बांधावरच्या बाभळी - एक अनुभव

Submitted by खुशालराव on 18 November, 2026 - 05:53

गदिमा म्हटले की, आपल्याला लगेच आठवण येते ती “कुश लव रामायण गाती” किंवा लहानपणी आवडीने ऐकलेले “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” हे गीत! आपल्या अजरामर ‘गीत रामायणा’मुळे ‘मराठीचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांचाच एक कथासंग्रह म्हणजे ‘बांधावरच्या बाभळी’.

झाले असे की, मला पुस्तके वाचायला आवडतात हे माहीत असल्यामुळे माझ्या गेल्या वाढदिवसाला मित्रांनी मला काही पुस्तके भेट दिली, त्यात ‘बांधावरच्या बाभळी’ हे पुस्तकही होते. गदिमांच्या काही कविता मी शालेय जीवनात वाचल्या होत्या, पण त्यांच्या कथा वाचण्याचा योग कधी आला नव्हता; तो या पुस्तकाच्या निमित्ताने आला.

प्रत्येक लेखकाची एक खास शैली असते. या कथासंग्रहाच्या माध्यमातून मला गदिमांची शैली अभ्यासता आली आणि “आपण याआधी गदिमांचे कवितांशिवाय इतर लेखन का वाचले नाही?” असा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहिला नाही.

या कथासंग्रहात प्रामुख्याने गावातील जीवन, माणसांच्या भावना आणि विविध स्तरांतील लोकांचे वेगवेगळ्या परिस्थितीतील वागणे यांचे चित्रण करणाऱ्या कथा आहेत. प्रतिकूल परिस्थिती आली तरी शेताच्या बांधावरची बाभूळ जशी डिगाने न डगमगता तग धरून उभी राहते, तसेच या कथांमधील पात्रांचे जीवन आणि त्यांचे वागणे आहे.

गदिमांच्या लेखनात एक प्रकारची लयबद्धता आहे; त्यांच्या काव्यलेखनाचा प्रभाव त्यांच्या गद्य लेखनावरही स्पष्टपणे दिसून येतो. लेखक आपल्याला इतक्या पटकन आणि सहजपणे वास्तविक जगातून कल्पनेच्या विश्वात घेऊन जातात की, आपण प्रत्यक्षात कथेतील घटनांचे साक्षीदार बनतो. सर्वकाही आपल्या डोळ्यांसमोर जिवंत उभे राहते. प्रत्येक वाचकाने हा अनुभव एकदा तरी नक्की घेतला पाहिजे, असे मला मनापासून वाटते.

जर तुम्ही हा कथा संग्रह वाचला नसेल, तर तो नक्की वाचा. आणि जर या आधी तुम्ही हा कथा संग्रह किंवा गदिमांचे गद्य लेखन वाचले असेल, तर ते तुम्हाला कसे वाटले, हे आम्हाला सांगायला विसरू नका!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults