मी मरण माझे पुढे पाहून आहे

Submitted by vilasrao on 10 October, 2026 - 11:03

मी मरण माझे पुढे पाहून आहे,
तूज आयुष्या तरी हाकून आहे.

माग ना घ्यावा मनाचा आठवांनी,
आज रस्ता मी पुन्हा टाळून आहे.

सावलीनेही दिला धोका दुपारी,
मी उन्हाला सोबती मानून आहे.

पिंजरा सोन्यात त्यांनी मढवलेला,
पंख मी माझे तरी परजून आहे.

सूर्य ज्यांनी झाकला, त्यांना कळू द्या,
काजवा हातात मी राखून आहे.

चार भिंती, छत; कुणी कैदेत ठेवो,
मी झरोक्यातून नभ वेचून आहे.

मी सुखांना शिकवली जेव्हा मुजोरी,
दुःख माझे आजही दबकून आहे.

विलासराव

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर..
सूर्य ज्यांनी झाकला... शेर विशेष आवडला

भटांचा एक शेर आठवला
सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो.."

डबल पोष्ट