गेले करायचे राहून - अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 25 September, 2026 - 10:47

याची एक लांब यादी होईल, पूर्ण आयुष्यच जगायचं राहून गेलेय माझे. मी काय करतेय मलाही माहित नाही.

नर्मदेच्या तीरावर राहणाऱ्या गरीब आदिवासी मुलांना बीजगणित आणि संस्कृत शिकवायचं होतं. विनामूल्य. शाळकरी वयांच्या कारण त्यापेक्षा मोठ्यांना शिकवायला गेले तर तेच नापास व्हायचे.

फिलियांथ्रॉपीत मला खूप रस होता, आपण या समाजासाठी काही तरी आणि विनामोबदला करायला हवे असे तीव्रतेने वाटायचे एकेकाळी. मी काहीच करू शकले नाही पण. पुढेही मला काही आशा दिसत नाहीये. सगळे जग कुठल्याना कुठल्या मोबदल्या शिवाय पर्सनल , पॉलिटिकल अजेंड्याशिवाय काही करत नाही पण मला त्याची असोशीच राहिली नाही. त्यातून मोकळे होण्याचा फायदा घ्यायचा आहे.

मला नांदेडचा मोहन भार्गव व्हायचं होतं पण मलाच काही येत नाही. माझ्या आयडियांनी आहे ते पाणीही आटायचं. मी तिथेही आऊटसायडर आहे आता आणि इथेही.

माझं ओव्हरॉल वाचन चांगले होते म्हणून आईला वाटायचं की मी MPSC , UPSC करावं पण माझं लहान वयात लग्न झालं आणि मी इकडेच आले. ती दारं बंद झाली.

नंतर तिलाच वाटायचं मी भाषा विषयात मराठी आणि संस्कृत मधे पुढे काही तरी करावं ते आहे अजून डोक्यात.

बहुतेक सगळ्याच संधी मुलांमुळे तिलांजली दिलेल्या आहेत, त्याग नाही वाटत. पण तुमची प्राधान्यक्रम बदलून जातात, आणि मग आयुष्याची दिशा बदलत जाते.

मला लहानपणापासूनच स्पिरिच्युॲलिटीत पुढे जायचं होतं, मेंटल एजिलिटी साठी. ते थोडंफार जमलं आहे. खूप खूप आव्हानात्मक असतं आपल्या unseen ऊर्जेला बाहेर काढणं. पण त्यातही आता पुढे अंधार दिसतोय कारण मी वेगळ्या प्रतलावर आणि जग वेगळ्या. दोनशे वर्षे थांबून राहणं शक्य नाही. त्यामुळे बरेचदा आपापल्या पुरतं ठेवत आहे. सगळेच नियम बदलायचे आहेत खरेतर. अभिरूची आणि बुद्धी दोन्ही गोष्टी मला पर्फॉर्मन्स वाटत नाहीत. सगळेच सारखे वाटते कारण ते असेही क्षणिकच असते.‌ उगाच याचा आधार घेऊन त्या अवतीभवती पर्सनॅलिटी डेव्हलप करणं पटत नाही. रादर मल्टिपल पर्सनॅलिटी आहेत त्या बाहेर काढायच्या आहे. हे एकच माणूस आहे असे वाटलेच नाही पाहिजे इतकं वैविध्य द्यायचं आहे.

सगळ्या प्रकारचे लिहायचे आहे, आधी कुणालाही न जमलेल्या गोष्टीवर विचार करायचा आहे, न जगलेल्या भावना जगून शब्दात मांडायच्या आहेत. काळाच्या पुढे जाणारं लेखन करायचे आहे पण आयुष्य मुभा देत नाही. आजूबाजूला वाचकही ते समजून घेणारी नाहीत. त्यामुळे तीच फ्रिक्वेन्सी मॅच करत लिहावे लागते. जे कधीतरी गुदमरवणारे आहे. पण लेखनच खुलभर दुधाची गोष्ट आहे त्यामुळे सगळंच खूप दूर वाटतंय. Artist should be naked म्हणतात, तसं आरस्पानी लिहायचं आहे. मनस्वी आणि उत्स्फूर्त.

मला सिकेपी, बंगाली, युपीच्या रेसिपी शिकायच्या आहेत. वेगळ्या. शक्यतो शाकाहारी. इन्स्टा ज्याने भरलेय त्या नाही. जे मी सुरू केले आहे आता.

मला मैलोनमैल दऱ्याखोऱ्यात भटकायचे आहे. नेटवर्क नसलेल्या ठिकाणी. पण हेल्थ फारच कोलमडली आहे. चाललेत प्रयत्न पण एकेक दिवस वाया जातोय त्यामागे.

इतकं काही गेले करायचे राहून मधे आहे आणि बऱ्याचशा गोष्टी साध्या आहेत पण मला नाही करता आल्या कारण मी निसर्गाची "chosen one" आहे. पण त्याचा खंत खेद नाही, उलट उल्का पडली पृथ्वीवर आणि दहा टक्के लोक वाचले तर मी त्यात असेल इतका प्रखर आत्मविश्वास आहे. एनर्जी वेगळी होऊन बसली आहे हे सतत जाणवतं, आपण बहुतेक जणांपेक्षा वेगळे आहोत हेही माहीत आहे फक्त त्या एनर्जीचं काय करायचं माहिती नाही.

हे जे चाललंय ते पुरेसे वाटत नाही, अजून मोठा प्लॅटफॉर्म हवा आहे. तो कसा शोधावा, शोधला तर मी तिथे टिकेल का, किंवा मला घरचं करून खरंच काही ground breaking लिहिता येईल का - हे सगळे प्रश्न आहेतच.

मी आणि माझी मैत्रीण आपण फक्त रिॲक्शन मधेच असतो आणि ती तर सतत बदलते मग आपण कोण आहोत म्हंटली. रिॲक्शन शिवाय उरलेले. म्हणजे आज एखादी गोष्ट मला फार आवडली आणि मी त्यावर विव्हळून प्रतिक्रिया दिली तर पाच दिवसांनी सगळ्या भावना बदलून जातात आणि आपण वास्तवाच्या जमिनीवर येतो. वर्षभरानी तर त्याचं काहीच वाटत नाही. No feelings at all ! मग काय खरं होतं?!

Metacognition वर हल्ली वाचलेय, highest form of intelligence is thinking about your own thinking आहे. अशा नव्या गोष्टी माबोवर आणायच्या आहेत. नाही समजलं तर नाही समजलं कुणाला, शंभर वर्षांनी कुणीतरी अस्मिता येईल तिच्यासाठी. मला कुणी नव्हतं पण तिला असावं म्हणून! मी प्रचंड पॅशनेट आहे पण माझ्या आजूबाजूला बर्फाच्या लाद्या आहेत. Am I speaking German to you? असं वाटतं बरेचदा.

आयुष्यातला एकेक दिवस जातोय आणि हाती भरीव असं काहीच लागत नाही असे सतत वाटतेय पण सध्या फक्त आल्या क्षणात आपापलं १००% देऊन बसतेय, कदाचित एकेका क्षणातून भविष्य आकार घेईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> एकेका क्षणातून भविष्य आकार घेईल.
आमेन! Happy

>>> मग काय खरं होतं?!
प्रवाहच खरा ना? नदीची उपमा क्लीशेड आहे, पण खरीच आहे - क्षणाक्षणाला पाणी बदलतं, मार्ग बदलतो, वेग बदलतो, पण नदी तीच असते.
रिअ‍ॅक्शन्सच म्हटल्या तरी माझ्या आणि तुझ्या निराळ्या असतात ना?

>>> अशा नव्या गोष्टी माबोवर आणायच्या आहेत. नाही समजलं तर नाही समजलं कुणाला
आम्हाला सगळ्यांना एका वाक्यात कंडममध्ये काढल्याबद्दल आभार! Lol

पोचलं (असं वाटतंय).

बीजगणित आणि संस्कृतच का? इंग्लिश सायन्स का नाही,असं वाटलं.
स्पिरिच्युअलिटी - अध्यात्म. स्वतःसाठी असतं ना? त्या शब्दातच आत्मन् आहे.

पुढचं वाचताना भवभूतीचा श्लोक आणि इक्बालचा शेर आठवले.

शेवटचं वाचताना माझ्या आवडीची ओळ जी मी इथे अवलोकनात लिहिली आहे ती आठवली.

गेलेल्या असंख्य दिवसातून हाती काहीच राहिले नाही
अज्ञातातून आलेला प्रवाह तसाच पुढती वाहत राही
शांताबाई

सगळं रुजत असतं कुठेतरी. येईल उगवून आणि तरारून.

स्वतः साठी आहेच की पण मग लिहूच नको की काय! Happy असं करता तुम्ही म्हणून मला तसं लिहावं लागतं. Proud

आम्हाला सगळ्यांना एका वाक्यात कंडममध्ये काढल्याबद्दल आभार! >>> Lol खूप मजा आली मला.

मला बीजगणित आणि संस्कृत येईल असे वाटते म्हणून. Happy

तू प्रचंड महत्वाकांक्षी आहेस असा माझा कयास होता तो खरा ठरलेला आहे.
.
>>> मग काय खरं होतं?!
हे मलाही वाटतं. बरेचदा वेगळ्या रीतीने. आपण ज्या इच्छा करतो तेव्हा त्या पूर्ण होत नाहीत पण नंतर कधी तरी अगदी ती गोष्ट नकोशी झालेली असताना मात्र दत्त म्हणुन उभ्या ठाकतात. हे जे 'सेन्सलेस, माईंडलेस, अनइन्टेलिजन्ट ग्रॅटिफिकेशन ऑफ दोझ डिझायर्स असते, ते नकोसे वाटते. यावर उपाय एकच इच्छाच न होउ देणे.
.
तुझ्या या तगमगीतून किंवा 'सॅक्रिड अतृप्ती/अस्वस्थता'मधुन काहीतरी उगवुन येइलच. आम्हा सर्वांना आवडणारे, निवळशंख लिखाण करतेस तेही पुण्यच आहे. निरंजन - तुझ्याकडुन शिकलेला शब्द आहे. हे तुला पूर्वी सांगीतलेच आहे. तसेच फ्रॅक्टल्स ही संकल्पना तू लिहील्यानंतर, मला पहील्यांदा कळलेली.
--------------------
मेटॅकॉग्निशन या संकल्पनेबद्दल आज कळले. वाचते आता.

मला नांदेडचा मोहन भार्गव व्हायचं होतं >> यासाठी तीन बदाम ❤️❤️❤️

बाकी सामो यांनी म्हटल्या प्रमाणे तू महत्त्वाकांक्षी वाटतेसच

लिही की. पण ते समपातळीवरचं कोणी मिळालं नाही तर त्याचं वाईट वाटणं हे त्या स्पिरिच्युअलिटीत कसं बसवायचं मग? तुझं प्रतल उंच आहे असं म्हटलंच आहे मी. शिखरावर गर्दी करायला जागा असते का? जातायेताना लोक भेटतात तेवढेच.

पण मला मी शिखरावर आहे याचीही खात्री नाही, रादर शिखर खूप दूर राहिले, कुठे आहोत हेच माहित नाही. यात उंच आणि खाली पण नसते खरेतर आणि कुणी समविचारी पण नाही. लिंबोवस्था! Happy

धन्यवाद ऋ आणि सामो Happy
महत्त्वाकांक्षी आणि कॉन्फिडंट आहे पण चाचपतही आहे बऱ्याच बाबतीत.

>>>>> काळाच्या पुढे जाणारं लेखन करायचे आहे पण आयुष्य मुभा देत नाही. आजूबाजूला वाचकही ते समजून घेणारी नाहीत. त्यामुळे तीच फ्रिक्वेन्सी मॅच करत लिहावे लागते.
लिखाण केलेच नाहीस मग तुला कसे कळले वाचक समजावुन घेत नाहीत ते?
.
मी माझ्या नवर्‍याशी मनातच भांडुन घेते. कारण आता ३० वर्षांनंतर मला त्याची प्रत्येक रिअ‍ॅक्शन, डायलॉग पाठ झालेला आहे. पण त्या नादात मी त्याचे पर्याय स्वातंत्र्य मारुन टाकते. कदाचित तो वेगळंही बोलला असता कदाचित त्याने माझे ऐ कलेही असते. पण मीच मनात दोन्ही भूमिका करुन भांडुन घेतले. Happy
.
तसं तू मनातच लिखाण ठरवतेस की करायचं आणि तूच ठरवतेस की वाचक समजावुन घेत नाहीत Happy

अस्मिता, Happy
किती छान भरभरून लिहितेस!
किती हुशार आहेस तू!!
तुझ्या सगळ्या स्वप्नांना पूर्ततेसाठी शुभेच्छा....

एकदम प्रांजळ! कोणाला काय वाटेल याचा विचार केला असेलच नक्कीच पण जे विचार आहेत ते तरीही लिहीले आहेत, असे वाटले.

Hope you get to do most of what's most satisfying!

वाचकांची फ्रिक्वेन्सी काय आहे याचा विचार न करता तुला जे आरस्पानी, उत्स्फुर्त लिहायचे आहे ते लिही. आणि त्याला मिळणार्‍या प्रतिसादाच्या बाबतीत you will be surprised. माबो वाचकांच्या प्रतिसादांचा एकूण स्तर त्या त्या वेळेस इथे असलेल्या लेखनानुसार उंचावतो किंवा खालावतो असे मी वीस वर्षांच्या निरीक्षणांवरून सांगतो.

फारेंड +१११११११
तुला जे लिहावं वाटतं ते लिही
आम्ही आहोत की वाचायला
समजो किंवा न समजो Happy

सुंदर.

लिही, नाही समजले तर नाही समजले.

छान लिहिलेय म्हणजे नेहमीच तुझं लिखान आवडतं. लिहीत राहा. तुझ्या सगळ्या स्वप्नांना पूर्ततेसाठी शुभेच्छा.

हे असं काही वाचलं की भयंकर कॉम्प्लेक्स येतो. मी हे समजण्याच्या लेव्हलवरच नाही. पण तू जे करायचंय, जगायचंय ते जग. आणि लिखाण कर. कुणाला ना कुणाला ते भिडेल आणि त्यांचं श्रेयस मिळेल.

माझेमन, तुझं वाचून मला लिहावं वाटलं नाहीतर माझं काही ठरलं नव्हतं. त्यामुळे प्लीज कॉम्प्लेक्स वगैरे नको. We (all) bring out the best in each other. Happy

थॅंक्यू कविन. Happy

मला कितपत समजलं ते माहित नाही. अ‍ॅबस्ट्रॅक्ट/ टँजिबल नसलेल्या गोष्टी नाही समजत मला चटकन. पण म्हणून वाचतच नाही असं करत नाही, तू लिहिलंस तर वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करेन. पण चीप एंटरटेनमेंट/ आळशी करमणुक आधी कंझ्युम करतो, विचार करायला आवडतो त्यामुळे ते ही आवडतेच.
तुला काय हवंय ते तुला मिळू दे, आणि मला कळू दे! Happy Wink

जो भाग समजला त्यात एक फु सल्ला. लायब्ररीत किंवा कम्युनिटी सेंटरमध्ये किंवा लोकल तिकडे काय ग्रुप असतील तिकडे मोफत ट्युटरिंगची जाहिरात करू शकतेस. मेंटरिंगही करता येईल. नर्मदेकाठची नाही तरी लोकल मुलांना कसा वेळ असेल तसं शिकवता येईल. हे मला ही अजुन जमलेले नाही. दोन्ही मुलांना गणित, विज्ञान, सोशल स्टडीज जे जमेल ते सगळं शिकवतो. तसंच ते आणखी इतर चार मुलांना शिकवता आलं तर करायची इच्छा आहे. माझा आनंद म्हणून अर्थात, त्यांना काही फायदा झाला तर तो बोनस.

अरे हां मला मराठी शिकवायची होती. इथेच , काही वर्षांनी त्याला कमिट करू शकते. Happy मला आवडतं शिकवायला, कॅनडात केले आहे काही वर्षं. लहान मुलांना तेही.

फा- अनवट वाटा जोखायच्या आहेत या अनुषंगाने होतं ते. Happy
रॉबर्ट फ्रॉस्ट यांची I took the one road less traveled by, and that has made all the difference.

लिही ग अस्मिता. हे लिहिलेले मला कळत नाहीये हे सुद्धा कळणेच आहे.
तसं कळल्यावर वाट वाकडी करून तुझ्याबरोबर चालून पाहू. कोणास ठाऊक तुला कळणारे कदाचित शिकवणारे जाईलही काही बोललं.
लिही तू आरस्पानी , मनस्वी आणि उत्स्फूर्त. आय अॅम वेटिंग
(बादवे माझी बहिण तुझ्यासारखी तुझ्याहूनही मॅड आहे. तिला हेच असेच वाटत असते.प)
आणि फारेंडशी पूर्ण सहमत

एकदम टडोपा वंदना. ह्यात काहीच आढ्यता नाही, फक्त कुणाला रसच नाही ही तगमग आहे, तुला कळली. त्यासाठीच होता ह्या लेखाचा प्रपंच. तुझी बहिण माझी बहिण झाली. Happy Soul sister.

अमा म्हणायच्या तसं फिकर नॉट! स्वान्तसुखाय लिहायचं. लिहीत रहा.
भरत म्हणतात तसं कुठे ना कुठे रूजलेलं असतंच ते येतंच कधी ना कधी वर उगवून.
जेवढं जमतं तेव्हढं करत रहायचं. कधी ना कधी, काही काही स्वप्न खरी होतात.

काळाच्या पुढे जाणारं लेखन करायचे आहे पण आयुष्य मुभा देत नाही. आजूबाजूला वाचकही ते समजून घेणारी नाहीत. त्यामुळे तीच फ्रिक्वेन्सी मॅच करत लिहावे लागते.>> लिहून तर बघ. समजून घेऊ.

मला कुसुमाग्रजांची एक कादंबरी आठवली. फार कुणी वाचली असेल असं वाटत नाही. "कल्पनेच्या तीरावर ".
दहा बारा वर्षांची होते मी तेव्हा. कल्पना भन्नाट वाटली होती.

फारच छान. यू आर रिअली अ चोझन वन . @ शर्मिला , कल्पनेच्या तीरावर मी पण वाचली आहे. भन्नाट होती.. त्या वयात विचित्र वाटलं होतं

आपले सर्वसाधारण विचार व्यक्त करायला बहुतेकांना जमतं, त्यापैकी फक्त काहीच जणांना त्याची सुसूत्र मांडणी करून कागदावर उतरवायला जमतं, त्यातल्या नगण्य लोकांना अगदी खोलवरच्या भावना - ज्यांना व्यक्त करायलाही अनेकांना शब्द सापडत नाहीत - त्या शब्दबद्ध करायला जमतं आणि त्यातलं क्वचित काही वाचकांना भावतं. तुझ्याकडे हा खूप मोठा ठेवा आहे. निदान तुझे काही लेख वाचताना ते जाणवतं आणि तिथल्या वाचकांच्या प्रतिक्रियाही ह्याला पुष्टी देतात.

हा उपक्रम एका अर्थाने मजेशीर आहे. लोकांचे करायचे राहून गेलेल्या गोष्टी वाचताना अनेकदा आपल्याला वाटतं की ते अजूनही ह्या गोष्टी करू शकतील की, का नाही! तश्या अर्थाच्या प्रतिक्रिय मी पण लिहिल्या आहेत. पण तुझा लेख वाचताना थोडं लक्षात की आपल्याला लेखकाचं वैयक्तिक आयुष्य माहीत नाहीये; त्यातल्या मर्यादा, दैनंदिन लढाया, मानसिक बैठकीतले बदल, बदललेली प्राधान्ये या सर्वाच्या पार्श्वभूमीवर त्या गोष्टी राहून गेल्या आहेत आणि ते समजून घेण्यासारखं आहे. मग मी आधी वाचलेल्या इतरांच्या लेखांनाही ते लागू होईल.

असो. सल्ला देण्याची माझी पात्रता नाही. तुला ज्या गोष्टी अजूनही कराव्याश्या वाटतात, त्या तुला करायला मिळोत, इष्ट आणि श्रेयस ते लाभो या शुभेच्छा.

रादर मल्टिपल पर्सनॅलिटी आहेत त्या बाहेर काढायच्या आहे. हे एकच माणूस आहे असे वाटलेच नाही पाहिजे इतकं वैविध्य द्यायचं आहे.>>> एव्हढण्च समजलं. एक एक पर्सनॅलिटी साठी एक एक आयडी मागून घ्यायचा.

दुसरं ते एक इंग्लीश वाक्य समजलं.

उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी - भवभूति

हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है
बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा
- अल्लामा इक्बाल

Pages