
शीर्षकात माझ्या गौराई लिहिलं आहे. गौराई, आमच्याकडे विदर्भात महालक्ष्म्या म्हणतात. ध्यानीमनी नसताना अंगावर आलेली जबाबदारी. जबाबदारी म्हणू की आशीर्वाद? त्यांचे त्यांनाच ठाऊक.
खरं तर, या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली ती एका अनपेक्षित हस्तांतरणाने. माझ्या सासऱ्यांनी, पप्पाजींनी, २०१७ साली महालक्ष्मी पूजेची धुरा माझ्या हातात दिली. मी त्या घरची धाकटी सून. परजातीय, त्यात शहरी वातावरणात वाढलेली, नोकरीच्या व्यापात गुरफटलेली. त्या काळात मी ISRO च्या महाराष्ट्र रिजनल सेन्टर मध्ये काम करत होते आणि माझी मुलगी वयाची अवघी आठ महिन्यांची.
सासरचं हे मोठं, जुनं घर माझ्यासाठी अपरिचित नव्हतं. पण त्याच्या परंपरा, गावातली रीतभात, आणि कुटुंबापुरती मर्यादित होणारी महालक्ष्मी पूजा... हा माझ्या रोजच्या जगण्याचा भाग नव्हता. आणि पप्पाजींनी एक दिवस माझ्या शेजारी बसून या तीन दिवसांच्या सोहळ्याची सगळी माहिती सांगायला सुरुवात केली. तेव्हा अजिबात कल्पना नव्हती, की ते फक्त कुलाचार शिकवत नाहीत. तर ते एक परंपरा सोपवत आहेत. आणि त्याहूनही विलक्षण म्हणजे, पुढच्या वर्षी हीच परंपरा माझ्या हातात कायमची येईल, याचीही तेव्हा कल्पना नव्हती किंवा एक दिवस हा घरगुती सोहळा अक्ख्या गावाचा उत्सव बनेल असे देखील कधी वाटले नव्हते.
माझं सासर, महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं एक गाव. अगदी लहान पण नाही आणि तालुका म्हणावं इतका मोठंही नाही. अमरावती जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं. चिखलदरा / सेमाडोह इथून तासाभराच्या अंतरावर. मराठीपेक्षा हिंदी भाषिकांचा प्रभाव जास्त. अत्यंत निसर्गसंपन्न. स्वच्छ पाण्याच्या नद्या, लहान मोठे मिळून नऊ जलाशय आणि गावाला लागूनच रिझर्व्ह फॉरेस्ट.
या गावातल्या या घरातल्या एका परंपरेची धुरा माझ्या हातात देताना पप्पाजींनी मला नेमकं काय दिलं होतं, याची तेव्हा कल्पना नव्हती.
२०१७ मध्ये पहिल्यांदा ही जबाबदारी आम्हा नवराबायकोवर आली तेव्हा मनातला पहिला प्रश्न होता, "हे सगळं कसं काय सांभाळणार?"
पण त्या वर्षी सगळं अगदी सुरळीत पार पडलं. कारण खरं तर सगळं पप्पाजींनीच आखून दिलं होतं आणि ते प्रत्येक क्षणी आमच्यासोबत होते. त्यांनी केवळ पूजा कशी करायची ते सांगितलं नाही. या तीन दिवसांच्या संपूर्ण सोहळ्याची रचना आमच्यासमोर उलगडून ठेवली. पहिला दिवस आवाहनाचा. गौराईंना सन्मानाने घरी आणण्याचा. दुसऱ्या दिवशी हवन आणि महालक्ष्मी पूजन. त्यानंतरचा महाप्रसाद हा तर या उत्सवाचा मोठा भाग. परिवाराच्या प्रत्येक घरातून किमान एका व्यक्तीने या प्रसादाला उपस्थित राहायचं. आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन.
प्रत्येक विधीची माहिती त्यांनी आम्हाला दिली. कोणता विधी कधी, कोणत्या क्रमाने, कोणत्या पद्धतीने करायचा, याची यादी हातात दिली. घराच्या पुरोहितांबरोबर जुजबी ओळख होतीच. ८२ वर्षीय तरुण, हनुमान महाराज मिश्रा, उर्फ मिश्राजी! "महाराजजी, इस साल से ये दोनों बनेंगे यजमान," पप्पाजींनी त्यांची आमच्याशी ओळख करून देताना सांगितलं होतं. महत्त्वाच्या निमंत्रितांची यादी दिली. कोणाची कधी गरज पडू शकते, कोणती गोष्ट कुठे मिळेल, या सगळ्याची माहितीही त्यांनी आम्हाला करून दिली. त्या वेळी मला हे सगळं अगदी स्वाभाविक वाटत होतं. पप्पाजींची पद्धतच तशी होती. एखादी जबाबदारी द्यायची, तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण ज्ञानही द्यायचं.
आमच्या या महालक्ष्मींचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आमच्याकडे लक्ष्मी केवळ धातूच्या किंवा मातीच्या मूर्तीच्या रूपात नाही, तर धान्यरूपात आहे. गहू आणि ज्वारीची रास हीच आमच्या महालक्ष्मींची मुख्य रूपं मानली जातात. समृद्धीचं, अन्नाचं आणि भूमीच्या सर्जनशक्तीचं साधं आणि सुंदर रूप. त्यामुळे आमच्या पूजेतल्या गौराई म्हणजे केवळ सजवलेल्या मूर्ती नव्हेत. त्यांच्या मुळाशी आहे धान्य. घर भरून ठेवणारी, वर्षभराचा उदरनिर्वाह करणारी लक्ष्मी.
पुढच्या वर्षीच्या महालक्ष्मी पूजेला अजून दीड महिना बाकी असताना पप्पाजी आम्हाला सोडून गेले. अचानक. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने. त्यांच्या जाण्यानंतर २०१७ मधला प्रत्येक प्रसंग पुन्हा आठवू लागला. त्यांनी प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने का समजावून सांगितली होती? मुख्य पुरोहितांशी माझी ओळख का करून दिली होती? विधींची यादी, निमंत्रितांची यादी, तीन दिवसांचा सगळा क्रम... त्यांनी जणू काहीच बाकी ठेवले नव्हते. आज मागे वळून पाहताना एक विचार मनात वारंवार येतो — त्यांना इतकी घाई का झाली होती?
पुढच्या वर्षी महालक्ष्मी आल्या. पण त्यांचं स्वागत करायला पप्पाजी नव्हते. घरातला शोक अजून ताजा होता. त्यामुळे त्या वर्षी पूर्वीसारखा मोठा सोहळा करण्याची ना परिस्थिती होती, ना कोणाची मानसिक तयारी. माझ्या सासूबाई पुण्यातच मोठ्या मुलाकडे राहत होत्या. बाकीच्यांच्याही मनात संकोच होता. मलाही जाणवत होतं की यावेळी सगळं नेहमीसारखं होणार नाही. पण पूजा थांबवायची नाही, एवढं मात्र ठरवलं होतं.
म्हणून त्या वर्षी महालक्ष्मीपूजा आमच्या पुण्याच्या घरीच, अगदी मोजक्या स्वरूपात करण्याचं ठरवलं. कोण येईल, कोण येणार नाही, याचा विचार न करता आवश्यक ते विधी करायचे. मोठा सोहळा नाही, महाप्रसाद नाही, गाव नाही. पण गौराईंचं आगमन मात्र व्हायलाच हवं.
अर्थात, गावाकडच्या पूजेची सगळी रूपं पुण्याच्या घरात आणणं शक्य नव्हतं. नदीकाठी जाऊन आवाहन करणं, पंचमहाभूतांचं प्रतीक म्हणून पाच दगड आणणं, त्यांची मिरवणूक काढत गौराईंना घरी आणणं... हे सगळं त्या वर्षी शक्य नव्हतं.
मग मी माझ्या देवघरातल्या महालक्ष्मीच्या आणि भवानीच्या मूर्ती बाहेर काढल्या. त्या वर्षी माझ्यासाठी त्याच गौराई झाल्या. धान्याच्या राशी मांडल्या. नवरा माझ्या सोबत उभा राहिला. आम्ही दोघांनी मिळून सगळी तयारी केली. नेहमीच्या मोठ्या व्यवस्थेऐवजी घरच्या घरी जे शक्य होतं ते केलं. पुरोहितही नव्हते. पण मला त्याची फारशी चिंता वाटली नाही. संस्कृतचा अभ्यास असल्यामुळे विधी आणि मंत्र मला परिचित होतेच.
आणि मग महाप्रसादाचा प्रश्न आला. नेहमी कुटुंबातील एखाद्या दांपत्याला लक्ष्मी-नारायण मानून मानाचा प्रसाद देण्याची पद्धत होती. पण त्या वर्षी काहीतरी वेगळं करावंसं वाटलं.
आमच्या पुण्याच्या घराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारा नेपाळी चौकीदार आणि त्याची पत्नी. घरातली कितीतरी कामं सहजपणे करून देणारे, कायम मदतीला धावून येणारे. त्याची पत्नी माझ्या घरी कामालाही यायची. त्यांना त्यांच्या दोन छोट्या मुलींसह त्या वर्षी पूजेच्या मानाचे पाहुणे म्हणून बोलावलं. त्यांना नवीन कपडे दिले. कपाळी कुंकवाचा टिळा लावला. आणि सगळ्या पाहुण्यांमध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं.
सुरुवातीला त्यांना थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा संकोच स्पष्ट दिसत होता. कदाचित अशा मानाच्या जागी बसण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असावी. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र अगदी स्पष्ट होता. त्यांच्या दोन मुली... एक पाच वर्षांची आणि दुसरी तीन वर्षांची. नव्या कपड्यांत त्या दोघी इतक्या गोड दिसत होत्या की माझ्या मनात सहज आलं, याच ज्येष्ठा गौराई आणि कनिष्ठा गौराई.
त्या वर्षीचा प्रसादही अगदी साधा होता. घरचा स्वयंपाक. शेजारच्या भाभीची मदत. साधारण वीस माणसं. मोठेपणा काहीच नव्हता. मात्र पप्पाजींनी आमच्या हातात दिलेली ज्योत मात्र विझली नव्हती.
त्यानंतर मात्र प्रत्येक वर्षी महालक्ष्मी त्यांच्या माहेरच्या घरातच म्हणजे गावच्या घरीच येत आहेत.
नेमका हा सोहळा आहे तरी कसा?
आमच्या गौराईंचं स्वरूप
मूळचं शेतकरी कुटुंब असल्यामुळे आमच्या गौराई म्हणजे धान्यलक्ष्मी. सव्वा माप गहू आणि सव्वा माप ज्वारी यांच्या राशी मांडायच्या. २०२१ साली गावच्या घराचं नूतनीकरण आणि एक्स्टेंशन झालं. घर नव्याने सजलं आणि त्याच निमित्ताने एक विचार पुढे आला, "आता महालक्ष्मी पूजनासाठी मुखवटे आणूया."
त्यानंतरपासून धान्याच्या राशींवर मुखवटे स्थानापन्न होऊ लागले. पण मुखवटे आले म्हणून गौराईंचं मूळ स्वरूप बदललं नाही. मूळाशी आजही तीच धान्यलक्ष्मी आहे.
आणि या महालक्ष्मींचा मुख्य प्रसाद म्हणजे आंबील. इतका मुख्य की तिकडे निमंत्रण देतानासुद्धा "महाप्रसादाला या" असं म्हणत नाहीत. "आंबील घ्यायला या." एवढंच म्हणतात. आंबील म्हणजे जणू या संपूर्ण सोहळ्याचीच ओळख.
त्याची तयारीही आदल्या दिवसापासून सुरू होते. आवाहनाच्या आदल्या दिवशी ज्वारी भिजत घालायची. दिवसभर भिजल्यावर ती सुती साडी किंवा धोतरावर पसरून ठेवायची. ज्वारी पूर्ण वाळलेली नसते, थोडी ओलसर असतानाच ती जात्यावर दळायला घ्यायची. त्यातून कण्या पाडायच्या.
पूर्वी हे काम पप्पाजी स्वतः करायचे. माझ्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी हे काम माझ्या वाट्याला आलं आणि पहिल्यांदा जात्यावर ज्वारी दळताना अक्षरशः हात भरून आले. जातं फिरवणं दिसतं तितकं सोपं नसतं, हे त्या दिवशी चांगलंच कळलं. आता मात्र थोडी युक्ती केली आहे. नावाला एक-दोन वाट्या कण्या जात्यावर भरडते आणि बाकीची ज्वारी मिक्सरवर वाटते. परंपरा टिकवायची, पण हातही टिकवायचे!
एकीकडे महालक्ष्मींच्या स्थापनेसाठी आरास सजवण्याचं काम सुरू असतं. फुले, माळा, पडदे, लाईटिंग... सगळं वापरून जागा सजवली जाते. रात्री उशिरापर्यंत ही लगबग सुरू असते.
पहिला दिवस : आवाहन
मध्य प्रदेश - महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहणारी चुडामणी नदी. अतिशय स्वच्छ, निर्मळ इतकी की इथले लोक या नदीला दुधाची धारा पण म्हणतात. पहिल्या दिवशी या नदीकाठी जाऊन पाच खडे आणायचे. कोणी त्यांना पंचमहाभूतांचं प्रतीक मानतं, तर कोणी लक्ष्मीपंचायतनाचं.
पण खडे उचलण्याआधी नदीची पूजा करायची. तिची परवानगी घेऊनच तिच्या पात्रातून ते पाच खडे उचलायचे. मग त्यांना रीतसर निमंत्रण द्यायचं आणि सन्मानाने घरी आणायचं.
पूर्वी हा सगळा सोहळा आमच्या घरापुरताच मर्यादित होता. आता मात्र गावातल्या बऱ्याच बायका आणि मुली यासाठी माझ्यासोबत नदीवर येऊ लागल्या आहेत. धाकटी चुलत जाऊ कायम सोबत असतेच. बाकी शेजारणी अगदी दोन दिवस आधीपासून फोन करून, "आमच्यासाठी गाडीत जागा ठेवायची हं," असं सांगतात. काहीजणी तर स्वागतासाठी आधीच घरी येऊन थांबलेल्या असतात.
नदीवरून घरी आणलेले हे पाच खडे लगेच स्थापनेच्या जागी ठेवले जात नाहीत. घराच्या अंगणात त्यांचं आगमन झाल्यावर ते स्थापनेपर्यंत तुळशीवृंदावनात विसाव्याला ठेवले जातात.
सायंकाळी स्थापना व्हायची असते आणि त्याआधी घरातली कितीतरी कामं उरकायची असतात. कुणी आरास पूर्ण करत असतं, कुणी पूजेची तयारी करत असतं. घरात माणसं वाढत जातात, कामांची यादी कमी होत जाते... मुखवटे बाहेर काढले जातात. त्यांचे दागिने वगैरे सगळं व्यवस्थित रचून ठेवण्यात येतं. स्वागताची तयारी सुरू होते. फुलोरा मांडला जातो. पूर्वी फुलोरा त्या टिपिकल मांडणीवर टांगला जात असे पण मी हे बदलून समोर ताटातच मांडून ठेवते. चांदीच्या समया स्वच्छ उजळून तेलवाती भरून तयार ठेवल्या जातात.
स्वयंपाकघरात लगबग सुरू असते. आजचा खास मान अंबाडीच्या भाजीचा. ती कोणीतरी शेतातून ताजी ताजी आणून दिलेली असतेच. आजकाल हे काम पण गावातल्या / शेजारच्या बायकांनीही आपल्याकडे घेतलं आहे. "मैं इस साल अंबाडी शाक दूंगी हा.. ! तुम अरबी के पत्ते देना" अशी आपापसात आधीच ठरवा-ठरवी झालेली असते. आणि शेवटी सगळ्यांच्या नजरा घड्याळाकडे. कारण आता गौराईंना घरात स्थानापन्न करण्याची वेळ जवळ आलेली असते.
सायंकाळी गोरज मुहूर्तावर गौराई उंबरठ्याच्या आत येणार असतात. मोठ्या वाड्यातल्या काकू खास मुखवटे बसवायला येतात. मुखवटे एका मोठ्या पितळेच्या परातीत सजवून ठेवले जातात. दुसऱ्या परातीत कुंकवाचं पाणी तयार असतं. आता मी त्यासाठी अलताही वापरते.
पितळेच्या परातीतले मुखवटे चेहरा झाकून वृंदावनापर्यंत नेले जातात. नदीवरून आणलेले ते पाच खडे त्यांच्या शेजारी ठेवले जातात. मग मुखवट्यांवरचं वस्त्र अलगद काढलं जातं.
यजमान, म्हणजे मी आणि नवरा, गौराईंना घेऊन उंबरठ्यापाशी येतो.
आणि मग सुरू होतं गौराईंचं स्वागत.
बायका औक्षणाची ताटं घेऊन उंबरठ्यावर उभ्या असतात. दिवसेंदिवस या स्वागतासाठी येणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढतच चालली आहे.
सासूबाईंपासून स्वयंपाक करणाऱ्या मावशींपर्यंत, घरातल्या ओळखीच्या बायकांपासून रोजंदारीवर कामाला येणाऱ्या बायकांपर्यंत... सगळ्यांच्या हातात औक्षणाचं ताट असतं. कुणी घरचं, कुणी शेजारचं, कुणी रोजच्या कामाच्या निमित्ताने या घरात येणारं. पण त्या क्षणी सगळ्यांची भूमिका एकच.
गौराईंचं स्वागत करणाऱ्या घरच्या बायका
औक्षण आटोपलं की माझी लेक त्या अलत्याच्या परातीत पाय बुडवते आणि घरात तिच्या छोट्या छोट्या पावलांचे कुंकवाचे ठसे उमटवत आत प्रवेश करते. तिच्या मागोमाग आम्ही दोघे मुखवटे घेऊन घरभर फिरतो.
"गौरी, गौरी, घर बघ..."
घरातली प्रत्येक जागा त्यांना दाखवत पुढे जायचं. ज्या घरात त्या पुढचे तीन दिवस राहणार आहेत, ते घर जणू पहिल्यांदाच त्यांना दाखवलं जातं.
आणि मग गौराईंना स्थापनेच्या मंडपात आणलं जातं.
गहू आणि ज्वारीच्या राशी मांडल्या जातात. त्या धान्यलक्ष्मीच्या राशींवर मुखवटे स्थानापन्न होतात.
अशा प्रकारे नदीकाठी निमंत्रण देऊन आणलेल्या त्या पाच खड्यांपासून, उंबरठ्यावरच्या औक्षणापर्यंत आणि घरभर उमटलेल्या छोट्या पावलांपासून, शेवटी धान्याच्या राशींवर गौराईंचं स्थानापन्न होणं पूर्ण होतं.
गौराई घरात येतात. आणि मग सुरू होतो त्यांचा तीन दिवसांचा मुक्काम
साडी नेसवली जाते, ओटी भरली जाते, अलंकार चढवले जातात. आणि मग सुरू होतं गौराईंचं खरंखुरं शृंगारकाम.
समोर उभ्या असलेल्या बायका सूचना देण्याचं काम अगदी चोख पार पाडत असतात.
"वाहिनी, थोडं उजवीकडे..."
"नाही नाही, जरा समोर..."
"ती नथ बघा, जरा तिरकी झाली वाटते का?"
"अरे बहू, वो गजरा सही से लगाव तो... इत्र भी लगाना हाँ!"
कुणाला पदराची घडी नीट हवी असते, कुणाला हार जरा वर हवा असतो, तर कुणाला नथ सरळ दिसत नाही तोपर्यंत चैन पडत नाही.
गौराईंसमोर दोन दोडके ठेवले जातात. नारळ, काकड्या आणि कणीस दोघींनाही अर्पण केलं जातं. त्यांच्या डोक्यावर आघाडा, केना आणि दुर्वांची जुडी वाहिली जाते.
आणि मग एक नाजूक पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो...
यांच्यात ज्येष्ठा कोण आणि कनिष्ठा कोण?
त्यावर अर्थातच एकमत होणं काही सोपं नसतं. प्रत्येकाकडे आपापला तर्क, आपापली माहिती आणि आपापली खात्री असते. थोडी चर्चा होते, थोडे मतभेद होतात. शेवटी सासूबाईंचा आवाज जरा चढतो,
"आरती करायला घ्या आता!"
आणि मग सगळ्यांना आठवतं की गौराईंचं स्वागत करायचं आहे, आता आरतीची वेळ झाली आहे.
आरतीनंतर लगेच जेवणाची लगबग. अंबाडीची भाजी आणि साधं, घरगुती जेवण.
जेवण आटोपलं की रात्रीच्या जागरणाची तयारी सुरू होते. डायका / डाहाका आणि जागरण हा गौराईंच्या पहिल्या दिवसाचा पुढचा भाग. माझे चुलत सासरे, डायका गायचे. त्यांच्या इच्छेनुसार देवीच्या जागरणाची डायका पद्धत सुरू केली. मुखवटे आणल्यावर पहिल्या वर्षी काकांनी स्वतः पहिलं नमन गाऊन पायंडा पाडून दिला. गावातली डायका, म्हणजे गोंधळ घालणारी मंडळी, रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास येऊ लागतात आणि सुरू होतो देवीचा जागर.
कधी कधी दोन-तीन डायका पार्ट्या आलेल्या असतात. मग त्यांची आपापसातली चुरस रंगते आणि रात्रही रंगत जाते. मध्ये चहा-पोह्यांचा छोटासा ब्रेक आणि पुन्हा जागरण. शेवटी रात्री एक-दीडच्या सुमारास उपरणं आणि दक्षिणा देऊन त्यांची बोळवण होते.
दुसरा दिवस मुख्य पूजेचा.
सकाळपासून पुन्हा लगबग. नऊ वाजता स्वयंपाकाच्या बायका हजर. बाहेर भलीमोठी चूल मांडली जाते. घरच्या बाईच्या हातून चुलीला हळदीकुंकू वाहून अग्नी प्रज्वलित होतो आणि मुख्य स्वयंपाकिणीची दक्षिणा होते.
बारा वाजताच्या सुमारास मिश्राजी सपत्नीक येतात. आता नव्वदीच्या आसपास पोहोचले आहेत. पण आपला तो '८२ वर्षीय तरुण' अजून तसाच आहे! त्यांच्या हस्ते महापूजा होते. मी आणि नवरा एकीकडे यजमान म्हणून पूजेत व्यस्त असताना माझे मोठे दीर आणि धाकटा चुलत दीर सायंकाळच्या महाप्रसादासाठीची सर्व व्यवस्था बघत असतात. आत आंबील शिजत असते. सोळा भाज्यांचा नैवेद्य, अळूवड्या आणि इतर मानाचे पदार्थ तयार होत असतात.
पूजा, आरती झाल्यावर नैवेद्याची लगबग. पाट, रांगोळी, केळीचं पान, वाढलेलं ताट. देवीला जेवायला येण्याची विनंती केली जाते. ताटाभोवती पाणी सारलं जातं.
आणि मग सगळे बाहेर. कारण 'घरात लक्ष्मी जेवतेय!'
दरवाजे बंद. बाहेर ओट्यावर, अंगणात मात्र खुर्च्या टाकून सगळे हळू आवाजात गप्पा मारत बसतात. गेल्या वर्षी काय झालं, यावर्षी काय कमी पडलं, कोणाला देवीची कशी प्रचिती आली... अशा चर्चा रंगत जातात. अर्ध्या तासानंतर आधी दारावर थाप देऊनच मग दरवाजा उघडला जातो. पानावर दहीसाखर आणि विडा ठेवला जातो. मग बायका पानाभोवती गोळा होतात. उगीचच आपली उत्सुकता...
"जेऊन गेलीय का देवी?"
कुणाला भाजीमध्ये बोटांचे ठसे दिसतात, तर कुणी म्हणतं, "गुलाबजामून पे तो दाँत के निशान हैं, देखो!"
आणि मग प्रत्येक जण अगदी हिरीरीने आपापली निरीक्षणं सांगत राहतो. खरं तर कोणालाच काही सिद्ध करायचं नसतं. सहज आपली गंमत. पण त्या काही मिनिटांत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघण्यासारखा असतो.
यानंतर थोडी विश्रांती. पण रात्री पुन्हा गाव जेवायला येतं. महाप्रसाद.
पूर्वी ५०-६० लोक यायचे, तेव्हा घरच्या बायकाच डोक्यावर पदर-बिदर घेऊन वाढायला बसायच्या. आता ती पद्धत मी बंद केली आहे. दोन-तीनशे लोकांसाठी अंगणात व्यवस्था असते, वाढपी असतात. रात्री साडेदहा वाजेपर्यंत दर्शन आणि प्रसादासाठी माणसं येतच राहतात.
कोणी ओटी भरतं, कोणी नवस बोलतं, तर कोणी मागच्या वर्षी बोललेला नवस फेडायला येतं. आणि दरवेळी कुणी ना कुणी अगदी आवर्जून सांगतं,
"तुम्हारे घर की लक्ष्मीजी जागृत है बहू... जो मांगो, वो मिल जाता है!" मी हसते. काय बोलणार? पण हे वाक्य दरवर्षी पुन्हा ऐकायला मिळतं, हे मात्र खरं.
तिसरा दिवस निरोपाचा.
कुंकुमार्चनाने सुरुवात होते. चांदीची लक्ष्मीची प्रतिमा तबकात घेऊन, अष्टलक्ष्मी स्तोत्राचे आठ आवर्तन करत कुंकुमार्चन केलं जातं. त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो.
आवाहनाच्या वेळी गौराईंना अर्पण केलेल्या काकड्या, कणीस, नारळ आणि दोडक्याचीच भाजी नैवेद्याला असते. मग आरती होते आणि मग मुखवटे किंचित हलवून गौराईंना निरोप दिला जातो.
नदीवरून आणलेले ते पाच खडेही आता आपल्या निजस्थानी परत जायला निघतात. जिथून त्यांना आणलं होतं, तिथेच पुन्हा नेऊन हळदीकुंकू वाहिलं जातं. "पुनरागमनाय च" म्हणत ते पुन्हा नदीच्या प्रवाहात सोडले जातात.
गौराईंना निरोप देऊन घरी परतल्यावर मात्र घर भरलेलं असूनही काहीतरी रिकामं रिकामं वाटत राहतं. तीन दिवसांचा तो गजबजलेला सोहळा अचानक संपलेला असतो.
आणि या सगळ्याच्या पलीकडे, या तीन दिवसांत घडणाऱ्या काही गोष्टी अशा असतात, ज्या शब्दांत सांगता येत नाहीत. माझ्या वाट्याला आलेले काही अनुभव स्वतःपुरते जपून ठेवले आहेत. इतरांनाही त्यांची त्यांची प्रचिती येते. कुणी ती सांगतं, कुणी मनातच ठेवतं. प्रत्येकाची गौराईशी जोडलेली नाळ वेगळी, तिच्याशी बोलण्याची पद्धत वेगळी.
कदाचित देवत्वाचंही हेच वैशिष्ट्य असावं. एकच देवी, पण प्रत्येकासाठी तिचं रूप वेगळं.
माझ्यासाठी मात्र एवढं नक्की आहे की पप्पाजींनी हातात दिलेली ही केवळ पूजा नव्हती. ती घराशी, मातीशी, धान्याशी, नदीशी आणि माणसांशी जोडणारी एक परंपरा होती.
दरवर्षी गौराई येतात. तीन दिवस घर भरून जातं. आणि मग त्या परत जातात. मागे राहते ती पुढच्या वर्षीची वाट पाहणारी एक ओढ.
जबाबदारी म्हणू की आशीर्वाद? त्यांचे त्यांनाच ठाऊक.
पण माझ्या गौराई दरवर्षी येतात. आणि एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे
किती सुंदर लिहिलं आहे.
किती सुंदर लिहिलं आहे.
त्यातून पूर्वी फारसा अनुभव नसताना तुम्ही हे आत्मसात केलंत याबद्दल विशेष कौतुक
ह्या वर्षीचा सर्वात सुंदर लेख
ह्या वर्षीचा सर्वात सुंदर लेख!!!
किती सुंदर रीतीने परंपरा
किती सुंदर रीतीने परंपरा सांभाळताय तुम्ही....
ज्वारीची आंबील मला खूप आवडते. वर्षातून एकदा तरी करतेच.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
सुंदर झालाय लेख
सुंदर झालाय लेख
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख एकदम जिवंत आणि सुंदर
लेख एकदम जिवंत आणि सुंदर झालाय.हे सर्व करणं, हा वसा आयुष्यभर जपणं मोठी गोष्ट आहे.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
गौरी खूप सुंदर, मनमोहक आहेत
गौरी खूप सुंदर, मनमोहक आहेत लिखाणही खूप सुंदर चित्रदर्शी!
गौरी खूप सुंदर, मनमोहक आहेत
डपो
सुंदर लेख आणि तितकेच सुंदर
सुंदर लेख आणि तितकेच सुंदर गौराईंचे रूप!