गेले करायचे राहून - अंतिम

Submitted by अंतिम on 28 September, 2026 - 18:07

वडिल माझ्याकडे १ वर्ष होते. इकडे येताना पार्किन्सनला तशी सुरुवात झाली होती. दगड पडल्यासारखे मध्येच एकदम पडायचे. नेहेमी आनंदी, हसतमूख, कायम विनोद करणारा माणूस आता स्नायुंवरील ताबा गेल्यामुळे नीट बोलू - हसूही शकत नाही हे बघून वाईट वाटत होते. पडल्यावर दंडाला, मांडीला जोरात लागत होते. नास्तिक माणूस देव असेल तर मला मरण देईल का लगेच असे म्हणू लागला. नजर शून्यात जाऊ लागली.

मायबोलीवर पार्किन्सनच्या मदतगटांबद्दल वाचले होते. ते तेव्हा अजिबातच आठवले नाही. पार्किन्सनची घसरण एकाच वेळी खूप वेगानेही झाली आणि तरी ती रोज होत असल्याने लक्षात आली नाही. अश्या मदतगटांना त्यांच्याबरोबर उपस्थित राहून उर्वरित आयुष्य सुखाचे करता आले असते. ते करायचे राहूनच गेले.

इथून भारतात जाताना बिझनेस क्लासचे तिकिट काढून त्यांना सुखाने झोपवून नेता आले असते. ते लक्षात आले नाही. किमान सगळ्यांचे तिकिट न काढता फक्त वडलांचे बिझनेस क्लासचे तिकिट काढून तरी न्यायला हवे होते. ही छोटी गोष्ट पण लक्षात आली नाही. ते राहूनच गेले.

ते शेवटचे काही दिवस जिवंत असताना मी तिथे होतो. मी निघालो आणि दुसर्‍या दिवशी ते गेले. मेल्यावर जे उरते त्या देहाला काही अर्थ नसतो. त्याने काय फरक पडतो हे खरेच. पण त्यांना अग्नि द्यायचे राहूनच गेले.

माझ्या पास आता कळ्या
आणि थोडी ओली पाने

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे अंतिम.ही खंत समजू शकते. प्रत्यक्षात शरीराने हजर नसलात तरी मनाने ते जिवंत असताना आपुलकी, प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचवलंच असेल.

सल समजतोय. विषय गेले करायचे राहून होता... त्या दृष्टीने तुम्ही बरोबरच लिहिलंय, पण आता थोडं त्या राहिलेल्या कळ्यांच्या सुगंधाबद्दल ही लिहा.
तुम्ही वडिलांना तेव्हा बोलावले त्यामुळे त्यांना येणे शक्य झाले. अजून एखाद वर्ष उशीर झाला असता तर त्यांना किती कठीण झालं असतं!

सल समजतोय. विषय गेले करायचे राहून होता... त्या दृष्टीने तुम्ही बरोबरच लिहिलंय, पण आता थोडं त्या राहिलेल्या कळ्यांच्या सुगंधाबद्दल ही लिहा.
तुम्ही वडिलांना तेव्हा बोलावले त्यामुळे त्यांना येणे शक्य झाले. अजून एखाद वर्ष उशीर झाला असता तर त्यांना किती कठीण झालं असतं!>>+१

कितीही केलं तरी आणखी हे हे करता आलं असतं, असं काही तरी उरतंच. त्याला उपाय नाही.
करताना या गोष्टी मुद्दाम टाळल्या असं काही नाही. सुचल्याच नाहीत तर कशा करणार?
कितीही काळजी घेतली तरी व्हायचं ते होतंच.
मुख्य म्हणजे तुम्ही केलंत, तुम्हांला काळजी होती, हे त्यांना माहीत होतं , दिसत होतं.
लिहिल्याने मनात साठलेलं वाहून जावो.
काळाचं मलम ती बोच कमी करो.
पुढे त्यांच्यासोबतचे दोघांसाठीही आनंदी क्षण, दिवस , वर्षे तेवढी आठवत राहोत.

शेवटचा दिवस येईपर्यंत तुम्ही त्यांची काळजी घेतली/केली हे महत्त्वाचं. त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचली ती.

ओह.,..

शेवटचा दिवस येईपर्यंत तुम्ही त्यांची काळजी घेतली/केली हे महत्त्वाचं. त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचली ती.>>>+१

हाईन्डसाईटमध्ये बऱ्याच गोष्टी सुचतात. पण म्हणून आपण रुग्णसेवेत गुंतलेलो असताना गोष्टी सुचल्या नाहीत याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. मनाशी कितीही permutations combinations केलीत तरी काही गोष्टी अटळ असतात.
तुम्ही त्यांची यथाशक्ती सेवा केलीत हे महत्वाचे.