कपबशी आणि अडकित्ता

Submitted by निमिष_सोनार on 2 November, 2026 - 05:05

"अगं अगं सूनबाई काय म्हणता सासुबाई" हा चित्रपट हिट झाल्यापासून निर्मिती सावंतचे अनेक चित्रपट येत आहेत आणि ते सर्व चांगले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला आणि ऍमेझॉन प्राईम या ओटीटीवर आलेला "कप बशी" हा तिचा चित्रपट सुद्धा खूप छान आहे. तसेच Z5 वर सई ताम्हणकरचा "अडकित्ता" हा चित्रपट बघितला. दोन्ही चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतात. दोन्ही चित्रपटांची कथा पूर्ण वेगळी, ओरिजनल आणि छान आहे.

आपल्या लग्नाचे वय उलटून गेलेल्या मुलासाठी निर्मिती सावंत स्थळ शोधत असते. काही वेळा मुलीच्या अटींमुळे, तर काही वेळेस तिच्या मुलीसाठी असलेल्या एका ज्योतिष शास्त्रीय (अंगलक्षण शास्त्रीय) अटीमुळे मुलाचे लग्न होत नसते. रेड FM RJ पूजा सावंतचे कार्यक्रम निर्मितीला आवडत असतात. पूजाचे लग्न होत नसते कारण तिची सुद्धा एक ज्योतिषशास्त्रीय अट असते. दोन्ही बाजूच्या अटी पूर्ण होतात का?

हा चित्रपट हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने पुढे सरकत जातो. परंतु अधून मधून आणि सर्वात शेवटी (रेड FM च्या स्टुडिओतून निर्मिती सावंत जे बोलते) अगदी छान भावनिक प्रसंग दाखवले आहेत त्यामुळे हा चित्रपट आपल्याला रडवतो. पूजाने निर्मितीच्या तोडीस तोड अभिनय केलेला आहे. इतर कलाकारांनी सुद्धा छान अभिनय केला आहे. निर्मितीच्या आईची भूमिका करणारी (अज्जल सासू) अभिनेत्रीसुद्धा हास्याचे कारंजे पसरवते. संपूर्ण चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला अडकवून ठेवतो.

कप बशी आणि चहा यांची सासू, सून आणि मुलगा यांच्याशी जी तुलना केलेली आहे ती चित्रपटाचा हाय पॉईंट आहे. बघा. तुम्हाला आवडेल.

Z5 वरील अडकित्ता चित्रपटामध्ये घरात कोणीही मोठे उपलब्ध नसल्यामुळे काम करणाऱ्या जोडप्याला (सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले) लहान बाळाला सांभाळायला बाई हवी असते. सई ताम्हणकरच्या रुपाने ती मिळते सुद्धा. सई ताम्हणकरची स्वतःची एक बॅक स्टोरी आहे. आपण वेगळा विचार करत राहतो, की आता असेच घडेल पण तसे घडत नाही. उलट आणखी चांगले घडते. या चित्रपटामध्ये नेहेमी चांगलेच घडते, फक्त एक घटना वगळता. ती घटना चित्रपटाचे कथेला ट्विस्ट देणारी ठरते.

संपूर्ण चित्रपटामध्ये कळते की, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे व घटनांमुळे, प्रमाणिक माणसंसुद्धा समोरील इतर प्रामाणिक माणसांवर संशय कसे घेतात. परंतु जो प्रामाणिक असतो तो शेवटपर्यंत प्रामाणिकच राहतो, हे सत्य आपल्याला चित्रपट सांगतो. या चित्रपटातील तीनही व्यक्तिरेखीमध्ये कोणीही वाईट नाही. कोणीही चूक नाही. ठराविक परिस्थिती आहे जी चूक आहे!

चित्रपटातील तिन्ही व्यक्तिरेखा प्रगल्भ (mature) आहेत. सखी एका प्रसंगात (परदेशातून आल्यावर तिच्या मुलाला सई एका मुलाच्या वाढदिवसाला घेऊन गेलेली असते तेव्हाचा प्रसंग) सईसोबत थोडी ओव्हर रिएक्ट (अतीरंजीत प्रतिक्रिया) होते पण, त्यानंतर सिद्धार्थ आणि तिच्यातील जो संवाद आहे तो या चित्रपटाचा हाय पॉईंट आहे.

दोन्ही चित्रपटात अगदी थोडे sexual references आणि dialogues आहेत पण ते सौम्य रीतीने हाताळले आहेत. कप बशी मध्ये मुलीची (पूजा) जी अट असते, त्यामागचे कारण मुलीसमोर लहानपणी घडलेल्या एका प्रसंगात असते. तेही आपल्याला पटते. तर तो लहानपणीच्या प्रसंग (थोडा अस्वस्थ करणारा) आणि अडकित्तामधील सीसीटीव्हीच्या एका प्रसंगामुळे दोन्ही चित्रपटांना 13+ रेटिंग आहे, अन्यथा 7+ द्यायला हरकत नव्हती.

हे दोन्ही चित्रपट बघण्यासारखे आहेत. कृपया वेळ काढून आवर्जून बघा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अडकित्ता चांगला आहे. कपबशी नाही पाहिला.
तुम्ही मराठी पिक्चर बघता आणि सर्वांना आवर्जून सांगता. मराठी वाचवण्याचं काम करताय.