असं एखादं पाखरू वेल्हाळ..!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास ऑफिसातून खाली येतो रोज. तळमजल्यावर, पण मागल्या बाजूला चहाचं दुकान आहे, तिथं चहा प्यायला. इमारतीत गाड्यांना येण्यासाठी पुर्व-पश्चिम, आणि दक्षिण-उत्तर असे दोन पॅसेजेस आहेत. ते एकत्र येतात, तिथंच हे चहाचं दुकान आहे. चहा - हे कधी गरज, तर कधी नुसतंच निमित्त. इमारतीच्या विशिष्ठ रचनेमुळे तिथे छान, प्रसन्न हवा खेळती असते. चहाबरोबर ती अनुभवावी, शिवाय बाजूच्याच कट्ट्यावर बसून येणारे जाणारे, चहा पीत गप्पा मारणारे न्याहाळावे. मग त्रासलेलं डोकं जरा स्थिर, थंड होतं.

आजही तसाच आलो, अन हवा अंगावर घेत, चहा पीत सहज वर पाहिलं, तर एक कबूतर काही तरी हेरून त्याशी झटत, पिंगा घालत होतं. नीट पाहिलं, तर पलीकडच्या कुठच्या तरी इमारतीवरून कुणी पतंग उडवीत असेल, त्याचा तो दोरा, म्हणजे मांजा होता. आमच्या इमारतीच्याही पलीकडे त्याचा पतंग गेल्यामुळे फक्त मांजाच दिसत होता.

त्या मांजाचा वेध घेत हे पाखरू वरवर जाऊ लागलं. तो पतंग त्याला सहन होईना की काय नकळे. पतंग पाहिल्यावर त्याला चेव आला असावा, अन हवेतच त्या पतंगाशी हुतूतूचा खेळ त्याने आरंभला. कदाचित, हे काय नवे, किंवा काय होतंय बघू या, किंवा नवीन काहीतरी करून पाहू या- अशा विचाराने ते पतंगाच्या अलीकडे पलीकडे उडून त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागलं असावं. हे असं धीट कबूतर कधी पाहिलं नव्हतं. मग मी लक्षपूर्वक बघतच राहिलो..

अचानक आलेल्या वार्‍याच्या जोरदार झोतामुळे पतंग भिरभिरत खाली येऊ लागला, अन पतंगाशी खेळत असलेल्या कबूतराची भंबेरी उडाली. पतंग वेडावाकडा खाली येऊन इमारतीच्या वर असलेल्या होर्डिंगच्या लोखंडी खाम्बांमध्ये अडकून फाटला, अन मांजाही तिथेच गुंडाळला जाऊन अडकून बसला.

कबूतराने त्या होर्डिंगवर बसून इकडे तिकडे पाहिले. मग फाटलेल्या पतंगाचे अन त्याच्या अडकलेल्या दोर्‍याचे निरीक्षण करीत बसले. या मस्त उडत असलेल्या पतंगाचे अचानक असे कसे झाले, हे बहूधा उमजेना त्याला.

मग ते जवळ आले, अन त्या दोर्‍याला तिथनं सोडवायचा प्रयत्न करू लागले..! प्रचंड कमाल वाटली मला त्या एवढ्याशा जीवाची. आपल्या कुवतीबाहेरचं करायचा हट्ट का ते धरतं आहे, तेच कळेना. कुतूहलाने मी त्याच्याकडे पाहू लागलो.

पलीकडच्या इमारतीवरून पतंग उडवणार्‍या पोरांनी पतंगाची आशा सोडून देऊन मांजाला हिसके द्यायला सुरूवात केली, तसे त्याभोवती फडफडत उडत असलेल्या त्या पक्ष्याचा पंख अन पाय त्यात अडकले. आपली त्वचा कापली जाईल असा तो मांजा..

मग मात्र आम्ही चहावाल्या पोर्‍याला पलीकडच्या इमारतीत पिटाळून तो दोरा सोडून द्या असे सांगण्यास पाठवले. पण हे कबूतर भयानकच अस्वस्थ झाले. पतंगाला वाचविण्याचा नाद सोडून ते प्रचंड आटपिटा करून स्वतःला त्या गुंत्यातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. पण फडफड वाढली तसे त्या दोर्‍याचे त्याच्या पंखा-पायांभोवतीचे वेढे वाढले, अन त्याची अवस्था अधिकच केविलवाणी झाली.

हा सर्व प्रकार पाहणारा कुणीही हळहळला असता. आम्ही मग चहा बाजूला ठेऊन इमारतीच्या गच्चीवर पळत गेलो. आठव्या मजल्यावर पोचेपर्यंत त्या बिचार्‍याची अवस्था अधिकच दयनीय झाली होती. पलीकडच्या पतंग उडवणार्‍या पोरांनी मांजा हिसके देऊन देऊन तोडला होता, अन सुटण्याची अयशस्वी धडपड करणारे हे पाखरू दमून, मांजाचे वेढे पंखा-पायांभोवती घेऊन उलटे लोंबकळत होते.

आम्ही दोरा कापून त्याला बाजूला घेतले, तेव्हा त्याच्या डोळ्यांत मुर्तिमंत भिती अगदी स्पष्ट दिसत होती. पंखाच्या मुळाशी त्या दणकट दोर्‍यामुळे रक्त आले होते. शेकडो वेढ्यांमुळे एक पाय अन एक पंख एकत्र बांधलेल्या अवस्थेत अजूनही तसेच होते. खाली पळत येऊन आम्ही एका ऑफिसातून कात्री मागवली. अन हलकेच एक एक धागा बाजूला करून कापू लागलो.

हे सगळे होईस्तोवर भरपूर गर्दी जमली होती. करकचून आवळले गेलेले ते सर्व वेढे सुटले, अन आम्ही त्याला जमिनीवर ठेवले, तेव्हा ते कबूतर अक्षरशः कोलमडून चक्क आडवे पडून गेले. मग चहाच्या दुकानातल्याच थाळीत पाणी घेऊन त्याला कोपर्‍यात नीट बसवले. थोडा वेळ मलूल होऊन तसेच बसून राहिले. अन मग दमलेल्या वृद्ध माणसासारखे हळूच उठून पाणी पिऊ लागले..

मी तिथेच कट्ट्यावर बसून त्याच्याकडे बघत राहिलो. विचारात गढून गेल्यावर वावटळीनंतर पावसाची हलकी सर कधी येऊन गेली, ते कळलंच नाही..

मनाशीच हसलो. अशा सरी येऊन जायला कोणती वावटळ कारण ठरेल, काय सांगावे?

***

आयुष्यभर वावटळी येतच असतात छोट्यामोठ्या खरं तर. त्यातल्या बर्‍याच स्मरण्याच्या पलीकडे जातात. काही मात्र निरनिराळ्या कारणांनी लक्षात राहून जातात.

आता आठवली, ती घटना काही वर्षांपूर्वीची. नोकरी करीत असतानाची.

साखर कारखान्यातल्या सेंट्रिफ्युगल मशिन्स मध्ये (मळी व साखर वेगवेगळे करण्यासाठी) लागणार्‍या निकेलच्या जाळ्या हे आमच्या कंपनीचं मुख्य उत्पादन. भारतात मोनोपॉली. मार्केटिंगची फारशी गरज नाही. स्पर्धा नाही. फारसं डोकं चालविण्याची गरज नाही. एकंदर काही काँप्लिकेशन्स नाहीत. सगळं कसं अगदी सुखेनैव चाललं होतं!

पण मन रमेना. हे काही खरं नव्हे, इथे आपल्याला करण्यासारखं काही फारसं नाही, एकंदरीतच हे काही आपलं काम नाही असं राहून राहून वाटे.

अशातच बरेलीहून एक कंप्लेंट आली. आमच्या जाळ्या दोनेक महिने चालणे अपेक्षित असताना मशिनमध्ये टाकल्यावर त्या चार आठ दिवसांत कागद टरकावून द्यावा, तशा फाटत होत्या. त्या कारखान्याला दिलेला मालाच्या नोंदी तपासून पाहत असतानाच प्रतापपूर, लखनौ, सितापूर, रायबरेली अन इतर ठिकाणांहून आणखी काही तक्रारी आल्या. कुठे नवीन स्क्रीन असतानाच फाटण्याच्या, तर कुठे स्क्रीनवरचे निकेल घासले जाऊन आठवड्याभरात निकामी होण्याच्या, एकाच महिन्यात डझनभर तक्रारी!

मी आमच्या एम.डी. ना, देशपांडे साहेबांना सांगितले, 'मी जातो युपीत. सगळ्या साईट्स ना प्रत्यक्ष भेटी देतो.' आमच्यासारख्याला काय नवीन काम द्यावे, हा प्रश्न पडलेले साहेब लगेच हो म्हणाले.

सगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष मशिन्स बघितली. तिथल्या ऑपरेटर्सना माझ्यासमोर स्क्रीन मशिनमध्ये बसवून दाखवा सांगितले. चीफ केमिस्ट अन चीफ इंजिनियर्सशी बोललो. मळीचे घटक तपासले. (मळीचा पीएच प्रमाणाबाहेर असेल, स्क्रीन प्रचंड वेगाने घासला जातो.) ठिकठिकाणच्या उसाचे ऊतारे तपासले. आमच्या स्पर्धक कंपनीचे स्क्रीन्स कुठे वापरले जातात, ते बघितले. (काही कारखाने अर्धा माल आमच्याकडून आणि कमी किंमत असल्यामुळे अर्धा माल आमच्या स्पर्धकांकडून मागवत.)

एक-दोन ठिकाणी सगळे व्यवस्थित असूनही स्क्रीन्स फाटत, घासले जात होते. हा आमचाच दोष होता. बाकी बहूतेक ठिकाणी मात्र बसवण्याची पद्धत, मळी योग्य प्रक्रिया न करताच मशिनमध्ये पाठवणे, एका मशिनला दुसर्‍या मशिनची जाळी बसवणे असे प्रकार निघाले. तर काहींनी चक्क स्पर्धक कंपनीचे स्क्रीन्स फाटले म्हणून तक्रार आमच्याकडे केली होती!

परत पुण्यात आलो, अन भला मोठा रिपोर्ट, एक्सेल शीटसह तयार करून साहेबांकडे गेलो.
म्हटले, 'सर, कस्टमर एज्यूकेशन आवश्यक आहे, जे आजपर्यंत आपण केलेले नाही. तुमची चुक आहे, असं सांगून सहसा कुणाला मान्य होणार नाही. तुमच्या ऑपरेटिंग कंडिशन्समधले अ ब क ड इत्यादी घटक प फ ब भ इतक्या प्रमाणात असले; तर जाळीचं आयुष्य अमुक तमुक ढमुक इतके अपेक्षित आहे (Screen Life is Function of those 'N' number of Parameters.. etc.)- हे कोष्टक बनवून या सार्‍यांना सांगायला हवे..'

'ते कोष्टक कसे तयार करणार?' साहेबांनी उत्सुकतेने विचारले.

'आपली उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञान अन आता आलेल्या तक्रारी आणि तिथे मी नोंदविलेल्या 'ऑपरेटिंग कंडिशन्स' याबाबत भारतातील प्रमुख संशोधन संस्थांना विस्तारपुर्वक लिहितो. आम्हाला आमच्या कस्टमर्सना देण्यासाठी म्हणून, आमच्या स्क्रीनच्या लाईफसाठीचे एक मोजमाप, संदर्भपट्टी तयार करून द्या म्हणुन सांगतो. जरूर पडल्यास, त्यासाठीचे कन्सल्टिंग चार्जेस देऊ या आपण त्यांना..'

'अरे बाबा, पत्रे लिहून या अशा गोष्टी होत असतात का?' साहेब म्हणाले. आमच्या फॅक्टरीत सहसा कुणाला प्रवेश नसे. कंपनीतले काही उच्चपदस्थ गेल्या काही वर्षांत कंपनी सोडून गेले, अन या स्क्रीनचे उत्पादन त्यांनी आम्ही वापरत असलेलेच तंत्रज्ञान वापरून स्वतःच सुरू केले- हे त्यामागे महत्वाचे कारण होते.

'सर, ज्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्यांना रिप्लेसमेंट देणे हा फार सोपा उपाय आहे. पण अशाने वाईट पायंडा पडेल, अन काळ सोकावेल. आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आपल्याच स्पर्धक कंपनीने हे आधी केले तर?'

थोडा विचार करून सिगरेट चुरगाळत ते म्हणाले, 'ठीक आहे. फक्त प्रत्येक गोष्ट मला दाखवून कर..'

मला एकदम उत्साह आला. पुढचे चार दिवस आमच्या कारखान्यात मुक्काम ठोकला. प्रत्येक गोष्ट, प्रक्रिया नीट समजावून घेतली. आवश्यक ती टिपणे काढली. यासोबत माझा 'तक्रारप्रकल्प' जोडला. आमच्या कंपनीच्या वर्तमान-इतिहास इ. बद्दलही लिहिले. हे सर्व साहेबांना दाखवून, एक कव्हरिंग लेटर तयार करून भारतातले सर्व आयआयटी, आयआयएस अन इतर अजून काही ठिकाणी पाठविले.

त्यांच्याकडून उत्तर येण्याची, किंवा अगदी तातडीने प्रतिसाद मिळण्याची साहेबांनाच काय, पण मलाही आशा नव्हती. पण इथवर आलो, तशी पुढचीही काहीतरी दिशा दिसेल, असं वाटत होतं. डोंगर चढल्याशिवाय पलीकडची दरी, जंगल वगैरे कसे दिसणार?

एक दिवस अचानक मला आमच्या रिसेप्शन डेस्कवर 'आयआयएस, बंगलोर' चं पाकिट दिसलं. आलेली पाकिटे फक्त सेक्रेटरीने फोडून, ती ऑफिसात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायची असा शिरस्ता होता. मी मिनतवार्‍या करून साहेबांच्या सेक्रेटरीकडून ते वाचायला मागितलं. तिला विषय माहिती असणे, किंवा कळणे शक्य नव्हते. कशीबशी, कुणालाच न बोलण्याच्या अटीवर ती कशीबशी तयार झाली.

मी त्या लांबलचक पत्रावरून झरझर नजर फिरविली. तिथल्या शास्त्रज्ञांनी या विषयात रस दाखविला होता. काही प्रश्न विचारले होते, आणि काही सँपल्स घेऊन मला बंगलोरला बोलावले होते. मग त्यानंतर ते आमच्या ऑफिस अन फॅक्टरीला अभ्यासासाठी भेट देणार होते.

मी टुण्णकन उडीच मारली. पत्र पुन्हा होते तसे ठेवले, अन मनातल्या उकळ्या दाबत, इतरांना काही कळणार नाही अशी काळजी घेत जागेवर गेलो.

लंच टाईमनंतर सगळी पत्रे आत गेल्याचं मी पाहिलं. पण नंतर पुर्ण दुपारभर, अन नंतर दुसर्‍या दिवशीही मला केबिनमधून बोलावणे आले नाही. मी जाऊन याबद्दल विचारतो, तर मी पत्र चोरून वाचल्याचं त्यांना समजलं असतं. त्यामुळे ती इच्छा मी दाबून टाकली.

तिसर्‍या दिवशी त्यांच्याकडून बोलावणं आलं, तेव्हा घाईघाईने मी आत गेलो. त्यांचा प्रचंड गंभीर चेहेरा बघून मला जरा भीतीच वाटली.

मग लायटरने सिगरेट पेटवत, एकेक शब्द सावकाश उच्चारत ते आपल्या जाड, घोगर्‍या आवाजात म्हणाले, 'आपल्या ग्रुपने निकेल स्क्रीन्सच्या व्यतिरिक्त पुल्ट्रडेड ग्लास फायबर सेक्शन्सचं प्रॉडक्शन नवीन कारखान्यात सुरू केलं आहे, हे तुला माहिती आहेच. तर तिथे तुझी गरज आहे. उद्यापासून तु तिथे जा!!'

***

एक सर येऊन गेली, तरी का कुणास ठाऊक, पण उकडत होतं. धो धो पाऊस यायला हवा खरा. म्हणजे हे सारं मळभ दुर होईल, जरा उत्साह तरी वाटेल. हे असं कुंद, बधिर वातावरण म्हणजे भलतंच कंटाळवाणं..

बाजूला बघितले, तर ते कबुतर मात्र जरा हुशार झालेले. इकडे तिकडे मान हलवत बसून राहिले होते. मध्येच वरती निरखून आपल्या जातभाईंच्या खेळण्या-उडण्याकडे बघत होते. पंख अन पाय जबरी दुखावला असावा. उडायचे सोडाच, पण त्याला पाय टाकणेही जमत नव्हते.

त्या पतंगाला, अन मांजाला पकडायला गेल्याची आगळिक भोवल्याचे कळले की नाही याला? की असा आगाऊपणा नेहेमीचाच आहे याचा? त्याच्याकडे पाहता पाहता मनात विचार येऊन गेला. आज आम्ही कुणी बघितले नसते, तर दोर्‍याशी झुंजून, त्याभोवती स्वतःला गुंडाळून घेऊन शेवटी मेले असते हे.

पुन्हा विचारांत गढून गेलो असतानाच पोरांचा मोठा आवाज, अन गलका ऐकू आल्यामुळे पाहिलं, तर एका चांगल्या धष्टपुष्ट मांजराने डाव साधला होता. कुठेतरी दबा धरून बसले असावे अन संधी मिळताच त्या पाखरावर झडप घालून, त्याला तोंडात धरून पळत होते.

जीवाच्या आकांताने सर्वांनी त्या मांजराचा पाठलाग केला, एक दोघांनी चप्पल बुटही मारून फेकले. शेवटी, त्या मोठ्या पॅसेजमध्ये पळताना मोठ्या आवाजांनी भेदरून जाऊन, आयती मिळालेली शिकार सोडून देऊन त्या मांजराने कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढला.

ते पाखरू भेदरून पुन्हा मेल्यासारखे पडून राहिले. कमनशिब म्हणावे तरी किती? आगीतून फुफाट्यात अशी अवस्था झाली होती त्याची. मघाशी छोटासा आगाऊपणा केल्याची किंमत त्याला अजूनही मोजावी लागत होती, अन ती त्या एवढ्याशा जीवाच्या मानाने जरा जास्तच होती. पोरांनी धावत जाऊन पुन्हा त्याला उचलले, अन आत सुरक्षित जागी नेऊन ठेवले. त्या बिचार्‍यावर आता जरा जास्तच लक्ष ठेवावे लागणार होते..

***

काहीच पुर्वसूचना न देता, मुदत वगैरे न देता, माझे मत न विचारता कंपनीने असं करावं हे जरा गंभीरच होतं. पण कोणतीही प्रतिक्रिया न देता, सहकार्‍यांमध्ये काहीही न बोलता मी सांगितलेले काम करण्याचा निर्णय घेतला. आणखी वादात न अडकता, माझे काय चुकले- याचा विचार करण्यासाठी मला वेळ हवा होता.

आमच्या नवीन प्लँटला कुलकर्णी नावाचे एमडी होते, अन आमच्या ग्रुपमधील सर्व लोकांत ते 'खवीस' या नावाने प्रसिद्ध होते. पहिल्या दिवसापासूनच माझ्याविरुद्ध असहकाराचे धोरण त्यांनी स्वीकारले. मॅनेजमेंटचा कुलकर्णींवर अजिबात विश्वास नाही, अन इथल्या बातम्या तिकडे म्हणजे मॅनेजमेंटला व्यवस्थित कळाव्या म्हणून मला इथं 'प्लँट' केलं गेलं आहे, अशी त्यांची पक्की समजूत झाल्याचं मला थोड्याच दिवसांत कळलं. मला अशा गोष्टींत रस नाही, मी फक्त इथे काम करायलाच आलो आहे, असं मी त्यांना कधी आडून तर कधी स्पष्ट सांगून बघितलं, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांनी आरोप करणं सुरूच ठेवलं.

पुढे हे वाढतच गेलं. काही आवश्यकता नसताना मला पुण्याबाहेर कित्येक दिवस अडकवून ठेवणे, माझ्यासमोर ग्रुपमधल्या इतर कंपन्यांच्या संचालकांबद्दल वाईटसाईट बोलणे, सुटीच्या दिवशीही बोलावून घेऊन दिवसभर नुसतेच बसवून ठेवणे, इतर सहकार्‍यांसमोर टोमणे मारणे असे बालिश उद्योग त्यांनी सुरू केले.

असेच कसेबसे पाच सहा महिने काढल्यानंतर एक दिवस मला हेडऑफिसमधून बोलावणे आले. कुलकर्णींनी पाठविलेला रिपोर्ट माझ्यासमोर ठेवण्यात आला. गेल्या काही महिन्यांतल्या कमी झालेल्या सेलबद्दल, शिवाय अनेक कस्टमर्सच्या तक्रारीही नीट न हाताळल्याबद्दल माझ्यावर ठपका ठेवण्यात आलेला होता.

आमचे ग्रुपचे अध्यक्ष समोर बसले होते. रिपोर्ट बाजूला सारून मी शांतपणे त्यांना साम्गितले, 'सर, मला तिकडे नक्की कोणत्या हेतूने पाठविण्यात आले होते, ते मला माहिती नाही. ते तुम्ही देशपांडे साहेबांनाच विचारा. मी त्यांच्याकडे असताना काय काम केले होते, तेही त्यांना चांगलेच माहिती आहे. पण कदाचित तसे काम केले जाणे इथे अपेक्षित नसावे. मुळात स्वतःचे डोके चालविणे इथे अपेक्षित नाही, अन हा माझाच नाही तर इतर अनेक जणांचा अनुभव आहे. आपल्या नवीन कारखान्यातही काम सोडून इतर उद्योग करणेच अपेक्षित असावे. मला जमले नाही, अन भविष्यातही जमणार नाही असे समजा. इथे माझी गरज नाही. मी राजीनामा देतो आहे सर, नमस्कार!'

***

अंधार पडत आला होता. बाजूला पाहिले, तर पोरांनी त्या कबूतराला पुन्हा बाहेर आणले होते. मघाशी कुठून तरी औषध वगैरेही त्याला लावले, दिले होते.

बाहेर आल्यावर ते पुन्हा बावरले असावे, पण मग नंतर नीट सावरले, धीट झाले अन ओंजळीतून त्याने उड्डाण केले. पण थोडे वर जाऊन पुन्हा ते कोसळल्यासारखे झाले, अन भिरभिरत पार्किंग लॉटमधल्या एका कारच्या छतावर धपकन पडले.

आमच्यातल्या अनेकांचे च्च..च्च.. आवाज ऐकून ते तिथेच पुन्हा नीट सावरून बसले. पुन्हा तयारी करून त्याने उड्डाण घेतले, अन हळूहळू वर जाऊन व्यवस्थित उडू लागले.

मघाशी त्याच्या जीवावर उठलेला दोरा अजूनही अडकलेल्या होर्डिंगच्या लोखंडी खांबावर ते बसले. क्षणभर, जणू विश्रांतीसाठी. मग त्याच्याकडे पाठ करून ते पंख पसरून आणखी वर जाऊ लागले.

त्याच्या पंखांत आता बळ आले होते. गाठीशी जीवघेणा अनुभव होता. अन समोर मोकळे आकाश होते..

***

पायर्‍या उतरताना मी पुन्हा मागे वळून बघितले. अनेक कडू गोड आठवणी त्या इमारतीत होत्या. अन त्यांनी बरंच काही दिलं होतं.

क्षणभर पाय रुतल्यासारखे झाले. इतक्या दिवसांचा ऋणानुबंध. सहज कसा तुटेल? पण मग निग्रहाने पाठ फिरविली. इथले बोलावणे पुन्हा येणार, हे माहितीच होते. पण आता नोकरी नकोच. इथे नको नि कुठेच नको.

पण काय करणार मग?

बाहेर आलो, तर खुप सारे लोक रस्त्यांवर वाहत असल्यासारखे चालले होते. अनंत वाहनेही त्यातच मिसळून जाऊन वाहत होती. पुढे गेलो, तर खुप सारे रस्ते, चौक, नि सिग्नल्स. इतके सारे सिग्नल्स माझ्यासाठीच असल्याचा भास झाला. रस्ते आणि चौक यांतला फरक समजेनासा झाला. त्या प्रचंड गर्दीतली वाहने कोणती अन माणसे कोणती हे समजेनासे झाले.

एक क्षणभर भिरभिरलोच. डोळे मिटून थोडा वेळ कडेला तसाच उभा राहिलो.
मग डोळे उघडले, अन पुन्हा चालू लागलो. अचानक, कसं नि कुणास ठाऊक, पण पावलांखालच्या जमिनीने बळ दिल्यासारखं वाटलं.

जमीन, अन पावलांचं असं नातं गेल्या पंचवीस वर्षांत कधी जाणवलं नव्हतं. आजूबाजूच्या एवढ्या प्रचंड कोलाहलातही मी जमिनीकडे एक कृतज्ञतेची नजर टाकली.
अन मग समोर पाहून एका अनामिक निश्चयाने चालू लागलो..

***
***
संपूर्ण
***

विषय: 
प्रकार: 

एकदम जबरदस्त! खूप आवडलं!

मस्त कथानक. पुढे काय होणार याचा पाखरामुळे थोडा अंदाज येऊ लागतो तरी वाचावेसे वाटते. फारच आवडले.

वाह !!! केवळ अप्रतिम !!!

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

व्वाह साजीरा, कसलं जबरदस्त लिहीलं आहेस.... मस्तच !

फारच छान!! इतकं साधे सरळ थेट भिडणारे लिहिलेय,व्वा!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

बरेच दिवसांपासून वाचायचं होतं. अखेर आज मुहूर्त लागला. मस्त लिहीलं आहेस. Happy दोन्ही प्रसंग एकमेकांत छान गुंफले गेलेत.

खूप सुंदर. दोन घटनांची गुंफण मनाला भावून गेली.
त्या पाखरासारखीच तूही घेतलेली झेप सफल व्हावी, ही शुभेच्छा. Happy

निवान्त वाचण्यासाठी खास राखून ठेवलं होतं. वा क्या बात है. अतिशय सुन्दर. गोळीबन्द लिखाणाची स्टाईल आहे.लिखते रहो.

है और भी दुनियामे है सुखनवर बहुत अच्छे
कहते है के 'साजिर्‍याका' है अंदाज्-ए- बयां और...

फारच सुरेख ! लेख वाचताना 'असं एखादं पाखरु वेल्हाळ' ची धूनही रेंगाळत होती मनात त्यानेही वेगळाच परिणाम साधला.

मस्तच आहे. सुरेख शैली. निव्वळ अप्रतिम! मागेही वाचली होती पण प्रतिक्रिया दिली नव्हती. आज 'कथाकथी' वर पुन्हा लिंक मिळाली (धन्यवाद Fortyniner) आणि परत वाचली.

मस्त ! Happy विशेषकरून ते जमीन आणि पायांच्या नात्याचं वाक्य....जबरी !

**********************************************************
" दिखला दे ठेंगा उन सबको जो उडना ना जाने ! "

अहाहा!!! फार सुंदर लिहिलेय साजिरा.... तुमचे लेखन विसरले जात नाही... मार्केटिंगविषयीचा लेखही असाच खुप छान होता. पाखरासोबतची अ‍ॅनालॉजी खुप भावली... Happy हा धागा वर आणणार्‍यांचे अनेक आभार!!!

Pages