Submitted by vilasrao on 10 October, 2026 - 10:40
**वृत्त:** आनंदकंद (गागालगा लगागा · गागालगा लगागा)
**काफिया:** "-आव" · **रदीफ:** "आठवेना"
ओठांवरी असे, पण ते नाव आठवेना,
भेटायचो जिथे मी, ते गाव आठवेना.
जाताक्षणी तुझ्या त्या डोळ्यांत काय होते?
अश्रू, हसू कि दोन्ही? तो भाव आठवेना.
दुखते अजून काही छातीत खोल कोठे,
केव्हा, कुणी दिलेला तो घाव आठवेना.
खेळात जीव माझा मी लावला कशाला?
हरलो कसा, कुठे मी, तो डाव आठवेना.
दोघांस पार नेण्या जी सोडली प्रवाही,
मध्येच का बुडाली, ती नाव आठवेना.
इतके तरी कळे की होते कुणी जिवाचे,
हरवून काय गेले, तो ठाव आठवेना.
विलास खाडे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर...
सुंदर...