दुनियादारी

Submitted by vilasrao on 10 October, 2026 - 10:43

**दुनियादारी**

आज पैशावाचुनी औकात नाही,
अन् गरीबाच्या व्यथेची बात नाही.

दाम येता सोयरे होतात गोळा,
रिक्त झोळीला इथे खैरात नाही.

स्वप्न डोळ्यांना भुकेल्या काय ठावे?
दोन घासांची हमी हातात नाही.

राजवाड्याला दिव्यांची रोषणाई,
झोपडीला एक साधी वात नाही.

सत्यवादी एकटा गर्दीत खोट्या,
एकही पाठीवरी त्या हात नाही.

संकटी जो थांबतो, तो फक्त माझा,
जो सुखाचा सोबती, दुःखात नाही.

मोजती नाती अता पैशांत सारे,
काळजे जिंका, धनाला मात नाही.

शेवटी जो तो रित्या हातीच जातो,
प्रेम, माया यांहुनी सौगात नाही.

विलास खाडे

Group content visibility: 
Use group defaults