माझी प्रेम कथा फसलेली भाग ६

Submitted by amol_koli on 27 September, 2026 - 18:19

--------------------------------------------------------------------------------------------------------
एक “Sorry” जे बोलताच आलं नाही… आणि एक “Coffee?” ज्याने सगळंच बदललं भाग ६
--------------------------------------------------------------------------------------------------------

त्या दिवशी दीपालीने Activa माझ्याजवळ थांबवली होती. मी तिच्याकडे पाहिलं… ती हसत होती. तिच्या चेहऱ्यावरून मला वाटलं, मी तिच्यासोबत कॉफीला यावं अशी तिची अपेक्षा होती.

पण त्या दिवशी मी मनाने इतका खचलेलो होतो की तिला साधं “नाही” सुद्धा नीटपणे म्हणण्याची अवस्था नव्हती.

मी काहीच उत्तर दिलं नाही आणि सरळ रूमवर निघून गेलो.

त्या क्षणी माझ्या वागण्याने तिचं मन दुखावलं असेल, हा विचारसुद्धा माझ्या डोक्यात आला नाही.

पण आज राहुलचं ते महान तत्त्वज्ञान ऐकल्यावर—

“गोड विसरायचं असेल तर तिखट खायला सुरुवात कर…”

मला अचानक दीपालीची आठवण झाली.

आणि मनात एकदम अपराधी वाटायला लागलं.

“अरे! त्या मुलीने आपुलकीने कॉफीसाठी विचारलं आणि आपण साधं उत्तरही दिलं नाही?”

मला स्वतःचाच राग आला. नकळत का होईना, माझ्यामुळे कुणाचं मन दुखावलं होतं.

मी ठरवलं—

“उद्या दीपालीला भेटून Sorry म्हणायचंच.”

ती माफ करेल की नाही, हे तिच्यावर. पण माफी मागणं माझं काम होतं.

त्या रात्री मात्र झोप काही केल्या येईना.

सतत दीपालीचा चेहरा आणि माझं त्या दिवशीचं वागणं आठवत होतं.

कधी तरी विचार करता करता झोप लागली…

आणि दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये पोहोचलो.

वर्गाचं दार उघडलं तर…

संपूर्ण वर्ग रिकामा!

फक्त दीपाली एकटी बसून वहीत काहीतरी लिहीत होती.

माझ्या मनाने लगेच आदेश दिला—

“जा! हीच वेळ आहे. Sorry बोल.”

मी कसंबसं धाडस करून तिच्याजवळ गेलो.

“Hi Deepali… this is Amol…”

काहीच प्रतिसाद नाही.

ती लिहीतच राहिली.

मी पुन्हा थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणालो,

“Hi Deepali…”

तरीही काही नाही.

शेवटी मी हिंमत करून म्हणालो,

“त्या दिवशी मी जसा वागलो… त्याबद्दल I am really sorry…”

दीपालीने लिहिणं थांबवलं.

हळूहळू माझ्याकडे पाहिलं.

सुरुवातीला चेहरा अगदी निर्विकार…

आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर राग!

मी घाबरलो.

ती जागेवरून उठली…

माझ्याकडे आली…

आणि—

धाडऽऽऽक!

माझ्या गालावर जोरात थप्पड!

आवाज इतका मोठा होता की…

मी थेट माझ्या बेडवर जागा झालो!

घाबरून गालावर हात ठेवला.

आजूबाजूला पाहिलं.

ना कॉलेज… ना दीपाली… ना थप्पड…

स्वप्न होतं!

क्षणभर जीव भांड्यात पडला.

पण लगेच दुसरा विचार—

“हे स्वप्न उद्या खरं झालं तर?”

बस्स!
माफी मागण्याचा प्लॅन पुन्हा cancel!

मनात म्हटलं—

“गोड विसरण्यासाठी तिखट खायचं खरं… पण हे तिखट जरा जास्तच झोंबतंय!”

⸻

दुसऱ्या दिवशी मी आणि राहुल कॉलेजला निघालो.

रस्त्यात मी पुन्हा त्याला विचारलं,

“राहुल, समज तिखट मला suit झालं नाही… तर दुसरा काही पर्याय आहे का?”

राहुलला अजूनही मी खाण्याबद्दलच बोलतोय असं वाटत होतं.

तो अत्यंत गंभीरपणे म्हणाला,

“अरे, तिखटाचा स्वभावच तसा असतो. सुरुवातीला त्रास होतो, आवडत नाही… पण हळूहळू सवय लागते. आणि एक दिवस तू त्याच्याही प्रेमात पडतोस.”

मी त्याच्याकडे पाहिलं.

मनात म्हटलं—

“यापुढे याचा सल्ला घेण्याआधी दोनदा विचार करायला हवा!”

कॉलेजमध्ये पोहोचलो.

राहुल पुस्तकं जमा करण्यासाठी लायब्ररीत गेला आणि मी वर्गाकडे निघालो.

काल रात्रीची स्वप्नातली थप्पड अजून गालावर नसली तरी डोक्यात मात्र ताजी होती.

वर्गाकडे जाताना मी मनातल्या मनात विठ्ठलाला प्रार्थना करत होतो—

“विठ्ठला, बाकी आज काही नको रे बाबा… फक्त वर्गात दोन-चार मुलं तरी असू देत. मला आणि दीपालीला एकटं ठेवू नकोस!”

घाबरत वर्गात डोकावलं…

आणि—

हुश्श!

वर्गात बरीच मुलं-मुली होती.

माझा confidence एका सेकंदात परत आला.

मी निवांत माझ्या बाकावर जाऊन बसलो.

आजचं धोरण स्पष्ट होतं—

ना मनीषाकडे पाहायचं… ना दीपालीकडे!

आपण आपलं Maths चं lecture करायचं आणि शांतपणे दिवस काढायचा.

पण मनातला अपराधीपणा काही जात नव्हता.

पहिलं lecture visiting faculty च्या Maths सरांचं होतं. सरांना यायला उशीर होत होता.

मी घड्याळाकडे पाहिलं.

मग दीपालीकडे.

मन पुन्हा म्हणालं—

“अमोल, आता तरी जा. किती पळणार?”

मी आजूबाजूला पाहिलं.

मनीषा अजून वर्गात नव्हती.

राहुल लायब्ररीत.

Maths चे सर अजून आले नव्हते.

वर्गात बाकी विद्यार्थी होते.

मी मनात म्हटलं—

“Perfect! विठ्ठलाने आज सगळी setting आपल्यासाठीच लावलेली दिसतेय.”

आणि आता एक निर्णय घेतला—

“जाऊ दे. जास्तीत जास्त काय होईल? स्वप्नातली थप्पड खरी होईल! चूक आपलीच आहे. माफी तर मागायलाच हवी.”

मी उठलो आणि दीपालीच्या बाकाकडे गेलो.

ती वहीत notes लिहीत होती.

मी तिच्यासमोर उभा राहिलो.

तिने वर पाहिलं…

आणि मला पाहताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.

बहुतेक तिच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता—

“हा स्वतःहून माझ्याशी बोलायला आला?”

तिने चेहऱ्यावरचं हसू लपवण्याचा प्रयत्न केला…

पण काही हसू ओठांपेक्षा आधी डोळ्यांत दिसतं.

आणि तिच्या डोळ्यांतलं ते हसू मला स्पष्ट दिसत होतं.

क्षणभर मीच हरवून गेलो.

मग स्वतःला आठवण करून दिली—

“अरे बाबा! Sorry म्हणायला आला आहेस. बघत काय बसलास?”

मी तोंड उघडणार एवढ्यात…

दीपालीने माझ्याकडे पाहून विचारलं—

“Coffee?”

माझं सगळं तयार केलेलं apology speech एका सेकंदात गायब!

मी हसलो.

तिच्याकडे पाहून म्हणालो—

“Coffee… sure, Deepali!”

आणि मग जुन्या गैरसमजाची आठवण झाली म्हणून मी म्हणायला सुरुवात केली,

“And by the way, my name is…”

पण माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच दीपाली म्हणाली—

“Amol… I know you, Amol.”

बस्स!

त्या क्षणी मी वर्गात होतो की दुसऱ्याच कुठल्या universe मध्ये, मलाच कळेना.

ज्या “अमोल” नावामागे मी माझा संकोच लपवला होता, तेच नाव तिच्या तोंडून इतक्या सहजपणे ऐकताना त्या क्षणी वेगळंच वाटलं.

मी हसत मागे वळलो…

आणि माझं हसू क्षणभर तिथेच थांबलं.

माझ्या अगदी मागे मनीषा उभी होती.

ती कधी वर्गात आली, मला समजलंच नव्हतं.

पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं की आमचं बोलणं कदाचित तिने ऐकलं होतं.

तिची नजर खाली होती.

चेहरा नेहमीसारखा शांत, निर्विकार…

पण तरीही काहीतरी वेगळं जाणवत होतं.

कदाचित ती काही भावना लपवत होती…

किंवा कदाचित ते फक्त माझ्या गोंधळलेल्या मनाचं आणखी एक calculation होतं.

मी काही बोललो नाही.

शांतपणे माझ्या बाकाकडे परत आलो.

पण बसताना एकदा नजर पुन्हा तिच्याकडे गेली.

यावेळी मनीषा माझ्याकडे पाहत होती.

तिच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं…

पण डोळ्यांत मात्र काहीतरी होतं.

आणि दुसरीकडे दीपाली…

तिच्या डोळ्यांत अजूनही त्या “Coffee?” चं हसू होतं.

त्या दिवशी माझी अवस्था खरंच विचित्र झाली होती.

कालपर्यंत मी एका मुलीपासून पळत होतो…

आज दुसऱ्या मुलीची माफी मागायला गेलो…

माफी मागायच्या आधीच कॉफी ठरली…

आणि मागे वळून पाहतो तर जिच्यापासून पळत होतो तीच माझ्या मागे उभी!

एका बाजूला दीपालीचं हसू…
दुसऱ्या बाजूला मनीषाची शांत नजर…
आणि मध्ये मी—अमोल की ज्ञानदेव, हेच अजून जगाला नीट सांगू न शकलेला!

त्या क्षणी मला खरंच एकच प्रश्न पडला होता—

“विठ्ठला… मी नेमकं केलं तरी काय आहे?”

राहुल म्हणाला होता, गोड विसरण्यासाठी तिखटाची सवय लाव.

पण त्याने एक गोष्ट सांगितली नव्हती—

गोड आणि तिखट दोन्ही एकाच वेळी समोर आलं…
तर करायचं काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users