आज फुलांची भाषा.....

Submitted by मानस६ on 31 December, 2007 - 12:34

आज फुलांची भाषा.....

आज फुलांची भाषा मजला कळते आहे
फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे

उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?

शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?

आज वाल्मिकी पुन्हा करु सुरवात नव्याने,
क्रौन्च होऊनी ऊर अता भळभळते आहे

एक पालखी हाय, जरी ही दूर निघाली,
नजर ’आतली’ मात्र मजकडे वळते आहे!

आज जरी हा पिंपळ इथला वठून गेला ,
एक-एक हे पान बघा; सळसळते आहे!

- मानस६

गुलमोहर: 

मानस,
वृत्त कोणते आहे??
काही ठिकाणी meter चुकल्यासारखे वाटतेय...
उदा. आज फुलांची भाषा मजला कळते आहे
फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे

उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?
- हा मस्तच आहे...
एक पालखी हाय, जरी ही दूर निघाली,
नजर ’आतली’ मात्र मजकडे वळते आहे! - हा ही आवडला...
चुभूद्याघ्या..

उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?

मला व्याकरण समजत नाही...पण शब्द सारे सुंदर!

उमेश जी

खुपच छान!
नुकताच मी प्रेमात पडलोय......त्यामुळे तर......अनुभवतोय..... खरच....

मानस , एक छोटीशी शंका
फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे.......... इथे ऊर दरवळतो असायला हवं ना रे? कारण आपण ऊर भरुन आला......असं म्हणजे पुल्लिंगी वापरतो ना?