माझी प्रेम कथा फसलेली भाग ८.१

Submitted by amol_koli on 27 September, 2026 - 18:31

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
कॉलेज बदलायचं होतं… पण त्या दिवशी माझाच विचार बदलला भाग ८.१
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
राहुलच्या त्या ऐतिहासिक सल्ल्यानंतर माझ्या डोक्यात निर्णय जवळजवळ पक्का झाला होता—

“प्लेट बदलायची!”

आणि माझ्या प्रेमात गोंधळलेल्या मेंदूने त्याचा अर्थ लावला होता—

कराडचं कॉलेज सोडायचं आणि सांगलीच्या कॉलेजमध्ये admission transfer करून घ्यायचं.

मनीषापासून दूर जायचं असेल तर हाच सगळ्यात सोपा मार्ग आहे, असं त्या वेळी मला वाटत होतं.

पण कॉलेज बदलणं म्हणजे वडापावची प्लेट बदलणं नव्हतं!

२००५ मध्ये MCA ची वर्षाची फी जवळपास ₹२८,००० होती. आजच्या हिशोबाने पाहिलं तर ती रक्कम साधारण दीड लाखाच्या आसपास वाटावी इतकी आमच्यासाठी मोठी होती.

आणि माझ्यासाठी तर त्या ₹२८,००० च्या मागे फक्त आकडा नव्हता…

माझ्या वडिलांची वर्षभराची धडपड होती.

⸻

मला वडिलांना फोन करून सांगायचं होतं—

“अण्णा, मला कराडचं कॉलेज सोडून सांगलीला admission घ्यायचं आहे.”

पण त्यासाठी कारण काय सांगणार?

“अण्णा, एका मुलीला विसरण्यासाठी कॉलेज बदलतोय…”

हे सांगितलं असतं तर कॉलेज बदलण्याआधी अण्णांनी बहुतेक माझाच अभ्यासक्रम बदलला असता!

त्यांची माझ्याकडून एकच अपेक्षा होती—

“मुलाने मन लावून शिकावं आणि एक दिवस Software Engineer व्हावं.”

आणि आई?

तिने तर माझं MCA पूर्ण होण्याचीही वाट पाहिली नव्हती.

शेजाऱ्यांना ती जवळजवळ सांगून मोकळी झाली होती—

“आमचा ज्ञानदेव Software Engineer झालाय!”

मी अजून COA ची assignments करत होतो आणि आईने मला जवळजवळ IT industry मध्ये deploy करून टाकलं होतं!

अशा परिस्थितीत कॉलेज बदलण्यासाठी मला एक भक्कम कारण हवं होतं.

कुणाचा सल्ला घ्यावा?

राहुल?

नाही बाबा!

त्याच्या सल्ल्याने आधी गोड सोडून तिखटाकडे गेलो… आणि आता अख्खं कॉलेज सोडण्याची वेळ आली होती.

⸻

त्या काळात आजच्यासारखा प्रत्येकाच्या हातात मोबाईल नव्हता.

आमच्या पाच जणांच्या फ्लॅटमध्ये एकच मोबाईल होता.

तोही आमचा नाही.

आमच्या वर्गमित्राचा—निलेशचा Nokia 1100!

त्या काळात Nokia 1100 म्हणजे आमच्या फ्लॅटमधलं communication satellite होतं.

आणि निलेशकडून मोबाईल मागणं म्हणजे loan sanction करून घेण्यासारखं होतं.

दर—

₹२ प्रति मिनिट.

आणि तरीही फोन मिळत नसेल तर अंतिम ब्रह्मास्त्र—

वडापाव + चहा!

मी त्याला म्हणालो,

“निलेश, अण्णांशी बोलायचं आहे. फोन दे ना.”

विशेष प्रतिसाद नाही.

मी मनात म्हटलं—

“ठीक आहे. अगदीच गरज पडली तर वडापावच्या budget मध्ये mobile loan घ्यावा लागेल.”

⸻

दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू होण्याआधी मी एका public telephone booth वर गेलो.

खिशातून एक रुपयाचं नाणं काढलं.

फोनमध्ये टाकलं.

घरी नंबर फिरवला.

आईने फोन उचलला.

मी म्हणालो,

“आई, अण्णा आहेत का?”

ती म्हणाली,

“ते शाळेत गेलेत. घरी आले की सांगते. निलेशच्या मोबाईलवर फोन करायला सांगते.”

मी मनात म्हटलं—

“Perfect!”

कारण निलेश स्वतःहून आम्हाला फोन देत नसला तरी घरून वडिलांचा फोन आला तर त्याच्याकडे पर्याय नव्हता.

आता सगळी तयारी झाली होती.

अण्णांचा फोन येणार…

मी कॉलेज बदलण्याचा विषय काढणार…

फक्त एकच गोष्ट बाकी होती—

कॉलेज बदलण्याचं कारण!

आणि त्या क्षणी मला वाटलं, या पृथ्वीवर माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल असा एकच हुशार मेंदू आहे—

दीपाली!

⸻

मी वर्गात गेलो.

नेहमीप्रमाणे दीपाली अभ्यासात गुंग होती.

मी ठरवलं होतं—

सरळ तिच्याजवळ जायचं आणि विचारायचं,

“मला कराडहून सांगलीला admission transfer करायचं आहे. काय कारण देता येईल?”

पण मी तिच्याजवळ पोहोचलो आणि तिने वर पाहिलं.

मला पाहून ती हसली.

त्या दिवशी ती खूप प्रसन्न दिसत होती.

चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.

क्षणभर मी काय विचारायला आलो होतो तेच विसरलो.

ती उठली आणि म्हणाली—

“मला माहीत होतं, तू माझ्याकडे येशील.”

मी अजून काही समजून घेण्याआधी ती पुढे म्हणाली—

“मी Coffee साठी ready आहे.”

आणि तेवढ्यात—

धाडऽऽक!

वर्गाच्या दुसऱ्या बाजूला काही पुस्तकं जमिनीवर पडली.

मी तिकडे पाहिलं.

राहुल!

तो माझ्याकडे पाहत होता.

चेहरा गंभीर.

नजर रागावलेली.

मला क्षणभर असं वाटलं, जणू त्याच्या नजरेतून एकच संदेश येतोय—

“माझ्याऐवजी पुन्हा दीपाली?”

मी मनात म्हटलं—

“आज संध्याकाळच्या budget मध्ये एक वडापाव आणि चहा reserve ठेवावा लागणार!”

तेवढ्यात—

“Amol…?”

मी भानावर आलो.

“Amol… चल ना!”

दीपाली म्हणाली.

मी राहुलकडे पुन्हा पाहण्याचं धाडस केलं नाही.

आणि दीपालीसोबत वर्गाबाहेर पडलो.

⸻

जवळच्या canteen मध्ये गेलो.

मी order दिली—

“एक Coffee.”

फक्त एक.

कारण महिन्याचा शेवट होता…

आणि माझ्या खिशात उरले होते फक्त—

पाच रुपये!

दोन coffee घेण्याइतका budget नव्हता.

दीपालीने माझ्याकडे पाहिलं.

“एकच Coffee? तू नाही घेणार?”

आता तिला,

“मॅडम, महिन्याचा शेवट आहे आणि आपल्या hero च्या खिशात फक्त पाच रुपये शिल्लक आहेत,”

हे सांगण्याइतकी हिंमत नव्हती.

मी अत्यंत गंभीर चेहरा करून म्हणालो—

“मी चहा-कॉफी पीत नाही… आणि मला गोडही फारसं आवडत नाही.”

दीपाली काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली.

मग हलकंसं हसली.

त्या हसण्यात मला असं वाटलं—

“हा काहीतरी लपवतोय…”

तिने विचारलं,

“बोल… काय discuss करायचं आहे?”

मी normal असल्याचं नाटक करत म्हणालो,

“काही नाही. मी ठीक आहे. फक्त तुला Coffeeचं promise केलं होतं ना… म्हणून आलो.”

ती लगेच म्हणाली,

“No… मला नाही वाटत. काहीतरी आहे. सांग, काय लपवतोयस—”

तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी बोलून टाकलं—

“मला कराडहून सांगलीला admission transfer करायचं आहे.”

ती स्तब्ध झाली.

काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली.

मग गंभीरपणे म्हणाली,

“अमोल, त्या दिवशी वर्गात जे झालं ते एवढं मनावर घेऊ नकोस. वर्ग हसला म्हणजे प्रत्येकाच्या मनात तुझ्याबद्दल वाईट आहे असं नाही. Problems पासून पळून जाऊ नकोस.”

आता मला दाखवायचं होतं की मी खूप mature आहे.

मी गंभीर चेहरा केला आणि म्हणालो—

“Deepali, I am not running away from the problem… I am just trying to redefine the problem statement.”

…

हे वाक्य तोंडातून बाहेर पडताच माझं आतलं मन माझ्यावरच ओरडलं—

“अरे देवा! काय बोललास तू? हा चित्रपट नाहीये!”

मी लगेच काहीतरी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करणार…

पण दीपाली म्हणाली,

“पहिल्यांदा office मध्ये जा. Clerk ला विचार. College change करण्याची procedure काय आहे ते समजून घे. मग निर्णय घे.”

मला वाटलं—

“बरोबर!”

मी ताबडतोब उठलो आणि कॉलेजच्या office कडे निघालो.

…

आणि हो—

Coffee चं bill भरायचं राहिलंच!

पण मनीषाला विसरण्याचा प्रश्न अजूनही तसाच होता…

आणि राहुलच्या भाषेत सांगायचं तर—

प्लेट बदलण्याचा option आता बंद झाला होता…
आणि गोड अजूनही त्याच प्लेटमध्ये होतं!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users