निवारा...

Submitted by प्राजु on 3 January, 2008 - 09:41

एक चाहूल इवलिशी ती
कोकीळेच्या अंतरी आली
जीव कोवळा नाजूक साजूक
'आई' म्हणोनी साद घाली..

"ऐक सख्या रे अंतरी माझ्या
अंश आपुला अंकुरतो...."
घेई भरारी हर्षभरे तो..
कोकीळ कूजन करू लागतो..

ना वसंत ना पालवी नवी
ना आम्रतरू मोहरला..
कूजन ते अकल्पित नवे
सारा निसर्ग गहिवरला...

"गलिच्छ आणिक बेसूर वाटे
नको सख्या ती 'काक' सृष्टी...
आपुल्या खोपी जन्मेल तो
करू मायेची आपण वृष्टी.."

"हो राणी! झटेन मी पहा तू
त्या आपुल्या बाळासाठी..
हक्काचे घर देईन त्याला
उडण्या-बागडण्यासाठी.."

रात्रंदिन तो झटू लागला
जमवित काडी काडी धागा
आकार ना परि घेई खोपा
कोकीळ तो मग करी त्रागा..

"हरलो राणी !" बोले कोकीळ
"भिकार माझा जन्म सारा
गाण्याविन ना ठाव काही
कसा बांधू मी निवारा?"

उडे कोकीळा सैरभैर मग
कोकिळ तिजला सावरू पाही
"नकोस राणी! नको गं अशी...
दैवंच!... बाकी काही नाही.."

थकले भागले जोडपे ते
नकळत विसावे त्या तिथे...
सावळा 'गोळा' सोडून पाही
एक रिकामे घरटेच ते..!

- प्राजु.

गुलमोहर: 

दाद आपुल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्राजु

प्राजू छान . वेगळाच विचार . पण थकले भागले.. घरटेच ते. म्हणजे नक्की काय?

मेघा