दोस्ती... भाग 11 — अर्धी भाकरी... आणि अखेरची वाट!

Submitted by amol_koli on 14 November, 2026 - 16:38

### दोस्ती...
### भाग 11 (पुढे) — अर्धी भाकरी... आणि अखेरची वाट!

काही माणसं आयुष्यातून निघून जातात... पण त्यांची वाट पाहण्याची सवय मात्र जात नाही.
चंदूचे अखेरचे विधी आटोपून आम्ही घरी परतलो.
मी घरात पाऊल टाकलं.
नेहमीप्रमाणे घर होतं. तोच दरवाजा, तेच अंगण, तीच बैठक आणि त्याच खुर्च्या.
पण आज घर वेगळंच वाटत होतं.
मी एका खुर्चीत बसलो.
बाबाही समोरच्या खुर्चीत बसले.
त्यांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला. डोळे मिटले आणि काही क्षण तसेच बसून राहिले.
माझ्या तोंडून सहज निघालं—
"आई, जरा पाणी आणतेस का?"
आणि पुढच्याच क्षणी मी गप्प झालो.
आई तर कित्येक वर्षांपूर्वीच आम्हाला सोडून गेली होती.
पाच वर्षांनी घरी परतल्यावरही कधीकधी मन जुन्या सवयी विसरत नाही.
माझ्या त्या एका हाकेने बाबांनी डोळे उघडले.
त्यांनी माझ्याकडे पाहिलं.
मी नजर खाली घातली.
"सॉरी बाबा... सहज तोंडातून निघालं."
बाबा काही बोलले नाहीत.
थोड्या वेळाने ते उठले. स्वयंपाकघरातून पाण्याचा तांब्या आणि ग्लास घेऊन आले.
माझ्यासमोर ठेवला.
"पाणी पी, मंगेश."
मी ग्लास हातात घेतला.
पण पाणी पिण्याआधीच माझ्या मनात अमोलचा विचार आला.
त्याने काही खाल्लं असेल का?
सकाळपासून तो माझ्या नजरेसमोर होता.
कधी रडताना.
कधी शांत बसलेला.
कधी रस्त्याकडे एकटक पाहताना.
मी बाबांना विचारलं—
"बाबा, अमोलने काही खाल्लं असेल का?"
बाबांनी दीर्घ श्वास घेतला.
"माहीत नाही रे."
"अशोकमामा त्याची काळजी घेत असतील ना?"
"घेत असतील. पण..."
बाबा थांबले.
"काही दुःखं अशी असतात, मंगेश, की माणसाला भूक लागली आहे की नाही, हेसुद्धा कळत नाही."
मी ग्लास टेबलावर ठेवला.
माझ्या मनात एकच प्रश्न होता.
चंदूशिवाय अमोल आता कसा राहणार?
### १. रामूकाकांच्या घरात...
त्या रात्री रामूकाकांच्या घरी शेजारच्या बायका जेवण घेऊन आल्या होत्या.
कुणी भाकरी आणली होती.
कुणी भात.
कुणी आमटी.
कुणी भाजी.
रामूकाका घराच्या ओसरीवर बसले होते.
सुशीलाकाकू आतल्या खोलीत शांत बसल्या होत्या.
एका शेजारणीने त्यांच्यासमोर ताट ठेवलं.
"सुशीला, दोन घास खाऊन घे गं."
सुशीलाकाकूंनी मान हलवली.
"नगं..."
"अगं, दिवसभर काही खाल्लं न्हाईस."
"नगं म्हणलं ना..."
शेजारीण त्यांच्या जवळ बसली.
"असं उपाशी राहून कसं चालंल?"
सुशीलाकाकूंनी ताटाकडे पाहिलं.
आणि अचानक त्यांचा आवाज भरून आला.
"आक्का..."
त्या थांबल्या.
"रोज आधी चंदूला वाढायचे गं मी..."
शेजारीण गप्प झाली.
"तो म्हणायचा, आई, आज भाकरी जरा जास्त दे. अमल्या बी खाणार हाय..."
सुशीलाकाकूंनी डोळे पुसले.
"आज ताट वाढलंय... पण माझा चंदूच न्हाई..."
त्या रडू लागल्या.
शेजारणीने त्यांना जवळ घेतलं.
बाहेर रामूकाकांसमोरही जेवणाचं ताट ठेवण्यात आलं.
एक गावकरी म्हणाला—
"रामू, थोडं खाऊन घे."
रामूकाकांनी ताटाकडे पाहिलं.
मग हळू आवाजात विचारलं—
"कसं खाऊ रं?"
कुणी उत्तर दिलं नाही.
"माझं पोरगं गेलं... अन् मी इथं बसून जेवायचं?"
त्यांचा आवाज थरथरला.
"कालपर्यंत माझ्यासंगं भाकरी खाणारा चंदू... आज त्याची जागाच रिकामी हाय..."
गावकरी त्यांच्या शेजारी बसला.
ताट तसंच राहिलं.
### २. अशोकमामांच्या घरात...
अमोलच्या घरातही वेगळी परिस्थिती नव्हती.
अशोकमामांनी जेवणाचं ताट तयार केलं होतं.
भाकरी, भाजी आणि थोडा भात.
अमोल एका कोपऱ्यात बसला होता.
अशोकमामा त्याच्या जवळ गेले.
"अमल्या..."
अमोलने मान वर केली नाही.
"चल, दोन घास खाऊन घे."
उत्तर नाही.
अशोकमामा त्याच्या शेजारी बसले.
भाकरीचा छोटा तुकडा मोडला.
त्यावर भाजी ठेवली.
आणि अमोलच्या जवळ धरला.
"चल रं बाळा..."
अमोलने मान हलवली.
"नगं बाबा."
"दिवसभर कायबी खाल्लं न्हाईस."
"भूक न्हाई."
अशोकमामा थोडा वेळ शांत बसले.
मग म्हणाले—
"अमल्या, माझ्यासाठी तरी खा रं."
अमोलने त्यांच्याकडे पाहिलं.
त्याचे डोळे भरून आले.
"बाबा..."
"बोल रं."
"चंदू बी जेवला नसंल ना?"
अशोकमामांच्या हातातला घास तसाच राहिला.
त्यांना काही बोलता आलं नाही.
अमोल पुढे म्हणाला—
"आम्ही दोघं असलो की एकमेकाला विचारायचो... जेवलास का रं?"
त्याने ताटाकडे पाहिलं.
"आता मी कुणाला विचारू?"
अशोकमामांचे डोळे भरून आले.
त्यांनी ताट बाजूला ठेवलं.
अमोलला जवळ घेतलं.
"अमल्या..."
एवढंच ते बोलू शकले.
त्या रात्री दोघंही बराच वेळ एकमेकांच्या जवळ बसून राहिले.
### ३. एक रस्ता... आणि रोजची वाट
पुढचे दोन दिवस अमोल फारसा कुणाशी बोलला नाही.
कधी घराच्या ओसरीवर बसायचा.
कधी अंगणात.
कधी शाळेच्या रस्त्याकडे पाहत राहायचा.
तोच रस्ता...
ज्यावरून चंदू सायकलवर यायचा.
दूरवरून घंटी वाजवत.
"ए अमल्या! चल की रं!"
अमोलला जणू तो आवाज अजूनही ऐकू येत होता.
एखादी सायकल रस्त्यावरून गेली की तो नकळत मान वर करायचा.
पण ती चंदूची सायकल नसायची.
संध्याकाळ झाली की तो आकाशाकडे पाहत बसायचा.
कधी त्याच्या हातात भाकरी असायची.
पण ती खाल्ली जायची नाही.
त्याला पाचवीतला तो दिवस आठवायचा.
चंदू जेवणाचा डबा घेऊन आला नव्हता.
अमोलने स्वतःच्या भाकरीचा अर्धा भाग त्याला दिला होता.
चंदू हसत म्हणाला होता—
"आरं अमल्या, तू खा की!"
"आधी तू खा."
"दोघं खाऊ की मग!"
आणि दोघांनी ती भाकरी वाटून खाल्ली होती.
त्या दिवसापासून त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली होती.
आज अमोलच्या हातात भाकरी होती.
पण ती वाटून खाणारा चंदू नव्हता.
### ४. तिसरा दिवस — चंदूची माती
तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो.
बाबा तयार झाले होते.
मीही त्यांच्यासोबत रामूकाकांच्या घरी जायला निघालो.
आज चंदूच्या अस्थिसंचयनाचा दिवस होता.
गावात त्याला साध्या भाषेत म्हणत होते—
"आज चंदूची माती हाय."
रामूकाकांच्या घरासमोर पुन्हा गावकरी जमले होते.
नातेवाईक आले होते.
काहींनी चंदूला आवडणारे पदार्थ आणले होते.
कुणी भाकरी.
कुणी भाजी.
कुणी भात.
कुणी गोड पदार्थ.
ते पदार्थ पाहून माझ्या मनात विचार आला—
एखाद्या माणसाला कोणता पदार्थ आवडायचा, हीसुद्धा त्याची किती जिवंत आठवण असते!
शंकरकाका नेहमीप्रमाणे तिथे होते.
पण आज त्यांचा आवाज शांत होता.
त्यांनी आणलेलं अन्न एका मोठ्या पोत्यात व्यवस्थित ठेवण्याची व्यवस्था केली.
गण्या, शिर्क्या आणि जित्या त्यांना मदत करत होते.
घरच्या परंपरेनुसार लागणारं साहित्य तयार होतं.
रामूकाकांनी अन्नाचं पोतं हातात घेतलं.
शंकरकाकांनी त्यांच्या जवळ जाऊन विचारलं—
"रामू, निघूया?"
रामूकाकांनी फक्त मान हलवली.
आम्ही सगळे स्मशानभूमीकडे निघालो.
अमोल माझ्या शेजारी चालत होता.
आजही त्याने फारसं काही खाल्लं नव्हतं.
मी त्याला विचारलं—
"अमोल, बरं वाटतंय ना?"
तो म्हणाला—
"हो दादा."
पण त्याचा चेहरा वेगळंच सांगत होता.
### ५. चंदूच्या आठवणींसमोर...
स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर गावातील वडीलधाऱ्यांनी आणि शंकरकाकांनी अस्थिसंचयनाची व्यवस्था केली.
चंदूच्या अस्थी मातीच्या कलशात ठेवण्यात आल्या.
बाकीची राख स्थानिक प्रथेनुसार वेगळी गोळा करण्यात आली.
सगळे शांतपणे उभे होते.
शंकरकाकांनी अन्न समोर ठेवण्यास सांगितलं.
फुलं आणण्यात आली.
गुरुजींनी प्रार्थना सुरू केली.
पसायदानाचे स्वर ऐकू येऊ लागले.
एकामागून एक माणसं पुढे येत होती.
फुलं अर्पण करत होती.
नमस्कार करत होती.
मग बाजूला जाऊन बसत होती.
बाबा पुढे गेले.
त्यांनी फुलं अर्पण केली.
काही क्षण हात जोडून उभे राहिले.
मग माझी पाळी आली.
मीही फुलं अर्पण केली.
आणि अमोलकडे पाहिलं.
तो शांत उभा होता.
त्याच्या हातात एक फूल होतं.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"चल, अमोल."
तो हळूहळू पुढे गेला.
त्याने फूल अर्पण केलं.
हात जोडले.
आणि अगदी हळू आवाजात म्हणाला—
"चंदू..."
पुढे त्याला काही बोलता आलं नाही.
त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
मी त्याला जवळ घेतलं.
तो माझ्या खांद्यावर रडू लागला.
मीही स्वतःला सावरू शकत नव्हतो.
### ६. कावळ्याची वाट...
विधी आटोपल्यानंतर सगळे थोड्या अंतरावर जाऊन बसले.
समोर चंदूला आवडणारे पदार्थ ठेवले होते.
स्थानिक परंपरेनुसार कावळा अन्नाला स्पर्श करेल, याची वाट पाहिली जात होती.
सगळीकडे शांतता होती.
पाच मिनिटं गेली.
दहा मिनिटं गेली.
वीस मिनिटं झाली.
पण कावळा आला नाही.
काही गावकरी एकमेकांकडे पाहू लागले.
शंकरकाका रामूकाकांच्या जवळ गेले.
"रामू, जा... नमस्कार करून ये."
रामूकाका उठले.
ते पुढे गेले.
हात जोडले.
आणि परत येऊन बसले.
मग सुशीलाकाकूंनाही पुढे जाण्यास सांगण्यात आलं.
त्यांनीही नमस्कार केला.
सगळे पुन्हा वाट पाहू लागले.
आणखी दहा मिनिटं गेली.
कावळा काही अन्नाजवळ आला नाही.
तेवढ्यात बाळूमामा म्हणाले—
"चंदूच्या आत्म्याला शांती मिळाली नसंल बहुतेक..."
काही लोकांनी मान हलवली.
बाळूमामा पुढे म्हणाले—
"आता हे अन्न गायीला द्या. उगाच किती वेळ वाट बघायची?"
शंकरकाका काही बोलणार, इतक्यात रामूकाका उठले.
"थांबा!"
सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.
रामूकाका काही क्षण शांत उभे राहिले.
मग म्हणाले—
"मला कळलं..."
कुणीतरी विचारलं—
"काय रामू?"
रामूकाकांचा आवाज भरून आला.
"माझा चंदू कशाची वाट बघतोय, ते मला कळलं..."
### ७. "अमल्या... चल माझ्यासंगं!"
रामूकाका आमच्याकडे चालत आले.
मी आणि अमोल थोड्या अंतरावर बसलो होतो.
रामूकाका अमोलसमोर थांबले.
त्यांनी त्याचा हात हातात घेतला.
"अमल्या..."
अमोलने त्यांच्याकडे पाहिलं.
"काका..."
रामूकाकांचे डोळे भरले.
"चल माझ्यासंगं."
अमोल उठला.
रामूकाकांनी त्याचा हात धरून त्याला अन्न ठेवलेल्या जागेजवळ नेलं.
सगळे शांतपणे पाहत होते.
रामूकाका अमोलकडे वळले.
"अमल्या, माझा चंदू तुझं लई ऐकायचा रं..."
अमोलच्या डोळ्यांत पाणी आलं.
रामूकाका पुढे म्हणाले—
"तू सांगितलंस की ऐकायचा..."
ते थांबले.
"आज बी एकदा सांग त्याला..."
अमोल रडू लागला.
रामूकाकांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
"सांग रं बाळा..."
"काका..."
"त्याला सांग... जेवून घे म्हणावं..."
अमोलने समोर ठेवलेल्या अन्नाकडे पाहिलं.
त्याच्या हातात अजूनही एक छोटंसं फूल होतं.
त्याने ते अलगद खाली ठेवलं.
हात जोडले.
आणि थरथरत्या आवाजात म्हणाला—
"चंदू..."
कुणीही आवाज केला नाही.
"आरं चंद्या... खाऊन घे की रं..."
अमोलचा आवाज भरून आला.
"असं उपाशी नगं राहूस..."
रामूकाकांनी डोळे मिटले.
अमोल पुढे म्हणाला—
"तुला आठवतंय का रं..."
तो थांबला.
"पाचवीत आपण एक भाकरी वाटून खाल्ली व्हती..."
त्याचे अश्रू थांबत नव्हते.
"तू म्हणाला व्हतास... अमल्या, दोघं खाऊ..."
अमोलने डोळे पुसले.
"आज बी तुझ्यासाठी भाकरी ठेवलीया रं..."
त्याने समोरच्या भाकरीकडे पाहिलं.
"खा ना चंदू..."
### ८. अर्धी भाकरी...
आणि तेवढ्यात—
दूरवरच्या झाडावरून एक कावळा उडत आला.
तो काही क्षण जवळच्या फांदीवर बसला.
सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
कावळा खाली उतरला.
अन्नाजवळ आला.
क्षणभर थांबला.
आणि त्याने भाकरीचा एक तुकडा उचलला.
तो तुकडा घेऊन कावळा पुन्हा उडून गेला.
काही गावकऱ्यांनी हात जोडले.
कुणी हळू आवाजात म्हणालं—
"कावळा शिवला..."
रामूकाका तिथेच खाली बसले.
त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
सुशीलाकाकूंनी चेहरा पदराने झाकला.
मी मात्र अमोलकडे पाहत होतो.
तो कावळा उडून गेलेल्या दिशेकडे एकटक पाहत होता.
त्याच्या डोळ्यांसमोर बहुधा पाचवीतला तो दिवस उभा राहिला होता.
शाळेच्या मागचं मैदान.
झाडाची सावली.
दोन मित्र.
आणि एक भाकरी.
अमोलने भाकरीचा अर्धा भाग चंदूला दिला होता.
चंदूने हसत तो घेतला होता.
आज अनेक वर्षांनी पुन्हा अन्नासमोर अमोल उभा होता.
पण यावेळी त्याच्यासोबत चंदू नव्हता.
अमोल माझ्याकडे वळला.
"दादा..."
मी त्याच्या जवळ गेलो.
त्याने माझा हात धरला.
आणि रडत म्हणाला—
"बघा ना दादा... चंदूनं आज बी अर्धीच भाकरी घेतली..."
माझ्या डोळ्यांतून अश्रू आले.
मी त्याला जवळ घेतलं.
तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिला.
मी काही बोललो नाही.
कारण त्या क्षणी त्याला समजावण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते.
कावळ्याने अन्नाला स्पर्श करणं हा तिथल्या लोकांसाठी परंपरेचा भाग होता.
पण अमोलसाठी त्या क्षणाला वेगळाच अर्थ होता.
त्याला त्याच्या मित्रासोबत वाटून खाल्लेली पहिली भाकरी आठवली होती.
आणि त्या आठवणीने तो पुन्हा एकदा चंदूच्या अगदी जवळ पोहोचला होता.
### ९. बाबांचे शब्द...
थोड्या वेळाने सगळे परतण्यासाठी उठू लागले.
अमोल अजूनही माझ्या जवळ उभा होता.
बाबा आमच्याकडे आले.
त्यांनी अमोलच्या डोक्यावरून हात फिरवला.
"अमोल..."
अमोलने बाबांकडे पाहिलं.
"सर..."
बाबा म्हणाले—
"चंदू तुझा खूप चांगला मित्र होता."
अमोलने मान हलवली.
"हो सर..."
बाबा काही क्षण थांबले.
"त्याच्यासोबतच्या चांगल्या आठवणी जपून ठेव."
अमोल शांत होता.
बाबा पुढे म्हणाले—
"आणि स्वतःचीही काळजी घे. अशोकमामा तुझी वाट पाहत असतील."
अमोलने पुन्हा मान हलवली.
मी बाबांकडे पाहिलं.
त्यांचे डोळेही भरून आले होते.
मला जाणवलं—
बाबांसाठी चंदू फक्त शाळेतला विद्यार्थी नव्हता.
त्यांनी त्याला लहानपणापासून वाढताना पाहिलं होतं.
त्याच्या खोड्या पाहिल्या होत्या.
त्याच्या मैत्रीचा निःस्वार्थपणा पाहिला होता.
आणि आता त्याच्या आठवणी जपणाऱ्या अमोलसमोर ते उभे होते.
### १०. परतीच्या वाटेवर...
आम्ही स्मशानभूमीतून परत निघालो.
सकाळचं ऊन आता वाढू लागलं होतं.
रस्त्यावरून चालताना मी अमोलचा हात धरला होता.
काही अंतर चालल्यावर त्याने मला विचारलं—
"दादा..."
"हं, अमोल?"
"तुम्हाला बाबा आमच्या शर्यतीची गोष्ट सांगितली का?"
मी त्याच्याकडे पाहिलं.
"हो रे. सगळी सांगितली."
"भाकरीची बी?"
"हो."
"आणि चंदूच्या प्रेमपत्राची?"
मी हलकंसं मान हलवली.
"तीसुद्धा."
अमोल काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला—
"चंदू लई वेडा व्हता दादा..."
त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर अगदी हलकंसं हसू उमटलं.
पण लगेच त्याचे डोळे भरून आले.
मी त्याला जवळ घेतलं.
"हो अमोल... बाबा सांगत होते. खूप खोडकर होता."
अमोल म्हणाला—
"पण मनानं लई चांगला व्हता..."
मी उत्तर दिलं—
"हो. तेही बाबांनी सांगितलं."
आम्ही पुढे चालत राहिलो.
काही वेळाने अमोलने माझा हात आणखी घट्ट धरला.
मला समजलं, त्याला अजून बोलायचं होतं.
पण आत्ता नाही.
कदाचित उद्या.
कदाचित आणखी काही दिवसांनी.
मी त्याला वेळ द्यायचं ठरवलं.
### ११. ती अर्धी भाकरी...
त्या रात्री मी बराच वेळ जागाच होतो.
डोळे मिटले की मला दोन चित्रं दिसत होती.
पहिलं—
पाचवीतले दोन लहान मित्र.
झाडाखाली बसलेले.
एकाच भाकरीचे दोन भाग करून खात असलेले.
आणि दुसरं—
आजचा अमोल.
हात जोडून आपल्या मित्राला म्हणणारा—
"चंदू... खाऊन घे की रं..."
मी उठून खिडकीजवळ आलो.
बाहेर अंकले गाव शांत झालं होतं.
दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता.
आकाशात चांदण्या होत्या.
मला चंदूच्या आयुष्याबद्दल विचार येत होते.
त्याने अमोलसाठी शर्यतीत मागे राहण्याचा निर्णय घेतला होता.
अमोलने त्याच्यासोबत भाकरी वाटली होती.
दोघांनी एकमेकांना कितीतरी छोट्या गोष्टींत साथ दिली होती.
त्यांच्या मैत्रीला मोठ्या वचनांची गरज नव्हती.
एकमेकांची काळजी घेण्याची सवयच पुरेशी होती.
आज अमोलला चंदूची आठवण झाली, तीही भाकरी पाहून.
कदाचित म्हणूनच त्या अर्ध्या भाकरीचा प्रसंग माझ्या मनातून जात नव्हता.
मी खिडकी बंद केली.
आणि मनात एक विचार आला—
चंदू आणि अमोलची मैत्री संपलेली नव्हती.
ती आता अमोलच्या आठवणींत जिवंत राहणार होती.
### दोस्ती...
एक भाकरी होती.
दोन मित्र होते.
एकाने अर्धी दिली.
दुसऱ्याने अर्धी घेतली.
वर्षं उलटली.
आयुष्य बदललं.
पण अमोलच्या मनात ती भाकरी अजूनही दोन भागांतच होती.
कारण त्याच्या वाट्याचा अर्धा भाग तो आजही आपल्या मित्रासाठी राखून ठेवत होता.

भाग 11 समाप्त — अर्धी भाकरी... आणि अखेरची वाट!
क्रमशः...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users