मला वेळेत जमण्यासारखा वाटलेला हा एकच उपक्रम, पण प्रत्यक्ष वेळ गाठायला भारतात आत्ता रात्रीचे पावणेबारा वाजले आहेत. त्यामुळे हे लिखाणही "गेले लिहायचे राहुन" होणार असं वाटायला लागलं होतं. पण शेवटी सगळं अवसान गोळा करून बसले आहे, थोडं मनमोकळं व्यक्त व्हायला.
मला ना, खूप लहानपणी एक मखमली, भरजरी स्वप्न पडलं होतं. मी ते आईला सांगितलंही, पण तत्कालीन मराठी मध्यमवर्गीय, त्यातही शिक्षकी पेशाचे आईवडील असलेल्या आणि अभ्यासात बर्यापैकी गती असलेल्या शाळकरी मुलीला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही प्रोत्साहन मिळालं नाही. ते मिळणार नाही हे कुठेतरी मनात आधीच स्वीकारलेलं होतंच म्हणा. आईला मी ते सांगत असताना मनात कितीही ऊर्मी दाटून आल्या, तरी ते तेवढ्यापुरतंच असणार आहे, आई कौतुकाने हसेल आणि सोडून देईल, आणि मग पुढे काहीच होणार नाही हेही पक्कं माहिती होतं. मी हट्टी नव्हते, रत्नागिरी लहानसं शहर, पुढे शिकायला पुण्याला जायचं तर खच्चून मार्क्स पाहिजेत वगैरे गणित मांडलं आणि स्वप्नातले सगळे सूर पार हरवून गेले! ३-४ क्षणच लख्ख विजेसारखे चमकून नाहिसे झाले! मी शाळेच्या कार्यक्रमात सतार वाजवते आहे आणि साक्षात आशा भोसले माझं सतारवादन संपल्यावर माझ्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवतायत...एरवी स्वप्नातही मी असं स्वप्न बघू शकले नसते! पण बघितलं खरं! सतारच का? माहिती नाही. माझ्या घरी फार सुंदर हार्मोनिअम होती (अजूनही आहे!) आणि मला तेव्हा थोडंफार वाजवता येत असे. सतार तर दुरूनही बघितली नव्हती, पण दूरदर्शनवर रविशंकरांचा कार्यक्रम बघितला आणि सतारीच्या प्रेमात पडले! कदाचित ते मनी वसलेलं स्वप्नी दिसलं असेल. पुढे योगायोगाने आम्ही एका लग्नकार्यासाठी डोंबिवलीला गेलो होतो तेव्हा माझ्या मावशीकडे राहिलो होतो. माझी मावसबहीण खूप छान सतार वाजवायची. ती लग्न होऊन कधीच सासरी गेली होती, पण मावशीला सांगून मी तिची सतार गवसणीतून काढून खूप वेळ बघत होते. "चल गं, ट्रेनची वेळ झाली" हे ऐकल्यावर मी ती पुन्हा गवसणीत घातली. शिकायची इच्छाही तिथेच बंद झाली. काही गोष्टी विशेष लक्ष द्यायच्या आधी, लक्षातच न येता आपसूकच बंद होतात तसं काहिसं झालं.
अभ्यास महत्त्वाचा हे खूप बिंनलं होतं मनात. तो आवडायचाही करायला, त्यामुळे गाणं-संगीत कायम बॅकफूटवरच राहिलं, ऐकण्यापुरतं. पण ऐकलं मात्र भरपूर! अजूनही खूप ऐकते. माझ्या लेकीचा गाण्याचा क्लास सध्या काही कारणामुळे बंद आहे, पण ती मधूनच कधीतरी पुन्हा क्लास सुरू करूया म्हणते तेव्हा मला सतार वाजवणारी, दोन वेण्या घातलेली मीच दिसते डोळ्यासमोर! तिचं गाणं पुन्हा सुरू करणार नक्की, पण तिच्याच मागे इतके व्याप आहेत, की तिलाच ते खरंतर वेळेत जमवणं कठीण झालं. असो.
दुसरी गोष्ट म्हणजे मात्र अगदी खरंच कधीच करूही शकणार नाही इतकी राहून गेली माझ्याकडून! मी अकरावीत असताना पुण्यात शिकायला आले. ५-६ महिन्यात माझ्यासारख्या पुस्तकवेड्या २-३ मैत्रिणी मिळाल्या होत्या. त्यातली एक जरा आमच्या मानाने डॅशिंगबिशिंग म्हणावी अशी होती. अकरावीचं एक सत्र संपलं आणि येऊ घातलेल्या बारावीसाठी मी पेइंग गेस्ट रहात होते ती खोली, जेवायची मेस, कॉलेज, क्लासेस आणि अभ्यासिका हे सगळं वेळेत बसवता यावं म्हणून बाबांनी सायकल घेऊन दिली आणि मला पंखच फुटले! ही डॅशिंग मैत्रीण कॉलेजपासून ५ मिनिटं चालायच्या अंतरावर रहायची. मग १५-२० मिनिटं जरी मोकळी मिळाली तरी आम्ही सायकलवरून उंडारून यायचो. तर असंच एकदा पुलंच्या पुस्तकाबद्दल बोलताना "मला ना एकदा पुलंना भेटायची फार इच्छा आहे, पण ते आजारी असतात हे मला माहिती आहे" असं मी म्हटलं. "चल जाऊया आपण त्यांना भेटायला" असं म्हणून तिने सायकल वळवली! आं! काहीही काय! सुनिताबाई किती कडक आहेत... ही मैत्रीण काय येडी झाली की काय... वगैरे मी काही बोलायच्या आत ती सोसायटीच्या गेटपर्यंत गेली आणि तिथूनच हाका मारायला लागली. मग मला काय रहावतंय!
१५-१६ वर्षांचं वेडं वय, कानात वारं शिरलेल्या वासरासारख्या आम्ही उधळलो होतो! तिचं घर शास्त्री रस्त्याला, तिथून भांडारकर रस्त्याला गेलो. "१ मालतीमाधव" माहितीचा, आपुलकीचा पत्ता. त्यामुळे कोणालाही काहीही विचारायची गरजच नव्हती. फेब्रुवारी महिना, त्यामुळे उन्हापावसाची चिंता नव्हती. संध्याकाळचे ४:३०-५ वाजले होते, त्यामुळे भलत्या वेळी जातोय ही बोचणी नव्हती. आमच्या मते आम्ही एकदम परफेक्ट वेळ साधून परफेक्ट काम करायला जात होतो!
आम्ही "मालतीमाधव"पाशी पोहोचलो आणि धडधडायला लागलं. आपण नक्की काय (परफेक्ट!) आगाऊपणा करायला जातोय हे आता जराजरा समजायला लागलं होतं. मुळात पुलंना आणि सुनिताबाईंनाही, वेळ घेतल्याशिवाय भेटणं कधीच आवडलं नाही हे माहिती होतं. पण आता माती खाल्लीच आहे तर होऊदे काय ते... असा विचार करून तिथल्या वॉचमनला "आम्ही पुलंना भेटायला आलोय" सांगितलं. त्यानेही आम्हाला अडवलं नाही. खाली रहिवासी फलकावर त्यांचं नाव वाचलं आणि त्यावर हात फिरवला. देवळात जाताना पहिल्या पायरीशी आपण वाकून नमस्कार करतो ना, त्याच भावनेने मी त्यांच्या नावाला स्पर्श केला होता. मग जिन्यात आलो आणि एकदम नर्व्हस झालो दोघीही!
"ऐक ना, आपण नको जाऊया! आतून बघ ना लोकांचे आवाज येतायत. पाहुणे असतील कोणी आलेले... आणि आपण त्यांची परवानगीपण घेतली नाहिये. परत येऊ जरा ओळखीतून परवानगी काढून..." मैत्रीण एका दमात बोलली. मलाही भयंकर ताण आलाच होता. पण एवढं येऊन तसंच माघारी जायचं पटेना. ताण हलका करायला मी म्हटलं, "सुनिताबाईंनी दार उघडलं तर मी सांगेन मी रत्नागिरीचीच आहे, पटकन त्यांना नमस्कार करू आपण. पुलं भेटले तर भेटले, नाहीतर २ सेकंदात सटकू!"
पण आता ती पार ढेपाळली होती. सगळं अवसान गळून गेल्यावर तिने "बघ ना, ऐक ना नीट! अगं सुधीर फडके वगैरेही येतात त्यांच्याकडे! आवाज नाही का कळत तुला बाहेर येतोय तो! नकोच जाऊया! मोठे लोक असतील आत सगळे, आपण काय येडचॅप उगीच जायचं मधेच!" म्हणून तिने हात धरूनच मला खाली आणलं! सुधीर फडक्यांचं काय मधेच! मला काहीच कळेना! पण तिच्यापुढे माझं काहीही चाललं नाही. आम्ही तिसर्या मिनिटाला खाली आलो होतो. वॉचमनने छानसं हसून "भेटले ना पुलं" असं म्हटलं आणि आमचं "हो" हे उत्तर गृहीत धरून "वा वा! छान छान!" असं म्हणालासुद्धा! मला हे सगळं अगदीच अनाकलनीय झालं होतं. आम्ही घरी आलो आणि मी तिला "तुला आधीच कळत नव्हतं का गं!" इतकंच बोलू शकले. तो विषय तिथेच संपला.
माझ्या मेसच्या काकूंचं माझ्यावर फार प्रेम होतं. त्यांना हा प्रकार सांगितला तेव्हा माझा रडवेला चेहरा बघून त्यांनी माझी समजूत काढली होती. पुढे ४ महिन्यांत, १२ जून २००० ला सकाळी पुलं गेले. दुपारभर मी रडल्यामुळे डोळे सुजले होते. माझ्या रूममेट्स इतक्या छान होत्या, त्यांनी मला पूर्ण वेळ समजून घेतलं. रात्री जेवायला गेले तेव्हा काकूंनी "काय गं.." इतकंच विचारलं आणि पुढे त्या काही बोलल्या नाहीत. माझं पुलंवेड सगळ्यांना माहिती होतं. भेटीचा किस्सा एव्हाना सगळ्यांना माहिती झाला होता. कोणीच मला उगीच काही विचारत-सांगत नव्हतं. माझा मला वेळ देत होते सगळेजण. जे निसटलंय, राहून गेलंय ते आता कधीच दुरुस्त होणार नाही हे मला समजलं होतं.
आजवर जे आयुष्य मिळालं ते मी आनंदाने स्वीकारत गेले. चुकत गेले, त्यातून शिकले. पण फार मोठा पश्चात्ताप व्हावा असं काहीच सुदैवाने घडलं नाही. जे कमी-जास्त असेल त्याची जबाबदारी मी घेतली. फार कशाची खंत नाही वाटली. जे हातात होतं ते त्यावेळी केलं म्हणून समाधान मिळत गेलं. पण पुलंच्या न झालेल्या भेटीची मात्र खंत वाटते. आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक म्हणजे त्यावेळचं ते इम्पल्सिव्ह वागणं असं मला अजूनही वाटतं. प्रत्यक्ष भेट झाली असती/ नसती... आम्ही दोघी मैत्रिणी नंतरही बरीच वर्षं अगदी पत्र पाठवून वगैरेही संपर्कात असल्यामुळे मैत्री तुटणं वगैरेही नाट्यमय घटना घडल्या नाहीत. पण जे निसटलं ते निसटलं!
आज या लेखनाच्या निमित्ताने मी व्यक्त व्हायच्या राहून गेलेल्या या २ गोष्टी मात्र मनमोकळेपणाने इथे मांडल्या! शाळकरी वयातल्या त्या स्वप्नाचा, गाण्याबद्द्ल ओढ वाटते त्याचा किती परिणाम झाला आहे हेही मला हल्लीच समजलं. मी संध्याकाळी कॉफी पिताना उगीच स्वप्नरंजन करत बसले होते, की मी पेटी वाजवेन, माझी लेक गाणं गाईल... आणि एकदम डोळे भरूनच आले! इतकं खोल काहीतरी वाटलं की पेटी वाजवता येतेय या आनंदाचंही ओझंच होईल की काय अशी भिती वाटली मला!
काही गोष्टी अशाच निसटतात का?
खूप सुंदर आलंय!
खूप सुंदर आलंय!
पुलंचा किस्सा वाचताना अंगावर काटा आला.
अशी एक चुटपुट / निसटलेला क्षण माझाही आहे.. मी सहावी सातवीत होते, पुलं समोर होते.. आणि मी फ्रीझ झाले.. काही सुचेचना.
ते गोड मिश्किल हसत समोरून निघून गेले..
जर तर चे असे निसटलेले क्षण ते मात्र कायमचे कोरले जातात.
भरभरुन आणि मनस्वी लिहीलयस.
भरभरुन आणि मनस्वी लिहीलयस. केवढी कर्तबगार आहेस, सुगरण आहेस. सितार शिकायला घे पुन्हा. ते स्वप्नं होइल पूर्ण.
पुलं - ह्म्म्म!!! काय बोलू!
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
पुलं ची आठवण फारच चुटपुट लावणारी आहे.
पु लंची आठवण अगदीच चुटपुट
पु लंची आठवण अगदीच चुटपुट लावणारी आहे.
तुझ्यामागे व्याप खूप आहेत माहिती आहे. तरीही सतार शिक गं. या गोष्टी कधीही सुरू करता येतात.
किती सुंदर, मनातलं लिहिलं
किती सुंदर, मनातलं लिहिलं आहेस प्रज्ञा !

सतारीचं जाऊ दे, पण पेटी येते हे तरी काय कमी आहे?
आणि संगीताचा कान लाभलाय.......तर त्याचा आनंद घेत राहा.
आता मी हळूहळू एकेका कामातून
आता मी हळूहळू एकेका कामातून मोकळी व्हायला लागले आहे. काहीतरी जमवीन आणि पेटी वाजवायला शिकेन असा विचार मनात पुन्हा मूळ धरतोय. अगदीच परीक्षा देणार नाही पण स्वतःच्या आनंदासाठी नक्कीच शिकायचंय. परीक्षेचं मोटिव्ह आता मला नकोच आहे. खूप धावपळ होते त्यापायी.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
किती सुंदर, मनस्वी आणि भरभरून
किती सुंदर, मनस्वी आणि भरभरून लिहिलंय! पुलंच्या न झालेल्या भेटीबद्दल वाचताना ‘राहून गेलेल्या’ गोष्टींची हुरहूर हळूहळू मनात उतरली.
पु लंची आठवण अगदीच चुटपुट
पु लंची आठवण अगदीच चुटपुट लावणारी आहे.> +१
सतार शिकण्यासाठी लवकर वेळ अणि संधी मिळो. शुभेच्छा!
खरंच गं.एक दुर्मिळ योग राहिला
खरंच गं.एक दुर्मिळ योग राहिला.
अर्थात पुलं आठवणीत आहेतच.कदाचित जाऊन काही बोलणे खावे लागले असते तर अजून वाईट वाटले असते.
किती सुंदर लिहिलं आहेस.
किती सुंदर लिहिलं आहेस.
पुलं ची भेट हुकली त्याची चुटपुट मला ही लागली.
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
पुलं ची आठवण खरेच चुटपुट लावणारी ..