शेवटची बस (भयकथा)

Submitted by निमिष_सोनार on 14 November, 2026 - 10:26

रात्रीचे अकरा वाजले होते. अमोल, निलेश आणि समीर हे तीन मित्र दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी शहराकडे निघाले होते. रात्री अकराची बस पकडून पहाटेपर्यंत शहरात पोहोचण्याचा त्यांचा बेत होता.

मात्र बसस्थानकावर पोहोचल्यावर बस रद्द झाल्याचे समजले. पुढची बस पहाटे चार वाजता होती.

"आता पाच तास कुठे काढायचे?" समीरने वैतागून विचारले.

बस स्थानक अगदी छोटे होते. तिथे फक्त बसायला जागा होती. पुन्हा घरी जायचे आणि परत यायचे म्हणजे खूप वेळ लागणार होता. पायी आले तसे पुन्हा पायी जावे लागणार होते. त्यापेक्षा, बसस्थानकापासून थोड्या अंतरावर त्यांना एक जुने, पडके कौलारू दोन मजली घर दिसले. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी तिथे थांबायचे ठरवले. घरचे सगळे झोपले असतील म्हणून त्यांनी हे घरी कळवायचे नाही असे ठरवले.

त्या पडक्या घराचा दरवाजा ढकलताच तो करकरला. आत धुळीने माखलेल्या भिंती, मोडकी खुर्ची आणि एका कोपऱ्यात जुना पलंग होता. दोन सोफे होते. तिघांनी मोबाईलचे टॉर्च सुरू केले आणि खाली बसले. सोबत आणलेले थोडे फरसाण आणि चटणी पोळी, ठेचा पोळी त्यांनी एकमेकांना शेयर करून खाल्ली. सोबत आलेल्या पाण्याच्या बाटलीतून त्यांनी पाणी पिले. मग सोफ्यावर आणि पलंगावर असे मिळून ते थोडे लोळले. सोबत आणलेली शाल त्यांनी पांघरली.

रात्री साडेअकरा वाजता त्यांना वरच्या मजल्यावरून लाकडी जिन्यावरून उतरण्याचा पावलांचा आवाज ऐकू आला.

धप... धप... धप...

"या घरात कोणीतरी राहतंय वाटतं," निलेश म्हणाला.

"असं असेल तर बरंच आहे. निदान जागा मालकाला भेटून परवानगी घेऊ," अमोल म्हणाला.

त्याने मोठ्याने आवाज दिला.

"कोणी आहे का वर?"

पायऱ्या उतरण्याचा आवाज एकदम बंद झाला.

काही क्षणांनी जिन्यावरून एक लहान मुलगा खाली येताना दिसला. त्याने पांढरा शर्ट आणि काळी चड्डी घातली होती.

"काय रे बाळा, कोण आहेस तू?" समीरने विचारले.

मुलगा काहीच बोलला नाही. तो फक्त हसला आणि स्वयंपाकघराच्या दिशेने निघून गेला.

तिघे घाबरले आणि पांघरूण झटकून त्याच्या मागे मागे गेले. पण स्वयंपाकघरात कोणीच नव्हते.

"हा कुठे गेला?" निलेश आश्चर्याने म्हणाला.

रात्री बारा वाजून गेले होते.

थंडी वाढत होती. अमोलने बॅगेतून पाण्याची बाटली काढली. तेवढ्यात त्याला समोरच्या टेबलावर तीन चहाचे कप दिसले.

"अरे, हे कप कुठून आले?"

कपातून वाफ निघत होती. जणू नुकताच चहा बनवला होता.

"कोणीतरी आपल्यासाठी चहा ठेवला? कमाल आहे?," समीर हसत म्हणाला.

"अरे, पण या घरात कोणीच नाही! मग चहा कुणी बनवला?"

निलेशने एका कपाला हात लावला. कप गरम होता.

तेवढ्यात स्वयंपाकघरातून एका वृद्ध स्त्रीचा आवाज आला.

"चहा घ्या रे मुलांनो... थंड होईल!"

तिघेही दचकले.

अमोलने स्वयंपाकघरात डोकावले.

तिथे एक वृद्ध स्त्री पाठमोरी उभी होती.

"आजी, तुम्ही कोण?"

ती हळूहळू मागे वळली.

तिचा चेहरा पाहून अमोलच्या हातातील टॉर्च खाली पडला.

तिच्या चेहऱ्यावर त्वचेऐवजी राखेचा काळसर थर होता. डोळे लालभडक होते.

टॉर्च उचलून पुन्हा चालू केला तेव्हा स्वयंपाकघर रिकामे होते.

या घटनांनी घाबरून तिघांनी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण मुख्य दरवाजा उघडत नव्हता.

अमोलने जोर लावला. समीरनेही मदत केली. पण दरवाजा जणू बाहेरून कोणी पकडून ठेवला होता.

तेवढ्यात मागच्या खोलीतून कोणीतरी स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला.

निलेशने घाबरत विचारले, "कोण आहे तिथे?"

"माझा मुलगा हरवला आहे... त्याला शोधून द्या..."

आता रडण्याचा आवाज हळूहळू जवळ येत होता.

समीरने टॉर्चचा प्रकाश त्या खोलीत टाकला.

खोलीत एक जुना पाळणा जोरजोरात हलत होता.

त्यात एक मोठी बाहुली झोपली होती. पाळणा हलवायचा एकदम थांबला आणि बाहुलीने एकदम डोळे उघडले आणि ती म्हणाली,

"तुम्ही माझ्याबरोबर खेळणार का?"

तिघेही किंचाळले आणि तिथून पुन्हा आपल्या जागेवर आले.

रात्री तीन वाजले.

तिघे एका कोपऱ्यात बसले होते. कोणालाही झोप येत नव्हती. तिघेजण मारुती स्तोत्र म्हणायला लागले. तेव्हा त्यांची भीती थोडी कमी झाली.

अचानक घराच्या मुख्य दरवाजावर तीन वेळा थाप पडली.

ठक... ठक... ठक...

"कोण आहे?" अमोलने विचारले.

बाहेरून आवाज आला.

"मी आहे. दरवाजा उघडा. माझीही बस चुकली आहे."

तिघांनी एकमेकांकडे पाहिले.

"अरे, आपल्यासारखाच कोणीतरी प्रवासी असावा," समीर म्हणाला.

अमोलने दरवाजा उघडला.

बाहेर एक तरुण उभा होता. अंगावर पांढरा शर्ट, खांद्यावर बॅग.

"मीसुद्धा शहराकडे चाललोय. बस पहाटे चारची आहे. थोडा वेळ तुमच्याबरोबर बसू का?"

"या ना," निलेश म्हणाला.

तो तरुण आत आला आणि खुर्चीवर बसला.

"तुम्ही कुठे चाललात?" त्याने विचारले.

"परीक्षा द्यायला," अमोल म्हणाला.

तरुण हसला.

"छान! मीसुद्धा एकदा असेच परीक्षा द्यायला निघालो होतो."

"मग दिली नाही का?" समीरने विचारले.

तरुण काही क्षण शांत राहिला.

"नाही. माझी बस कधीच आली नाही."

त्याचे बोलणे ऐकून तिघे अस्वस्थ झाले.

तेवढ्यात अमोलने मोडक्या खुर्चीवर ऑन करून ठेवलेली टॉर्च थोडी घरंगळत खाली पडली आणि टॉर्चचा प्रकाश प्रकाश त्या तरुणाच्या पायांवर पडला.

त्याचे पाय उलटे होते!

अमोल किंचाळला.

पुढच्याच क्षणी त्या तरुणाने मान 360 अंशात वळवली. त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला.

आणि तो खुर्चीसकट अंधारात नाहीसा झाला.

चार वाजता बाहेर बसचा हॉर्न ऐकू आला.

अमोलने दरवाजा उघडला. यावेळी दरवाजा सहज उघडला.

तिघेही जीवाच्या आकांताने बाहेर धावले आणि बसमध्ये चढले. कंडक्टरने ते बघितले.

बस सुरू झाली. तिघांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

"देवाचे आभार! आता शहरात पोहोचलो की सगळं ठीक होईल," निलेश म्हणाला.

काही वेळाने कंडक्टर तिकीट तपासायला आला.

"तीन तिकिटं आहेत ना?" त्याने विचारले.

अमोलने होकार दिला.

कंडक्टरने तिघांकडे पाहिले आणि म्हणाला,

"तुम्ही त्या जुन्या घरात थांबला होतात का?"

"हो. पण तुम्हाला कसं माहीत?"

"मी तुम्हाला तिथून पळताना पाहिले! ते घर अशुभ आहे. बरं झालं तुम्हाला काही झालं नाही"

अमोलने सांगितले, "हो काका. आम्हाला त्या घरात रात्री खूप भयानक अनुभव आले."

बस निघाली. बसच्या खिडकीबाहेर बघतांना तिघांना त्या पडक्या घराच्या दरवाजात लहान मुलगा म्हातारीच्या खांद्यावर बसून राहून हात हलवत होता आणि मांडीवर बाहुली घेतलेली बाई खिडकीतून बघत होती असे दिसले.

लेखक: निमिष सोनार, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users