दैनिक मायबोली : गणेशोत्सव समारोप विशेषांक

Submitted by संयोजक on 4 October, 2026 - 09:50

वर्ष : २०२६ | विशेष आवृत्ती |

बातमी खरी आणि वृत्तांकन आपणा सर्वांचे!

-मायबोली प्रतिनिधी

मुख्य बातमी

गणेशोत्सव २०२६ संपला, मात्र प्रवेशिकांचा ओघ थांबेना!

मायबोली गणेशोत्सव २०२६ची अधिकृत सांगता झाली असली, तरी प्रवेशिका पाठवण्याचा उत्साह काही मायबोलीकरांच्या मनात अद्याप कायम असल्याचे वृत्त आहे. अंतिम मुदत संपल्यानंतरही नव्या प्रवेशिका दाखल होत असल्याने संयोजक मंडळासमोर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात काही उपक्रमांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांच्या धाग्यांवरील शुकशुकाटामुळे संयोजक मंडळात चिंतेचे वातावरण होते. मात्र अंतिम मुदतीच्या आसपास परिस्थितीने अचानक कलाटणी घेतली. 'सुरुवातीला प्रवेशिका येत नाहीत म्हणून काळजी होती. आता येणं थांबत नाही म्हणून काळजी आहे. नेमकं काय हवंय, हे आम्हालाच समजेनासं झालंय!' असे संयोजक मंडळातील एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

लेखन विभाग

'गेले करायचे राहून' मध्ये आठवणींचा भावपूर्ण महापूर.
अपूर्ण इच्छा, राहून गेलेली स्वप्ने, आयुष्याच्या वाटेवर मागे पडलेले क्षण आणि पुन्हा एकदा जगावेसे वाटणारे अनुभव यांना या उपक्रमाने शब्द दिले. विशेषतः ज्येष्ठ मायबोलीकरांनी आपल्या आयुष्याच्या अनुभवांतून या धाग्याला भावपूर्ण स्वरूप दिले. 'राहून गेलेली गोष्ट म्हणजे नेहमीच संपलेली गोष्ट नसते,' असा संदेश अनेक लेखांतून उमटल्याचे साहित्य विभागाच्या प्रतिनिधीने सांगितले.

आंतरराष्ट्रीय वार्ता

शेवटच्या क्षणी प्रवेशिका:
कॅलिफोर्निया प्रमाणवेळेनुसार रात्रीचे १२ वाजायला ७ मिनिटे बाकी असताना आला प्रवेशिकेचा रुमाल. मायबोलीकरांनी भारतातील आणि अमेरिकेतील वेळेच्या फरकाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. एका स्पर्धकाने अंतिम मुदतीच्या अवघ्या काही मिनिटे आधी प्रवेशिका सादर करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे भारतीय संयोजकांना वेळेची गणिते पुन्हा मांडावी लागली.

प्रवास वार्ता

'माझा पहिला विमानप्रवास' या उपक्रमाने घेतली भरारी.
अंतिम टप्प्यात या उपक्रमाला अनपेक्षित वेग मिळाला. काही तासांतच पहिल्या विमानप्रवासाच्या आठवणींचा ओघ सुरू झाला.
प्रवेशिकांची संख्या वाढत असताना अंतिम टप्प्यात आठवणींच्या उड्डाणांना धावपट्टी अपुरी पडत होती.

पाककला विभाग

स्वयंपाकघरात कल्पकतेची मेजवानी!
एका मुख्य घटकापासून किमान तीन स्वतंत्र पदार्थ तयार करण्याच्या आव्हानाला मायबोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एका जिन्नसाचे किती प्रकार होऊ शकतात, याचा शोध घेताना स्वयंपाकघरांमध्ये प्रयोगशीलतेची लाट उसळली. 'दिसतं तसं नसतं' या स्पर्धेसाठी पदार्थाच्या रूपाची आणि नावाची त्याच्या चवीशी असलेली सांगड तोडताना स्पर्धकांमध्ये कल्पकतेची चढाओढ लागली.
फळ + फूल + मसाला या त्रिवेणी संगमाने यंदाच्या गणेशोत्सवात पाककलेबरोबरच वनस्पतीशास्त्रालाही व्यासपीठ मिळवून दिले.
जास्वंद, गुलाब, झेंडू, गोकर्ण, सोनचाफा, पारिजातक अशा फुलांनी पेयांमध्ये रंग भरले. दरम्यान, “केशराची गणना कशात?”, “कॉफी किंवा चहा वापरता येईल का?”, “मसाल्याची व्याख्या नेमकी काय?” अशा प्रश्नांनी संयोजक मंडळाच्या चर्चांना वैज्ञानिक वळण मिळाले.

सर्वच स्पर्धांमधील प्रवेशिकांमध्ये मायबोलीकरांनी सादरीकरणात सौंदर्यदृष्टीही दाखवून दिली. पदार्थ आधी डोळ्यांनी चाखावा या उक्तीचा प्रत्यय आणून दिला.

संगीत वार्ता

आशाच्या सुरांनी मायबोलीकरांच्या मनात जागवल्या आठवणींच्या मैफली!
‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ या लेखन उपक्रमातून आशा भोसले यांच्या सुरेल कारकिर्दीला मायबोलीकरांनी अनोखी मानवंदना दिली. त्यांच्या गाण्यांमधील खास शब्दोच्चार, हरकती, मुरक्या, भावभावना आणि वैयक्तिक आठवणींना शब्दरूप देताना धाग्यावर संगीतप्रेमींची मैफलच रंगली.

विशेष सदरे

संयोजकांच्या विनंतीला मान देऊन मनीमोहोर यांनी कोकणातील गणेशोत्सवात दिसणार्‍या माटीची माहिती त्यांच्या नेहमीच्या गोष्टीवेल्हाळ शैलीत लिहिली. सिम्बा यांनी एका नास्तिकाच्या घरचा गणपती या लेखातून गणेशोत्सवाचा निखळ सांस्कृतिक आनंद ते कसा घेतात हा अनुभव मांडला. त्यावर अनेक मायबोलीकरांनाही त्यावर व्यक्त व्हावेसे वाटले, हे विशेष. साजिरा यांनी व्हिन्सेंटच्या प्रेमकथा या लेखातून एका मनस्वी कलावंताच्या आयुष्यातील एका कालखंडाचा पट मांडला. संयोजकांपैकी एक मृण्मयी यांनी याच गणेशोत्सवातला त्यांचा एक अनुभव कहाणी माझ्या गौराईंची या लेखात शब्दबद्ध केला.

सांस्कृतिक वार्ता

'माझ्या घरातला महाराष्ट्र'ला अखेर घर मिळाले!
मायबोली गणेशोत्सवातील एका उपक्रमाने संयोजक मंडळाला चांगलेच प्रतीक्षेत ठेवले होते. या उपक्रमात अंतिम मुदतीच्या काही वेळ आधीपर्यंत एकही प्रवेशिका दाखल झाली नव्हती. अखेर सात वर्षांच्या रिदितने आपल्या घरातला महाराष्ट्र शोधून काढत पहिली प्रवेशिका सादर केली. या छोट्या सहभागीने घरातील वस्तू आणि संस्कृती यांची सांगड घालत आपले छोटेसे महाराष्ट्र दर्शन घडवले. त्याच्या प्रयत्नांचे मायबोलीकरांनी मनापासून कौतुक केले.

छायाचित्र विभाग

प्रकाशचित्रांच्या झब्बूने मायबोलीवर खुलवली आठवणींची आणि नजरेची गॅलरी!
स्पर्धेच्या धावपळीपासून थोडा विरंगुळा देणाऱ्या प्रकाशचित्रांचा झब्बू या खेळाने मायबोलीकरांना आपल्या छायाचित्रसंग्रहातील खास क्षण एकमेकांसोबत वाटण्याची संधी दिली. प्रवेशद्वार, रात्रीचे आकाश या झब्बूंमध्ये मायबोलीकरांनी जगप्रवास घडवला.
आपल्या घरातल्याच जुनी - नवी उपकरणे , पुस्तकातली खूण अर्थात बुकमार्क या झब्बूंना मात्र तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.

मीम

मराठी चित्रपट आणि मालिकांवरील मीम ही कल्पना तितकीशी पचनी पडली नाही. काही सदस्यांनी गेल्या दोन वर्षांतील थीमच्या आठवणी नव्या मीमच्या रूपाने पुन्हा जागवल्या. काहींनी मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा आणि उपक्रमांबद्दल प्रसंगोचित मीम सादर केले.

काहीच्या काही फॉर्वर्ड

या उपक्रमात आलेले काही फॉर्वर्ड आपल्याला व्हॉट्स अ‍ॅपवर येऊ शकतील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठसे वापरून शुभेच्छापत्र या उपक्रमात मायबोलीकरांच्या बाळगोपाळांच्या कल्पना पाहायला मिळाल्या.

आवडता लोगो रंगवा हा उपक्रम प्रताधिकारभंगाच्या शक्यतेने मागे घ्यावा लागला. याबद्दल जाई. , त्यांची कन्या भार्गवी यांचा जो विरस झाला त्याबद्दल संयोजकांनी खेद व्यक्त केला.

हवामान विभाग:

मायबोलीवर प्रवेशिकांचा जोरदार पाऊस, काही भागांत ढगफुटीसदृश परिस्थिती!
- गणेशोत्सवाच्या सुरुवातीला तुरळक प्रवेशिकांच्या सरी कोसळल्या. त्यानंतर काही दिवस वातावरण ढगाळ राहिले. अंतिम मुदतीच्या आसपास विशेषतः 'शशक लेखन' विभागात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.

बाजारभाव:

फुलांच्या मागणीत वाढ, फुलांचा भाव वधारला!
पेय स्पर्धेमुळे फुलांना विशेष मागणी. घरच्या बागेतील फुलांना महत्त्व प्राप्त झाले असून, लिंबू, पुदिना आणि मसाल्याच्या पदार्थांना वाढती मागणी!

तंत्रज्ञान विभाग:

१.प्रवेशिकांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यांची नोंद ठेवण्यासाठी Excel Sheet चा आधार घेण्यात आला.
Excel Sheet च्या वाढत्या आकारामुळे संयोजकांची चिंता वाढली!

२. मतदानाच्या प्रक्रियेत संयोजकांची कसोटी, Cancel बटणाचा शोध सुरू!
गणेशोत्सवातील मतदान प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे संयोजकांची धावपळ उडाली. मतदान सुरू करणे, पर्याय तपासणे, चुका दुरुस्त करणे आणि आवश्यकतेनुसार बदल करणे या प्रक्रियेत संयोजकांना तांत्रिक कौशल्याबरोबरच संयमाचीही परीक्षा द्यावी लागली. दरम्यान, Cancel बटणाच्या शोधासाठी स्वतंत्र मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती आहे.

संयोजक मंडळाच्या पडद्यामागील घडामोडी

कल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंत, संयोजकांच्या बैठकीत रंगल्या चर्चा!
यंदाच्या गणेशोत्सवासाठी विविध उपक्रमांची आखणी करताना संयोजक मंडळाने अनेक कल्पनांवर चर्चा केली. काही कल्पनांना लगेच मंजुरी मिळाली, काहींमध्ये बदल सुचवण्यात आले, तर काहींना अधिक विचारांती अंतिम स्वरूप देण्यात आले. पहिल्या गटचर्चा, फोन कॉल, मसुद्यांची देवाणघेवाण, नियमावलीतील सुधारणा, WhatsApp वरील चर्चा आणि घोषणांची तयारी अशा अनेक टप्प्यांतून उपक्रम प्रत्यक्षात आले.

विशेष सदर:

संयोजकांच्या डायरीतून
पहिला दिवस : कल्पना सुचत आहेत. यंदा काहीतरी वेगळं करू या!
दुसरा दिवस : मसुदे तयार होत आहेत. चर्चा सुरू आहे.
तिसरा दिवस : नियमावलीत काही बदल आवश्यक आहेत.
चौथा दिवस : घोषणा प्रसिद्ध झाल्या. आता प्रवेशिकांची प्रतीक्षा.
पाचवा दिवस : प्रवेशिका अजून कमी आहेत. काहीतरी करायला हवं का?
सहावा दिवस : प्रवेशिका येऊ लागल्या आहेत. छान!
सातवा दिवस : प्रवेशिका खूप येत आहेत. यादी अपडेट करा!
आठवा दिवस : अंतिम मुदत संपली. तरीही प्रवेशिका येत आहेत!
नववा दिवस : समारोपाचा मसुदा तयार करा.
दहावा दिवस : समारोपाचा मसुदा अजून वाढवायचा आहे.
अकरावा दिवस : Excel Sheet कुठे आहे?
बारावा दिवस : समारोपाचा मसुदा अजूनही सुरूच!

संपादकीय:

उत्सव संपला, पण आठवणींचा उत्सव सुरूच!
गणेशोत्सव म्हणजे केवळ काही दिवसांचा सोहळा नव्हे. तो असतो कल्पनांचा, सहभागाचा, संवादाचा आणि एकत्र येण्याचा उत्सव.
यंदाच्या गणेशोत्सवात अनेक नवे प्रयोग झाले. काही कल्पना पहिल्यांदाच साकारल्या, काही जुन्या उपक्रमांना नवे रूप मिळाले. कुणी आपल्या स्वयंपाकघरातून सहभागी झाले, कुणी आठवणींच्या कप्प्यातून, कुणी कॅमेऱ्यातून, तर कुणी लेखणीतून.

संयोजक मंडळासाठी हा प्रवास वेगळाच होता. कल्पना सुचवण्यापासून त्यांना प्रत्यक्ष स्वरूप देण्यापर्यंत, प्रवेशिकांची वाट पाहण्यापासून त्यांचा ओघ सांभाळण्यापर्यंत अनेक अनुभव या काळात मिळाले. कधी उत्साह, कधी चिंता, कधी धावपळ, तर कधी एखाद्या छोट्याशा प्रतिसादाने मिळणारा आनंद. या सगळ्यांनी मिळून यंदाचा गणेशोत्सव समृद्ध केला. आणि या सगळ्या गडबडीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली : उत्सव यशस्वी होतो तो केवळ आयोजकांमुळे नाही, तर त्यात मनापासून सहभागी होणाऱ्या प्रत्येकामुळे.
म्हणूनच या विशेष अंकाच्या शेवटी संयोजक मंडळाकडून सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार.
तुमच्या कल्पना, तुमचा सहभाग, तुमचा प्रतिसाद आणि तुमच्या प्रेमामुळे यंदाचा गणेशोत्सव संस्मरणीय झाला.
गणेशोत्सवाचा सोहळा मायबोलीवर साजरा करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल, आम्हांला संयोजनाची संधी दिल्याबद्दल आणि वेळोवेळी केलेल्या तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शनासाठी वेबमास्तर आणि अ‍ॅडमिन यांचे मनापासून आभार.

अखेरची बातमी

गणेशोत्सवाची सांगता, पुढील वर्षाच्या तयारीला सुरुवात?
गणेशोत्सव २०२६ चा समारोप होत असतानाच पुढील वर्षीच्या उपक्रमांबाबत काही मायबोलीकरांनी चर्चा सुरू केल्याचे समजते.
संयोजक मंडळाने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

याबरोबरच मायबोली गणेशोत्सव २०२६ चे हे विशेष बातमीपत्र संपले.
पुन्हा भेटूया, पुढच्या वर्षी..

आता आम्ही प्रेक्षकांसाठी/श्रोत्यांसाठी डायल इन लाइन खुली करत आहोत.
तुमच्या प्रतिक्रिया, मते आणि अनुभव प्रतिसादांत लिहा.

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!

— मायबोली गणेशोत्सव २०२६ संयोजक मंडळ
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक मंडळाचे अनेक आभार. परदेशात राहिल्याने इथल्या उत्सवामुळे उत्सवाचे चैतन्य मनातही येते. आपापला वेळ काढून सगळ्यांना मजा यावी यासाठी कल्पक उपक्रम, त्याची जाहिरात, आठवण करून देणं, प्रोत्साहन देणं हे सगळं पाहून घरचं कार्य वाटल्याने भाग घेण्याचा उल्हास आला.

शशक तर शंभर आलेत असं वाचलं, त्यातील भरपूर वाचलेत पण अजूनही काही राहिलेतच. जे या उपक्रमांमुळे लेखन करायला लागले ( उदा. धनवन्ती Happy ) त्यांनी प्लीज ही लिंक तुटू न देता स्वतंत्र लेखन करत राहा. आपलेच आहेत सगळे. Happy

शशकांमुळे दोन दिवसांपूर्वी स्वप्न पडले की मी पण विनोदी शशक लिहिले होते पण कुणीच हसेना वर अवांतर होऊन लोक इन्कम टॅक्स वर चर्चा करू लागले. खाडकन जाग आली. शशकांमुळे डोक्यावर परिणाम! Happy

पहिला विमान प्रवास - मी चुकून खिडकीतून हात काढणार होतो पण खिडकी बंदच निघाली असं होईल की काय वाटले होते पण हा उपक्रम निरागस आणि नवलाईने नटलेला होता. अजून सगळ्या विमानाची चक्कर मारून झाले नाही पण मारणार आहे. Happy

गेले करायचे राहून - फार पर्सनल लिहिले असते तर कोतबोच झाला असता म्हणून अगदी मोघम लिहिले व बऱ्याच प्रमाणात रिस्क घेतली. पण आपल्या मर्यादा जोखायला आणि त्या ओलांडायला आपलं आपणच शिकावं लागतं याची आठवण या उपक्रमामुळे झाली. कधीकधी माहिती असणाऱ्या गोष्टींची सुद्धा चाकोरीबद्ध आयुष्यामुळे शिथिलता येते, ती शैथिल्याची कात टाकल्यासारखी वाटले. त्यासाठी सर्वांचेच खूप आभार. Happy इतरांचे वाचतानाही नंतर अरे, हे तर माझे पण राहून गेले आहे की असे दरवेळी होत होते. संपूर्ण ज्येष्ठ नागरिक मोडमधे जाऊन हळहळ वाटायच्या आत आवरून मनातल्या मनात एक ढोबळ रिअलिस्टिक यादी किंवा बकेट लिस्ट करता आली ती तुम्हा सगळ्यांमुळे. Happy

यात सोनूचे विशेष कौतुक. तिच्या लेखामुळे वेगळं जग , वेगळा अनुभव नितळ मनाने बघता आला. थॅंक्यू सोनूताई! Happy

फळ, फूल, मसाला पेय. ही स्पर्धा आल्यापासून आपल्याला तर काही येणार नाही असे वाटून "पहेली" मधल्या नॉन भूत शाहरुख सारखे दिवसभर "फल, फूल, गुलाबजल" घोकत होते, जमल्यावर एकदम भूत शाहरुख सारखे रसिकबिसिक वाटले.

चिवड्याला मत देणाऱ्यांचे, वाचकांचे, मनातल्या मनात कौतुक करणाऱ्या सर्वांचेच आभार. तुम्हाला नेहमी खुसखुशीत चिवडा मिळो. उर्वरित लोकांना त्यांच्या त्यांच्या नशिबाप्रमाणे मिळो. मी काही चिवड्याचा गौतम बुद्ध थोडीच आहे. Wink

हा वरचा भित्तीपत्रकासारखा दिसणारा अभिनव पद्धतीने लिहिलेला समारोप फार आवडला. त्यामुळे येथेच पसरायचे ठरवले होते. Happy पुन्हा एकदा संयोजक मंडळाचे आभार.

एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते, जय हिंद जय महाराष्ट्र! Happy गणपती बाप्पा मोरया!

कुणी लिहीलंय? फार मस्तं लिहीलंय.
कव्हर सुद्धा आवडलं. एआयने केलेलं असेल तरीही आवडलंच.

पहिलं बक्षीस थोडक्यात हुकलं. ज्या विभागात प्रवेशिका दिली त्या विभागात बक्षीसच नव्हतं.
आता फक्त ऑस्करसाठीच प्रवेशिका देणार.

यंदाच्या गणेशोत्सवा बाबतचे मनोगत :

आधी लिहिलेले इथे परत डकवतो आहे.

साधारण ९ वर्ष माबोवर आहे, पैकी गेली ३-४ वर्षे एक pattern झाला आहे त्यानुसार दर २-३ दिवसात एकदा इथे डोकावतो. सिनेमा, वेबसिरीज, भाषा आणि रेसिपी-खादाडीचे धागे आधी बघतो, मग अन्य काही धागे. माझ्या धाग्यांवर कुणी काही प्रतिसाद दिले असतील तर ते acknowledge करतो. व्यक्तिगत निरोप असतील तर ते वाचून डिलीट करतो. एव्हढाच वावर.

प्रतिसाद दिला तर नेहेमी लेखन नीट वाचून मगच. वरवर बघून मस्त-मस्त किंवा नाना पाटेकर फेम “हा छान, तो छान, तू छान, मी छान, आपण सगळेच छान छान” टाइप प्रतिसाद देत नाही. Mutual back scratching sessions अपेक्षित आणि पसंत नसल्याने खरेच काही आवडले तर कॉम्प्लिमेंट. ती मात्र genuine, मनापासून.…

तर, या सगळ्यासाठी रोज ५-१० मिनिटे पुरेशी होतात. सगळेच वाचून होते असेही नाही, but that’s ok.

मागच्या गणेश उत्सवात फक्त पाककृतींच्या आणि शब्दखेळांच्या स्पर्धा एवढाच वावर होता, वाचन आणि आवडल्यास प्रतिसाद.

यंदा मात्र सर्वच उपक्रम डोळ्याखालून घातले. दर दिवशी, कधीकधी तर दिवसातून दोन दा चक्कर टाकली, काय नवीन ते बघायला. एका महत्वाच्या प्रकल्पाचे काम अचानक तीस दिवस पुढे ढकलले गेल्याने हाताशी थोडा वेळ होता ते पथ्यावर पडलेच पण माबोकरांचा उत्साही सहभाग was a bigger factor and the enthusiasm was infectious.

लेख वाचले, अनुभव- कथा वाचल्या, फोटो डकवले, इमोजीयुक्त प्रतिसाद लिहिले, और तो और आयुष्यात पहिल्यांदा शतशब्द कथाही लिहिल्या - वट्ट दोन ! एकूण मजा आली. अजून सगळेच वाचले नाही, राहिलेले नंतर निवांतपणे वाचणार.

“पहिला विमानप्रवास” मात्र फार जुनाट आणि overdone विषय होता. त्याला लेखक-वाचक दोहोंचा भरपूर प्रतिसाद मिळाला याचे आश्चर्य वाटले. Maybe I was out of sync here.

यंदा बरेच नवीन माबोकर लिहिते झाले, अदरवाईज न लिहिणारी बरीच नवीन नावे दिसली. प्रतिसादादाखलही भरभरून लिहिले सर्वांनी, which is so good.

आयोजकांनी कल्पक, आनंद देणारे उपक्रम राबवल्याने सोहळ्यात सहभागिता वाढली - there was something for everyone.

संयोजक चमू च्या अतरंगी, अमितव, अभ्या..., ऋतुराज., भरत. ,मनिम्याऊ_मृण्मयी यांच्या कल्पक आयोजना मुळे साहित्यिक षडरसभोजनाचा आनंद सर्वांना घेता आला.

उत्सव संयोजक टीम चे आभार आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कौतुक आणि कृतज्ञता 🙏

या वेळचा गणेशोत्सव फार आगळा वेगळा आणि छान पार पडला.

  1. गणपतीच एकच कॅरिकेचर सर्वत्र विविध भावांमध्ये डोकावत राहीले आणि बाप्पा फारच गोड व मिस्किल होता - हे खूप आवडले.
  2. उपक्रम, स्पर्धा सुद्धा आटोपशीर आणि सुनियोजित होत्या. एक स्पर्धा - लोगोवाली रद्द करावी लागली हे एकच वाईट वाटले.
  3. मला रात्रीचे आकाश हा झब्बु आवडला
  4. आणि होय 'गेले करायचे राहून' - फार मस्त उपक्रम होता तो.
  5. शशकांमुळे तेवढेच अलंकार कोणते आहेत, रस कोणते आहेत त्याची उजळणी झाली.
  6. मी लिहीलेली पोस्टपार्टम सायकॉसिसची कथा अतिच भयानक होती. मलाच डिस्टर्बिंग वाटत होती तेव्हा ती काढली हे बरेच झाले.
  7. 'गेले करायचे राहून' मध्ये आपला एक आल्टर ईगो बाहेर काढता आला - याचा आनंद वाटला. खरच कोणाला सुचलेली ती आयडिया?
  8. पाककृतींमध्ये मला विशेष रस नसतो पण यावेळेस फारच कल्पक पाककृती आल्या. तसेच काही स्पर्धकांचा उरक पाहूनच धापा टाकायला झाले.
  9. आणि हे वृत्तपत्रिय वार्तांकन तर चेरी ऑन टॉप आहे..

-------------------------
अतरंगी, अमितव, अभ्या..., ऋतुराज., भरत. ,मनिम्याऊ_मृण्मयी - जबाबदारी इतकी छान पार पाडल्याबद्दल आणि अनेकांना लिहीते केल्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार 🐭

वाह! मस्त Lol खरोखरच 'करायचे राहून गेलेल्या गोष्टींचा महापूर आला' आणि 'पहिल्या उड्डाणांची धावपट्टी अपुरी पडली'. या सर्वांमागचे संयोजकांचे अथक परिश्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. कारण सर्व स्पर्धा/उपक्रम आयोजित करणे, ते राबवणे आणि अखेर मतदान वगैरे घेणे यासाठी प्रचंड ऊर्जा, सृजनशीलता आणि मेहनत आवश्यक असते. या निमित्ताने सर्वांना लिहिते केल्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद _/\_

फारच मस्त जोरदार आढावा घेतला आहे.
प्रचंड संख्येत येणाऱ्या एन्ट्री बघणे अतिशय कल्पक आणि मागच्या वर्षी पेक्षा अगदी वेगळ्या स्पर्धा दर वर्षी ठेवणे याबद्दल संयोजक मंडळाचे कौतुक आणि आभार!!
(परत एकदा भुणभुण प्यादं पुढे सरकवते:पुढच्या वर्षी स्पर्धा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी नंतर 1 आठवडा आणि त्यानंतरच्या रविवारी 12 वाजता अमेरिकी प्रमाण वेळेत समारोप असा करा!! तसेही यावर्षी लोक उत्साहाने 1 आठवडा नंतर पर्यंत लिहीत आहेतच.)

दिसतं तसं नसतं आणि फळ फुल मध्ये लोकांनी खूप कल्पकता दाखवली. मिम्स स्पर्धेत भाग घ्यायला आवडला असता पण मराठी हिंदी मालिकांशी टच अनेक वर्षांपूर्वी संपला आहे त्यामुळे काही सुचलंच नाही.पिक्चर वर मिम्स असते तर भरपूर सुचलं असतं.

शशक लोक खूप उत्साहाने लिहितात.आणि न लिहिणारे लिहिते होतात.त्यामुळे खूप महत्त्वाची मोलाची स्पर्धा आहे.दरवर्षी चालू राहावी.विमान प्रवास मनोरंजक वाटले. गेले करायचे राहुनी मधल्या गोष्टी आठवून त्रास होईल त्यामुळे तिथे काही लिहिले नाही:)

आमचा रुमाल आठवल्याबद्दल स्पेशल धन्यवाद.

गेले करायचे राहून ला मिळालेल्या प्रतिसादामुळे पुन्हा काही प्रवेशिका मागवण्यात येणार आहेत असे समजले.

गेले करायचे राहून (मतदान)
गेले लिहायचे राहून (प्रतिसाद)
आणि
गेले वाचायचे राहून

येऊद्यात मग.

२०२६ नंतरच्या सर्व गणेशोत्सव- संयोजक चमूंसाठी बार फार उंचावला गेलेला आहे त्यामुळे काहीं होतकरु आणि इच्छुक संयोजकांच्या कोमल हृदयावर ताण आल्याची बातमी आत्ताच हाती लागली आहे Wink

अभ्या अमितव भरत अतरंगी ऋतुराज मनिम्याऊ सर्वांचे अभिनंदन करून दाखवलेत ❤️

समारोपाची पोस्ट सुद्धा त्याच कल्पकतेला साजेशी जी पूर्ण गणेशोत्सवात दिसली ❤️

भारी लिहिला आहे समारोप! उद्घाटनाचं गार्‍हाणंही जमून आलं होतं! Happy

उपक्रम किती यशस्वी झाले ते प्रवेशिकांच्या ओघावरून स्पष्ट दिसत आहेच. अनेकांना लिहितं केलंत, संयोजक! Happy
सगळ्या प्रवेशिका वाचूनदेखील झालेल्या नाहीत माझ्या!
मला व्यक्तिशः प्रत्येक प्रवेशिका सुचताना, लिहिताना आणि मग अभिप्राय स्वीकारताना प्रचंड आनंद मिळाला. त्याचं मोल कशातच होऊ शकत नाही.

मुलांचा सहभाग दिवसेंदिवस कमी होत जाणार हे बहुधा आता आपण स्वीकारायला हवं. कालाय तस्मै नमः!

उत्सव खूप छान पार पाडलात! दमलात, विश्रांती घ्या. Happy

वा! काय भारी समारोप आहे Happy
यंदाचा गणेशोत्सव अगदीच हटके झाला.
मला वाचनाचा सुद्धा नीट सहभाग घेता आला नाही पण लक्ष होतं, कल्पक आणि दर्जेदार उपक्रम आणि त्याला साजेशा येणाऱ्या तशाच उत्तम प्रवेशिका!
अजुन वाचतो आहे जमेल तसे.

संयोजकांचे आणि सहभाग घेणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

शशक अनेक, मत सिर्फ एक!
बहुत नाइन्साफी है.
सरदार, कुछ करो.
ये भी है वो भी है, किसको वोट करू?
असे झाले.

छान लिहिलंय समारोपचं वृत्तांकन. यावर्षीचा गणेशोत्सव छान पार पाडला. भरपूर शशक आल्या त्याही उत्तमोत्तम त्यामुळे वाचायला मजा आली .फळ फुल मसाला स्पर्धा खूप आवडली. यावेळच्या सगळ्यांच रेसिपी स्पर्धा एकसोएक होत्या.
विजेत्यांचे अभिनंदन तसेच भाग घेतलेल्या सर्वांचे कौतुक. उपक्रमही आवडले.यासाठी मेहनत घेतलेल्या उत्सव संयोजक टीमचे कौतुक आणि आभार.

फारच कल्पक पद्धतीने वृत्तान्त लिहिला आहे. आवडला.

संपूर्ण उत्सव विचार करून केलेला होता. नॉस्टाल्जिया हा माबोकरांचा प्रिय गुण आहे हे जोखून पहिला विमानप्रवास आणि गेले करायचे राहुनि हे लेखन उपक्रम घेतलेत व अनेकांना लिहिते केलेत. फसवी पाकृ हा प्रकार मला विशेष आवडला. त्यात भाग नाही घेऊ शकलो, पण लोकांनी लढवलेल्या युक्त्या बघून मी अचंबित झालो.

संयोजकांनी वेळेत घोषणा , शंकासमाधान, उपक्रम, निकाल , समारोप हे करणे वरवर रूटीन वाटले तरी किती अवघड असते याची कल्पना आहे. त्यासाठी टीमवर्क जुळून यावे लागते. त्याची प्रचीती आली. खूप कष्ट घेतलेत तुम्ही! खरंच मनापासून कौतुक.

समारोपाच वार्तांकन ही आयडिया खूपच आवडली. मजा आली वाचताना.
ह्या वर्षीचा गणेशोत्सव मस्तच झाला. सगळे उपक्रम , स्पर्धा कल्पक होत्या. सहभाग ही सगळ्यांचा भरीव होता. त्यामुळे हे दहा पंधरा दिवस अगदी धामधुमीत गेले.
सर्व संयोजक चमूचे मनापासून अभिनंदन आणि आभार.

अतरंगी, अमितव, अभ्या..., ऋतुराज., भरत. ,मनिम्याऊ_मृण्मयी >>> सर्व संयोजकांचे आभार. यावर्षी एरवी रोमात असणाऱ्या कित्येक आयडी लिहित्या झाल्या याबद्दल विशेष कौतुक.

समारोपाचे वार्तांकन आवडले.

पुढच्या वर्षी स्पर्धा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी नंतर 1 आठवडा आणि त्यानंतरच्या रविवारी 12 वाजता अमेरिकी प्रमाण वेळेत समारोप असा करा! >>> या सूचनेला अनुमोदन.
घरचा गणेशोत्सव उरकून कामाला लागल्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घ्यायला जमले नाही.

पण फळ-फुल-मसाला आणि 'दिसतं तसं नसतं'मधील स्पर्धक माबोकरांची कल्पकता पाहून अचंबा वाटला.
यावेळी बऱ्याचश्या शशक संत्रे सोलून दाखवा स्पर्धेसारख्या न वाटल्यामुळे हुश्श्य झाले.

उत्सव उत्साहात उरकला Happy
शशक मधे भाग यावर्शी घेता आला नाही त्याचं प्रायश्चित्त म्हणून किमान प्रतिसादातल्या एका ओळीत तरी अनुप्रास साधावा म्हणलं.

मी जरी कोणत्याच स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणुन एक करायचे गेले राहुन लिहुन घेतले.
मुलांनी मात्र सगळ्या उपक्रमात भाग घेतला.
घरातील महाराष्ट्र मधे एक तरी एंट्री आली त्यामुळे तो उपक्रम फेल गेला नाही असे डिक्लेर करुन मी संयोजकांच्या वतीने रिदीतचे कौतुक करुन घेते

सगळेच उपक्रम आटोपशीर आणि कल्पक होते. शिवाय नियमांचा भडिमार नसल्याने सगळ्यांना एन्जॉय करता आला.संयोजकांचे आभार!

खूप मस्त झाला गणेशोत्सव!
समारोप विशेषांक तर एकदमच मस्त झालाय! वरच्या सगळ्या प्रतिसादांना मम म्हणते... खूप खूप कौतुक संयोजक मंडळाचं!

लहान मुलांसाठी असलेला लोगोचा उपक्रम बंद करावा लागण्यात माझी शंका निमित्त ठरली याचं मलाच वाईट वाटतंय कारण उपक्रम छानच होता. मायबोलीकर जाईच्या मुलाची प्रवेशिकाही खूप गोड होती, पण तीही रद्द करावी लागली यासाठी मी मनापासून माफी मागते.
माझी मुलगी नंतरच्या उपक्रमात भाग घ्यायला उत्सुक होती पण तिच्याच शाळेत परीक्षा सुरू झाली आणि मग ते राहून गेलं.
माझा बरेचदा वाचनमात्र सहभाग असतो गणेशोत्सवात, पण या वेळी "गेले करायचे राहून" च्या निमित्ताने मी भाग घेतला. अजून खूप प्रवेशिका वाचायच्या राहिल्यात इतका भरघोस प्रतिसाद आहे प्रत्येक उपक्रमाला!

१०-१२ दिवस उत्सवी वातावरणात खूप प्रसन्न वाटत होतं. धन्यवाद संयोजक __/\__

अशा पद्धतीने समारोप लिहीला हेच फार फार आवडलय

एकदम हटके

उपक्रमच मस्त होताच पण समारोप फॉर्मॅट सगळ्यात टॉपला

किती छान लिहिलाय समारोप
Creative अगदी
कुणाचं डोकं आहे हे
खूप कौतुक
सगळे पोस्टार्स, स्पर्धा, उपक्रम नावीन्यपूर्ण होते आणि माबो करांनी उदंड प्रतिसाद दिला. दणक्यात झाला गणेशोत्सव, मजा आली..
संयोजक चमू साठी टाळ्या

लय म्हणजे लय्यच आवड्या. भारी लिहिलय.
बराच बॅकलॉग आहे पण जेवढं वाचलय त्यावरून यावेळच्या उत्सवाचं विराट रूप जाणवतय. संयोजक रॉक्स!

ही कल्पना, तो सुरूवातीचा पेपरचा फोटो, त्यातली "सदरे" आणि धाग्यातील वृत्तांत, सगळेच फार भारी आणि कल्पक आहे. ज्यांनी कोणी हे केले, यात सहभाग घेतला त्यांना एक मोठी दाद! Happy

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि आभार! दहा दिवस धमाल चालेल, बरेच माबोकर त्यात सहभागी होतील (धाग्यांवर प्रतिसाद देणे हा ही "सहभाग" समजावा अशी मागणी करत आहे Wink ) आणि या निमित्ताने सहसा फार न लिहीणारे लोकही लिहीते होतील हे जमवणे नक्कीच सोपे नाही. ते इतक्या यशस्वीरीत्या जमवल्याबद्दल अभिनंदन, आणि यानिमित्त माबोवर रसरशीत वाचनीय मटेरियल आले - याबद्दल आभार!'

सर्व पारितोषिक विजेत्यांचेही अभिनंदन!

संयोजक मंडळाचे खूप अभिनंदन! यंदाचा उत्सव मस्त झाला. सगळ्या सुचना, कम्युनिकेशन्स एकदम व्यवस्थित होती! सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी झाल्या. क्रिएटिव्ह्ज मस्त होती. त्यात 'एआय'चा सढळ हस्ते वापर होता हे जाणवलं पण तो वापरही नेटका होता. कुठलीही पोस्टर्स किंवा फ्लायर्स बटबटीत नव्हती. प्रशस्तिपत्रकांचं डिझाईनही सटल होतं. एकंदरीत सगळीकडे गणपतीची जी एक आनंदी, "फन" इमेज दाखवली होती ती खूप आवडली. समारोपाची कल्पनाही मस्त आहे. बर्‍याचशा स्पर्धा आणि उपक्रम आवडले.

मी स्वत: जिन्नस एक..मध्ये भाग घेतला. गंमत म्हणून ठिक आहे पण तसा प्रकार प्रत्यक्षात कधी करू असं वाटत नाही. म्हणजे एका जेवणात एका जिनसाची थाळी! आम्ही थाळी केली खरी पण आम्हांलाच तांदूळाची उकड खाऊन कंटाळा आला. त्यामुळे स्पर्धा ठरवताना प्रॅक्टीकॅलिटी(?) चाही जरा विचार केला जावा असं वाटतं. सरबातांच्या एंट्री भारी होत्या!

शशकला सुरूवात / शेवट वगैरे न दिल्याने प्रवेशिका खूप आल्या असं वाटलं. काही काही शशक वाचत्या, त्या छान होत्या. अलंकारांची अट छान होती, पण ते मभादीला जास्त बरोबर वाटलं असतं.

"गेले करायचे राहून" हा विषय फारसा आवडला नाही कारण त्यात उगीच नकारात्मकता होती. त्यापेक्षा मागे होता तो बकेट लिस्ट उपक्रम जास्त आवडला होता. विमान प्रवासाचे सगळे लेख अजून वाचलेले नाहीत पण विषय आवडीचा असल्याने वाचेन नक्की.

गणेशोत्सवातला "निमंत्रितांचे लेख" (ते ही मायबोलीकरांचेच!) हा प्रकार मला अजिबात पटत नाही. दिवाळी अंक असताना त्यात लेखन निवडलं जाणं / न जाणं असलं तर भाग घेण्याची सगळ्यांना समान संधी असते. इथे तसं होत नाही. त्यामुळे हा एकच प्रकार सर्वसमावेशक नव्हता. शिवाय विषयांची आणि लेखकांची निवड ह्यामागे नक्की निकष काय होते हे ही अजिबात कळलं नाही. (एकजण फक्त राजकारणावर लिहितात आणि अजून एक फक्त नॉस्टॅल्जियावर! त्यामुळे नक्की थीम काय होती समजलं नाही). जाता जाता, मागे एका संयोजक मंडळाने गणेशोत्सवातल्या स्पर्धेचे निकाल मतदानाऐवजी परिक्षकांद्वारे लावायचं ठरवल्यावर "लोकशाही खतरे मे है!" चा नारा देणारे दोन जण संयोजक मंडळात असताना असा "नॉन-इन्क्लुजिव्ह" उपक्रम कसा काय झाला ह्याचं आश्चर्य वाटलं.)

हे दोन-तीन गोष्टी वगळता उत्सवात मजा खूप आली! संयोजकांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद!

क्या बात है यार.. मस्त लिहिला आहेत समारोपाचा लेख. मंडळातली नावं बघितली तेव्हाच त्या धाग्यावर लिहिलं होतं बहुतेक- हा गणेशोत्सव भारी होणार.

उपक्रम कल्पक होते हे इतक्या लोकांनी भाग घेतल्यावर दिसलंच. (एखादा उपक्रम / स्पर्धा कल्पक आहे, पण लोकांनी भाग घेतलाच नाही असंही घडतं. ते इथं झालं नाही.) कितीतरी वेळा भाग घ्यायचा म्हणून ठरवलं पण अनेक कटकटींमुळे जमलं नाही याची रुखरूख राहीलच.

अनेक उपक्रमांतल्या अनेक प्रवेशिका फार सुंदर होत्या. आणि त्या इतक्या संख्येने असणं हे शुभचिन्ह म्हणा.

बकाप ब्रो! कार्य अंगावर घेतलं आणि नेटकं पैलतीरी नेलंत. अभिनंदन भिडू लोक्स!

फारच छान झाला उपक्रम.
भाग न घेता वाचक / प्रेक्षक म्हणून जी गंमत असते ती औरच असते. समारोपाचं लिखाण आवडलंच.
हे बहुतेक function at() { [native code] }अरंगी किंवा ऋतुराज यांनी लिहीलं असेल असा अंदाज.
बरोबर आला तर सांगा. Happy

संपूर्ण उत्सव आवडला. ह्याकरताच गणेशोत्सवाची मी आतुरतेने वाट पाहत असते.

एका जेवणात एका जिनसाची थाळी! आम्ही थाळी केली खरी पण आम्हांलाच तांदूळाची उकड खाऊन कंटाळा आला. त्यामुळे स्पर्धा ठरवताना प्रॅक्टीकॅलिटी(?) चाही जरा विचार केला जावा असं वाटतं.>> मी भाग घेतांना एका जेवणात काय खाता येईल हा विचार करूनच कमीतकमी पदार्थ केले होते.
Otherwise बेसनाचे आणखी पन्नास पदार्थ सहज शक्य आहेत.

अतरंगी, अमितव, अभ्या..., ऋतुराज., भरत. , मनिम्याऊ_मृण्मयी संयोजक मंडळाचे खूप अभिनंदन!
समारोपाच वार्तांकन ही कल्पना खूपच आवडली.

Pages