एखादी गोष्ट करायची ठरवली तर कधी ना कधी ती पूर्णत्वाला न्यायची इच्छा अगदी तीव्र होते आणि कधी अनायसे तर कधी जाणीवपूर्वक, ती घडते. माझ्या बकेटलिस्ट बद्दल मी याआधी लिहिलं आहेच आणि अजूनही त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी पूर्ण करतेच. किंबहूना कामंधामं सोडून मनाला येईल तसं जगणच सुरू आहे माझं बऱ्याच वर्षांपासून. पण आत्ता लिहीतेय माझ्या राहून गेलेल्या इच्छेबद्दल.
लहानपणी भातुकली खेळलेय पण फक्त जेवण बनवणं इतपतच. नवरा बायको, मुलंबाळं असे खेळ खेळले असले तरी तितकेसे आठवत नाहीत किंवा त्यांचा तितकासा प्रभाव मनावर झाला नसेल. पुस्तकं वाचायला आवडायची. चांदोबा मधले ते राजकुमार आणि राजकुमारी आवडायचे. आपल्याला कधीतरी असा राजकुमार भेटणार अशी स्वप्नं किंवा कल्पनाविलास सुरू झाले. घरी टीव्ही आला आणि चित्रपटातले प्रेमीप्रेमिका आवडायला लागले. मारझोडपट अजूनही झेपत नाहीत पण अजिबात संबंध ना सूत्र प्रकारातले प्रेमपट मी मूर्खासारखे बघत बसते. माझे दोन चुलत भाऊ व्हिडीओग्राफीचं काम करायचे. नेहमी नवनवीन लग्नाचं शूटिंग आणि मग घरी त्याचं एडिटिंग असायचं. तेव्हा आपलं पण आपल्या राजकुमाराबरोबर असच लग्न होणार या विचाराने मी तासन् तास बघत बसायचे. लग्न करायचंच हे मनात पक्कं होतं.
अभ्यासात मी यथातथाच होते. गृहपाठ करणं म्हणजे एक शिक्षा वाटायची. चौथीत असताना वर्गशिक्षिकेने वहीत लिहून दिलं होतं की "माझी मुलगी गृहपाठ करत नाही हे मला माहीत आहे" आणि त्यावर बाबांची सही आणायला सांगितली होती. त्यानंतर नेमाने सगळं करेन असं बाबांना सांगितलं खरं पण तरीही माझी टंगळमंगळच असायची. कधीकधी आई रागावून म्हणायची की नसेल अभ्यास करायचा तर दहावी नंतर लग्न करून टाकते तुझं. मग बस चूल आणि मूल करत घरात. तिला वाटायचं की ती धमकी देतेय पण मी मनात खूप खुश व्हायचे की वा, माझं लवकर लग्न होणार! मुलं सांभाळण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे ते कितपत जमेल ते माहीत नव्हतं पण चुलत बहिणीची मुलं सुट्टीत घरी यायची तेव्हा त्यांच्याबरोबर खेळायला आवडायचं.
जेव्हा चुलत भावाला झालेलं बाळ एकत्र कुटुंबामुळे घरात वावरायला लागलं तेव्हा मात्र त्याला जोजवणं मला अतिशय आवडतय हे कळायला लागलं. हे काम कठीण असलं तरी अशक्य अजिबात वाटत नव्हतं. घरात सगळ्यांनाच दोन-तीन भावंडं असल्याने आपल्यालापण दोनतीन मुलं तरी नक्कीच होतील अशी आशा वाटली. दहावीचा अभ्यास टाकून मी बाळाला खेळवत बसायचे. त्याची शी शू साफ करणं, त्याला आंघोळ घालायला मदत करणं, त्याला मसाज करणं, सगळच मला आवडायचं. पण नंतर नवीन घरात राहायला गेल्यावर बाळाला कधीतरीच भेटायला जायला मिळायचं.
घरात बसून मुलं सांभाळायची असतील तर पैसे लागतील. स्वतः कामावणार नसू तर नवऱ्याचे लागतील. असा भरपूर कामावणारा नवरा हवा असेल तर आपण पण चांगलं "वरण्यायोग्य" असावं लागेल. म्हणजे चांगलं शिक्षण आणि कदाचित सुरुवातीला चांगली नोकरी करणं क्रमप्राप्त आहे हे समजलं हे माझच नशीब म्हणावं लागेल. आजूबाजूच्या मुलींची चांगली नोकरी नसतानाही लग्न झाली होती पण त्यांना बांबूच्या टोपल्या वगैरे विणायला येत होतं. मला खेळण्याशिवाय काहीच येत नव्हतं. मल्लखांब, व्हॉलीबॉल, सायकलिंग, गिर्यारोहण वगैरे मधे मी निपूण म्हणावं इतकी चांगली होते. पण अभ्यासात मात्र पहिल्या पाचात येण्याइतपतच. त्यामुळे मग इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाल्यावर एक नोकरी करून चांगला नवरा पटवणं सोपं होईल असं वाटलं. अभ्यास न आवडणाऱ्या मुलीला इंजिनिअरिंग मधे फर्स्ट क्लास काय वाईट नाही असं त्यावेळी तरी वाटत होतं, असो!
खूपच लवकर खूपच अनपेक्षित पगाराची नोकरी मिळाली. फक्त चांगला नवरा शोधण्यासाठी नोकरी करतेय हे डोक्यात नक्की असल्याने कामात काही चमक दाखवावी असं अजिबात वाटत नव्हतं. ऑफिसला यायचं, पाट्या टाकायच्या आणि परत जायचं एवढच हवं होतं मला. मग अप्रायझलमधे बॉसने खूप सुनावलं. आता कामात रस घेण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. आकडे न आवडणारी मुलगी डेटा अनालिसिस मधे एक्सपर्ट झाली.
या सगळ्यात नवरा शोधमोहीम बरीच पाठी गेली. घरी आईबाबा, चुलत-आत्ते भावंडं, सख्खी बहीण या सगळ्यांनी आपापले जीवनसाथी स्वतःच निवडले असल्याने आणि मी तशी थोडी विक्षिप्तच असल्याने माझा जीवनसाथीही मीच शोधायचा होता. कॉलेजात किंवा बाहेर जे मुलगे आवडले त्यातल्या कोणालाही मी "तशी" कधी आवडेलच नाही त्यामुळे नुसतीच मजा. मुलींबरोबर ही संबंधं आले पण ते ही कधी सिरीयस होण्याइतके नाही टिकले. त्यात भारतात मुलं वाढवायची असतील तर एकटीने, किंवा लग्न न करता मुलगा किंवा मुलगी पार्टनर बरोबर वाढवणं खूपच कष्टाचं काम त्यामुळे लग्न करावच लागणार हे कळलं होतं. मग विवाहसंस्था नोंदणी प्रयोग सुरू केले. बहिणीला फिल्टर करायला बसवलं आणि तिने पुढे पाठवलेल्या मुलांबरोबर बोलणं सुरू झालं. काहींशी भेटही झाली. शेवटी एकदाचा मला एक मुलगा आवडला आणि त्यालाही मी आवडले. फोनवर भरपूर बोलून, जवळजवळ प्रेमात पडून मग भेटायचा निर्णय घेतला. भेटल्यावरही अर्थातच आवडलो आम्ही एकमेकांना. त्याला सांगितलं की माझे मुलगे आणि मुली दोघांबरोबरही संबंधं होते. त्याने विचारलं की आत्ता नाहीत ना, नंतर नसतील ना, आणि पुरुषाशीच लग्न करून मुलं हवीत हे नक्की आहे ना, तशी खात्री स्वतःबद्दल असेल तर मला कशाला काय फरक पडायला हवा. सगळेच अनुभव घेतात की कधी उत्सुकता म्हणून कधी प्रयोग म्हणून किंवा कधी स्वतःबद्दल खात्री करावी म्हणून. त्याच्यासाठी हा मुद्दा डील ब्रेकर नव्हता. एक मात्र होतं की तो जॉब करत असतानाही शिकत होता, खरंतर शिकताना परिस्थिती मुळे जॉब करत होता. तर त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी माझा जॉब सोडणं थोडं जिकिरीचं होईल त्यामुळे मी अजून दोन-तीन वर्षं तरी तो सुरू ठेवायचा होता ज्याला मी तयार झाले.
मग काय, आमची पसंती तर झाली होती, दोघांनी घरी कळवून टाकलं आणि बाकी सगळे बघण्या-भेटण्याचे कार्यक्रम झाले. तीनच महिन्यांत लग्न झालं आणि आम्ही एकत्र राहायला लागलो. मला घर सांभाळण्याची प्रॅक्टिस होती, मुलं सांभाळण्याचीही होती, पण कोणा वेगळ्या माणसाबरोबर राहायची नव्हती. लिव्ह इन मधे राहून लग्न केलं असतं तर कदाचित समजलं असतं पण आम्ही फक्त काही विकेंडच एकत्र घालवले होते. सुट्टी घालवणं वेगळं आणि नेहमी एकत्र राहणं वेगळं. काही डील ब्रेकर होते माझ्यासाठी ते घडले आणि कितीही केलं तरी मला त्यात तडजोड करणं शक्य होत नव्हतं. मी इतकी रागात होते की जे आयुष्यातले सर्वात सुंदर शरीरसंबंध होते ते ही नकोत म्हणून सांगितलं. पण तुला बाहेर कुठे शरीरसुख मिळत असेल तर घे असंही सांगितलं. त्यावेळी ओपन मॅरेज, ओपन रिलेशनशिप वगैरे कधी ऐकलं नव्हतं पण मला चालणार असेल तर त्याने एकपत्नीव्रत राहायची गरज नाही हे तेव्हा पटत होतं. त्याला ते अज्जिबात पटलं नाही आणि ही गोष्ट बाजूला ठेऊन आम्ही बाकी गोष्टी पटवून घेता येतील का ते पहात राहीलो. बाकी आमची खूप चांगली मैत्री होती. त्याच्या घरच्यांशीही खूप प्रेमाचे संबंध होते. पण एकत्र राहायला जमत नव्हतं अगदीच. घरच्यांच्या समजावण्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मी दुसऱ्या शहरात बदली करून घेतली.
काय स्वप्न बघितली होती मी, काय करून बसले वगैरे विचार करण्यात भरपूर वेळ जायचा म्हणून मी कामात स्वतःला झोकून दिलं. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन रात्री उशिरा पर्यंत थांबायला लागले. त्याने रीतसर सायकायट्रिस्टकडे जाऊन मदत घेतली होती. मी ऑफिसात बसून पाठ मोडून घेतली. तीन महीने अंथरुणाला खिळले होते तेव्हा डॉक्टर नी सांगितलं की मानसिक आरोग्य नीट नसेल तर शारीरिक व्याधी चिघळत जातात. मग मी नवऱ्याशी बोलले. महिनाभर एकत्र राहायचा पुन्हा एकदा प्रयत्न करायचा असं ठरलं. पण मग त्यातही डील ब्रेकर घडलाच आणि म्हटलं बास, मला क्लोजर हवय. तसंही आम्ही एका वकिलाला गाठून म्युच्युअल कंसेंटने घटस्फोट हवाय म्हणून कोर्टात अर्जं दिला होताच पण तारखेच्या वेळी गेलो नव्हतो. यावेळी नक्की येतो असं वकिलाला सांगून गेलो आणि त्याच दिवशी घटस्पोट घेऊन वेगळे रस्ते पकडले.
त्यानंतर कोणाबरोबर रहाणे हा प्रकार आपल्याला कधी झेपणार नाही हे जाणवलं. भावाकडे किंवा बहिणीकडे राहायला जमत होतं कारण आमचे विचार एकमेकांना पटले नाहीत तरी आम्ही कोणाच्या अध्यात-मध्यात नसतो. पण तिसऱ्याच व्यक्तीपेक्षा गड्या आपण एकटेच बरे! एकटी राहायला चांगलं वाटत होतं. मुलांबरोबर थोडंफार डेटिंगही सुरू झालं होतं. बऱ्याच वर्षांनंतर परत जेव्हा मुंबईत बदली झाली तेव्हा एक घर शोधलं. त्या घराच्या चाव्या ज्यांच्याकडे होत्या त्यांनी विचारलं की तुम्ही एकट्या राहणार असाल आणि दिवसभर ऑफिसात असाल तर एका महिन्यासाठी पीजी म्हणून माझ्या मुलीला ठेऊ शकता का? तिला पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्यायच्यात पण आमच्या घरात तिच्या अभ्यासासाठी वेगळी खोली नाहीय. मी इतर ठिकाणी शोधतोय पण म्हटलं तुम्हाला विचारावं. मला कोणाही बरोबर राहायचा फोबिया होता ते मी सांगितलं नाही पण इतक्या वर्षांनंतर प्रयत्न करायला मी तयार होते. म्हटलं भेटते मी तिला आणि बोलून सांगते. माझ्यापेक्षा सातआठच वर्षांनी लहान असलेली ती गोड मुलगी भेटायला आली. तिला सांगितलं की दिवसभर तर तू आरामात घर वापरू शकतेस. रात्री मी टीव्ही किंवा लॅपटॉप बघत झोपते त्यामुळे तू बेडरूम वापरू शकतेस आणि मी हॉल वापरेन. घराचं अर्धं भाडं आणि जेवणाचा अर्धा खर्च दे, मदतनीस मी ठेवेन. पण मी पूर्वी कधी मुलींनाही डेट केलय हे आधीच सांगून ठेवते. ती म्हटली मला कशाला काय फरक पडायला हवा त्याने, मी आपला अभ्यास करेन फक्त. दुसऱ्या दिवशी ती सामान घेऊन माझी फ्लॅटमेट झाली.
रात्री मी ऑफिसातून घरी आले की जेवताना आम्ही गप्पा मारायचो. तिला बोलायला अतिशय आवडतं, माझ्याहून जास्तं. आमची चांगली गट्टी जमली. विकेंडला दोन मॉक पेपरच्या मधे येऊन "दिदी तुला सांगू" म्हणून जी सुरू व्हायची ती दुसरा पेपर द्यायची वेळ होईल तेव्हाच थांबायची. एका महिन्यासाठी आलेली असली तरी परीक्षा झाल्यावर निकाल लागेपर्यंत माझ्याकडेच राहिली. जेवताना कधी एखादी सिरीज लावून आम्ही बघायचो तर कधी गप्पांतून वेळच मिळायचा नाही. ते माझं गोड बाळ होतं म्हणून मी तिला बाळूच म्हणायला लागले.
या बाळामुळे मला समजलं की कदाचित एकत्र रहाण्यात काही बंधनं नसतील, अपेक्षा नसतील तर मी राहू शकते. पण लग्न, आपलं बाळ या गोष्टी आता जन्मात कधीच होऊ शकणार नाहीत. लग्न हा प्रकार माझ्यासाठी नाहीच हे समजून आलं होतं. नवर्याशी पुन्हा मैत्री झाली होती. त्यालाही लग्न हा प्रकार मानवणारा नाही हे पटलं होतं. आपल्याला वाटायचं की आपण चार लोकांसारखे एकत्र राहू, मुलं सांभाळू पण हा आपला पिंडं नाहीय. काही लोक DINK करतात. एकत्र राहून मुलं नकोत असं ठरवतात. आपण एकत्र राहू शकत नाही पण आपल्याला मुलं आवडतात. आपण आपल्यालाच ओळखलं नव्हतं. आपण वेगळे आहोत हे आधीच कळलं असतं तर इतकी वर्षं फुकट घालवली नसती! असो! आता आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि कधी भेटतोही. सासरच्या बाकीच्यांशी तर कायमच चांगले संबंध आहेत. भेटीगाठी होतच असतात.
बहिणीच्या आणि भावाच्या मुलांना भरपूर जोजावून मुलं सांभाळायची हौस भागवून घेतली. पण मूल वाढवायची बकेटलिस्ट मधली गोष्ट राहिलीच करायची. पण मग जेव्हा बहिणीला तिसरं बाळ झालं तेव्हा म्हटलं आता हे बाळ मी सांभाळलं तर! म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे जाऊन भेटून, खेळून यायचं नव्हे, पूर्ण वेळ बाळाबरोबर राहायचं. बहिणीलाही मदत हवीच होती. पंधरा वर्षं नोकरी करून जन्मभर कदाचित थोडी काटकसरीने, पण राहू शकेन एवढं कमवून ठेवलं होतं. राजीनामा दिला तेव्हा मॅनेजरने एक वर्ष सब्याटीकल घेऊन जायचा पर्याय दिला. म्हटलं हे चांगलं आहे, माझा तसाही काही नेम नाही. वर्षभर बाळ सांभाळायचय, नंतर काय ते ठरवलं नाहीय तर हा पर्याय चांगलाच आहे. मग मी गाशा गुंडाळून बहिणीकडे राहायला गेले. हे टिकलू पिकलू बाळ खूपच लाघवी! जवळजवळ पूर्णवेळ माझ्याकडेच होतं. बहिणीलाही मोठ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत होता. वर्षभर खरच मी लहानपणापासून जे ठरवलं होतं तसं घरात बसून बाळ सांभाळलं. मोठी दोघंही लाडकी होतीच. पण मूल नुसतं सांभाळणं आणि आपलं मूल वाढवणं यात फरक असतो ते चांगलच कळलं. आपले आईबाबा आपल्याबरोबर वेगळे वागायचे पण तेच आजीआजोबा आल्यावर नातवंडांशी अधिक प्रेमाने, अधिक लाड करत वागतात तोच तो फरक. रोजच्या जगण्यातली जबाबदारी नसते आणि नातवंडांचीही जबाबदारी आपल्याला पूर्णपणे घ्यायची नसते. सगळं करायला मुलांचे आईवडील समर्थ असतात. आपल्याला फक्त त्यांच्या बाळलीला अनुभवायच्या असतात. थोडीफार मदत आणि मुलांसाठी करताना राहून गेलेल्या गोष्टी करायची संधी मिळालेली असते. माझंही तसच झालं होतं. माझी स्वतःची मुलं असती तर कदाचित इतका वेळ मला देता आला नसता. कदाचित मुलं होऊ न देण्याचा निर्णय बरोबरच होता.
ही छोटी एक वर्षाची झाल्यावर नोकरीत परत रुजू व्हायचं की नाही हे ठरावण्याआधी मी एक महिन्याच्या भटकंतीसाठी बाहेर पडले. त्या प्रवासाबद्दल आणि इतर साहसांबद्दल बकेटलिस्ट लेखात लिहिलय. त्यावेळी पॉंडिचेरीत असताना हॉटेल मालकांच्या घरात राहात होते. डेंटिग करणं बंदच होतं गेल्या दोनतीन वर्षांपासून. घरमालक, ज्यांच्याबरोबर चांगलं सूत जुळलं होतं ते एकदा म्हणाले की तू रोज रात्री एकटी का येतेस घरी? तुझे प्रेफरन्स माहीत नाहीत पण सोबतीला मुलगा किंवा मुलगी का आणत नाहीस? मला खरंतर हसू आलं कारण मी याबाबत विचारच केला नव्हता, पण म्हटलं कोणी आवडलं तसच तर नक्की आणेन. नंतर खरच एक मुलगा - चिकू, आवडला आणि तो माझ्याबरोबर घरात राहायला आला. हा माझ्यापेक्षा एक दशकाहूनही लहान असलेला पण आयुष्यात काय हवय आणि काय नको याची पुरेपूर जाणीव असलेला मुलगा होता. एकत्र राहण्यापूर्वी मी त्याला माझे याआधीचे अनुभव आणि समस्या सांगितल्या. तो म्हणाला मलाही तसच हवय. एकत्र राहायचं पण काहीही अपेक्षा न ठेवता. एकमेकांच्या अध्यात मध्यात न येता. आपण एकत्र असू पण ओपन रिलेशनशिप मधे. मी इतर मुलींनाही डेट करेन आणि तू ही इतर मुला मुलींना डेट कर. मला ते फारच आवडलं. तो कधी फोन करून सांगायचा की आज रात्री घरी येणार नाहीय, एका मुलीबरोबर जातोय. माझा मालकांबरोबर गप्पा मारण्यात किंवा क्रोशे करण्यात छान वेळ जायचा. मला मात्र दुसरं कोणी तेव्हा आवडलं नाही. त्याचं आणि माझं एकदम चांगलं चाललं होतं. आकंठ प्रेमात होतो आम्ही दोघे.
बहीण जेव्हा मुलांना घेऊन पॉंडिचेरीला फिरायला आली होती तेव्हा मी, चिकू आणि छोटं बाळ असे काही वेळ एकत्र होतो आणि वाटलं की हे असं कुटुंबं आवडेल. मला लग्न, मूल वगैरे नकोय हे नक्की पटलं होतं, पण ते आमचे एकत्र घालवलेले क्षण आतून काहीतरी हलवून गेले की काय असं वाटलं. नंतर चिकूला चेन्नईत जॉब मिळाला आणि मला तिकडे जायचं नसल्याने मी बहिणीकडे परत आले. चिकूबरोबर आता लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू झाली. आता सात-आठ वर्षं झाली, अजूनही आम्ही तितकेच जवळ आहोत मनाने. रोज फोनवर बोलणं होतं. हळूहळू एकमेकांना आपले निर्णय सांगणे, एकमेकांना विचारून निर्णय घेणे आपोआप व्हायला लागलं. दर दोन-तीन महिन्यांतून एकदा आम्ही कुठेतरी फिरायला जात होतो. काहीवेळा तो बहिणीकडे दोन-चार दिवस राहायला येतो. छोटीबरोबर तर त्याची चांगलीच मैत्री झालीय. तो परदेशात राहायला गेल्यापासून वरचेवर भेटणं होत नाही पण तसंही फोनवरच भेटायचो ना! त्याला पण मुलं आवडतात आणि माझं बाळ ते त्याचं पण बाळ त्यामुळे तो पण छोटीला आपली मानतो. माझी आई त्याला कधी प्रत्यक्षात भेटली नाहीय पण अधूनमधून चौकशी करते त्याची.
हल्ली काही वर्षांत मासिकपाळीचा त्रास सुरू झाला आणि मागच्या वेळच्या FSH टेस्टमधे कळलं की संपलय सगळं. आता नाही येणार परत पाळी. आता जरी कधी वाटलं की मुलं व्हायला दिली तर चालेल का, तरी ते कधीच शक्य होणार नाही. मेनोपॉज असा कधी लवकर पण येऊ शकतो.
आता खरच गेलं करायचं राहून! कायमस्वरूपी!
आता छोटीही खूप मोठी झालीय. माझ्या बकेटलिस्ट मधली एक तळात गेलेली गोष्ट करायची वेळ आलीय त्यामुळे मी तिथे जायचं ठरवलं होतं. तशी तयारी जवळपास झालीच होती. पण, पण, पण! माझं ते मुंबईचं बाळ होतं ना, तीच ती माझी जिवाभावाची मैत्रीण झाली होती, ती गोड मुलगी. तिला दुसरं बाळ झालं आणि तिच्या नवऱ्याला नेमकी तेव्हाच परदेशात नोकरी मिळाली. नवऱ्याचा तिकडे जम बसेपर्यंत आणि तिलाही तिथे काही नोकरी मिळेपर्यंत, एवढ्या लवकर तिला तिथे जायला जमणार नाहीय म्हणाली. रोज सासूशी मी काय बोलणार तर तुला यायला जमेल का असं तिने विचारलं. तुझ्या बकेटलिस्ट मधल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला इथे पूर्ण करायच्या आहेत आणि तू करत नाहीयेस. त्या पण होतील, बाळही असेल आणि मला बडबड करायला पार्टनर मिळेल. म्हटलं ठीक आहे, मला जे काम करायचय ते मी अजून काही महीने पुढे ढकलू शकते. आलेय मी आता पुन्हा मुंबईजवळ राहायला. बेलीडान्स, योग, जीम, कसले कसले वर्कशॉपस्, काय नी काय सुरू झालेत हळूहळू. बाकी वेळ बाळं आहेतच. माझ्या बाळाची बाळं म्हणजे नातवंडच झाली की माझी! तेच ते आजीआजोबा सारखं प्रेमाने वाढवायचं.
काही करायचं राहून जातं खरं पण कधी काय कोणत्या स्वरूपात मिळेल सांगता येत नाही.
किती स्वच्छ विचार! किती
किती स्वच्छ विचार! किती स्वच्छ लिहिणं! आवडलं!
समृद्ध आहात. लेख आवडला.
समृद्ध आहात. लेख आवडला.
किती स्वच्छ विचार!>>>
अफाट लेख!
) काहीतरी जबरदस्त विलक्षण विचार करणार्या आणि तो प्रत्यक्षात आणायची हिंमत करणार्या तुमचा मनात बारीकसा हेवा आणि "कसं बुआ हे सर्व जमत असेल" असा कौतुकमिश्रित अचंबा वाटत आलेला आहे
त्यामुळे तुमचा लेख "गेले करायचे राहून" मधे आलेला दिसला तेव्हा आँ ??असे काहीतरी वाटले 
किती स्वच्छ विचार!>>> स्वातीला अनुमोदन! क्लिअर थॉट प्रोसेस जाणवते वाचतानाही.
तुमचे बकेट लिस्ट, पॅराग्लायडिंग, स्कुबा, पाँडिचेरी वगैरे लेख वाचलेले आहेत आणि नेहमी चाकोरी सोडूनच ( खरं तर चाकोरी लाथाडून म्हणावे लागेल
अगदी वेगळंच लिखाण. पण खूपच
अगदी वेगळंच लिखाण. पण खूपच प्रामाणिक त्यामुळे आवडलंच.
अफाट आहे हे!
अफाट आहे हे!
असे लिहायला जमले पाहिजे.
एखाद्या पिक्चरची स्टोरी वाचत आहे असे वाटले. आणि तसेच डोळ्यासमोर सारे दिसले
फारच स्पष्ट आणि स्वच्छ विचार.
फारच स्पष्ट आणि स्वच्छ विचार. लिखाण खूप आवडलं.
एखाद्या पिक्चरची स्टोरी वाचत आहे असे वाटले.>>>>> +१
सोनू, तुझा 'करायचे राहुनी'
सोनू, तुझा 'करायचे राहुनी' मधला लेख काय असू शकेल विचार करतच उघडला. कारण तू इतकं काय काय केलेलं वाचलं आहे की सोनूला काही गेले करायचे राहुनी असू शकेल असं वाटत न्हवतं.
काय लिहिलं आहेस! इतकं नितळ प्रामाणिक आणि सहज कोण लिहू शकतं! काही अभिनिवेश नाही का काही नाही. तुला शुभेच्छा!
सोनू ताई, लय भारी.
सोनू ताई, लय भारी.
किती प्रामाणिक लेखन!!!
किती प्रामाणिक लेखन!!!
माणूस किती बदलत जातो... लहानपणी घर संसार आवडीने करायचा असलेली व्यक्ती इतकी बदलली...
वाचलं.
वाचलं.
उपक्रमाच्या घोषणेतला हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ मगर फिर भी कम निकले
हा गालिबचा शेर आणि साहिलची मैं जिंदगी का साथ निभाता चला गया ही गझल
दोन्ही तुझ्यासाठीच लिहिले आहेत.
आवडला लेख सोनू. वरच्या सगळ्या
आवडला लेख सोनू. वरच्या सगळ्या प्रतिक्रियांना+११११११११
धन्यवाद, आभार, शुक्रिया.
धन्यवाद, आभार, शुक्रिया.
काल सकाळी मी हा विषय पाहिला आणि म्हटलं डायरीतली थोडी पानं एकत्र करून एखादा लेख बनवूया. बराच फाफटपसारा होत होता आणि मग काटछाट करून रात्रीपर्यंत एकदाचा थोडा आटोपशीर बनला आणि पोस्ट केला. डायरीचीच पानं असल्यामुळे कदाचित जास्त प्रामाणिक वाटला असेल.
सोनू,
सोनू,
तुमचा मागचा लेख वाचला होता तेव्हा वाटले होते की, वा! असे जगायला हवे.
आजही परत तसेच वाटले वा! असे जगायला हवे, इतक्या प्रामाणिकपणे स्वतःकडे बघता यायला हवे.
God bless you!
काय लिहिलं आहेस! इतकं नितळ
काय लिहिलं आहेस! इतकं नितळ प्रामाणिक आणि सहज कोण लिहू शकतं! काही अभिनिवेश नाही का काही नाही. तुला शुभेच्छा! हेच म्हणते
स्वत:शी प्रामाणिक असेल व निडर
स्वत:शी प्रामाणिक असेल व निडर असेल तरच असे लेखन शक्य आहे. अनेकदा आपलेच आपल्यावर दडपण असते व आपल्या अभिव्यक्तिचा संकोच आपणच करत असतो. सुंदर लेख! प्रणाम!
काय वेगळं आणि सॉर्ट आयुष्य
काय वेगळं आणि सॉर्ट आयुष्य आहे सोनू तुझं!! आयुष्यभर चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह घेऊन गोंधळलेल्या चेहऱ्याने पावलं टाकत असल्याने इतक्या स्वच्छ विचारांचं, आचिव्हमेंट चं कौतुक आहे.
पुढच्या आयुष्यात जे जे मनाशी ठरवलं आहे ते सर्व मिळत राहो.
परवा सिम्बाच्या लेखामुळे माबो
परवा सिम्बाच्या लेखामुळे माबो शीतनिद्रेतून जागा झालो आणि आज सोनूच्या या लेखामुळे रोमातून बाहेर यायला भाग पडलं.
एकदम प्रांजळ, पारदर्शक, वर अमित म्हणाला तसं, कसलाही अभिनिवेश नसलेलं लेखन. स्वतःच्याच आयुष्याकडे इतकं तटस्थपणे बघायला जमायला हवं.
वरवर साधं सरळ वाटणारं लिहिलेलं असलं तरी या सगळ्यातून जाताना किती ताणतणाव सोसावे लागले असतील, किती मानसिक उलघाल झाली असेल आणि तरीही कडवटपणाचा लवलेशही कुठे डोकावत नाही.
सोनूतै, तुझं कौतुक, अभिमान, तू आता खुश आहेस याचा आनंद, मी तुला वैयक्तिकरित्या ओळखतो म्हणून झालेला आनंद अशा एकदम संमिश्र भावना दाटून आल्यात. तुझी गार्डियन एंजल आक्काचंही खूप कौतुक!
माझ्यासारख्या पामरांना प्रेरणा देत रहा!
प्रांजळ कथन. मस्त मुलगी आहेस
प्रांजळ कथन. मस्त मुलगी आहेस तू सोनू!
काय लिहिलं आहेस! इतकं नितळ
काय लिहिलं आहेस! इतकं नितळ प्रामाणिक आणि सहज कोण लिहू शकतं! काही अभिनिवेश नाही का काही नाही. तुला शुभेच्छा! हेच म्हणते>>>> ममोला मम!
Amazing लिखाण,
Amazing लिखाण,
खालचे गाणे तुमच्या प्रवासाला चपखल बसेल.
पुढेमागे चरित्र, आठवणी लिहिल्यास त्यांना "i did it my way" नाव द्या.
And now the end is near
So I face the final curtain
My friend, I'll say it clear
I'll state my case of which I'm certain
… I've lived a life that's full
I've traveled each and every highway
And more, much more than this
I did it my way
… Regrets, I've had a few
But then again, too few to mention
I did what I had to do
And saw it through without exception
… I planned each charted course
Each careful step along the byway
And more, much more than this
I did it my way
… Yes, there were times, I'm sure you know
That I bit off more than I could chew
But through it all when there was doubt
I ate it up and spit it out
I faced it all and I stood tall
And did it my way
… I've loved, I've laughed and cried
I've had my fill, my share of losing
And now as tears subside
I find it all so amusing
To think I did all that
And may I say, not in a shy way
Oh, no, no not me
I did it my way
खरेतर कंटेंट इतका लक्षवेधी
खरेतर कंटेंट इतका लक्षवेधी आहे, की लिखाण कसे झाले आहे याला कॉम्प्लीमेंट द्यायला थोडा वेळ लागला.
अतिशय प्रांजळ, आणि "आहे हे असे आहे" प्रकारचे लेखन.
त्यातला सरळसोटपणा मनाला भावला.
ज्या गोष्टी स्वतःच्या मनात पण
ज्या गोष्टी स्वतःच्या मनात पण बोलणे त्याज्य समजले जाते त्या अशा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर लिहिणे याला खूप प्रचंड धाडस आणि विचारांचा ठामपणा / सॉर्टेड विचार लागते.
त्या धाडसी वृत्तीला आणि विचारांच्या नेमकेपणाला दाद देण्यासाठी हा प्रतिसाद..
अवाक करणारं कथन आहे हे! अशी
अवाक करणारं कथन आहे हे! अशी विचारांची स्पष्टता आणि त्याहीपेक्षा आपल्याला जे बरोबर वाटतं तेच करण्याचं डेअरिंग माझ्यात असतं तर!
किती नितळ लेखन आहे. पण ते
किती नितळ लेखन आहे. पण ते इथवर आमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीचं आयुष्य जगताना तुला प्रचंड मानसिक, कौटुंबिक व सामाजिक स्ट्रगल करावा लागला लागला असेल याची खात्री आहे . आणि तरीही तुझ्या लिखाणात खंत, विषाद किंवा कसला विखार नाही. हीच केवढी अचिव्हमेंट आहे.
तुझं लिखाण वाचून एकदम रिचर्ड बाखच्या illusions चा हा प्रोलॉग आठवला. तो तुझ्यासाठी…
Once there lived a village of creatures along the bottom of a great crystal river.
The current of the river swept silently over them all - - young and old, rich and poor,
good and evil, the current going its own way knowing only its own crystal self.
Each creature in its own manner clung tightly to the twigs and rocks of the river
bottom, for clinging was their way of life, and resisting the current what each had
learned from birth.
But one creature said at last,
‘I am tired of clinging. Though I cannot see it with my eyes, I trust that the current knows where it is going. I shall let go, and let it take me where it will. Clinging, I shall die of boredom.
The other creatures laughed and said,
‘Fool! Let go, and that current you worship
will throw you tumbled and smashed across the rocks, and you will die quicker than
boredom!
But the one heeded them not, and taking a breath did let go, and at once was
tumbled and smashed by the current across the rocks.
Yet in time, as the creature refused to cling again, the current lifted him free from
the bottom, and he was bruised and hurt no more.
And the creatures downstream, to whom he was a stranger, cried,
‘See a miracle! A
creature like ourselves, yet he flies! See the Messiah, come to save us all!
And the one carried in the current said,
“I am no more Messiah than you. The river
delights to lift us free, if only we dare let go. Our true work is this voyage, this
adventure”
.
But they cried the more,
‘Saviour!’ all the while clinging to the rocks, and when they looked again he was gone, and they were left alone making legends of a Saviour.
ज्या गोष्टी स्वतःच्या मनात पण
ज्या गोष्टी स्वतःच्या मनात पण बोलणे त्याज्य समजले जाते त्या अशा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर लिहिणे याला खूप प्रचंड धाडस आणि विचारांचा ठामपणा / सॉर्टेड विचार लागते.
त्या धाडसी वृत्तीला आणि विचारांच्या नेमकेपणाला दाद देण्यासाठी हा प्रतिसाद.. +१२३
मलाही खूप वर्ष मनात राहिलेलं खूप काही लिहायचं आहे. गेली अनेक वर्ष अगदी रोज.. न चुकता मी एका वेगळ्या आयुष्याचं स्वप्न बघते. पण इथे लिहायची हिंमत नाही माझ्यात. तुमच्या धाडसाला सलाम.
पारदर्शी प्रामाणिक लिखाण
पारदर्शी प्रामाणिक लिखाण .आवडलं.
सोनू, किती नितळ आणि स्वच्छ
सोनू, किती नितळ आणि स्वच्छ लिहिले आहेस. जियो. मुक्त आणि तरीही अर्थपूर्ण आयुष्याचा आरसाच जणू.
नितळ प्रामाणिक लिखाण. गट्स
नितळ प्रामाणिक लिखाण. गट्स लागतात असं जगायलाही आणि लिहायलाही. आवडेश लेख