पुण्याच्या उपनगरात अमोलचं एक छोटंसं पण नावाजलेलं फर्निचरचं दुकान होतं—“आपलं घर”.
दहा वर्षांपूर्वी एका छोट्या गॅरेजमधून सुरू केलेल्या या व्यवसायाने हळूहळू चांगली भरारी घेतली होती. अमोलला आपल्या कष्टाचा अभिमान होता. दुकान वाढलं, कर्मचारी वाढले, ग्राहक वाढले आणि त्याचबरोबर अमोलचा आत्मविश्वासही.
पण गेल्या दोन वर्षांत परिस्थिती अचानक बदलली.
ऑनलाइन बाजारपेठ वाढली. नवीन स्पर्धक आले. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या. दुकानात माल पडून राहत होता आणि कर्जाचे हप्ते मात्र वेळेवर भरावे लागत होते.
एके दिवशी अकाउंटंटने अमोलसमोर कागद ठेवला.
“साहेब... यावेळीही तोटा झाला आहे.”
अमोल काही क्षण शांत राहिला.
“किती?”
“सुमारे बारा लाख.”
अमोलच्या हातातून पेन खाली पडलं.
“बारा लाख?”
“हो.”
अमोल खुर्चीत मागे रेलला.
“इतकी वर्षं उभा केलेला व्यवसाय... आणि आता?”
तेवढ्यात त्याचा जुना मित्र सुनील दुकानात आला.
“काय झालं रे? चेहरा असा का पडलाय?”
अमोलने हसण्याचा प्रयत्न केला आणि व्यवसायातील तोट्याबद्दल सांगितले. सुनीलने कागद हातात घेतला आणि म्हणाला, “अरे, व्यवसाय आहे ना... कधी नफा, कधी तोटा हे होणारच”
“हे वाक्य इतरांना समजावण्यासाठी चांगलं आहे. पुढे काय?"
सुनील म्हणाला,
“तोट्याचं कारण शोध. सर्वांची बैठक बोलाव.”
दुसऱ्या दिवशी अमोलने मोठी बैठक बोलावली.
सर्व कर्मचारी त्याच्याकडे चिंतेच्या नजरेने पाहत होते.
“आपला व्यवसाय अडचणीत आहे,” अमोल स्पष्टपणे सर्वांना म्हणाला.
काही कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले.
“पण मी कोणालाही दोष देणार नाही. आधी आपण समजून घेऊया की, चूक नेमकी कुठे होतेय?”
त्याने सर्वांना एकच प्रश्न विचारला, “तुमच्या मते आपला बिझिनेस का कमी होतोय?”
थोडा वेळ शांतता.
मग एक सेल्समन म्हणाला, “साहेब, आपले ग्राहक दुकानात येऊन किंमत विचारतात आणि लगेच ऑनलाइन किंमतीची तुलना करतात.”
दुसरा म्हणाला, “आपल्या अनेक जुन्या फर्निचर डिझाइन्सना मागणीच नाही.”
तिसरी कर्मचारी प्रिया म्हणाली, “ग्राहकांना फर्निचर घेतल्यानंतर आफ्टर-सर्व्हिस सुद्धा हवी आहे असं निरीक्षण आहे.”
अमोल शांतपणे ऐकत होता.
त्याला जाणवलं की, समस्या मार्केटची कमी आणि आपल्या विचारसरणीत जास्त होती.
अमोलने आपल्या काही जुन्या जाणत्या ग्राहकांशी संपर्क केला.
एका ग्राहकाने स्पष्ट सांगितलं, “तुमचा माल चांगला आहे. पण डिलिव्हरी उशिरा होते.”
दुसरा म्हणाला, “तुमच्या दुकानात चांगले पर्याय आहेत; पण ऑनलाइनपेक्षा किंमत जास्त वाटते.”
तिसरी ग्राहक म्हणाली, “तुम्ही आमचं घर पाहून फर्निचर सुचवलंत, तर आम्ही जास्त खरेदी करू.”
अमोलने प्रत्येक प्रतिक्रिया लिहून घेतली.
एक जुना अनुभवी ग्राहक मात्र बराच वेळ शांत राहिला.
अमोलने विचारलं, “तुमचं मत काय?”
तो हसला आणि म्हणाला, “तुमची एक मोठी चूक होत आहे.”
“कोणती?”
“तुम्ही अजूनही दहा वर्षांपूर्वीचा व्यवसाय आजच्या बाजारात चालवत आहात. यावरून काय ते तुम्ही समजा!"
हे वाक्य अमोलच्या मनात घर करून राहिलं.
पुढचा टप्पा होता खर्चाचा.
अमोलने मागील तीन वर्षांचा आर्थिक डेटा टेबलवर ठेवला.
कुठे पैसे जात होते, याचा बारकाईने अभ्यास सुरू झाला.
काही अनावश्यक भाडे, न वापरलेली सेवा, अतिरिक्त स्टॉक, कमी विक्री असलेली उत्पादने, अनावश्यक जाहिराती हे सगळं समोर आलं.
अमोल म्हणाला,“आपण खर्च कमी करणार. पण स्टाफ कमी करून नाही, तर अनावश्यक वाया जाणारा खर्च कमी करून.”
कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला.
एके दिवशी प्रिया अमोलकडे आली.
“सर, एक कल्पना आहे.”
“सांग.”
“आपण फर्निचर विकतो. पण ग्राहकांना ‘घर सजवण्याचा अनुभव’ विकूया.”
अमोल हसला.
“म्हणजे?”
“ग्राहकाच्या घराचा फोटो किंवा माप घेऊ. त्याला डिजिटल डिझाइन दाखवू. त्यानुसार फर्निचर, लाईटिंग, स्टोरेज, इंस्टॉलेशन. सगळं एकत्र. मी या संदर्भात काही ऑनलाईन कोर्सेस शिकते आहे”
अमोल काही क्षण विचारात पडला.
“यासाठी पैसा लागेल.”
प्रिया म्हणाली,
“पैसा लागेल. त्यापेक्षा जास्त नॉलेज लागेल. ते मी मिळवते आहे. वाटल्यास तुम्ही त्याचा मोबदला मला नंतर द्या. त्या नॉलेजचा उपयोग झाल्यानंतर!"
अमोल हसला.
“ठीक आहे.”
दुकानाने नवीन सेवा सुरू केली, “तुमच्या घरासाठी तुमच्या बजेटमध्ये संपूर्ण फर्निचर सोल्यूशन.”
सोशल मीडियावर छोट्या व्हिडिओंच्या माध्यमातून ग्राहकांना डिझाइन्स दाखवले जाऊ लागले. मोबाईल ऍप द्वारे ऑनलाइन ऑर्डर सुरू झाल्या.
जुने स्टॉक कॉम्बो ऑफरमध्ये विकले गेले.
लॉयल ग्राहकांसाठी रेफरल योजना सुरू झाली.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक ग्राहकाला खरेदी झाल्यानंतर फोन करून विचारलं जाऊ लागलं, “आपण समाधानी आहात ना? आमच्या प्रॉडक्ट मध्ये आणि सेवेमध्ये आणखी काय सुधारता येईल?”
पण संकट अजून संपले नव्हते.
तीन महिन्यांनी विक्री वाढली.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.
अमोलने अकाउंटंटला विचारलं,
“आता नफा किती?”
अकाउंटंट शांत राहिला.
“काय झालं?”
“विक्री वाढली आहे साहेब, पण नफा अजूनही कमी आहे.”
अमोल पुन्हा धक्का बसल्यासारखा झाला.
त्याने सर्व आकडे तपासले.
आणि खरी समस्या समोर आली.
विक्री वाढली होती, पण काही उत्पादनांवर मार्जिनच नव्हतं.
सुनील हसत म्हणाला, “बघितलंस? व्यवसायात फक्त ‘किती विक्री झाली?’ हा प्रश्न नसतो.”
अमोल म्हणाला,“मग?”
सुनील उत्तरला,"किती मार्जिन मिळालं? हा त्याहून मोठा प्रश्न आहे.”
अमोलने कमी मार्जिन असलेली काही उत्पादने बंद केली.
प्रीमियम आणि कस्टमाइज्ड उत्पादनांवर लक्ष केंद्रित केलं.
पुरवठादारांशी नव्याने करार केले.
बँकेशी चर्चा करून कर्जाच्या अटींची पुनर्रचना केली.
स्टॉकचे नियोजन सुधारले.
आणि प्रत्येक महिन्याला एक मीटिंग ठरली.
मिटिंगचा विषय: “नफा कुठून येतोय आणि पैसा कुठे जातोय?”
सहा महिन्यांनी...
त्याच दुकानात पुन्हा बैठक होती.
अकाउंटंटने कागद अमोलसमोर ठेवला.
“या महिन्यात... आपण नफ्याकडे वाटचाल करत आलो आहोत.”
क्षणभर कुणीच बोललं नाही.
मग प्रिया टाळ्या वाजवू लागली.
सगळे कर्मचारी आनंदाने हसले.
अमोलच्या डोळ्यांत पाणी आलं.
तो म्हणाला, “हा फक्त माझा विजय नाही. हा आपल्या सगळ्यांचा विजय आहे.”
सुनीलने विचारलं, “मग सांग, या सगळ्यातून काय शिकलास?”
अमोल काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला, “मी आधी समजत होतो की व्यवसाय म्हणजे जास्त विक्री, जास्त पैसा आणि जास्त विस्तार.”
तो थांबला मग म्हणाला,
“पण आता कळलंय की व्यवसाय म्हणजे, योग्य ग्राहक, योग्य उत्पादन, योग्य किंमत, योग्य खर्च आणि योग्य निर्णय.”
प्रिया हसली.
“आणि योग्य वेळी ग्राहकांचं ऐकणं!”
अमोल म्हणाला,
“हो! कारण कधी कधी ग्राहक आपल्याला आपला व्यवसाय आरशात दाखवतो. व्यवसायात नफा आला तर नम्र राहा. तोटा आला तर शांत राहा!"
सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अमोलने सर्वांना ड्रायफ्रूटचे बॉक्स भेट म्हणून दिले.