गॉकेलिनचे संशोधन

Submitted by केअशु on 12 October, 2026 - 22:28

मायकेल गॉकेलिन हा फ्रान्स मधल्या पॅरिस या शहरात १९२८ साली जन्मला. गॉकेलिनने विविध व्यावसायिक क्षेत्रातील हजारो लोकांचे जन्मटिपण म्हणजे जन्मवेळ , जन्मतारीख आणि जन्मठिकाण हा डेटा घेऊन त्यांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले.गॉकेलिनचे ज्योतिषविषयक मुख्य सांख्यिकीय संशोधन साधारण १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून १९८० च्या दशकापर्यंत चालले.
हे करताना त्याने वैदिक ज्योतिषाप्रमाणे जन्माच्या वेळचे आकाश बारा राशींमध्ये न विभागता ग्रहाच्या जन्मस्थानावरून दिसणाऱ्या दैनिक आकाशमार्गाचे १२ विभाग केले होते. त्यामध्ये त्याला असे आढळले की पूर्व क्षितिजावर विशिष्ट ग्रहाच्या उदय बिंदूपासून लगतच्या वेळेत जे लोक जन्मले तसेच तोच ग्रह मध्यान स्थानी गेल्यानंतर (Mid heaven) च्या लगतच्या वेळेत जन्मलेले जे लोक होते ते त्या ग्रहाशी संबंधित व्यवसायामध्ये उत्कृष्ट/प्रसिद्ध कामगिरी केलेले असे लोक होते. म्हणजे समजा जर पूर्व क्षितिजावर मंगळ उगवला असेल तर त्याच्या उदय बिंदूपासून लगतच्याच वेळेत तसेच मंगळ मध्यानावर गेल्यावर त्याच्या लगतच्या वेळेत जन्मलेले जे लोक होते ते सैन्य , मैदानी खेळ , पोलीस दल , मिलिटरी बँड तसेच अन्य अशी क्षेत्रे ज्यात शारीरिक कष्ट , जोम , धडाडी धाडस हे फार महत्त्वाचे असते अशा क्षेत्रांमध्ये नावाजलेले लोक होते.

गॉकेलिन याने केलेले हे संख्याशास्त्रीय संशोधन फार महत्त्वाचे आहे. कारण गॉकेलिन हा ज्योतिषशास्त्र शिकला होता आणि तो अतिशय उत्तम असा संख्याशास्त्रज्ञ देखील होता. त्याने मानसशास्त्रामध्ये देखील डॉक्टरेट मिळवली होती. गॉकेलिन याच्या या संशोधन कार्यात त्याची पत्नी फ्रांसवाझ हिनेदेखील मोलाची मदत केली होती.

गॉकेलिनच्या संशोधनातून आलेल्या अन्य काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.

१) गॉकेलिनने आनुवंशिकता या दृष्टीने ज्योतिषशास्त्रीय पडताळणी करून पाहिली त्यावेळी त्याला असे आढळले की आई किंवा वडील यांच्या जन्माच्या वेळी जे ग्रह प्रभावी(उदित बिंदूपासून लगतच्या वेळेत) होते तेच ग्रह अपत्यांच्या जन्माच्या वेळी देखील तसेच प्रभावी असलेले दिसतात. परंतु याला एक मर्यादा अशी देखील आहे की गॉकेलिनच्या मते, Caesarean किंवा प्रसूतीमध्ये वैद्यकीय हस्तक्षेप झालेल्या जन्मांमध्ये त्याने शोधलेला planetary heredity effect आढळत नव्हता.

२) ग्रहांचा प्रभाव हा विशिष्ट प्रकारचा व्यवसाय किंवा कौशल्य यासाठी लाभदायक/जुळणारे असणारे व्यक्तिमत्व निर्माण करतो. विशिष्ट ग्रह विशिष्ट व्यवसाय चालवण्यासाठी सहाय्य करतो असा त्याचा अर्थ नव्हे. विशिष्ट ग्रहाचा आणि विशिष्ट व्यवसायाचा संबंध नाही.

३) गॉकेलिनचे संशोधन प्रामुख्याने अनुभवजन्य आणि सांख्यिकीय होते. त्याने ग्रह माणसांवर कोणत्या भौतिक यंत्रणेद्वारे परिणाम करतात हे सिद्ध केले नाही; त्याने जन्ममाहितीच्या मोठ्या नमुन्यांमध्ये ग्रहस्थिती आणि मानवी वैशिष्ट्ये/व्यावसायिक यश यांच्यात सांख्यिकीय संबंध आहे का, हे तपासले. ग्रह जर माणसावर परिणाम करत असतील तर ते तो कशाप्रकारे करतात हा त्याच्या संशोधनाचा भाग नव्हता.

खालील भाग यशोदा भागवत यांच्या फल ज्योतिष्य शास्त्र की अंधश्रद्धा या पुस्तकातून घेतला आहे.

गॉकेलिनचे टीकाकार

गॉकेलिनने नोंदविलेल्या शोधांचे साधारण मूल्यमापन करण्यापूर्वी त्याच्या टीकाकारांबद्दल, विशेषतः ज्यांना काही शास्त्रीय पार्श्वभूमी आहे अशा टीकाकारांबद्दल काही गोष्टी सांगाव्यात असे आम्हांला वाटते. शास्त्रात पक्षपात होत नाही अशी एक लोकप्रिय समजूत आहे. परंतु आम्हांला असे आढळून आले की, गॉकेलिनवर टीका करणाऱ्यांनी साधा शिष्टाचारही न पाळता वाकडी वाट करून पक्षपात, पूर्वग्रह व शत्रुभाव दाखवून देण्यात नैतिकंतेचीही बूज राखलेली नाही. बेल्जियम कमिटी पॅराचे एक उदाहरण त्यासाठी पुरेसे होईल. खरे तर ज्योतिषशास्त्राला पूर्णपणे बळकटी देणारे गॉकेलिनचे अभ्यास पाहूनही त्यांनी ते सिद्ध होऊ नयेत म्हणून आपला अहवाल अर्धवटच प्रसिद्ध केला. (तसे नसते, तर ते का नाकारले त्याचा संपूर्ण अहवाल कमिटीने सादर केला असता.) शास्त्रामध्ये तर ही गोष्ट मुळीच बसणारी नाही. पण मग त्यामुळे झाले काय, की गाँकेलिनच्या निष्कर्षांबाबत कमिटी या निर्णयास का आली त्याचे ज्ञान आम्हांला केवळ गॉकेलिनच्या काही उद्धृतांमधून आणि त्याच्याशी केलेल्या चर्चेमधूनच मिळवावे लागले. त्यामुळे आम्हांला जरी गॉकेलिनच्या कामाबाबत यत्किचितही शंका नाही, तरी कमिटीचा अहवाल वैचारिक आदानप्रदानासाठी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.

अमेरिकन कमिटीचा उल्लेख आम्ही आधी केलेलाच आहे. त्या कमिटीने पुन्हा नव्याने काही संख्याशास्त्रीय आक्षेप उभे केले आणि त्यांचे निराकरण केले तरच तुमचे काम ग्राह्य धरले जाईल, असे गॉकेलिन-द्वयीला कळवले. मग पुन्हा गॉकेलिन-द्वयीने खूप मोठ्या प्रमाणात तपशिलांची जमवाजमव केली आणि संख्याशास्त्राची ती अटही पूर्ण केली. त्यातूनही त्यांच्या कामाला बळकटीच मिळाली. त्याउपरसुद्धा कमिटीने गॉकेलिन-द्वयीचा दावा सिद्ध झाला असे मान्य करण्यास नकारच दिला! शास्त्रातली ही पद्धतसुद्धा आगळीच दिसते आणि कमिटीला तरी ती श्रेयस्कर ठरत नाही. नेमके 'पडद्यामागे' काय कटकारस्थान झाले त्याचा संपूर्ण दुर्दैवी अहवाल रॉवलिन (१९८१) आणि करी (१९८२) यांनी दिलेला आहे आणि तो जर खरा असेल तर कमिटीला अनेक गोष्टींचा जाब द्यावा लागेल.

कल्व्हर व ईना (१९७९) यांच्याचसारखे इतरही टीकाकार गॉकेलिनचे संशोधन हाणूनच पाडायचे असा खेळ खेळताना दिसतात. त्यांनी आपल्या टीकेमध्ये गाँकेलिनच्या संशोधनाला खूपच अपुरी जागा दिलेली आहे. त्यामुळे अनभिज्ञ वाचकांना गॉकेलिनने आपल्या कामासाठी केवढा प्रचंड खटाटोप केला, केवढे अमाप परिश्रम घेतले, किती पुनरभ्यास केले किंवा त्यांत त्याला कितपत यश, केव्हा केव्हा मिळाले, ते कळणेही कठीण होऊन बसते. त्यांनी आपल्या मीमांसेत अर्थपूर्ण परिणाम मिळविण्यात अपयशी ठरलेले इतर लहानसहान पुनरभ्यास नमूद करण्यावर अकारणच भर दिलेला आहे. आणि ते अभ्यास अयशस्वी ठरण्याचे मुख्य कारण वाचकांपर्यंत पोहोचूच दिलेले नाही, की त्यांत पुरेसे प्रख्यात नसणाऱ्या व्यक्तींचे गट वापरण्यात आलेले होते; आणि गॉकेलिनच्या कामाची रास्त परीक्षा करायची तर ते गट प्रख्यात लोकांचेच असावे लागतील.

गॉकेलिनच्या कामाबाबत जे संख्याशास्त्रीय आक्षेप घेण्यात आले तेही अनेकदा अशाच पद्धतीने घेण्यात आले आहेत. त्यामुळे या टीकेतून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे ते वाचकांना कळणेच अवघड होऊन बसते. कल्व्हर व ईना यांनी काय म्हटले आहे ते पहा :

मूलतः गॉलिन-द्वयीच्या पृथक्करणाबाबत वेगवेगळ्या कारणांनी टीका होते. परंतु त्यापैकी बरीचशी त्यांच्या मोजणी-पद्धतीवर आणि तर्पाशलांत त्यांनी किती प्रमाणात स्वातंत्र्य घेतलेले आहे, त्या हिशोबाबाबत आहे. दावा असा आहे की हे घटक जर नेमके सांगण्यात आले तर गॉकेलिनने घेतलेल्या दोन्ही गटांच्या वर्गीकरणाचे मूल्यमापन साधारण १०६ पेक्षाही खाली जाऊ शकते.

लक्षात घ्या, की कल्व्हर व ईना यांनी अगदी संदिग्ध असे विधान केले आहे आणि त्यांनी असेही म्हटलेले नाही की, या विधानाशी ते सहमत आहेत. त्यांनी तो दावा फक्त मांडलेला आहे, पण त्याच्या नेमक्या मूल्यमापनाचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्यांनी त्यात हे पण नमूद केलेले नाही की, गॉकेलिनचे पृथक्करण तपासण्यासाठी एका नामवंत संख्याशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेत गॉकेलिनचे पृथक्करण पूर्णपणे यशस्वी ठरले. तेव्हा ही टीका वस्तुतः गॉकेलिनची काहीच चूक नसूनही, तो चूक ठरला असा गैरसमज निर्माण करण्यासाठीच केलेली दिसते. 'शास्त्रीय टीका' खरे तर अशी असत नाही.

आम्ही स्वतःच गॉकेलिनची प्रयोगरचना आणि संख्याशास्त्रीय सप्रमाणता अत्यंत काळजीपूर्वक तपासली. तसेच त्याचे टीकाकार आणि तो यांच्यातले सर्व विवाद्य मुद्देही मोठ्या जिज्ञासेने पाहिले. तेव्हा त्यातून आम्ही अगदी ठाम अशा निष्कर्षास पोहोचलो की, अनेकदा टीकाकारांची वर्तणूक अनुचित होती. शास्त्रसंमत तर ती मुळीच नव्हती. त्यांनी स्वतःची तत्त्वे स्वतःच पायदळी तुडविलेली होती; सर्व शास्त्रीय नियमांचे उल्लंघनही त्यांनीच केले होते; स्वतः चाचण्या करताना तपशिलांबाबत गॉकेलिनला विचारलेही नव्हते किंवा मिळालेल्या निष्कर्षांमधले आवश्यक मुद्दे दडवून ठेवले होते. गाँकेलिन पति-पत्नींकडून मात्र तशा प्रकारचे कोणतेच दुराचरण न झाल्याचे आम्हांला आढळून आले. ते दोघेही पूर्णवेळ शास्त्रीय भूमिकेशी सुसंगत, शांत व तर्कनिष्ठ वर्तणूक करीत होते. प्रत्येक टीकेला उत्तर देण्यासाठी नवीन तपशील गोळा करत त्यांचे यथायोग्य पुनः पृथक्करण सादर करीत होते आणि हे सारे काम अत्यंत कष्टप्रद असूनही आपली तर्कनिष्ठ भूमिका सोडत नव्हते. त्यामुळे गाँकेलिनवर केलेल्या टीकेच्या भडीमारातून 'शास्त्रीय' समाज सहज निसटू शकेल असे वाटत नाही.

लेखात प्रो० बॉक (१९७५) याने असे लिहिले आहे की, ग्रहांत व आपल्यांत खूपच अंतर असल्यामुळे ते मानवी क्रियांवर प्रभाव पाडू शकणार नाहीत. तसेच त्याने असेही गृहीत धरलेले दिसते की, ग्रहांनी सोडलेल्या प्रभावी किरणांपासून ढाल बनून प्रसूतिगृहाच्या भिंती, नवजात बालकाचे संरक्षण करतील. खगोलशास्त्रज्ञ असूनही त्याने अशी विधाने करावी म्हणजे नवलच आहे. त्याला माहीत असावयास हवे की, ग्रह सूर्याच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पाडू शकतात; आणि त्यातूनच आपल्यावरही तहत-हेचे परिणाम होत असतात; आणि हेही ज्ञातच आहे की, काही विशिष्ट रश्मिकिरण अभेद्य अशा भिंतीही भेटून जाऊ शकतात- त्यांना प्रसूतिगृहांच्या भिंती अपवाद असणार नाहीत !

'अॅक्वारिअन एजंट' या ज्योतिषपत्रकाने १९७६मध्ये त्या शास्त्रज्ञांच्या विरोधात एक निवेदन प्रसिद्ध केले. त्याचा आशय असा, की 'फलज्योतिष हा निदान एक संशोधन व्हावे असा प्रांत आहे. केवळ एका विशिष्ट रविराशीवरून संपूर्ण भविष्य सांगणारे पाखंडी ज्योतिषी आणि अनेक ज्योतिषशास्त्रीय घटकांचा सखोल अभ्यास करणारे, शास्त्राची कास धरणारे ज्योतिषी यांच्यामधला फरक आपण जाणून घ्यावयास हवा. या निवेदनावर त्यांनी विश्वविद्यालयीन पदवीधरांच्या १८७ (!) सह्या मिळविलेल्या आहेत. त्यांनीही हुकमी दाद मागितलेली असली तरी त्यांचा दृष्टिकोन काहीसा कमी पूर्वग्रहदूषित आहे. अर्थात, केवळ अधिक संशोधन व्हावयास हवे असे त्यांचे म्हणणे आणि पुराव्यांची प्रत्यक्ष परीक्षा करण्याचे त्यांनी टाळणे वा नाकारणे - म्हणजे पापभीरूपणा असला तरी पापच करण्यासारखे आहे! अर्थात, असेही शक्य आहे की, ज्योतिषशास्त्राच्या कोणत्याच बाबीत काही तथ्य नसेल. पण मुद्दा असा, की त्या १८६ शास्त्रज्ञांनी तसे दर्शवून दिलेले नाही. त्यासाठी त्यांनी फलज्योतिषाला पुष्टी देणारे सर्व उपलब्ध पुरावे पद्धतशीर तपासावे लागतील आणि मगच ते कसे व्यर्थ आहेत ते दाखवून द्यावे लागेल.

शास्त्रज्ञांमध्ये काहीशी समतोल वृत्ती दिसते ती जे० अॅलन हायनेक याची. हायनेक हा नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील अॅस्ट्रॉनॉमी विभागाचा चेअरमन; आणि प्रो० बॉकची जी दुसरी कमिटी, 'हॉर्वर्ड कमिटी ऑन अॅस्ट्रॉलॉजी' तिचा तो सभासद. त्याने 'अमेरिकन मेन ऑफ सायन्स' या डिरेक्टरीत समाविष्ट असलेल्या वीस हजार जणांच्या कुंडल्या तयार केल्या; तपासल्या. तेव्हा त्यांत 'बुद्धीचा कारक मानला गेलेला बुध' किंवा रविराशी यांचे तथाकथित योगसंबंध त्याला कुठेच आढळले नाहीत. ज्या वेधशाळेत त्याने हे काम केले तेथल्या संचालकांनी नकारात्मक निकाल असूनसुद्धा ते प्रसिद्ध करण्यासाठी त्याला परवानगी नाकारली. त्यांनी साधा विचारसुद्धा केला नाही की, आपल्या कर्मचाऱ्याने त्यासाठी केवढा वेळ खर्च केलेला आहे. त्यामुळेच, १९७८ साली प्रकाशित झालेल्या गॉकेलिनच्या पुस्तकाला प्रस्तावना देताना हायनेकने लिहिले: "अतिशय घुटमळत, दोलायमान होत...मी ही प्रस्तावना लिहितो आहे. कारण, फलज्योतिषशास्त्राशी अगदी दूरान्वयाने जरी एखाद्या खगोलशास्त्रज्ञाचा संबंध आला, तरी त्याचे शांस्त्रीय बंधुभाव झुगारावयास ते पुरेसे होईल."

अशा या ढळढळीत वैराच्या पार्श्वभूमीवर फलज्योतिषशास्त्राबाबत कोणतीही नवी संकल्पना मांडताना वा प्रयोग करताना उघड्या मनाच्या शास्त्रज्ञांना युद्धपातळीच गाठावी लागेल. संशोधन करण्याचा त्यांचा मूलभूत हक्कही या क्षेत्रासाठी नाकारला जाईल. परिणामी दोषारोप व उपहास ओढवून घेण्यापेक्षा मूग गिळून गप्प बसणे प्रस्थापित शास्त्रज्ञ स्वीकारतील. मनोधैर्य असणारे काही थोडेच फक्त कबूल करतील की, "त्यात काही तथ्य असू शकेल."

मानसोपचारतज्ञ किंवा मानसशास्त्राचे अभ्यासक हे तरी मोकळ्या मनाचे असतील असे आपल्याला वाटते का? तर तसेही दिसत नाही.

गुडस्टाइन व ब्राझीस (१९७०) यांनी आपल्या ज्योतिषविषयक प्रयोगाचे स्वतःच वर्णन केलेले आहे ते असे की, त्यांनी 'अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'च्या सभासदांपैकी कोणतेही १००० सभासद घेतले आणि त्यांना एक प्रश्नावली पाठविली. जन्मवेळेच्या ग्रहस्थितीनुसार उपजीविकेचा व्यवसाय ठरू शकतो का, यासंबंधीची ती प्रश्नावली होती; आणि त्या सभासद मानसशास्त्रज्ञांनी प्रयोगाचा दर्जा वा शास्त्रीय गुणवत्ता योग्य आहे का, ते ठरवावयाचे होते. खरे तर हा प्रयोग बनावट होता. मानसशास्त्रज्ञांच्या अर्ध्या गटाला एक नमुना व दुसऱ्या अर्ध्या गटाला दुसरा नमुना पाठविण्यात आला होता. एका गटाच्या प्रश्नावलीसोबत, निवडलेला व्यवसाय आणि ग्रहांची सांगड असल्याचे पुरावे दर्शविण्यात आले होते; तर दुसऱ्या गटाची प्रश्नावली तीच असली तरी तशी सांगड नसते असे परिणाम दर्शविण्यात आले होते.

मानसशास्त्रज्ञ निकाल देताना वस्तुनिष्ठ असतील अशी अपेक्षा होती. परंतु या प्रयोगाने ते तसे नसतात, असेच दाखवून दिले. बऱ्याच जणांनी उर्मट शेरे मारून प्रश्नावली अनुत्तरित परत पाठविली. फक्त २८२ जणांनी उपयुक्त ठरेल अशी भरून पाठविली. त्यातही ज्यांना नकारात्मक परिणाम पाठविण्यात आले होते त्यांनी प्रश्नावली चांगली आहे, मांडणीच्या दृष्टीने साधार आहे, निर्णयाप्रत येण्यास पुरेशी आहे, असा निर्वाळा दिला. दोन्ही गटांना पाठविण्यात आलेली प्रश्नावली जरी एकच होती तरी त्यासोबत आलेल्या मानसशास्त्रज्ञांच्या भावनिक प्रतिक्रिया आणि पक्षपातीपणाचा पुरावा पाहून, गुडस्टाइन व
ब्राझीस यांना तत्परतेने लिहिणे भाग पडले की, "दुर्दैव असे की भावविवशतेचे आणि पक्षपातीपणाचे दुष्परिणाम माहीत असूनही, चिकित्सा करतेवेळी मानसशास्त्रज्ञ आपल्या इतर शास्त्रीय सहकाऱ्यांपेक्षा फारसे वस्तुनिष्ठ वा निःपक्षपाती नसतात."

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults