दृश्यम ३ - देवगन वर्जन

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 October, 2026 - 09:20

फर्स्ट डे फर्स्ट शो मॉर्निंगलाच आज बघून आलो. थेटर फुल हाउसफुल. घरी आल्यावर बायकोने विचारले कसा होता? मी म्हणालो मस्त कडक होता. त्यावर ती म्हणाली, मी बघणार नाही तर तूच मला स्टोरी सांग.. मी विचारले दृश्यम-२ पाहिला आहेस का?.. ती नाही म्हणताच मी पाकिटातून पाचशे रुपये काढून तिच्या हातात ठेवले आणि म्हटले ताई माफ कर, हे घे पैसे आणि आधी ओटीटीवर दुसरा बघ, मग थिएटरला जाऊन तिसरा बघ..
यावर ती अवाक! इतरवेळी आपल्या उधळपट्टीला नावे ठेवणारा नवरा आज चक्क खिसा रिकामा करतोय.. पण तिला दृश्यम दोन आणि तीनची स्टोरी सांगण्यापेक्षा पैसे गेलेले परवडले. कुठून सुरू करावी आणि कुठली वळणे घेत सांगावी याचा विचार करूनच डोके भंजाळून गेले. ज्याला हे सारे सुचले, जसे त्याने ते लिहिले, ज्या प्रकारे ते दाखवले, म्हणजे कथा, पटकथा, स्टोरी टेलिंग वगैरे सगळंच भन्नाट. सांगणे सोपेही नाही आणि सांगण्यात मजाही नाही.

दुसरा भाग खरे तर मला इतका आवडला नव्हता. काहीतरी मिसिंग होते, विश्वासार्ह वाटत नव्हते, लूपहोल आहेत असे जाणवत होते. पण मी त्याची चिरफाड करत बसलो नाही. त्याने होत काही नाही, फक्त आपलीच चित्रपट बघायची मजा कमी होते. पण मूळात ती मजा तितकी दुसऱ्या भागात आलीच नव्हती. याला कारण कदाचित पहिल्या भागाने वाढलेल्या अपेक्षा सुद्धा असू शकतील.

यावेळी नेमका उलटा सीन होता. दुसऱ्या भागामुळे माझ्या अपेक्षा फार नव्हत्या. पण उत्सुकता होती. ओरिजनल मल्याळम चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये फर्स्ट हाफ संथ आणि खेचलेला आहे वगैरे वाचल्याचे आठवत होते. पण तरीही मला बघायचा होता आणि या दोन ऑक्टोबरचा निकाल दोन ऑक्टोबरलाच लावायचा होता.

प्रत्यक्षात मात्र मी ऐकलेल्या रिव्ह्यूप्रमाणे काहीच नव्हते. चित्रपट जराही संथ नव्हता. तब्बू आणि अजय देवगनच्या फॅमिलीची आजची परिस्थिती दाखवायला एक-एक सीन घेतला आणि तिथून जो चित्रपट सुटला त्यात क्षणभर विश्रांती घ्यायची एकही जागा नव्हती. एका सेकंदाचाही फाफटपसारा नव्हता.

यावेळी जयदीप अहलावत आणि वकील झालेले प्रकाशराज या दोन नवीन एन्ट्री होत्या. दोघे काय करू शकतात हे माहीत होतेच. पण अहलावत त्यात सुद्धा एक एक्स फॅक्टर घेऊन आला. इन्वेस्टीगेशन ऑफिसरचा टेरर दिसून आला म्हणून त्यानंतर अजय देवगन जे प्रत्युत्तर देतो त्यात मजा येत होती. थिएटरमध्ये पब्लिक टाळ्या वाजवत होती.
संवाद सुद्धा यावेळी एकेक मस्त आहेत. आणि त्यातले कित्येक नंतर त्यामागचा अर्थ उलगडत पुन्हा येतात तेव्हा जास्त मजा आली. गायतोंडे ह्युमर एक वेगळी कॅटेगरी तयार करायला हवी. यावेळी त्याने आणखी धमाल उडवली आहे.

मी ओरिजनल मल्याळम दृश्यम एकही भाग पाहिला नाही. पण त्याचा तिसरा भाग जमला नाही असे जे ऐकले होते ते खरे असेल तर हिंदी मध्ये गेम पलटला आहे एवढे नक्की.

बघून या लवकर.. पिक्चर सस्पेन्स असल्याने सर्वांनी बघितल्यानंतरच बोलण्यात मजा आहे. मग मी ती चर्चा माझ्या बायकोला वाचायला देतो, म्हणजे माझे पाचशे रुपये वाचतील Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मी ओरिजनल तामिळ दृश्यम एकही भाग पाहिला नाही" - कुणीच पाहिला नाहीये...... कारण ओरिजिनल सिनेमा मल्याळम भाषेत आहे Happy

ही चूक एकाने फेसबुक वर सुद्धा काढली Proud पण पोस्टमध्ये एका जागी बरोबर लिहिले आहे एका जागी चुकवले. या दोघांमध्ये नेहमी हा घोळ होतो Happy

पण ठीक आहे, लिखाणातली प्रत्येक चूक किमान दोन प्रतिसाद वाढवतेच Happy

येस, मुलांना अगदीच बघण्यासारखा आहे.
हिंसाचार, शिवीगाळ, अश्लीलता काहीच नाही.
पहिले दोनमध्येही काही होते का तसे?
अच्छा पहिल्यात मूळ घटनेत काही असू शकेल.. पण यात तसेही काही उल्लेख नाही आता.