सांभाळले होते

Submitted by vilasrao on 14 October, 2026 - 07:05

गजल

जया नात्यांस मी प्राणांहुनी सांभाळले होते
तयांनी नेमके काळीज हे ठेचाळले होते

जया दीपास वाऱ्यापासुनी मी झाकले रात्री
तयाने शेवटी माझ्याच हाता जाळले होते

मला वाऱ्यासवे वाहायचे हे साधले नाही
म्हणूनी वादळांशी वैर मी हे पाळले होते

घरी अंधार इतका, अंत नाही त्यास कोठेही
दिवे तेवायला थोडेच मी न्याहाळले होते

भरारी घ्यायची होती नभाच्या पार जाण्याला
परी काळाने पंखांना असे पिरगाळले होते

विलासा, शीण देहाला, तरीही चालतो आहे
पथी स्वप्नांपुढे काटे कुठे मी टाळले होते?

विलास खाडे

Group content visibility: 
Use group defaults