चकव्याचे चक्र

Submitted by निमिष_सोनार on 11 November, 2026 - 06:07

रात्रीचे अकरा वाजले होते.

नोव्हेंबर महिन्याची थंडी हळूहळू अंगात भिनू लागली होती. दिवसभर ऊन खाऊन तापलेली जमीन आता गार झाली होती. आकाशात चंद्र नव्हता. ढगांची दाट चादर पसरली होती आणि मधूनच वाहणारा थंड वारा हुं हुं करत झाडांच्या फांद्यांना विचित्र आवाज करत हलवत होता.

विकासची बस अखेर मुख्य रस्त्यावरील एका फाट्यावर येऊन थांबली.

"चिंचखेड गावासाठी इथेच उतरा!"

कंडक्टरचा आवाज ऐकून विकासने आपली बॅग खांद्यावर घेतली आणि खाली उतरला.

गेल्या दोन तासांपासून बस पंक्चर झाल्यामुळे काही काळ रखडली होती त्यामुळे पोहचायला अकरा वाजले. आता पुढचा प्रवास त्याला पायीच करावा लागणार होता.

त्याने मोबाईल काढला.

बॅटरी 10 टक्के.

नेटवर्कचे एकच बारीक चिन्ह कधी दिसत होते, तर कधी गायब होत होते.

त्याने चंदनला फोन लावला.

एक रिंग... दोन रिंग...

आणि अचानक कॉल कट झाला.

पुन्हा प्रयत्न केला. यावेळी 'Not Reachable'.

"अरे देवा! आता याच वेळी नेटवर्क जायचं होतं का?"

विकास स्वतःशीच पुटपुटला.

चंदन त्याचा कॉलेजपासूनचा मित्र. त्याच्याच गावात विकासला जमिनीच्या एका व्यवहारासंदर्भात सल्ला घ्यायचा होता. चंदनने त्याला घरी येण्याचा आग्रह केला होता.

"तू काळजी करू नकोस. रात्री कितीही वाजले तरी घरी ये. मी वाट पाहतो. उद्याच आपण जमिनीच्या व्यवहाराचा सोक्षमोक्ष लावू"

चंदनचे शब्द त्याला आठवले.

बस निघून गेली.

तिच्या मागच्या लाल दिव्यांचे दोन ठिपके अंधारात विरून गेले आणि काही क्षणांतच सगळीकडे पुन्हा भयाण शांतता पसरली.

विकासने बॅगमधून आणलेली टॉर्च सुरू केली आणि गावाकडे जाणारी पायवाट धरली.

मुख्य रस्त्यापासून चंदनचे घर साधारण तीन किलोमीटर अंतरावर होते. कधी शेतातून, कधी शेतांच्या मधून आणि विविध पडक्या घरांजवळून जाणारी ती अरुंद पायवाट होती.

दोन्ही बाजूंना उसाची शेतं होती. कुठे एखादं वाळलेलं झाड, तर कुठे काटेरी झुडपं.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरून कधीतरी एखादा पक्षी फडफडत उडायचा. त्याच्या पंखांच्या आवाजाने विकास दचकायचा.

वाऱ्यामुळे उसाची पानं एकमेकांवर घासली जात होती.

सर्र... सर्र... सर्र...

जणू कुणीतरी उजव्या बाजूच्या त्या उसाच्या शेतातून त्याच्या बाजूने चालत होतं.

विकासने वळून पाहिलं.

कुणीच नव्हतं.

"उगाच मनात भीती निर्माण करून घेऊ नकोस."

तो स्वतःलाच समजावत पुढे चालू लागला.

काही अंतरावर त्याला एक जुनी पडकी विहीर दिसली. तिच्या बाजूला एक भग्न दगडी बांधकाम होतं. गावातल्या लोकांनी ते जुनं घर अनेक वर्षांपूर्वी सोडून दिलं होतं.

त्याने टॉर्चचा प्रकाश तिकडे वळवला.

घराच्या मोडकळीस आलेल्या दरवाज्यात त्याला काहीतरी गोलाकार पांढरं हलल्यासारखं वाटलं.

तो क्षणभर थांबला.

पुन्हा प्रकाश टाकला.

तिथे काहीच नाही.

तो पुढे निघाला.

पण दोन मिनिटांनी त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली.

तो ज्या विहिरीजवळून नुकताच पुढे गेला होता, तीच विहीर पुन्हा त्याच्या उजव्या बाजूला दिसत होती!

त्याने मागे वळून पाहिलं. पायवाट सरळ होती. मग ही विहीर पुन्हा कशी आली?

"अरे... हे काय?"

त्याने मोबाईलमध्ये पाहिलं. 11:20 pm. आणि तेवढ्यात बॅटरी पूर्ण संपली. मोबाईल पूर्णपणे बंद झाला.

त्याला वाटलं, कदाचित पायवाटेला एखादं वळण असेल आणि त्याचं लक्ष गेलं नसेल. म्हणून विहिरी बद्दल गफलत झाली असावी.

तो पुन्हा पुढे चालू लागला.

थोड्या अंतरावर एक जुनं वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्या जमिनीकडे लोंबकळत होत्या. दोन पारंब्या हातात धरून माणसाची आकृती उभी असल्यासारखी दिसत होती.

विकासने टॉर्चचा प्रकाश तिकडे टाकला.

"कोण आहे?"

काहीच उत्तर नाही.

"कोण आहे तिथे?"

आकृतीने हळूहळू मान वर केली.

पण चेहरा दिसण्याऐवजी त्याला फक्त दोन पांढरे ठिपके दिसले.

विकासच्या अंगावर काटा आला.

त्याने टॉर्च बंद केली आणि पुन्हा सुरू केली.

आकृती गायब झाली होती.

आता मात्र त्याच्या पावलांचा वेग वाढला.

विकास जवळजवळ अर्धा किलोमीटर चालला असेल. तेवढ्यात त्याला समोरून कुणीतरी येताना दिसलं.

दूरवरून त्या माणसाची चाल ओळखीची वाटत होती.

जवळ आल्यावर विकास आनंदाने ओरडला.

"चंदन!"

समोरचा माणूस थांबला.

"अरे विकास! तू आलास?"

"हो रे! किती फोन केले तुला. नेटवर्कच नाहीये इथे. आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण संपली"

"माहितीय."

"तू मला घ्यायला आलास?"

"हो."

विकासने सुटकेचा निश्वास सोडला.

"बरं झालं बाबा! एकट्याला चालताना जरा विचित्र वाटत होतं."

चंदन काहीच बोलला नाही.

विकासने त्याच्याकडे नीट पाहिलं.

चंदनने नेहमी घालायचा तोच फिकट निळा शर्ट घातला होता. तीच पँट. पायात तीच चप्पल.

पण तरीही काहीतरी वेगळं वाटत होतं.

त्याचा चेहरा विलक्षण निस्तेज दिसत होता. डोळे खोल गेलेले होते. ओठांवर कसलीही हालचाल नव्हती.

"काय रे? तब्येत बरी नाही का?"

"नाही. ठीक आहे."

"मग एवढा शांत का?"

"रात्री शांतच राहायचं असतं. जास्त आवाज केला तर ते जागे होतात!"

"काय?"

"काही नाही. चल."

चंदनने चालायला सुरुवात केली.

विकास त्याच्या मागे चालू लागला.

काही मिनिटं शांततेत गेली.

चंदन अचानक थांबला.

"विकास..."

"काय?"

"तू माझ्याबरोबर चालतोयस ना?"

विकास गोंधळला.

"म्हणजे?"

"काही नाही."

तो पुन्हा चालू लागला.

थोडं पुढे गेल्यावर विकासला जाणवलं की चंदनची सावली दिसतच नव्हती.

विकासच्या छातीत धस्स झालं.

"चंदन..."

"हं?"

"तुझी सावली का दिसत नाही?"

"तुला माझ्या सावलीशी मतलब आहे की माझ्याशी?"

"म्हणजे..."

चंदनने हळूहळू मागे वळून पाहिलं.

त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं.

"मी दिसतोय ना तुला? झालं तर मग!"

चंदन हसू लागला.

ते हसणं सामान्य नव्हतं.

विकासचा घसा कोरडा पडला.

त्याने मागे सरकण्याचा प्रयत्न केला.

पण तेवढ्यात चंदनने त्याचा हात पकडला.

त्याचा हात बर्फासारखा थंड होता.

"घरी चल. सगळे वाट पाहतायत."

"मा .... माझा हात सोड!"

"घरी चल म्हटलं ना!"

चंदनचा आवाज अचानक बदलला होता. तो आवाज चंदनचा नव्हताच. जणू दोन-तीन माणसं एकाच वेळी बोलत होती.

विकासने जोरात हात झटकला आणि मागे वळून धावायला सुरुवात केली.

काही अंतरावर गेल्यावर त्याने मागे पाहिलं.

चंदन तिथेच उभा होता.

विकास किती वेळ धावत होता, त्यालाच कळत नव्हतं.

पायवाट संपली. समोर गावातील पहिलं घर दिसलं.

त्याने हातातील डिजिटल घड्याळ पाहिलं.

12: 20 pm.

चंदनचं घर गावाच्या शेवटच्या बाजूला होतं.

घरासमोर पोहोचल्यावर त्याने जोरजोरात दरवाजा ठोठावला.

"वहिनी! वहिनी! दार उघडा!"

आतून आवाज आला.

"कोण आहे?"

"मी विकास! चंदनचा मित्र!"

दरवाजा उघडला.

चंदनची पत्नी, मनीषा, आणि चंदन समोर उभे होते.

"अरे विकासदादा! तुम्ही? या ना आत!"

विकासने आत पाऊल टाकलं. तो अजूनही धापा टाकत होता.

"काय झाले? एवढा का घाबरलास?"

चंदनने आश्चर्याने विचारलं.

"काही नाही. थोडा चकवा बसला होता!"

"म्हणजे?"

"रस्त्यात मला तू भेटला होतास?"

चंदनच्या पायाखालची जमीन सरकली.

"काय? मी तुला रस्त्यात भेटलो होतो?"

"हो. तू माझ्याबरोबर चालत होतास. आपण बोललोही."

"जाऊ द्या हो दादा. सोडा. हात पाय धुवून घ्या. फ्रेश व्हा. भूक लागली असेल. मी जेवायला वाढते!" मनिषा म्हणाली.

हातपाय धुवून बाहेर आल्यावर विकासला जाणवले की, तो विहिरीजवळ उभा आहे. त्याच पायवाटेवर! अंधारात!

लेखक: निमिष सोनार, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली गोष्ट.
शेवट तसा अपेक्षित होता पण तरीही वाचायला मजा आली

वेगवान कथा. मनात कुतूहल आणि भीती निर्माण करण्यात यशस्वी होते. पण मला शेवट समजला नाही.