### दोस्ती...
### भाग ६ — इंडिया इज माय कंट्री... आणि प्रेमाची इंग्लिश गडबड!
काही मुलं शाळेत अभ्यासासाठी जातात. काही खेळण्यासाठी. काही मित्रांना भेटण्यासाठी. पण आमच्या अंकलेच्या शाळेत अशीही दोन-तीन रत्नं होती, ज्यांना इंग्रजी शिकण्यापेक्षा इंग्रजीतून मानिषाला प्रभावित करण्याची जास्त घाई होती!
आणि त्या घाईत इंग्रजी व्याकरणाचं जे काही व्हायचं, ते पाहून कुंभार सरांना कधी कधी स्वतःच्या शिक्षक होण्याच्या निर्णयावरच शंका यायची!
### पुन्हा एकदा आठवणींच्या गावात...
चहाचा ब्रेक संपवून आम्ही पुन्हा गाडीत बसलो.
बाबांनी सीटबेल्ट लावला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि आमचा अंकलेकडे प्रवास पुन्हा सुरू झाला.
माझ्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही ओसरलं नव्हतं.
"बाबा, एक विचारू?"
"विचार की!"
"त्या अमोलने खरंच IQ विकत आणण्यासाठी अशोकमामांकडे पैसे मागितले होते का?"
बाबा खळखळून हसले.
"मंगेश, तू अजून त्याच IQ मध्ये अडकलायस?"
"काय करू बाबा! अमोल स्वतःसाठी IQ विकत घेणार आणि चंदूसाठीही एक आणणार, हे डोक्यातून जातच नाहीये!"
बाबा हसत म्हणाले,
"अरे, त्या दोघांचे असे कितीतरी किस्से आहेत. पण आता त्यांच्या जोडीला अजून एक नमुना मिळाला होता."
"कोण?"
"जीवन!"
"अच्छा! तोच का, ज्याने IQ कंपासपेटीसारखं दुकानात मिळतं असं अमोलला सांगितलं होतं?"
"तोच!"
मी हसलो.
"मग तर भारीच त्रिकूट झालं असेल!"
बाबा म्हणाले,
"त्रिकूट नव्हे रे... आता त्या तिघांच्या आयुष्यात मानिषा नावाचं एक मोठं संकट आलं होतं!"
मी आश्चर्याने विचारलं,
"संकट?"
बाबांनी डोळे मिचकावले.
"अरे, चंदू आणि जीवन दोघांनाही मानिषाला प्रभावित करायचं होतं!"
मी कपाळावर हात मारला.
"बाबा! पाचवीतच प्रेमाची स्पर्धा?"
"हो! आणि त्या स्पर्धेत दोघांची जी फजिती व्हायची ना..."
बाबा हसू लागले.
"ऐक आता!"
### शनिवार म्हणजे चंदू-अमोलचा स्वातंत्र्यदिन!
अंकले गाव.
श्री सिद्धनाथ विद्यामंदिर.
शनिवारचा अर्धा दिवस संपला की चंदू आणि अमोलचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा.
शाळा सुटली की घरी कळवायचं.
मग पाटीलसाहेबांच्या शेताकडे निघायचं.
रामू बापूंच्या देखरेखीखाली विहिरीत पोहण्याची मजा घ्यायची.
आणि त्यानंतर...
जांभळाच्या झाडावर!
हे दोघं इतक्या नियमितपणे तिथे जायचे की त्या झाडालाही बहुतेक शनिवार कधी येतो हे समजू लागलं असावं!
एकदा चंदू झाडावर चढत असताना अमोल म्हणाला,
"ए चंद्या, जरा सांभाळून रं!"
"आरं, काय झालं?"
"पडशील!"
"आरं, तू खाली उभा हायस ना!"
"म्हणजे?"
"पडलो तर पकड की मला!"
अमोलने वर पाहिलं.
"एवढा मोठा तू! मी कसा पकडू?"
चंदू गंभीर चेहरा करून म्हणाला,
"मग तू खाली कशापायी उभा हायस? फुकटची सावली खायला?"
अमोल हसायला लागला.
दोघं झाडाच्या मजबूत, खालच्या फांद्यांवर बसून जांभळं खात होते.
कधी एकमेकांना जांभळं फेकून द्यायचे.
कधी कोणाच्या जिभेला जास्त जांभळा रंग चढलाय, याची स्पर्धा करायचे.
त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच त्यांची धमाल सुरू होती.
पण अमोलच्या डोक्यात एक महत्त्वाची गोष्ट होती.
त्याने चंदूकडे पाहिलं.
"ए चंद्या!"
"काय रं?"
"उद्या काय हाय माहीत हाय ना?"
चंदूने जांभूळ तोंडात टाकलं.
"रविवार!"
"आरं, ते न्हाय!"
"मग सोमवार?"
"चंद्या! जरा नीट ऐक की!"
चंदू हसला.
"बरं बाबा, सांग!"
अमोल म्हणाला,
"कुंभार सरांनी इंग्रजीत निबंध तयार करायला सांगितलाय!"
चंदूने आणखी एक जांभूळ तोडलं.
"मग?"
"मग काय? वर्गात सादर करायचाय!"
"कशावर?"
"India! आपल्या देशावर!"
चंदूने मान हलवली.
"अच्छा! इंडिया!"
"तयारी केलीस का?"
"व्हय!"
अमोलने संशयाने त्याच्याकडे पाहिलं.
"खरंच?"
"व्हय की!"
"मग पहिलं वाक्य सांग!"
चंदूने विचार केला.
जांभळाची बी खाली टाकली.
आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,
"इंडिया इज..."
अमोल उत्सुकतेने ऐकत होता.
"पुढं?"
चंदूने दुसरं जांभूळ तोंडात टाकलं.
"इंडिया इज... लई भारी!"
अमोलने कपाळावर हात मारला.
"आरं चंद्या! इंग्रजीत सांगायचंय!"
"मग काय? इंडिया इंग्रजीतच बोललो की!"
"आरं, पूर्ण निबंध इंग्रजीत पाहिजे!"
चंदूने विचारलं,
"किती मोठा?"
"किमान एक पान!"
चंदूचे डोळे मोठे झाले.
"एक पान?"
"हो!"
"आरं, एवढा मोठा इंडिया हाय, तर एका पानात कसा बसणार?"
अमोल इतका हसला की त्याच्या हातातली जांभळं खाली पडली.
"चंद्या, तुझं काही खरं न्हाय!"
चंदूने खांदे उडवले.
"आरं, काळजी करू नगंस! बघू की उद्या!"
अमोलने पुन्हा बजावलं,
"कुंभार सर लई कडक हायती. नीट तयारी कर!"
चंदूने मान हलवली.
"व्हय रं, करतो!"
पण अमोलला चांगलंच माहीत होतं.
चंदूच्या डोक्यात सध्या इंग्रजीचा निबंध कमी आणि मानिषाचे विचार जास्त होते!
### सोमवार — इंग्रजीचा महाभयंकर तास!
सोमवारची सकाळ.
वर्गात सगळी मुलं बसली होती.
कुणी इंग्रजीची वही चाळत होतं.
कुणी पाठ केलेला निबंध मनातल्या मनात म्हणत होतं.
आणि चंदू?
चंदू शेवटच्या बाकावर बसून मानिषाकडे पाहत होता!
मानिषा पुढच्या बाकावर बसून आपली वही वाचत होती.
चंदूने शेजारच्या मुलाला विचारलं,
"ए, मानिषा काय वाचतीया रं?"
"इंग्रजीचा निबंध!"
"अच्छा!"
चंदू काही क्षण विचारात पडला.
मग म्हणाला,
"आरं, किती अभ्यास करती ही!"
तेवढ्यात जीवन तिथे आला.
जीवनलाही मानिषाला प्रभावित करायचं होतं.
आणि म्हणूनच आज त्याने विशेष तयारी केली होती.
केसांना नीट भांग पाडलेला.
शर्ट व्यवस्थित खोचलेला.
हातात इंग्रजीची वही.
आणि चेहऱ्यावर असा आत्मविश्वास की जणू इंग्रजी भाषा यानेच शोधून काढली होती!
जीवन चंदूकडे पाहून म्हणाला,
"ए चंद्या, आज बघ माझं इंग्रजी!"
चंदूने त्याच्याकडे पाहिलं.
"का रं? काय झालं?"
"आज मी निबंध सादर करणार!"
"कर की!"
"आणि बघ, मानिषा कशी प्रभावित होती!"
चंदूने डोळे बारीक केले.
"आरं, मानिषाचा त्यात काय संबंध?"
जीवन हसला.
"तुला काय कळणार? इंग्रजी बोलायला आलं पाहिजे!"
चंदूने शांतपणे उत्तर दिलं,
"आरं, इंग्रजी बोलायला आलं म्हणून काय मुंबईची रेल्वे तुझ्या नावावर करणार हायती व्हय?"
मागच्या बाकावरची मुलं हसायला लागली.
जीवनचा चेहरा उतरला.
"बघच तू!"
चंदूने हात हलवला.
"व्हय बाबा! बघतो!"
तेवढ्यात...
कुंभार सर वर्गात आले.
### कुंभार सरांचा प्रश्न
"Good morning, students!"
"Good morning, sir!"
"Sit down!"
सगळे विद्यार्थी खाली बसले.
कुंभार सरांनी आपली वही टेबलावर ठेवली.
चष्मा नीट केला.
आणि वर्गाकडे पाहिलं.
"Yesterday, I asked you to prepare an essay on India."
वर्गात शांतता.
"How many of you have prepared?"
एकामागून एक हात वर जाऊ लागले.
अमोलचा हात वर.
मानिषाचा हात वर.
जीवनचा हात तर इतक्या वेगाने वर गेला की शेजारच्या मुलाला वाटलं हा काहीतरी पकडायला निघालाय!
बाकी सगळ्यांचे हात वर गेले.
पण...
शेवटच्या बाकावर एक हात खालीच होता.
चंदूचा!
कुंभार सरांनी संपूर्ण वर्गावर नजर फिरवली.
आणि त्यांची नजर चंदूवर स्थिरावली.
"Chandu!"
चंदू उभा राहिला.
"व्हय सर!"
"Where is your hand?"
चंदूने स्वतःच्या हातांकडे पाहिलं.
मग दोन्ही हात वर करून म्हणाला,
"हिथंच हायती सर!"
वर्गात हशा पिकला.
"हाहाहाहा!"
कुंभार सरांनी कपाळावर हात ठेवला.
"Chandu! I mean, have you prepared your essay?"
चंदूने अमोलकडे पाहिलं.
अमोलने कपाळावर हात मारला.
चंदू म्हणाला,
"सर... थोडासा!"
"How much?"
चंदू काही क्षण विचारात पडला.
मग म्हणाला,
"सर, इंडिया इज माय कंट्री!"
कुंभार सरांनी विचारलं,
"And?"
चंदू गप्प.
"And?"
चंदूने खिडकीबाहेर पाहिलं.
"And... इंडिया इज लई मोठा कंट्री!"
संपूर्ण वर्ग पुन्हा हसायला लागला.
कुंभार सरांनी टेबलावर हात आपटला.
"Silence!"
मग चंदूकडे पाहून म्हणाले,
"Sit down!"
चंदू खाली बसला.
आणि अमोलच्या कानात कुजबुजला,
"ए अमल्या!"
"काय?"
"आरं, मी कालच म्हटलं व्हतं ना, इंडिया लई मोठा हाय!"
अमोलला हसू आवरेना.
### जीवनची इंग्रजीतून हिरोगिरी!
कुंभार सरांनी वर्गाकडे पाहिलं.
"Who would like to present the essay?"
क्षणाचाही विलंब न करता जीवनचा हात वर गेला.
"Sir! Sir! Me, sir!"
कुंभार सर म्हणाले,
"Yes, Jeevan. Come here."
जीवन उठला.
त्याने शर्ट नीट केला.
केसांवरून हात फिरवला.
हातात वही घेतली.
आणि वर्गासमोर चालू लागला.
पण तो चालत होता की एखाद्या चित्रपटात नायकाची एन्ट्री होत होती, हेच कळत नव्हतं!
चंदूने अमोलच्या कानात कुजबुजलं,
"ए अमल्या, ह्यो निबंध म्हणायला चाललाय का लग्नाला?"
अमोलने तोंडावर हात ठेवला.
"गप रं!"
जीवन वर्गासमोर उभा राहिला.
त्याने आधी मानिषाकडे पाहिलं.
मानिषा वहीत काहीतरी लिहीत होती.
जीवनने हलकासा खोकला.
"खं... खं..."
मानिषाने वर पाहिलं.
जीवनने लगेच छाती फुगवली.
मग त्याने वर्गाकडे पाहिलं.
त्यानंतर कुंभार सरांकडे.
आणि पुन्हा मानिषाकडे!
कुंभार सरांनी विचारलं,
"Jeevan, are you ready?"
जीवन म्हणाला,
"Yes, sir! Fully ready!"
चंदू कुजबुजला,
"आरं, निबंध सुरू कर की! फोटो काढायला उभा हायस काय?"
अमोल पुन्हा हसू लागला.
जीवनने वही उघडली.
एक दीर्घ श्वास घेतला.
आणि मोठ्या थाटात सुरुवात केली.
"India is my country..."
त्याने क्षणभर थांबून मानिषाकडे पाहिलं.
"I am a Indian..."
आणि पुढे म्हणाला,
"And all Indians are brother and sister!"
तेवढ्यात...
"Excuse me!"
मानिषाचा आवाज आला.
जीवन थांबला.
संपूर्ण वर्ग शांत झाला.
कुंभार सरांनी मानिषाकडे पाहिलं.
"Yes, Manisha?"
मानिषा उभी राहिली.
"Sir, there is a grammatical mistake."
जीवनच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक गायब झालं.
कुंभार सरांनी विचारलं,
"Where?"
मानिषा म्हणाली,
"He said 'I am a Indian'. It should be 'I am an Indian'."
संपूर्ण वर्ग शांत!
जीवनच्या हातातली वही थोडी खाली आली.
मानिषा पुढे म्हणाली,
"We use 'an' before the vowel sound in 'Indian'."
कुंभार सरांनी मान हलवली.
"Absolutely correct, Manisha!"
जीवनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे झाले.
काही क्षणांपूर्वी त्याला वाटत होतं की मानिषा त्याच्या इंग्रजीवर प्रभावित होईल.
पण झालं नेमकं उलट!
जिला प्रभावित करायला तो उभा राहिला होता, तिनेच त्याच्या इंग्रजीतली चूक पकडली होती!
### चंदूचा आनंद गगनात मावेना!
शेवटच्या बाकावर चंदू बसला होता.
त्याने संपूर्ण प्रसंग पाहिला.
जीवनचा उतरलेला चेहरा.
मानिषाचा आत्मविश्वास.
आणि कुंभार सरांचा गंभीर चेहरा.
चंदूने अमोलकडे पाहिलं.
अमोलने चंदूकडे पाहिलं.
आणि चंदूने हसू दाबण्यासाठी तोंडावर हात ठेवला.
पण हसू काही थांबेना!
त्याचे खांदे हलू लागले.
अमोल कुजबुजला,
"ए चंद्या, गप बस!"
चंदू कसाबसा म्हणाला,
"आरं... ह्यो... ह्यो तर..."
"काय?"
"मानिषाला इंग्रजी शिकवायला गेला व्हता... आणि मानिषानंच याला शिकवलं!"
अमोलचंही हसू फुटलं.
पण कुंभार सर अजून बोलायचे बाकी होते.
### पाच निबंधांची शिक्षा!
कुंभार सरांनी जीवनकडे पाहिलं.
"Jeevan!"
"Yes, sir..."
"How could you make such a basic grammatical mistake in a prepared essay?"
जीवनने मान खाली घातली.
"Sorry, sir."
कुंभार सर म्हणाले,
"You were supposed to prepare carefully."
"Yes, sir."
"Now you will write essays on five different topics and show them to me tomorrow!"
जीवन दचकला.
"Five, sir?"
"Yes! Five!"
जीवनने पुन्हा विचारलं,
"Tomorrow, sir?"
कुंभार सरांनी चष्म्यातून त्याच्याकडे पाहिलं.
"Would you prefer ten?"
जीवन घाबरून म्हणाला,
"No, sir! Five is very good, sir!"
वर्गात हशा पिकला.
कुंभार सरांनी हाताने शांत राहण्याची खूण केली.
"Go and sit down."
जीवन खाली मान घालून आपल्या बाकाकडे निघाला.
आता त्याच्या चालण्यात सकाळचा तो रुबाब नव्हता.
केसांचा भांगही तसाच होता.
शर्टही तसाच खोचलेला होता.
पण आत्मविश्वास?
तो बहुतेक वर्गासमोरच राहिला होता!
जीवन आपल्या जागेवर बसला.
चंदूने त्याच्याकडे पाहून हळूच विचारलं,
"काय रं जीवना?"
जीवनने रागाने पाहिलं.
"काय?"
"पाच निबंध लिहायचेत व्हय?"
"हो!"
चंदू गंभीर चेहरा करून म्हणाला,
"मग इंडिया सोडून अजून चार देश निवड की!"
अमोल हसायला लागला.
जीवन चिडला.
"गप बस रं!"
चंदू म्हणाला,
"आरं, मदत करतोय की तुला!"
### मधली सुट्टी — जैसी करनी, वैसी भरनी!
दुपारची सुट्टी झाली.
मुलांनी डबे उघडले.
अमोल आणि चंदू नेहमीप्रमाणे एकत्र बसले.
अमोलने डबा उघडताच चंदू म्हणाला,
"ए अमल्या!"
"काय रं?"
"आज मला लई आनंद झालाय!"
"कशाचा?"
चंदूने जीवनकडे पाहिलं.
जीवन आपल्या वहीत काहीतरी लिहीत बसला होता.
बहुतेक पाच निबंधांची सुरुवात करत होता!
चंदू हसत म्हणाला,
"जैसी करनी, वैसी भरनी!"
अमोलने विचारलं,
"म्हणजे?"
चंदू म्हणाला,
"आरं, त्या दिवशी ह्यानंच तुला IQ जनरल स्टोअरमधं मिळतं म्हणून फसवलं व्हतं ना?"
अमोल हसला.
"हो!"
"मग बघ! आज ह्याचंच इंग्रजी मानिषानं पकडलं!"
अमोल खळखळून हसला.
"खरंय रं!"
चंदू पुढे म्हणाला,
"आरं, आणि कुंभार सरांनी एक न्हाय, दोन न्हाय... थेट पाच निबंध दिलेत!"
अमोल म्हणाला,
"पण चंद्या, त्याची चूक पकडली म्हणून तुला एवढा आनंद का?"
चंदूने छाती फुगवली.
"आरं, त्या दिवशी माझ्या दोस्ताला फसवलं व्हतं त्यानं!"
अमोल त्याच्याकडे पाहत राहिला.
मग हसला.
"अरे, पण मीसुद्धा विचार न करता विश्वास ठेवला होता!"
चंदूने हात हलवला.
"ते जाऊ दे! आता मला एक सांग."
"काय?"
"IQ जनरल स्टोअरमधं मिळत न्हाय, हे पक्कं ना?"
अमोलने त्याच्याकडे पाहिलं.
आणि दोघंही जोरात हसू लागले.
### मानिषाचं एक हास्य... आणि अमोलचा गोंधळ!
मधली सुट्टी संपत आली होती.
अमोल आपली वही दप्तरात ठेवत होता.
तेवढ्यात त्याची नजर मानिषाकडे गेली.
मानिषा आपल्या बाकावर बसली होती.
तिने अमोलकडे पाहिलं.
क्षणभर दोघांची नजरानजर झाली.
आणि...
मानिषा हसली.
एक साधंसं, हलकंसं हास्य.
अमोल गोंधळला.
ही माझ्याकडे का हसली?
त्याने मागे वळून पाहिलं.
कदाचित मागे कुणीतरी असेल!
पण मागे तर भिंत होती.
अमोलने पुन्हा मानिषाकडे पाहिलं.
ती आपल्या वहीत पाहू लागली होती.
अमोल काही क्षण विचारात पडला.
आपल्या चेहऱ्यावर काही लागलंय का?
त्याने पटकन गालावर हात फिरवला.
मग कपाळावर.
नाकावर.
काहीच नव्हतं.
चंदूने हे सगळं पाहिलं.
"ए अमल्या!"
"काय?"
"तोंड का चाचपडतोयस रं?"
"काय न्हाय!"
"आरं, काय झालं?"
अमोल म्हणाला,
"मानिषा माझ्याकडं बघून हसली."
चंदू अचानक सावध झाला.
"काय?"
"अरे, हसली!"
"तुझ्याकडं?"
"हो!"
चंदूने मानिषाकडे पाहिलं.
मग अमोलकडे.
मग पुन्हा मानिषाकडे.
"आरं, मग तू काय केलंस?"
"काही न्हाय!"
चंदूने कपाळावर हात मारला.
"आरं देवा!"
"काय झालं?"
"एवढी मोठी घटना घडली आणि तू काहीच केलं न्हायस?"
अमोल गोंधळला.
"काय करायला पाहिजे होतं?"
चंदूने गंभीर चेहरा केला.
"निदान हसायचं तरी!"
अमोल म्हणाला,
"आरं, मला कळलंच न्हाय ती का हसली!"
चंदूने विचार केला.
मग म्हणाला,
"बरं झालं! आता पुढच्या वेळी हसली की मला सांग."
"का?"
"मी बघतो!"
अमोलने त्याच्याकडे पाहिलं.
"काय बघणार?"
चंदू म्हणाला,
"आरं, ती तुझ्याकडं हसतीया का माझ्याकडं, ते!"
अमोलने डोक्याला हात लावला.
"चंद्या, तू लई येडा हायस!"
चंदूने अभिमानाने उत्तर दिलं,
"व्हय! पण दोस्तासाठी येडा हाय!"
दोघंही हसू लागले.
### चंदूची गुप्त योजना!
सुट्टीनंतरचा तास सुरू होण्याआधी चंदू पुन्हा अमोलजवळ आला.
यावेळी त्याचा चेहरा गंभीर होता.
इतका गंभीर की अमोलला वाटलं कुंभार सरांनी त्याला पुन्हा काही शिक्षा दिली असावी.
"ए अमल्या!"
"काय रं?"
"मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचंय."
"काय?"
"पण कुणाला सांगायचं न्हाय!"
अमोलने मान हलवली.
"बरं!"
चंदू त्याच्या कानाजवळ आला.
"मी एक प्लॅन केलाय!"
"कसला?"
चंदूने इकडे तिकडे पाहिलं.
कुणी ऐकत नाही ना, याची खात्री केली.
आणि हळू आवाजात म्हणाला,
"मी मानिषाला प्रपोज करणार हाय!"
अमोल दचकला.
"काय?"
"श्श्श! हळू बोल!"
अमोलने कुजबुजत विचारलं,
"आरं, पण प्रपोज म्हणजे नेमकं काय करणार?"
चंदू काही क्षण गप्प झाला.
मग म्हणाला,
"तेच तर ठरवतोय!"
अमोलने आश्चर्याने विचारलं,
"म्हणजे प्लॅन केलाय म्हणतोस आणि काय करायचं तेच माहीत न्हाय?"
चंदू म्हणाला,
"आरं, प्लॅन करणं आणि प्लॅन पूर्ण करणं या दोन वेगळ्या गोष्टी हायती!"
अमोलला हसू आलं.
"मग कधी करणार?"
चंदूने विचार केला.
"एक दिवस!"
"कुठला दिवस?"
"ते अजून ठरलं न्हाय!"
"मग काय ठरलंय?"
चंदूने छाती फुगवली.
"मानिषाला प्रपोज करायचं!"
अमोलने कपाळावर हात मारला.
"चंद्या! तू आधी इंग्रजीचा निबंध तरी तयार कर!"
चंदू म्हणाला,
"आरं, निबंध उद्या बी लिहिता येईल!"
"आणि प्रपोज?"
"त्यासाठी तयारी लागती!"
अमोल हसत म्हणाला,
"कसली तयारी?"
चंदूने गंभीर चेहरा केला.
"सगळ्यात आधी इंग्रजी शिकायला लागंल!"
"का?"
चंदू म्हणाला,
"आरं, मानिषा मुंबईच्या इंग्रजी शाळेत शिकलीया! तिला इंग्रजीतच सांगायला पाहिजे ना!"
अमोलने विचारलं,
"मग काय सांगणार?"
चंदूने क्षणभर विचार केला.
मग म्हणाला,
"ते कुंभार सरांना विचारूया!"
अमोलचे डोळे मोठे झाले.
"काय?"
"आरं, इंग्रजीचे मास्तर हायती ना!"
अमोल हसून हसून वाकला.
"चंद्या! कुंभार सरांना विचारलंस तर ते तुला इंग्रजी शिकवायच्या आधी पाच निबंध लिहायला देतील!"
चंदू थोडा विचारात पडला.
मग म्हणाला,
"मग जीवना कडनं विचारू?"
अमोलने लगेच उत्तर दिलं,
"नको! तो तुला प्रपोज करायला जनरल स्टोअरमध्ये पाठवील!"
आणि दोघंही खळखळून हसू लागले.
### परत वर्तमानात...
बाबांनी गोष्ट सांगणं थांबवलं.
मी गाडीत बसल्या बसल्या जोरात हसू लागलो.
"हाहाहाहा!"
बाबाही हसत होते.
"काय रे मंगेश?"
"बाबा, कमाल आहे! चंदूला प्रपोज करायचंय, पण काय बोलायचं तेच माहीत नाही!"
"अरे, तेव्हा त्याचं वयच किती होतं?"
"आणि जीवन? त्याने तर मानिषाला प्रभावित करायच्या नादात पाच निबंधांची शिक्षा मिळवली!"
बाबा हसले.
"हो!"
मी म्हणालो,
"पण बाबा, मानिषाने अमोलकडे पाहून का हसलं असेल?"
बाबांनी माझ्याकडे पाहिलं.
"ते मलाही तेव्हा माहीत नव्हतं."
"म्हणजे?"
"मंगेश, मी शिक्षक होतो. प्रत्येक मुलाच्या मनात काय चाललंय, हे मला कसं कळणार?"
मी हसलो.
"बरोबर आहे!"
बाबा पुढे म्हणाले,
"पण त्या दिवशी एक गोष्ट मात्र लक्षात आली."
"काय?"
"जीवनला मानिषासमोर स्वतःचं इंग्रजी दाखवायचं होतं. चंदूला तिच्याशी बोलायचं होतं. आणि अमोल?"
"अमोल काय?"
"अमोलला तर मानिषा त्याच्याकडे पाहून का हसली, हेच समजत नव्हतं!"
मी पुन्हा हसू लागलो.
काही वेळाने मी विचारलं,
"बाबा, मग चंदूने खरंच मानिषाला प्रपोज केलं का?"
बाबा हसले.
"अरे, तो त्याचा प्लॅन होता!"
"मग?"
"मग काय झालं, ते पुढे सांगतो."
मी खिडकीबाहेर पाहिलं.
आणि माझ्या मनात पुन्हा ती शाळा उभी राहिली.
शेवटच्या बाकावर बसलेला चंदू.
अभ्यासात हुशार पण कधी कधी भोळा अमोल.
इंग्रजीत स्वतःला भारी समजणारा जीवन.
मुंबईहून आलेली मानिषा.
आणि या सगळ्यांना इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करणारे कुंभार सर!
मी बाबांकडे पाहिलं.
"बाबा, तुमच्या शाळेत शिकवणं म्हणजे फार कठीण काम असणार!"
बाबा हसले.
"का रे?"
"कारण तिथे विद्यार्थ्यांना इंग्रजीपेक्षा मानिषामध्ये जास्त रस होता!"
बाबा खळखळून हसले.
"अरे, पण सगळी मुलं तशी नव्हती!"
"मग चंदू आणि जीवन तरी नक्कीच होते!"
"ते मात्र खरं!"
गाडी पुढे धावत होती.
मी विचार करत होतो.
बालपण किती वेगळं असतं!
त्या वयात कुणाला इंग्रजी नीट येत नाही म्हणून जग थांबत नाही.
कुणी निबंधात चूक केली म्हणून आयुष्य संपत नाही.
कुणी आपल्याकडे पाहून हसलं, तर त्याचा अर्थ लावता येत नाही.
आणि कुणी आवडलं, तर त्याला काय सांगायचं, हेसुद्धा माहीत नसतं.
पण तरीही त्या दिवसांत आनंद असतो.
हसणं असतं.
खोड्या असतात.
आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी असतात.
मला बाबांनी सांगितलेली एक गोष्ट पुन्हा आठवली.
चंदू आणि अमोल स्वभावाने वेगळे होते.
पण दोघंही एकमेकांच्या वेडेपणात सहभागी होत होते.
चंदू अमोलला हसवत होता.
अमोल चंदूला समजावत होता.
आणि जीवनसारखा एखादा मित्र त्यांच्या आयुष्यात आला की त्या हसण्याला आणखी रंग चढत होता.
### दोस्ती...
एकाला इंग्रजीचा निबंध पाठ नव्हता...
दुसऱ्याला इंग्रजीचं व्याकरण नीट जमत नव्हतं...
तिसऱ्याला मानिषाशी इंग्रजीत बोलायचं होतं...
आणि चौथ्याला आपण कुणाकडे पाहून हसलो, याची कल्पनाही नव्हती!
कुंभार सरांना विद्यार्थ्यांचं इंग्रजी सुधारायचं होतं...
पण विद्यार्थ्यांच्या डोक्यात चाललं होतं वेगळंच व्याकरण!
कारण बालपणात काही चुका पुस्तकात दुरुस्त करता येतात... पण काही चुका पुढे आयुष्यभर हसण्यासाठी आठवणी बनून राहतात!
### भाग ६ समाप्त — इंडिया इज माय कंट्री... आणि प्रेमाची इंग्लिश गडबड!
क्रमशः...