मे महिन्याचे दिवस होते. सूर्यदेवांनी जणू काही पृथ्वीला तव्यावर ठेवून परतायला घेतले होते. सकाळचे साडेदहा वाजले होते, पण उन्हाचा तडाखा असा होता की रस्त्यावरचे कुत्रे भुंकणे आणि वाहनांच्या मागे पळणे सोडून सावलीत बसून उन्हाळ्याच्या सुट्ट्या एंजॉय करत होते.
रविकांत एका खासगी कंपनीत नोकरीला होते. दिवसभर ऑफिसमध्ये बॉसच्या मेलना उत्तर देणे, एक्सेल मध्ये 1 ते 10 आकड्यांची वेगवगेळी कॉम्बिनेशन भरणे, मीटिंगमध्ये इकडची मान तिकडे हलवणे आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहणे, हा त्यांचा दिनक्रम होता. फावल्या वेळात ते विनोदी लेख, कथा, चारोळ्या आणि अधूनमधून व्यंगचित्रांसाठी कल्पना सुचवत असत. त्यांच्या मोबाईलमध्ये नोट्स नावाच्या फोल्डरमध्ये इतके विनोद साठवले होते की, तेवढे पैसे बँकेत ठेवले असते तर त्यांनी अमिताभ बच्चनला कमरेवर हात ठेवून त्यांच्याच स्टाईलने प्रश्न विचारला असता, "कोण बनेगा करोडपती, आप या मैं, हांय?"
रविवारी सकाळी त्यांची पत्नी स्वयंपाकघरातून ओरडली.
"अहो, ऐकलंत का?"
रविकांत वर्तमानपत्राच्या मागे मुटकुळे आसन घालून लपून बसले होते.
"ऐकतोय गं!"
"बाजारात जाऊन भाजी आणा. भेंडी, टोमॅटो, बटाटे, कांदे, कोथिंबीर, दुधी भोपळा, लाल भोपळा, कारले, तोंडली, फ्लॉवर, गिलके, दोडके, मेथी, पालक आणि पाच प्रकारची फळंही आणा."
"अगं, मी बाजारात चाललोय की बिग बॉसच्या घरात? एवढ्या वस्तूंची यादी दिलीस!"
"फार विनोद करू नका. आणि भाव करून घ्या. हल्ली भाजीवाल्यांनी लुटायला सुरुवात केली आहे."
"काळजी करू नकोस. मी भाव करण्यात पीएचडी केली आहे."
रविकांत यांनी पिशव्या घेतल्या आणि बाजाराची वाट धरली.
भाजी बाजारात पोहोचल्यावर त्यांना भेंडीचा एक टवटवीत ढीग दिसला.
ते एका भाजीवालीकडे गेले.
"ताई, ही भेंडी कशी दिली?"
"वीस रुपये साहेब."
रविकांत यांनी आश्चर्याने डोळे मोठे केले.
"अहो ताई, पण मगाशी मी त्या स्टॉलवर विचारलं तर त्या मावशींनी दहा रुपये सांगितली!"
भाजीवालीने अजिबात विचलित न होता उत्तर दिले.
"जा ना मग, तिच्याकडून विकत घ्या!"
"पण तिची संपली, म्हणून इथे आलो!"
भाजीवाली चेहऱ्यावर मंद स्मित आणत म्हणाली,
"साहेब, जेव्हा माझ्याकडेही भेंडी संपेल, तेव्हा मी सुद्धा दहा रुपयांनीच विकेन!"
रविकांत दोन सेकंद तिच्याकडे बघतच राहिले.
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते की, जणू काही त्यांना तिने अर्थशास्त्राचा नवा सिद्धांतच सांगितला.
ते मनात म्हणाले,
'एक भेंडी विकतेय आणि दुसरी भेंडी विकत नाहीये. पण दोघींची बुद्धी मात्र भेंडीपेक्षा जास्त ताजी आहे!'
शेवटी त्यांनी तिसरीकडून दहा रुपये भावाने भेंडी घेतली.
मनातल्या मनात त्या दोन्ही भाजीवाल्या महिलांना त्यांनी प्रेमाने 'हुशार (भेंडी)मावश्या' ही पदवी बहाल केली.
भाजीपाल्याच्या आणि फळांच्या दोन भरगच्च पिशव्या घेऊन रविकांत घराकडे निघाले.
उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. घामाने शर्ट पूर्ण भिजला होता. चष्मा नाकावरून खाली घसरत होता.
तेवढ्यात एक माशी त्यांच्या नाकावर येऊन बसली.
त्यांनी मान झटकली.
माशी उडाली.
दोन पावले चालल्यावर ती पुन्हा नाकावर!
रविकांत यांनी पुन्हा मान झटकली.
माशी पुन्हा उडाली.
तीन सेकंदांनी पुन्हा नाकावर!
आता रविकांत वैतागले.
"अगं माशी आहेस की माझ्या नाकाची भाडेकरू? भाडं देणार आहेस का?"
माशीने काहीही उत्तर दिले नाही. बहुधा ती भाडेकरार नाकारत होती.
दोन्ही हातांत पिशव्या असल्यामुळे ते माशीला हाताने हाकलू शकत नव्हते. त्यांनी जोरात मान डावीकडे झटकली आणि मग उजवीकडे.
पण यावेळी घामाने निसरडा झालेला चष्मा नाकावरून घसरला आणि थेट रस्त्यावर!
चष्मा वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हात हलवला आणि एका हातातील भाजीची पिशवी खाली पडली.
धप्प!
पिशवीतील टोमॅटो रस्त्यावर सैरावैरा पळाले.
एक टोमॅटो गटाराच्या दिशेने, दुसरा रस्त्याच्या मध्यभागी, तिसरा भेंडी न घेतलेल्या भाजीवाल्या मावशीकडे आणि चौथा थेट एका सायकलवाल्याच्या पायाजवळ आणि पाचवा सावलीत बसलेल्या कुत्राच्या तोंडात! धुबुक!
सायकलवाला ओरडला,
"काय साहेब! टोमॅटोची क्रिकेट मॅच चालू आहे का?"
रविकांत खाली वाकून टोमॅटो गोळा करू लागले.
इतक्यात मागून एक ओळखीचा आवाज आला.
"काय साहेब, भेंडी घेतली स्वस्तात; पण टोमॅटो मात्र रस्त्यावर फेकून दिलेत?"
त्यांनी मागे वळून पाहिले.
तीच ती पहिल्या स्टॉलवरील भाजीवाली मावशी! तिच्या हातात रविकांतचा टमाटा आणि चष्मा होता.
चेहऱ्यावर हसू दाबण्याचा निष्फळ प्रयत्न करत ती चष्मा पुढे करत होती.
रविकांत यांनी चष्मा घेतला. टमाटा तिने त्यांच्या पिशवीमध्ये टाकला.
"धन्यवाद मावशी!"
"काही नाही. पण साहेब, पुढच्या वेळी माशीला हाकलताना भाजीला सुरक्षित ठेवा!"
रविकांत यांनी तिच्याकडे एक तिरकस कटाक्ष टाकला. तिनेही त्यांच्याकडे तितक्याच तिरस्कारयुक्त नजरेने पाहिले. जणू दोघांमध्ये आता कुस्तीचा सामना सुरू होणार!
तेवढ्यात तिच्या दुकानात एक वेगळाच प्रकार घडला.
एक खोडकर लहान मुलगा दबकत दबकत तिथे आला. तिने दुसरीकडे लक्ष दिल्याचे पाहून त्याने तिच्या टोपलीतून तीन दुधी भोपळे उचलले आणि शेजारच्या प्रतिस्पर्धी भाजीवालीच्या टोपलीत अलगद टाकले.
आणि पळून गेला!
दोन भाजीवाल्यांमधील स्पर्धेचे हे नवे पर्व होते.
मुलगा मनात म्हणाला असावा,
'आज मी बाजारात दुधी भोपळ्याचं राजकारण करून आलो!'
घरी पोहोचायला त्यांना नेहमीपेक्षा अर्धा तास जास्त लागला.
दार उघडताच पत्नीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
"कुठे होता इतका वेळ?"
"बाजारात!"
"ते मला दिसतंय. पण बाजारात काय करत होता?"
"भाजी घेत होतो."
"भाजी घ्यायला गेला होता की, भाजीवाल्यांची जनगणना करायला?"
रविकांत यांनी पिशव्या खाली ठेवल्या.
"अगं, बाजारात खूप गर्दी होती. माशी होती."
"माशी!"
"अगं, एक माशी सारखी नाकावर बसत होती. तिच्यामुळे माझा चष्मा पडला, टोमॅटो फुटले..."
"म्हणजे भाजी आणायला गेलात आणि टमाटोची वाट लावून आलात!"
"पण चष्मा वाचला!"
"वा! आता चष्म्याची भाजी करूया का?"
"कर. फ्रेमचा तुकड्याची आमटी आणि काचेचे लोणचे घाल!" असे म्हणत रविकांत शांतपणे सोफ्यावर बसले.
पत्नीने भाजी तपासायला सुरुवात केली. तोपर्यंत त्यांनी बाजारातील घडलेले विनोद पत्नीला सांगितले.
"अगं, आज बाजारात दोन चांगले विनोद झाले. एक भेंडीवर आणि दुसरा माशीवर!"
"तुम्ही भाजी आणली की भाजीवाल्यांना विनोद शिकवून आलात?"
रविकांत हसले.
"मला तुमचे ताजे विनोद नकोत. मला भाजी ताजी हवी! यापुढे लक्षात ठेवा"
रविकांत यांच्या डोक्यात मात्र एक भन्नाट कल्पना आली.
वाईटातून काहीतरी चांगले घडवायचे!
त्यांनी स्वतःशीच म्हटले, 'टोमॅटो फुटले आणि, कल्पनेला अंकुर फुटलाय!'
रविकांत यांनी लगेच लॅपटॉप उघडला.
त्यांनी एआयच्या मदतीने दोन भन्नाट व्यंगचित्रे तयार केली.
पहिल्या चित्रात दोन भाजीवाली महिला होत्या. एक वीस रुपये भावाने आणि दुसरी दहा रुपये भावाने विकत होती. त्यावर संवाद मोठ्या अक्षरात लिहिला होता.
"जेव्हा माझ्याकडेही भेंडी संपेल, तेव्हा मीसुद्धा दहा रुपयांनीच विकेन!"
दुसऱ्या चित्रात रविकांतसारखा एक गृहस्थ दोन्ही हातांत भाजीच्या पिशव्या घेऊन माशीला हाकलताना दिसत होता. चष्मा हवेत उडत होता आणि टोमॅटो रस्त्यावर फुटत होते.
त्यांनी त्यावर एक मजेशीर कॅप्शन दिले.
"माशी छोटी असली तरी नुकसान मोठं करू शकते. विशेषतः दोन्ही हातांत पिशव्या असताना!"
त्यानंतर त्यांनी या दोन्ही प्रसंगांचे छोटे कार्टून व्हिडिओ सुद्धा बनवले. त्यात मजेदार आवाज, पार्श्वसंगीत आणि स्लॅपस्टिक इफेक्ट्स टाकले.
दोन्ही रिल्स फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर अपलोड केल्या.
पोस्ट टाकताना त्यांनी मनात विचार केला, 'जास्तीत जास्त शंभर लोक बघतील. त्यातले दहा हसतील आणि दोघे लाईक करतील.'
पुढचा रविवार उजाडला.
रविकांत पुन्हा भाजी बाजारात गेले.
आज त्यांनी दोन पिशव्यांऐवजी एकच पिशवी घेतली होती. माशीचा अनुभव ताजा असल्याने त्यांनी चष्माही स्क्रूने घट्ट बसवून घेतला होता.
बाजारात शिरताच त्यांना एक विचित्र आवाज ऐकू आला.
"हा हा हा हा हा!"
"अरे बघ, बघ! पुन्हा लाव ती रिल!"
"थांब रे, पोट दुखायला लागलं!"
रविकांत यांनी इकडे तिकडे पाहिले.
तीच पहिल्या स्टॉलवरील भेंडीवाली मावशी मोबाईलवर पदर तोंडाला लावून लावून काहीतरी बघत होती आणि हसून हसून तिच्या डोळ्यांतून पाणी येत होते.
त्यांना पाहताच ती म्हणाली,
"अहो साहेब! या या! तुमचा व्हिडिओ पाहिला का?"
रविकांत गोंधळले.
"माझा?"
"हो! तो भेंडीचा! काय भारी बनवलाय कुणीतरी!"
रविकांत हसू आवरत म्हणाले,
"हो, तो मीच बनवला आहे."
"काय सांगता? खरंच?"
"हो!"
मावशीने लगेच मोबाईल शेजारच्या भाजीवाल्याला दाखवला.
"अहो, हे बघा! हेच ते साहेब! आपल्या बाजारातले!"
शेजारचा भाजीवाला हसत म्हणाला,
"अहो साहेब, तुम्ही तर भेंडी बाजारातले सेलिब्रिटी झालात!"
रविकांत म्हणाले,
" झालो ना? आता माझ्यासाठी भेंडीचा भाव कमी करा!"
"त्ये सोडून बोला साह्यब!"
तेवढ्यात बाजूच्या स्टॉलवरून आवाज आला.
"अहो, तो माशीवाला व्हिडिओ पण दाखवा ना!"
एका भाजीवालीने पदर तोंडाला लावला होता. दुसरी हसून हसून थकली होती. पुरुष भाजीवाले पदर नसल्याने पांढऱ्या फडक्याने तोंड झाकून हसत होते. एका भाजीवाल्याने तर हसता हसता वांग्याच्या पोत्यावर बसकण मारली. दुसऱ्याने त्याला उचलले अन्यथा भरीत तयार होणार होते.
मग तो हसत हसत खाली जमिनीवर पडला. तिथे पत्ताकोबीचे पानं पडलेले होते त्यावर गोल गोल लोळत म्हणाला, "साहेब, तुमच्या माशीने तर बाजारात क्रांती केली!"
रविकांत यांना स्वतःच्या लोकप्रियतेचा आनंद झाला.
पण पुढच्याच क्षणी एकाच्या मोबाईलमध्ये बघून त्यांच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. हे सर्व लोक रविकांत यांनी टाकलेल्या पेजवरचे व्हिडीओ न बघता इतर कुणीतरी स्वतःच्या नावाने टाकलेले रविकांतचे पण थोडा बदल केलेले व्हिडीओ बघत होते. काहींनी त्यावर स्वतःचा लोगो लावला होता.
काहींनी तर कॅप्शन बदलून लिहिले होते,
'आमच्या टीमची खास निर्मिती!'
एका पेजवर तर मोठ्या अक्षरांत लिहिले होते,
'हा विनोद सर्वप्रथम आमच्या चॅनेलवर प्रकाशित!'
रविकांत यांनी डोक्याला हात लावला.
"अरे! हा विनोद माझा आहे!"
तेवढ्यात एक भाजीवाला म्हणाला,
"साहेब, तो विनोद आमच्या गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर गेल्या आठवड्यापासून आहे."
दुसरा म्हणाला,
"अहो, माझ्या मंगलकांत नावाच्या मेहुण्याने सांगितलं की त्याच्या मित्राने चंद्रकातने हा जोक स्वतः लिहिला आहे!"
तिसरा म्हणाला,
"नाही नाही! मी यूट्यूबवर पाहिला. गुरुकांत नावाच्या चॅनेलने सांगितलं की हा जोक त्यांच्या लेखकाने लिहिला आहे."
रविकांत म्हणाले,
"मग मूळ लेखक कोण? मी आहे. शनिकांत!"
त्यांनी सर्वांना स्वतःचा ओरिजिनल व्हिडिओ आणि व्यंगचित्र दाखवले.
एक भाजीवाला उत्तरला,
"रविकांत साहेब, हा गोंधळ बघून स्वतःचे नाव सुद्धा विसरलात? इंटरनेटवर मूळ लेखक शोधणं म्हणजे बाजारात हरवलेली कोथिंबीर शोधण्यासारखं आहे!"
सगळे हसले.
रविकांत यांना पुन्हा वरील वाक्यामुळे तिसऱ्या जोकची कल्पना सुचली.
तेवढ्यात ती पहिली भेंडीवाली मावशी पुढे आली.
"साहेब, एक गोष्ट सांगा. त्या भेंडीच्या विनोदात माझाच संवाद आहे ना?"
"हो मावशी!"
"मग माझं नाव कुठे आहे?"
"अहो, तुम्हाला क्रेडिट द्यायला हवं होतं हे मान्य पण मीही प्रसिद्ध झाले पाहिजे होते! तुमच्या व्हिडिओमध्ये माझे नाव काहीतरी दुसरेच आहे."
"अहो, मला कुठे तुमच्या सगळ्यांची नावे माहिती आहेत?"
शेजारची प्रतिस्पर्धी भाजीवाली लगेच मध्ये पडली.
"माझाही उल्लेख करा. मीसुद्धा त्या विनोदात आहे!"
पहिली म्हणाली,
"पण तुझी भेंडी संपली होती ना?"
दुसरी म्हणाली,
"तुझी बुद्धी संपली होती गं, सटवे!"
बाजारात पुन्हा एकदा हशा पिकला.
रविकांत म्हणाले, "अहो, मी तयार करून अपलोड केलेल्या विनोदावर इतर कुणीतरी अनेकजण दावा करत आहेत आणि तुम्ही म्हणत आहेत की विनोदातील पात्रांना सुद्धा प्रसिद्धी द्या?? आणि, मावशी! ही माशी माझ्या नाकावर बसली होती. तुमच्या नाकावर नाही! म्हणजे विनोद मी केला, चित्र मी बनवलं, व्हिडिओ मी तयार केला, पण कॉपीराइट तिसऱ्याचाच?"
पहिली भेंडीवाली मावशी म्हणाली,
"साहेब, आजकाल भाजी बाजारातही असंच चालतं. शेतकरी पिकवतो, व्यापारी विकतो आणि ग्राहक भाव करतो!"
"मावशी, तुमचं हे वाक्य मी लिहून ठेवतो. पुढचा विनोद नक्की तुमच्यावर! कॉपीराइट तुमचा! ठरलं तर मग. आता मला एक किलो भेंडी फुकट द्या बरं गप गुमान!"
"ते आता नाही. माझा हा जोक व्हायरल झाल्यानंतर! पुढच्या रविवारी"
काळ पुढे सरकत गेला.
रविकांत यांच्या दोन्ही विनोदांनी सोशल मीडियावर आणखी जास्ती अक्षरशः धुमाकूळ घातला. सुरुवातीला फेसबुक आणि इन्स्टाग्राम. मग व्हॉट्सॲप ग्रुप. त्यानंतर विविध विनोदी पेजेस. मग काही ऑनलाइन न्यूज पोर्टल्स.
एका स्थानिक दैनिकाच्या फनी पेजवर तर दोन्ही विनोद प्रसिद्ध झाले.
रविकांत यांनी पेपर हातात घेतला आणि आनंदाने पत्नीला दाखवला.
"अगं बघ! आपले विनोद पेपरमध्ये आले!"
पत्नीने पेपरकडे पाहिले.
"छान! पण लेखकाचं नाव कुठे आहे?"
रविकांत थोडे खजील झाले.
"नाहीये."
"मग काय फायदा?"
"अगं, प्रसिद्धी मिळाली!"
"म्हणजे तुम्ही लिहायचं, दुसऱ्यांनी प्रसिद्ध व्हायचं आणि तुम्ही पेपर वाचून आनंद मानायचा?"
रविकांत म्हणाले,
"अगं, यालाच म्हणतात निःस्वार्थ साहित्यसेवा!"
दिवाळी आली.
विनोदी दिवाळी अंकांमध्येही हेच दोन विनोद वेगवेगळ्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून दिसू लागले.
एका अंकात भेंडीच्या विनोदाला शीर्षक दिले होते,
'भाजीवाल्यांची भन्नाट शक्कल!'
दुसऱ्या अंकात माशीच्या विनोदाला शीर्षक होते,
'माशीचा प्रताप!'
एका अंकात तर माशीच्या विनोदाखाली लिहिले होते,
'लेखक: आमचे विशेष प्रतिनिधी!'
रविकांत हसले.
"अगं, आता माझा विनोद माझ्या कल्पनेपेक्षा जास्त प्रवास करतोय!"
सोशल मीडियावर आपल्या विनोदांची झालेली अवस्था पाहून रविकांत यांनी एक दिवस गंभीरपणे विचार केला.
'आपण विनोद लिहितो, चित्र काढतो, व्हिडिओ बनवतो. पण त्यावर मालकी हक्क मात्र दुसरेच सांगतात. यावर काहीतरी कायदेशीर उपाय असला पाहिजे!'
त्यांनी गुगलवर शोधाशोध केली. कॉपीराइट, बौद्धिक संपदा, लेखकाचे हक्क वगैरे माहिती वाचली. दोन-तीन लेख वाचल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला की जणू काही ते स्वतःच कॉपीराइट कायद्याचे तज्ज्ञ झाले होते.
दुसऱ्याच दिवशी ते कॉपीराइट कार्यालयात पोहोचले.
तिथल्या अधिकाऱ्याला त्यांनी नमस्कार केला.
"सर, मला एक माहिती पाहिजे होती."
"बोला."
"माझा एक विनोद आहे. तो मी स्वतः अनुभवातून लिहिला आहे. त्याचे व्यंगचित्र बनवले, व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर टाकला. आता तो सगळीकडे व्हायरल झाला आहे. पण प्रत्येकजण स्वतःचा असल्याचा दावा करतोय. तर मला त्या विनोदाचे कॉपीराइट मिळू शकते का?"
अधिकाऱ्याने चष्म्याच्या वरून त्यांच्याकडे पाहिले.
"कसला विनोद म्हणालात?"
रविकांत यांनी संपूर्ण प्रसंग सांगितला.
अधिकारी शांतपणे ऐकत होता. पण भेंडीवालीचा संवाद ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
"आणि मग माशी नाकावर बसली, चष्मा पडला, टोमॅटो फुटले..."
एवढे ऐकताच अधिकारी जोरजोरात हसायला लागला.
त्याच्या हसण्याचा आवाज ऐकून बाहेर बसलेले दोन कर्मचारीही आत डोकावून पाहू लागले.
रविकांत थोडे नाराज झाले.
"सर, मी इथे गंभीर विषय घेऊन आलोय. तुम्ही हसताय कशाला?"
अधिकारी हसू आवरत म्हणाला,
"अहो, तुमचा विनोद छान आहे. पण विनोदाच्या कल्पनेला स्वतंत्रपणे कॉपीराइट मिळत नाही."
रविकांत यांनी लगेच विचारले,
"म्हणजे माझा विनोद मी सुरक्षित ठेवू शकत नाही?"
"तुम्ही तुमची मूळ निर्मिती सुरक्षित ठेवू शकता. पण भेंडीचा भाव किंवा माशी नाकावर बसण्याची घटना कुणाच्या मालकीची होणार?"
अधिकारी पुढे हसत म्हणाला,
"साहेब, विनोद लोकांना हसवण्यासाठी असतो. विनोदाला कॉपीराईटचे कुलूप लावून लोकांची हसण्याची ऊर्मी दाबण्यासाठी नाही!"
रविकांत निराश झाले.
अधिकारी पुन्हा हसू लागला.
रविकांत बाहेर पडले.
काही दिवस गेले.
एका सकाळी रविकांत चहा घेत वर्तमानपत्र वाचत बसले होते. अचानक त्यांच्या नजरेस फनी पेजवरील एक व्यंगचित्र पडले.
त्यांनी चष्मा नीट केला. व्यंगचित्रात एक गृहस्थ कॉपीराइट कार्यालयातील अधिकाऱ्यासमोर बसलेला होता.
गृहस्थ म्हणत होता,
"सर, मला माझ्या जोकचे कॉपीराइट पाहिजे!"
समोरचा अधिकारी खळखळून हसत म्हणत होता,
"अहो, जोकला कॉपीराइट मागता? हा हा हा!"
चित्राच्या खाली कॅप्शन होते:
'जोकचा कॉपीराइट मागणारा माणूस! हाच सर्वात मोठा जोक!'
आणि चित्राच्या कोपऱ्यात मोठ्या अक्षरांत नाव छापले होते:
संकल्पना व व्यंगचित्र : कॉपीराइट कार्यालयातील अधिकारी!
त्यांनी पुन्हा चित्र पाहिले. तो गृहस्थ अगदी त्यांच्यासारखाच दिसत होता! आणि समोरचा अधिकारी? तो तर त्याच दिवशी भेटलेला कॉपीराइट अधिकारी होता!
रविकांत यांनी ताबडतोब मोबाईल काढला आणि त्या अधिकाऱ्याला फोन लावला.
"हॅलो सर, मी रविकांत बोलतोय."
"हो बोला!"
"सर, आजच्या पेपरमध्ये तुमच्या नावाने एक व्यंगचित्र आलंय. एका माणसाला जोकचं कॉपीराइट हवंय आणि अधिकारी त्याची खिल्ली उडवतोय!"
अधिकारी हसत म्हणाला,
"हो हो! ते माझंच आहे. त्या दिवशी तुम्ही आला होतात ना, त्यावरून मला कल्पना सुचली. मग मी चित्र काढून पेपरला पाठवलं."
रविकांत म्हणाले,
"सर, एक विचारू?"
"विचारा."
"त्या व्यंगचित्रासाठी तुम्ही माझी परवानगी घेतली होती का?"
यावेळी अधिकारी मात्र काही क्षण शांत झाला.
रविकांत पुढे म्हणाले,
"काळजी करू नका सर. मी तुमच्यावर दावा करणार नाही. पण एक विनंती आहे..."
"काय?"
"पुढच्या वेळी माझ्यावर व्यंगचित्र काढलंत तर निदान माझं नाव तरी टाका. प्रसिद्धीचा थोडासा कॉपीराइट मलाही मिळू द्या!"
दोघेही हसू लागले.
रविकांत यांनी फोन ठेवला.
पत्नीने विचारले,
"काय झालं? कोणाचा फोन होता?"
रविकांत हसत म्हणाले,
"ज्यांच्याकडे माझ्या जोकचा कॉपीराइट मागायला गेलो होतो, त्यांनीच माझ्यावर विनोद करून पेपरमध्ये प्रसिद्ध केला!"
आणि पेपर हवेत फेकून, चहाचा कप बाजूला ठेऊन ते जोरजोराने नाचत हसू लागले.
कारण त्यांना आता एक गोष्ट पक्की समजली होती...
"जोक लिहिणारा लेखक कुणीही असो, त्याचा खरा कॉपीराइट मालक असतो सोशल मिडिया!"
(समाप्त)
लेखक: निमिष सोनार, पुणे