### दोस्ती...
### भाग ७ — प्रेमपत्र, लाल शाई आणि चुकीचा पत्ता!
काही प्रेमकथा एका नजरेत सुरू होतात. काही एका गुलाबाच्या फुलाने. काही एका प्रेमपत्राने.
पण आमच्या अंकलेच्या शाळेत एक अशी प्रेमकथा घडली, जिच्यात प्रेमपत्र लिहायला पाच वर्षं लागली, ते पोहोचवायला पाच सेकंद... आणि तेही चुकीच्या व्यक्तीच्या हातात!
### मुंबई ते अंकले — आठवणींचा प्रवास
गाडी अंकलेच्या दिशेने धावत होती.
रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी हिरवीगार शेतं, अधूनमधून लागणारी छोटी गावं आणि खिडकीतून येणारा गार वारा यामुळे प्रवास छान चालला होता.
पण माझं लक्ष बाहेरच्या दृश्यांकडे नव्हतंच.
माझ्या डोक्यात अजूनही चंदू, अमोल, जीवन आणि मानिषा यांचाच गोंधळ सुरू होता.
मी बाबांकडे पाहिलं.
"बाबा, एक सांगू?"
"सांग ना!"
"तुमची गोष्ट खरंच खूप छान आहे. विशेषतः चंदू आणि अमोलची मैत्री! किती वेगळे स्वभाव आणि तरीही किती घट्ट नातं!"
बाबा समाधानाने हसले.
"हो रे मंगेश. त्या दोघांची मैत्री खरंच वेगळी होती."
मी उत्सुकतेने विचारलं,
"पण बाबा, पुढे काय झालं? चंदूने मानिषाला प्रपोज केलं का?"
बाबा माझ्याकडे पाहून हसले.
"केलं!"
"खरंच?"
"हो. पण त्यासाठी त्याला पाच वर्षं लागली!"
मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.
"काय? पाच वर्षं?"
"हो!"
"बाबा, हा प्रपोज करणार होता की एखाद्या सरकारी कार्यालयात अर्ज टाकणार होता?"
बाबा खळखळून हसले.
"अरे, त्याची तयारीच तशी होती!"
"म्हणजे?"
"मंगेश, पाचवीत मानिषाला पाहिल्यापासून चंदूच्या डोक्यात एकच विचार होता. तिला आपल्या मनातलं सांगायचं. पण धाडस काही होत नव्हतं."
"मग?"
"मग तो दहावीत पोहोचला!"
मी हसायला लागलो.
"म्हणजे पाचवीपासून दहावीपर्यंत फक्त प्लॅनिंग?"
बाबा हसत म्हणाले,
"अरे, मधल्या काळात त्याने प्रेमाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली होती!"
"कशी?"
बाबांनी गंभीर चेहरा केला.
"तो कवी झाला होता!"
मी दचकलो.
"चंदू? कवी?"
"हो! आणि साधासुधा नाही... प्रेमकवी!"
आता मात्र मला हसू आवरेना.
"बाबा, पुढे सांगा!"
बाबांनी खिडकीबाहेर पाहिलं.
आणि गोष्ट पुढे सुरू केली.
### पाच वर्षांनंतर — दहावीतील चंदू आणि अमोल!
पाच वर्षं कशी गेली, कळलंच नाही.
कालपर्यंत शर्यतीत धावणारे, विहिरीत पोहणारे, जांभळाच्या झाडावर बसून गप्पा मारणारे चंदू आणि अमोल आता दहावीच्या वर्गात पोहोचले होते.
दोघंही उंच झाले होते.
आवाज बदलू लागले होते.
चेहऱ्यावर मिशीची हलकीशी रेघ दिसू लागली होती.
पण स्वभाव?
तो फारसा बदलला नव्हता!
अमोल अजूनही अभ्यासात हुशार.
वेळेवर गृहपाठ करणारा.
परीक्षेची तयारी करणारा.
आणि चंदू?
चंदूही आता पूर्वीपेक्षा बराच सुधारला होता.
अभ्यासात लक्ष देऊ लागला होता.
वाचनाची आवड निर्माण झाली होती.
मराठीत सुंदर लिहू लागला होता.
विशेषतः कविता!
पण त्याच्या कवितांचा विषय मात्र गेल्या काही वर्षांत फारसा बदलला नव्हता.
मानिषा!
होय!
मानिषा!
चंदूच्या मते, जगात सूर्य उगवत होता तो मानिषासाठी.
चंद्र चमकत होता तो मानिषासाठी.
पाऊस पडत होता तो मानिषासाठी.
आणि शाळेची घंटा वाजत होती...
तीसुद्धा मानिषाला पाहण्यासाठी!
### अंकलेचा पहिला सार्वजनिक प्रेमकवी!
चंदूने कविता लिहायला सुरुवात केली होती.
पण कविता लिहिणं ही एक गोष्ट.
आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं ही दुसरी.
चंदूला मात्र आपली प्रत्येक कविता मानिषापर्यंत पोहोचवायची होती.
म्हणून त्याने एक भन्नाट मार्ग शोधला.
जिथे जागा मिळेल, तिथे कविता लिहायची!
वर्गाच्या मागच्या भिंतीवर.
जुन्या बाकावर.
शाळेच्या आवारातील फळ्यावर.
मुलांच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर.
आणि एकदा तर मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेरील भिंतीवरही!
चंदूला वाटायचं, एक ना एक दिवस मानिषा या कविता वाचेल.
आणि मग...
थेट प्रेमात पडेल!
पण प्रत्यक्षात काय व्हायचं?
शाळेच्या शिपायाला भिंती साफ कराव्या लागायच्या!
एक दिवस अशोकमामा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ गेले.
भिंतीवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं—
> तुझ्या डोळ्यांत चंद्र दिसतो, तुझ्या हास्यात सूर्य हसतो...
अशोकमामांनी कविता वाचली.
मग आजूबाजूला पाहिलं.
आणि मोठ्याने ओरडले,
"एऽऽ! कुणी लिहिलंय रं हे?"
जवळच उभा असलेला चंदू अगदी निरागस चेहरा करून म्हणाला,
"काय झालं मामा?"
"आरं, ही भिंत हाय का कवितेची वही?"
चंदू म्हणाला,
"मामा, कविता लई भारी हाय ना?"
अशोकमामांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं.
"म्हणजे तूच लिहिलीयस व्हय?"
चंदू लगेच गोंधळला.
"न्हाय मामा! मी फक्त वाचत व्हतो!"
"मग सांग, तुझ्या डोळ्यांत चंद्र दिसतो म्हणजे काय?"
चंदूने विचार केला.
मग म्हणाला,
"मामा, कवीची कल्पना हाय!"
अशोकमामांनी कपाळावर हात मारला.
"आरं, मग त्या कवीला सांग, कल्पना वहीत लिहायची! भिंतीवर न्हाय!"
चंदूने मान हलवली.
"बरं मामा!"
अशोकमामा पुढे निघाले.
चंदूने सुटकेचा निःश्वास सोडला.
तेवढ्यात मागून अमोल आला.
"ए चंद्या!"
"काय रं?"
"पुन्हा कविता लिहिलीस?"
"व्हय!"
"कुठं?"
"भिंतीवर!"
अमोलने कपाळावर हात मारला.
"आरं, तुला वही न्हाय का?"
चंदू गंभीरपणे म्हणाला,
"हाय की!"
"मग वहीत का लिहीत न्हायस?"
चंदू म्हणाला,
"आरं, वही मानिषा वाचणार कशी?"
अमोल गोंधळला.
"म्हणजे?"
"आरं, भिंतीवर लिहिलं की सगळ्यांना दिसतं!"
अमोलने विचारलं,
"पण मानिषाने वाचलं का?"
चंदू काही क्षण शांत झाला.
"अजून न्हाय!"
"मग?"
"आरं, एक दिवस वाचंल!"
अमोल हसू लागला.
"चंद्या, तू कविता लिहिण्यापेक्षा शाळेच्या रंगकामाचा खर्च वाढवतोयस!"
चंदूने अभिमानाने उत्तर दिलं,
"मोठ्या प्रेमासाठी छोटामोठा खर्च होणारच!"
### दहावीची परीक्षा की प्रेमाची परीक्षा?
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला अवघे वीस दिवस उरले होते.
शाळेत अभ्यासाचं वातावरण होतं.
कुंभार सर इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेत होते.
गणिताचे शिक्षक महत्त्वाची उदाहरणं सांगत होते.
मुख्याध्यापक म्हणून बाबाही विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवत होते.
पण चंदूच्या डोक्यात मात्र वेगळाच अभ्यास सुरू होता.
मानिषाला प्रपोज कसं करायचं?
एक दिवस चंदू अमोलजवळ आला.
"ए अमल्या!"
अमोल गणिताचं उदाहरण सोडवत होता.
"काय रं?"
"एक लई महत्त्वाचं काम हाय!"
"काय?"
"आज मला तुझी मदत पाहिजे!"
अमोलने वहीतून मान वर केली.
"कशासाठी?"
चंदूने आजूबाजूला पाहिलं.
मग कुजबुजला,
"मानिषासाठी!"
अमोलने डोळे मिटले.
"आरं चंद्या! पुन्हा?"
"काय पुन्हा?"
"पाच वर्षं झाली रं! अजून तुझं मानिषाच चाललंय?"
चंदूने गंभीर चेहरा केला.
"अमल्या, प्रेम हाय ते!"
अमोल हसला.
"बरं! मग काय करायचंय?"
चंदूने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं,
"आता अंतिम निर्णय घ्यायचाय!"
"कसला?"
"प्रपोज करायचं!"
"मग कर की!"
चंदू दचकला.
"आरं, एवढं सोपं असतं व्हय?"
"मग?"
"आधी प्लॅन पाहिजे!"
अमोलने वही बंद केली.
"बरं! मग आज प्लॅन करू!"
चंदू आनंदाने म्हणाला,
"म्हणजे तू मदत करणार?"
"हो!"
चंदूने अमोलचा हात हातात घेतला.
"अमल्या, तू खरा दोस्त हायस रं!"
अमोल म्हणाला,
"हो! पण आधी हात सोड! माझं गणित बाकी हाय!"
### ऑपरेशन मानिषा!
त्या दिवशी शाळा सुटल्यावर दोघं नेहमीच्या जागी गेले.
पाटीलसाहेबांच्या शेतात.
जांभळाच्या झाडाखाली.
दोघं बसले.
समोर एक वही.
एक पेन.
आणि चंदूच्या मनात पाच वर्षांचं प्रेम!
अमोल म्हणाला,
"चल, सांग! काय करायचं?"
चंदूने विचार केला.
"पहिला प्लॅन!"
"काय?"
"मानिषाला गुलाबाचं फूल द्यायचं!"
अमोलने विचारलं,
"गुलाब कुठून आणणार?"
"बाजारातून!"
"पैसे?"
चंदू गप्प.
"दुसरा प्लॅन!"
अमोल हसला.
"बरं, सांग!"
"तिच्यासमोर कविता म्हणायची!"
अमोलने लगेच विचारलं,
"कुठली?"
चंदूने छाती फुगवली.
"तुझ्या डोळ्यांत चंद्र दिसतो..."
अमोलने मध्येच थांबवलं.
"बस! नको!"
"का रं?"
"आरं, ही कविता तू स्वच्छतागृहाच्या भिंतीवर लिहिली व्हतीस ना?"
"व्हय!"
"मग मानिषाला कविता आवडण्याऐवजी अशोकमामा आठवतील!"
चंदू हसू लागला.
"मग तिसरा प्लॅन!"
"सांग!"
"तिच्यासमोर जाऊन थेट सांगायचं!"
अमोल म्हणाला,
"हा बरा आहे!"
चंदूने मान हलवली.
"न्हाय!"
"का?"
"धाडस होत न्हाय!"
अमोलने कपाळावर हात मारला.
"मग काय करायचं?"
चंदूने क्षणभर विचार केला.
आणि अचानक त्याचे डोळे चमकले.
"एक भन्नाट आयडिया!"
"काय?"
"प्रेमपत्र!"
अमोलने मान हलवली.
"हा पर्याय चांगला आहे."
चंदू म्हणाला,
"पण साधं प्रेमपत्र न्हाय!"
अमोल सावध झाला.
"म्हणजे?"
चंदूने नाट्यमय आवाजात सांगितलं,
"रक्तानं लिहिलेलं प्रेमपत्र!"
अमोल त्याच्याकडे पाहतच राहिला.
"काय?"
"व्हय!"
"आरं चंद्या, तू प्रपोज करणार हायस का डॉक्टरकडं तपासणीला जाणार हायस?"
चंदू म्हणाला,
"आरं, सिनेमात असंच दाखवत्यात!"
अमोलने डोकं हलवलं.
"सिनेमात दाखवत्यात म्हणून सगळं करायचं नसतं!"
चंदू विचारात पडला.
मग म्हणाला,
"मग लाल शाईनं लिहूया!"
अमोलच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव आले.
"हा! हे बरं!"
चंदूने विचारलं,
"पण लाल शाई कुठून आणायची?"
अमोल म्हणाला,
"माझ्याकडं लाल पेन हाय!"
चंदूने आनंदाने टाळी वाजवली.
"झालं तर मग!"
अमोल हसत म्हणाला,
"आता निदान प्रेमपत्र लिहायला दवाखान्यात जायची गरज न्हाय!"
दोघंही खळखळून हसले.
### प्रेमपत्राचा पहिला मसुदा!
अमोलने वही उघडली.
लाल पेन काढलं.
"चल, सांग! काय लिहायचं?"
चंदूने आकाशाकडे पाहिलं.
एक दीर्घ श्वास घेतला.
आणि मोठ्या नाट्यमय आवाजात म्हणाला,
"प्राणप्रिये... मम हृदयप्रिये..."
अमोलने लिहिणं थांबवलं.
"ए चंद्या!"
"काय?"
"ही मानिषाला चिठ्ठी लिहितोयस की संस्कृतचा पेपर सोडवतोयस?"
चंदू म्हणाला,
"आरं, प्रेमपत्रात भारी शब्द पाहिजेत!"
अमोलने विचारलं,
"तुला 'मम हृदयप्रिये'चा अर्थ माहीत हाय?"
चंदू थोडा गोंधळला.
"म्हणजे... हृदयातली प्रिया!"
"आणि मानिषाला समजला न्हाय तर?"
चंदू म्हणाला,
"मग ती शब्दकोशात बघंल!"
अमोलने कपाळावर हात मारला.
"आरं, तू प्रेमपत्र देणार हायस! गृहपाठ न्हाय!"
चंदू हसू लागला.
अमोल म्हणाला,
"सरळ, साध्या मराठीत लिहूया. तुला जे वाटतं तेच सांग."
चंदू काही क्षण शांत झाला.
मग म्हणाला,
"बरं!"
अमोलने नवीन पान उघडलं.
"चल, सांग."
चंदू हळूहळू बोलू लागला.
"प्रिय मानिषा..."
अमोल लिहू लागला.
"मला तुला एक गोष्ट सांगायची आहे..."
चंदू थांबला.
"काय झालं?"
"आरं, थोडं छान लिही की!"
अमोलने विचारलं,
"कसं?"
चंदू म्हणाला,
"असं लिही... पाचवीपासून तू मला आवडतीस!"
अमोल हसला.
"ठीक आहे!"
दोघांनी बराच वेळ विचार करून शेवटी पत्र तयार केलं.
त्यात मोठमोठे शब्द नव्हते.
कठीण इंग्रजी नव्हतं.
सिनेमातले संवाद नव्हते.
फक्त चंदूच्या मनातली साधी भावना होती.
चंदूचं प्रेमपत्र
प्रिय मानिषा,
मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. पाचवीपासून तू मला आवडतेस. पण आजपर्यंत तुला सांगायचं धाडस झालं नाही.
मी कधी कधी वेड्यासारखा वागतो, हे मला माहीत आहे. पण मला तुझ्याशी मैत्री करायला आणि तुला अधिक ओळखायला आवडेल.
तुला माझ्याबद्दल तसं वाटत नसेल, तरी काही हरकत नाही.
तुझा वर्गमित्र,
चंद्रकांत रामू कांबळे.
पत्र वाचून चंदू काही क्षण शांत झाला.
मग म्हणाला,
"ए अमल्या!"
"काय?"
"लई भारी झालं रं!"
अमोल हसला.
"मग झालं!"
चंदूने पत्र पुन्हा वाचलं.
"पण एक अडचण हाय!"
अमोलने डोळे मिटले.
"आता काय?"
"पत्र लिहिलं..."
"हो!"
"पण द्यायचं कसं?"
अमोलने आकाशाकडे पाहिलं.
"देवा! आता या माणसाला पत्र द्यायचा प्लॅन बी पाहिजे!"
### अमोलचा ऐतिहासिक प्लॅन!
अमोल काही क्षण विचार करत बसला.
मग अचानक म्हणाला,
"चंद्या! एक भन्नाट प्लॅन सुचलाय!"
चंदू सावध झाला.
"काय?"
"उद्या सकाळी मानिषा शाळेत येईल ना?"
"व्हय!"
"मी लांबून बघत उभा राहीन."
"मग?"
"ती आली की तुला खूण करीन."
"मग?"
"तू थेट तिच्यासमोर जायचं!"
चंदूने घाबरून विचारलं,
"आणि?"
"एका गुडघ्यावर बसायचं!"
चंदूचे डोळे मोठे झाले.
"काय?"
"हो!"
"आरं, कशापायी?"
"प्रपोज करायचंय ना?"
चंदूने मान हलवली.
"बरं!"
अमोल पुढे म्हणाला,
"मग तिच्याकडे न बघता पत्र पुढं करायचं!"
चंदूने विचारलं,
"न बघता?"
"हो! म्हणजे तुला लाज वाटणार न्हाय!"
"मग?"
"पत्र तिच्या हातात द्यायचं!"
"मग?"
"आणि तिथून पळायचं!"
चंदू थक्क झाला.
"पळायचं?"
"हो!"
"कुठं?"
"घरी!"
चंदू काही क्षण विचार करत राहिला.
मग म्हणाला,
"आरं, पण उत्तर?"
अमोलने गंभीर चेहरा केला.
"दुसऱ्या दिवशी!"
चंदूने विचारलं,
"म्हणजे?"
अमोल म्हणाला,
"उद्या पत्र द्यायचं. परवा उत्तर मिळेल!"
चंदूने आनंदाने टाळी वाजवली.
"म्हणजे एकदम परीक्षेसारखं!"
अमोल हसला.
"हो!"
चंदू म्हणाला,
"आज अर्ज, उद्या निकाल!"
अमोलने दुरुस्ती केली.
"उद्या अर्ज, परवा निकाल!"
चंदू हसला.
"बरं! पण पास झालो तर?"
"मग आनंद!"
"आणि नापास?"
अमोलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"मग पुढं अभ्यास करायचा!"
चंदूने मान हलवली.
"बरोबर!"
दोघांनी एकमेकांच्या हातावर टाळी दिली.
ऑपरेशन मानिषा — अंतिम मंजुरी!
### वर्तमानकाळ — बाबांचा हशा!
"हाहाहाहा!"
मी गाडीत जोरात हसायला लागलो.
"बाबा! हा कसला प्लॅन?"
बाबा हसले.
"अरे, त्यांना तोच सर्वांत उत्तम वाटला!"
मी म्हणालो,
"एका गुडघ्यावर बसायचं, मुलीकडे बघायचंच नाही, पत्र द्यायचं आणि पळायचं?"
"हो!"
"बाबा, ही प्रेमाची कबुली आहे की चोरी करून पळण्याची योजना?"
बाबा खळखळून हसले.
"मंगेश, त्या वयात त्यांना तेच सुचलं!"
मी विचारलं,
"मग दुसऱ्या दिवशी काय झालं?"
बाबांनी माझ्याकडे पाहिलं.
"त्यांनी प्लॅन तंतोतंत अमलात आणला!"
मी दचकलो.
"खरंच?"
"हो!"
"मग मानिषाने काय उत्तर दिलं?"
बाबांनी हलकंसं हसत उत्तर दिलं,
"अरे, उत्तर तर दूरच राहिलं..."
"म्हणजे?"
"आधी पत्र योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे ना!"
मी गोंधळलो.
"बाबा, काय म्हणताय?"
बाबा हसले.
"ऐक!"
### ऑपरेशन मानिषा — डी डे!
दुसऱ्या दिवशी सकाळ.
श्री सिद्धनाथ विद्यामंदिर, अंकले.
शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मुलांची वर्दळ सुरू होती.
कुणी सायकल लावत होतं.
कुणी मित्रांसोबत गप्पा मारत होतं.
कुणी गृहपाठ पूर्ण करत होतं.
आणि चंदू?
चंदू एका झाडामागे उभा होता!
हातात लाल शाईने लिहिलेलं प्रेमपत्र.
चेहऱ्यावर प्रचंड तणाव.
अगदी बोर्डाची परीक्षा द्यायला निघाल्यासारखा!
थोड्या अंतरावर अमोल उभा होता.
त्याचं काम एकच.
मानिषा दिसली की खूण करायची!
चंदूने लांबून विचारलं,
"ए अमल्या!"
अमोलने हाताने शांत राहण्याची खूण केली.
चंदूने पुन्हा कुजबुजत विचारलं,
"आली का रं?"
अमोलने नकारार्थी मान हलवली.
चंदूने पत्र खिशातून काढलं.
पुन्हा घडी घातली.
पुन्हा उघडलं.
पुन्हा घडी घातली.
मग स्वतःशीच म्हणाला,
"चंद्रकांत रामू कांबळे... आज तुझ्या आयुष्याचा मोठा दिवस हाय!"
त्याने छातीवर हात ठेवला.
हृदय जोरात धडधडत होतं.
धडधड... धडधड...
तेवढ्यात दूरवरून अमोलने हात हलवला.
चंदू सावध झाला.
अमोलने पुन्हा खूण केली.
मानिषा येत होती!
पण...
एक छोटासा तपशील अमोलच्या लक्षात आला नव्हता.
मानिषा एकटी नव्हती!
तिच्यासोबत शाळेतील आणखी एक शिक्षिका येत होती.
उषा मॅडम!
### एक पाऊल पुढे... आणि इतिहास घडला!
अमोलने चंदूला खूण केली.
चंदूने एक दीर्घ श्वास घेतला.
पत्र हातात घट्ट पकडलं.
आणि झाडामागून बाहेर आला.
त्याच्या डोक्यात अमोलचा प्लॅन घुमत होता.
सरळ जायचं.
एका गुडघ्यावर बसायचं.
समोर बघायचं नाही.
पत्र द्यायचं.
आणि पळायचं!
चंदूने मान खाली घातली.
समोरून दोन व्यक्ती येत होत्या.
एक उषा मॅडम.
आणि त्यांच्या दोन पावलं मागे मानिषा.
पण चंदूने वर पाहिलंच नाही!
त्याला वाटलं...
हीच मानिषा!
तो अचानक पुढे गेला.
आणि...
धप्पकन् एका गुडघ्यावर बसला!
उषा मॅडम थांबल्या.
त्यांनी आश्चर्याने खाली पाहिलं.
समोर चंदू!
एका गुडघ्यावर बसलेला.
हातात लाल रंगात लिहिलेलं पत्र.
चेहऱ्यावर गंभीर भाव.
उषा मॅडम गोंधळल्या.
"अरे चंद्रकांत! काय झालं?"
चंदूने मान वर केली नाही.
कारण प्लॅनमध्ये स्पष्ट सांगितलं होतं—
समोर बघायचं नाही!
त्याने थरथरत्या हाताने पत्र पुढे केलं.
"हे... तुमच्यासाठी!"
उषा मॅडम आणखी गोंधळल्या.
"माझ्यासाठी?"
चंदूने मान हलवली.
"व्हय!"
मॅडमनी पत्र हातात घेतलं.
"पण हे काय आहे?"
चंदू काही बोलला नाही.
त्याच्या डोक्यात पुढचा आदेश सुरू झाला होता.
पत्र दिलं.
आता पळायचं!
तो पटकन उभा राहिला.
आणि...
धूम ठोकली!
अक्षरशः धूम!
इतक्या वेगाने पळाला की शाळेच्या शर्यतीतही कदाचित तितक्या वेगाने धावला नसेल!
उषा मॅडम त्याच्याकडे पाहतच राहिल्या.
मानिषाही थांबली.
तिने आश्चर्याने विचारलं,
"मॅडम, काय झालं?"
उषा मॅडम म्हणाल्या,
"मलाही काही कळलं नाही!"
त्यांनी हातातलं पत्र पाहिलं.
लाल शाई.
नीट घडी घातलेला कागद.
आणि वर लिहिलेलं—
प्रिय मानिषा...
उषा मॅडमनी भुवया उंचावल्या.
### अमोलचा प्लॅन... आणि अमोलचीच पंचाईत!
दूर उभा असलेला अमोल संपूर्ण प्रकार पाहत होता.
सुरुवातीला त्याला वाटलं...
वा! चंद्यानं धाडस केलं!
पण मग त्याच्या लक्षात आलं.
थांब!
मानिषा तर मागं हाय!
मग पुढं कोण?
अमोलने डोळे मोठे केले.
आणि पुढच्या क्षणी त्याला सत्य समजलं.
चंदूने प्रेमपत्र मानिषाला नाही... उषा मॅडमना दिलं होतं!
अमोलच्या हातापायांतलं त्राणच गेलं.
"आरं देवा!"
त्याने कपाळावर हात मारला.
"चंद्या! काय केलंस रं तू!"
तो धावत चंदूच्या मागे गेला.
चंदू शाळेच्या इमारतीच्या मागे जाऊन थांबला होता.
धापा टाकत होता.
पण चेहऱ्यावर आनंद होता.
अमोल तिथे पोहोचला.
"ए चंद्या!"
चंदू आनंदाने म्हणाला,
"अमल्या! झालं रं!"
अमोलने कपाळावर हात ठेवला.
"काय झालं?"
"प्रपोज केलं!"
"कुणाला?"
चंदूने आश्चर्याने विचारलं,
"आरं, मानिषाला!"
अमोलने डोळे मिटले.
"चंद्या..."
"काय?"
"एक विचारू?"
"विचार!"
"तू पत्र देताना वर बघितलंस का?"
चंदूने अभिमानाने उत्तर दिलं,
"न्हाय!"
"का?"
"आरं, तूच सांगितलं व्हतंस ना! वर बघायचं न्हाय!"
अमोलने कपाळावर हात मारला.
"आरं, पण कुणाला पत्र देतोयस ते तरी बघायचं व्हतंस!"
चंदू गोंधळला.
"म्हणजे?"
अमोलने हळू आवाजात सांगितलं,
"तू मानिषाला पत्र दिलंच न्हायस!"
चंदूचा चेहरा उतरला.
"काय?"
"व्हय!"
"मग कुणाला दिलं?"
अमोल काही क्षण गप्प राहिला.
मग म्हणाला,
"उषा मॅडमना!"
क्षणभर शांतता.
चंदूने अमोलकडे पाहिलं.
अमोलने चंदूकडे.
चंदूने पुन्हा विचारलं,
"कुणाला?"
अमोलने थोड्या मोठ्या आवाजात सांगितलं,
"उषा मॅडमना रं!"
चंदूचे डोळे मोठे झाले.
तोंड उघडंच राहिलं.
"आरं देवा!"
त्याने दोन्ही हात डोक्यावर ठेवले.
"म्हणजे... मी..."
अमोल म्हणाला,
"व्हय!"
"उषा मॅडमसमोर..."
"व्हय!"
"एका गुडघ्यावर बसलो?"
"व्हय!"
"आणि प्रेमपत्र दिलं?"
"व्हय!"
चंदू काही क्षण स्तब्ध राहिला.
मग अचानक म्हणाला,
"ए अमल्या!"
"काय?"
"मला आता एक सांग!"
"काय?"
"मॅडमनी पत्र घेतलं का?"
अमोलने आश्चर्याने पाहिलं.
"आरं, घेतलं की!"
चंदूने डोकं धरलं.
"मग संपलं!"
अमोल म्हणाला,
"काय संपलं?"
चंदूने गंभीर चेहरा केला.
"माझं दहावीचं शिक्षण!"
अमोलला हसू फुटणार होतं.
पण परिस्थिती पाहून त्याने कसंबसं स्वतःला सावरलं.
चंदू पुढे म्हणाला,
"आरं, वीस दिवसांनी बोर्डाची परीक्षा हाय!"
"माहीत हाय!"
"आणि आता मॅडम मला शाळेतून काढणार!"
अमोल म्हणाला,
"आरं, आधी काय होतंय ते बघू!"
चंदूने रागाने विचारलं,
"तू खूण कशापायी केलीस?"
अमोल म्हणाला,
"मानिषा आली म्हणून!"
"मग मॅडम दिसल्या न्हायती का?"
अमोलने मान खाली घातली.
"त्या लक्षातच आल्या न्हायती!"
चंदूने कपाळावर हात मारला.
"अमल्या!"
"काय?"
"तुझ्या प्लॅननं माझा घात केला रं!"
अमोल म्हणाला,
"आरं, तू तरी वर बघायचंस!"
चंदूने उत्तर दिलं,
"आरं, वर बघायचं न्हाय, हे तूच सांगितलं व्हतंस!"
अमोल गप्प झाला.
दोघं एकमेकांकडे पाहत राहिले.
आणि त्या गंभीर परिस्थितीतही अमोलला अचानक हसू आलं.
चंदूने रागाने विचारलं,
"काय हसतोयस?"
अमोल कसाबसा म्हणाला,
"आरं, पाच वर्षं मानिषासाठी पत्र लिहायची तयारी केलीस..."
"मग?"
"आणि पहिलंच पत्र उषा मॅडमना दिलंस!"
अमोल खळखळून हसू लागला.
चंदूने त्याच्याकडे पाहिलं.
त्याला रागही येत होता.
भीतीही वाटत होती.
पण काही क्षणांनी त्यालाही हसू आलं.
"आरं अमल्या, माझं नशीबच फुटकं हाय रं!"
दोघंही हसू लागले.
पण त्यांचं हसणं फार वेळ टिकणार नव्हतं.
कारण...
प्रेमपत्र आता उषा मॅडमच्या हातात होतं!
### वर्तमानकाळ — गाडीतला हशा!
"हाहाहाहाहा!"
मी इतक्या जोरात हसायला लागलो की बाबांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं.
"काय रे मंगेश?"
"बाबा! हे काय झालं?"
बाबाही हसू लागले.
मी हसत म्हणालो,
"पाच वर्षं प्रेमपत्राची तयारी!"
"हो!"
"वीस दिवसांनी बोर्डाची परीक्षा!"
"हो!"
"एका गुडघ्यावर बसून प्रपोज!"
"हो!"
"आणि पत्र थेट उषा मॅडमना?"
बाबा खळखळून हसले.
"अगदी!"
मी डोळ्यातलं हसू पुसत म्हणालो,
"बाबा, हा चंदू एक नंबरचा नमुना आहे!"
बाबा म्हणाले,
"आणि अमोल?"
मी पुन्हा हसलो.
"अमोल तर त्याचा मुख्य सल्लागार!"
बाबा म्हणाले,
"हो! दोघांनी मिळून जो प्लॅन केला होता ना, त्याचा परिणाम काय होणार याचा विचारच केला नव्हता!"
मी काही क्षण हसत राहिलो.
मग अचानक माझ्या लक्षात आलं.
"एक मिनिट बाबा!"
"काय?"
"तुम्ही म्हणालात... उषा मॅडम?"
"हो."
"म्हणजे माझी उषा?"
बाबांनी माझ्याकडे पाहिलं.
"हो रे! तुझ्याबरोबर शिकलेली उषाच!"
मी थक्क झालो.
"काय सांगताय बाबा!"
बाबा हसले.
"हो!"
मी पुन्हा विचारलं,
"म्हणजे चंदूने प्रेमपत्र माझ्या उषाला दिलं?"
बाबा म्हणाले,
"अरे, तुझी उषा म्हणजे तुझी वर्गमैत्रीण! आणि हो, तिलाच दिलं!"
मी काही क्षण गप्प झालो.
माझ्या मनात उषाचा चेहरा तरळून गेला.
तीच उषा...
जिच्यासोबत मी लहानपणापासून शिकलो.
जिच्याबद्दल मनात भावना असूनही कधी बोलू शकलो नाही.
आणि आता तिच्याच साखरपुड्यासाठी मी न्यूयॉर्कहून भारतात परतत होतो.
मी बाबांना विचारलं,
"बाबा, मग उषाने काय केलं?"
बाबांनी खिडकीबाहेर पाहिलं.
मग माझ्याकडे वळून म्हणाले,
"तेच तर पुढे सांगणार होतो."
"म्हणजे?"
"मंगेश, चंदू आणि अमोलला वाटलं होतं की त्यांचा प्लॅन फसला."
मी म्हणालो,
"फसलाच ना!"
बाबांनी हलकंसं हसत उत्तर दिलं,
"हो. पण खरी गंमत तर पत्र उषाच्या हातात गेल्यानंतर सुरू झाली!"
मी उत्सुकतेने पुढे झुकलो.
"बाबा, मग?"
बाबांनी हसत विचारलं,
"तुला पुढची गोष्ट ऐकायची आहे ना?"
"अर्थात!"
बाबा म्हणाले,
"मग ऐक..."
गाडी अंकलेच्या दिशेने पुढे धावत होती.
माझ्या मनात मात्र एक विचित्र विचार सुरू झाला होता.
चंदूला मानिषा आवडत होती.
पण त्याने पत्र दिलं उषाला.
आणि मी?
मला उषा आवडत होती.
पण मी तिला कधी पत्र तर सोडाच, साधं मनातलंही सांगू शकलो नव्हतो.
मला नकळत हसू आलं.
चंदूचं प्रेमपत्र चुकीच्या व्यक्तीकडे पोहोचलं होतं... आणि माझ्या मनातलं प्रेम तर कधी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचलंच नव्हतं.
किती विचित्र योगायोग!
एका मुलाने प्रेम व्यक्त करण्याचं धाडस केलं होतं, पण पत्ता चुकला होता.
आणि दुसऱ्याने आयुष्यभर योग्य पत्ता माहीत असूनही कधी पत्र लिहिलंच नव्हतं.
मी बाबांकडे पाहिलं.
ते शांतपणे बसले होते.
कदाचित त्यांना माझ्या मनात काय चाललं आहे, याची कल्पना नव्हती.
किंवा...
कदाचित होतीही.
### दोस्ती...
पाच वर्षं प्रेमाची तयारी केली...
वीस दिवस अभ्यासाला उरले होते...
दोन मित्रांनी मिळून प्लॅन आखला...
एकाने खूण केली...
दुसऱ्याने गुडघा टेकला...
पत्र पुढे केलं...
आणि न बघताच पळून गेला!
कारण प्रेमात कधी कधी धाडसापेक्षा योग्य व्यक्ती ओळखणं जास्त महत्त्वाचं असतं!
आणि त्या दिवशी चंदूने एक ऐतिहासिक गोष्ट सिद्ध केली होती—
प्रेम आंधळं असू शकतं... पण प्रेमपत्र देताना तरी डोळे उघडे ठेवायला हवेत!
### भाग ७ समाप्त — प्रेमपत्र, लाल शाई आणि चुकीचा पत्ता!
क्रमशः...