नावात काय आहे? हा तर भीमपराक्रमी !

Submitted by हेमंतकुमार on 3 October, 2026 - 10:15

माणसांच्या नावांची विविधता थक्क करणारी आहे. आपले नाव ही आपली कायदेशीर ओळख असते आणि नेमकी ओळख पटवताना त्यात गोंधळ होऊ नये म्हणून फक्त एका नावाऐवजी प्रथमनाम आणि त्याला जोडून अन्य एखादे नाव असे द्विस्तरीय नाव लिहिण्याची प्रथा जगात अनेक देशांत रूढ झाली. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास आपण प्रथमनामाच्या जोडीने आपल्या पालकांचे नाव आणि आडनाव परंपरेने लिहितो. तर काही प्रांतांत केवळ व्यक्तीचे नाव आणि वडिलांचे प्रथमनाम सांगण्याची पद्धत आहे. एखादे आडनाव आपल्याला संबंधित कुळ आणि वंश यांची जाणीव करून देत असते. आडनावांचा इतिहास आणि त्यांची व्युत्पत्ती हा भाषाशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञांसाठी नेहमीच एक अत्यंत कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे. मराठी भाषेत वि. का. राजवाडे, डॉ. केतकर, पं. महादेवशास्त्री जोशी आणि ना. गो. चापेकर यांसारख्या नामवंत तज्ज्ञांनी मराठी आडनावांच्या निर्मितीवर आणि त्यांच्या वर्गीकरणावर सखोल अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, 'आडनाव' हा शब्द संस्कृतमधील 'आद्यनाव' (म्हणजेच कुळाचे मूळ नाव) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

प्रथमनामांच्या खालोखाल आडनावांमधली विविधता देखील स्तिमित करणारी आहे. कुठून आली असावीत अशी हजारो आडनावे, हा प्रश्न नवल वाटणारा आहे. या लेखात या विषयाच्या खोलात जाण्याचा इरादा नाही. परंतु सारांशरूपाने सांगायचे झाल्यास भारतीय आडनावांचा उगम प्रामुख्याने खालील मुद्द्यांवरून झालेला दिसतो :

  • मूळ गावे आणि प्रांत
  • ऐतिहासिक पदे, किताब
  • व्यवसाय
  • गोत्र/ प्राचीन कुळ
  • निसर्ग, प्राणी आणि पक्षी
  • शारीरिक किंवा स्वभाववैशिष्ट्य
  • अज्ञात कारणे

ज्या घटनेमुळे आणि संबंधित व्यक्तीमुळे आज या विषयात डुबकी मारावीशी वाटली आहे त्या मुद्द्यावर आता येतो. या लघुलेखात आपल्याला सध्या भारतात आणि अन्यत्रही गाजत असलेल्या एका भारतीय व्यक्तीच्या आडनावाकडे कुतुहलाने बघायचे आहे. नुकत्याच घडलेल्या फ्लायदुबईच्या मोठ्या विमान दुर्घटनेत एका पराक्रमी वीरपुरुषाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आलेले असून ते गाजते आहे. त्या आडनावाकडे आपण भाषेच्या रंजक नजरेतून पाहणार आहोत. अर्थात, आपण बोलतो आहोत कॅप्टन स्मित मच्छर यांच्या आडनावाबद्दल !
सर्वप्रथम कॅप्टन स्मित यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना एक कडक सलाम ठोकतो. त्यांच्या तब्येतीला लवकरच आराम पडण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

कॅप्टनच्या आडनावाचा गुजराती भाषेत नक्की उच्चार काय आहे याची कल्पना नाही; जाणकारांनी सांगावे. परंतु इंग्रजी आणि मराठी प्रसारमाध्यमांमधून त्यांचे जे नाव प्रसिद्ध झालेले आहे त्यानुसार तरी त्याचा उच्चार मच्छर/मच्छार असा होताना दिसतो. त्यातूनच जनसामान्यांबरोबरच अनेक भाषा आणि समाज अभ्यासकांना देखील या आडनावाचे कुतूहल वाटलेले आहे. उत्तुंग अभिमानास्पद कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत तसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. या आडनावाचा उगम शोधण्याचा पिच्छा काही पत्रकारांनी पुरवलेला दिसतोय. असाच एक माहितीपूर्ण लेख इंडिया टुडेमध्ये वाचण्यात आला. त्यामध्ये अनेक अभ्यासकांची विविध मते दिलेली आहेत. त्या लेखाला अनुसरूनच आता पुढचे विवेचन करतो.

शब्दकोशानुसार मूळ संस्कृत शब्द मशक असून त्यातूनच हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये त्याचे मच्छर झालेले दिसते. मराठी कोशात त्याचे डास व चिलिट हे दोन अर्थ आहेत.
आता मुद्दा असा आहे की हा शब्द आडनाव म्हणून कसा प्रचलित झाला असेल?
वरील लेखात विविध अभ्यासकांनी व्यक्त केलेली मते अशी आहेत :
१. भगवद गोमंडल कोश या गुजराती ज्ञानकोशानुसार मच्छरचे अन्य अर्थ सामर्थ्य, जोम किंवा असोशी असे देखील आहेत.

२. हे आडनाव गुजरातखेरीत पाकिस्तानच्या सिंध प्रांतात देखील आढळते. मासेमारी करणाऱ्या तिथल्या कोळी जमातीला उद्देशून हा शब्द आला असावा. म्हणजेच, व्युत्पत्तीचा काटा डासाकडून माशाकडे वळलेला दिसतो.

३. मच्छर हा कदाचित मत्सरचा अपभ्रंश असावा. (अरे बापरे, हे एक भलतंच !)

४. काही प्रांतात डासांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्या भागालाच मच्छर म्हणण्याची प्रथा आली असावी आणि नंतर तेच नाव तिथल्या रहिवाशांना चिकटले.

५. सामाजिक संभाषणात एकमेकांना चिडवणे किंवा गंमत करण्यातून काही टोपणनावे निर्माण होतात आणि पुढे त्यांची आडनावे बनतात. हे देखील त्यापैकीच एक असावे.

असे आहेत विविध तर्कवितर्क. तसंही आडनावे ही एक प्रकारे विशेषनामेच असल्याने त्यांची निश्चित व्युत्पत्ती ठरवणे तसे कठीणच. लोककथा आणि दंतकथांना इतिहास म्हणून आपापल्या मर्यादा असतातच. अशा काही संशोधनांचा शेवट अखेरीस अपभ्रंश या मुद्द्यावर येऊन थांबतो. वरील प्रकारच्या सामान्य वाचनातून कुठलाही निष्कर्ष न काढलेला बरा.
मच्छर वा मच्छारचे विविध अर्थ काहीही असोत, या आडनावाची खात्रीशीर व्युत्पत्ती सापडो अथवा न सापडो, आपल्या कॅप्टनच्या भीमपराक्रमामुळे त्यांचे आडनाव मात्र शौर्याचे प्रतीक बनलेले असून ते तेजाने तळपते आहे.

पुन्हा एकवार त्यांना वंदन !
************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मच्छर वा मच्छारचे विविध अर्थ काहीही असोत, या आडनावाची खात्रीशीर व्युत्पत्ती सापडो अथवा न सापडो, आपल्या कॅप्टनच्या भीमपराक्रमामुळे त्यांचे आडनाव मात्र शौर्याचे प्रतीक बनलेले असून ते तेजाने तळपते आहे.>>

खरे आहे.
मूळ घटनेबद्दल काही ठिकाणी संशय व्यक्त करण्यात आला आहे पण त्यामुळे पराक्रमाचं तेज कमी होत नाही.

छान लेख आणि विषय. नुकताच एक इंग्रजी युट्यूब व्हिडिओ पाहिला, त्यात इंग्रजांची आडनावे कशी तयार झाली याबद्दल माहिती आहे. त्यातही तुम्ही म्हणता तशीच मूळ गावे, व्यवसाय, पदे वगैरे वर्गवारी आहे. १०६६ मध्ये नॉर्मन लोकांनी इंग्लंडवर कब्जा केल्यानंतर जमिनीची मालकी वगैरे दस्तावेजीकरण झाले (हे इंग्रज लोक ह्यात पटाईत) त्यात आडनाव वापरायची पद्धत रूढ झाली म्हणे. म्हणजे एखाद्या गावात बरेच रॉबर्ट असतील, तर जो जंगलाच्या बाजूला राहतो तो रॉबर्ट वुड्स, तपकिरी केसवाला रॉबर्ट ब्राऊन, शिंपी असेल तर रॉ. टेलर, जॉनचा मुलगा असेल तर रॉ. जॉन्सन वगैरे. अर्थात आधीची नावे फ्रेंचमध्ये होती, त्यांच्या आंग्लीकरणात काही काळ गेला असणार.

आप्ल्याकडे आडनावं लावायची पद्धत इंग्रजांनीच आणली का?

मच्छर हे नाव ऐकल्यावर आधी थोडी गंमत वाटली.

गुजराथी भाषेत ( तिकडे स्थानिक लोकं ) कोळी लोकांना माच्छी म्हणतात. आमच गाव गुजरातेत आहे. तिथे हा माच्छी समाज बराच प्रस्थापित आहे, त्यांनी बांधलेली मोठी मोठी देवळे आहेत.
त्यामुळे त्या समाजातील एक आडनाव मच्छर/ माच्छर असावे असा एक माझा तर्क / अंदाज . अर्थात आडनावात काय आहे ? असेही वाटून गेले.

नाव मच्छर असले तरी पराक्रम एखाद्या सिंहासारखा आहे त्यांचा!

सर्वांना धन्यवाद !
आपण लिहिलेली पूरक माहिती रोचक असून आवडली .
आडनावे आपल्याकडे कधी सुरू झाली असावीत ? >>>त्यासाठी आता जरा इतिहास वाचणे आले.

स्मित तुम्हाला साष्टांग नमस्कार. तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलंत. तुम्हाला लवकर बरं वाटूदे.

मी कुठेतरी वाचलं की त्यांचं खरं आडनाव मच्चर आहे.

माझ्या समजुतीनुसार

मछुहारा (हिंदी) -> मछहार (सिंधी) -> मछ्छार असा प्रवास असावा. या आडनावाच्या एका सिंधी परिवाराशी ओळख आहे. गुजराती नागर ब्राह्मणांमधेही मछ्छार हे आडनाव असते.

बाकी आडनावं जितकी चमत्कृतीपूर्ण महाराष्ट्रात आहेत तितकी भारतात कुठेच नाहीत हे नक्की.

हरपा, पोस्ट आवडली

ओह, त्या दिवशी कोकरोच आणि मच्छर बद्दल एक मीम पाहिले त्यातले मच्छर काय हे समजले नव्हते. आता ट्यूब पेटली. या बातमीला फॉलो केले तेव्हा हे आडनाव डोक्यात नोंदवले गेले नाही बहुधा.

इंटरेस्टिंग आहे नाव.
एकाच शब्दाचे वेगळ्या भाषेत वेगळे अर्थ असतात. किंवा अपभ्रंश झाल्यावर जे शब्द बनतात त्याचा वेगळ्या भाषेत भलताच अर्थ असतो त्यातला प्रकार असावा हा.

मूळ घटना बाकी भारी होती _/\_