सागर - सरिता

Submitted by अजित अन्नछत्रे on 23 November, 2026 - 01:35

सहस्त्र योजन चालुनि आले, शेवटची पायरी..
आज मी उभी तुझ्या दारी, सागरा, उभी तुझ्या दारी !

अवखळ, चंचल माझे शैशव, रुसले फुगले मनोमनी
रुणझुण पैंजण लेउन फिरले, कडे-कपारी वनोवनी
चितारलेल्या तव प्रतिमेला, कवटाळुनिया सदा उरी..
आज मी उभी तुझ्या दारी, सागरा, उभी तुझ्या दारी !

वेली फुलल्या, शेते पिकली, वनराई अन् वृक्ष-लता
माळरानिही फुले बहरली, ठाई ठाई रे हीच कथा
तूच रचेता, तुझीच रचना, त्वया रचिली ही किमया सारी..
आज मी उभी तुझ्या दारी, सागरा, उभी तुझ्या दारी !

लवणयुक्त आप तुझे, मधुर मधुर मम काया
उदंड तू अमाप तू, अल्पशी माझी छाया
तू अनंत, मजसी अंत, पण रूप तुझे रे अंतरी..
आज मी उभी तुझ्या दारी, सागरा, उभी तुझ्या दारी !

सहस्त्र योजन चालुनि आले, संथशी माझी गती
तुझजवळी मज खेचून नेते, सुप्त आस ही तुझ्या प्रति
दोन पाउले केवळ उरली, शेवटची पायरी..
आज मी उभी तुझ्या दारी, सागरा, उभी तुझ्या दारी !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...

छान