गेले करायचे राहून

Submitted by mrsbarve on 25 September, 2026 - 00:51

गेले करायचे राहून ऐवजी गेले करायचे राहून - अजून पर्यंत तरी ! असा काही तरी विषय हवा होता कारण नाहीतर , उगीच म्हातारं झाल्यासारखंच वाटतं .
किंव्हा कुढत बसल्यासारखं वाटतं बुवा. आणि आपल्याला जे ऍक्चुअली हवे असतें ते मिळवण्यासाठी आपण वेळ काढतोच आणि कष्ट घेऊन करतोच.असं मला नेहमी वाटतं .
पण कधी कधी कष्टाची तयारी असून किंवा वेळ देऊन हि एखादी गोष्ट करणे साध्य करणे जमत नाही मी म्हंटले तसे अजून पर्यंत तरी - ते म्हणजे छान गाणं म्हणायला शिकणे!

एरवी लहानपणी वाचनाचीच एव्हढी प्रचंड आवड होती कि गाणं शिकावं वगैरे डोक्यात आलं नाही. थोडी फार गाणी ऐकायला मिळायची .रेडिओ , टी .व्ही. वर ची गाणी कानावर पडत होती .पण क्वचित स्वतःशी गुणगुणण्या इतपतच प्रगती होती .

लग्न झाल्यावर आल्यावर लक्षात आलं कि नवऱ्याला माझयापेक्षा नक्कीच जास्त गाण्यात गती आहे. चुकीचं गायलेलं त्याला कळतंच पण मग तेच गाणं त्याच्याही नकळत तो गुणगुणायचा ते छान लयीत, तालात आणि चांगल्या आवाजात ! मला ऐकायला मिळायचं जे मी काही वेळा पूर्वी गायचा प्रयत्न केलेला असायचा . आणि मी वरमून जाई.
कधी कघी मी मोठ्या आवाजात अगदी मन लावून गुणगुणत असले कि मुले आणि नवरा पुरेपुरे हुं म्हणायचे.कुचके!

असं म्हंटलं तर काय अवघड आहे शिकायला गाणं ? एक बऱ्यापैकी संगीत शिक्षक आणि रोज थोडा सराव. बरोबर? म्हणजे मला तसं वाटलं होतं!

एकदा ठरवले कि खरेच ,शिकूया नीट आता गाणं, मग भारतातून एक बाई ऑन लाइन शिकवू लागल्या .पहिले गाणे होते ओंकार स्वरूप रूप गणेशाचे , मी ते गाणे एका वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहून वगरे काढले .पण मग सुरु झाली कसरत ,काही केल्या जमेना. सुरुवातीला वाटले सोप्पंय कि , पण दुर्दैवाने गाणे शिकताना एक कान तयार पाहिजे तोच नव्हता. टीचर ना भरपूर पेशन्स होता तो हळूहळू विरत जाताना मला दिसत होता. त्या म्हणाल्या “ तुम्ही लहानपणी कधी गाणी नीट ऐकली नाहीयेत का?
मी सराव वगैरे सुरु केला , आणि जीव तोडून अगदी दात ओठ खाऊन त्या गाण्यातले आलाप try केले . पण ते आणखीच पथेटिक होत होतं . मुळात आडात नाही तर … असो.मला गाण्याचे शब्द खूप आवडतात पण गाणं म्हणायला बिलकुल जमत नाही हेच खरे.पुढे काहीच प्रगती ना झाल्याने क्लास बंद झाला आणि मी गाणं शिकायच्या माझ्या टूम ला राम राम ठोकला.
असो म्हणून मी गुणगुणायची थांबले नाहीय .मला हव्या तशा चालीत आणि सुरात ही . शेवटी काय आपलं आयुष्य सुद्धा एक गाणं आहे आणि मी ते मला हव्या त्या चालीत गुणगुणत पुढे चालत आहे !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा मी बहुतेक नवती दहावीत वगैरे असेन,
(तुमच्याच कॅटेगरीत) काहीतरी गाणं गुणगुणत होते.
शेजारी उभ्या असलेल्या बाबांनी ऐकलं .

त्यांना अचानक मोठा धक्का बसला..
अरे हिला थोड तरी सुरांच ज्ञान द्यायला हवं होत..
पालक म्हणून आपण चुकलो का.
आता काय करता येईल .. काही फिक्स मिळेल का
वगैरे हजारो प्रश्न त्यांच्या चेहर्या वर स्पष्ट दिसत होते.

शेवटचा पराग्राफ त्या आयुष्यावर बोलू काही फॉरवर्ड धाग्यात सुद्धा चालेल Happy

पण बाकी खरे आहे, चांगला गळा असणे हे गॉड गिफ्ट आहे. सगळ्यांचाच कसा असेल. पण जसाही आपला आवाज सूर ताल असेल, त्याने न लाजता गाणे जमायला हवे.

छान लिहिलंय.
मलाही हे रिलेट झालं. म्हणजे आपल्याला गाता आलं पाहिजे असं वाटायचं. मग संधी कुठे तर पिकनिकला भेंड्या खेळताना आमच्या ऑफिसचा लहानसा ग्रुप ट्रेनने पिकनिकला चालला होता आणि आम्ही भेंड्या खेळत होतो. तेव्हा मला किती गाणी माहीत आहेत, चटकन आठवताहेत म्हणून दुसरे प्रवासी माझ्याकडे हसर्‍या चेहर्‍याने = कौतुकाने पाहताहेत असं मला वाटलं.

ट्रिप नंतर काही दिवसांनी एका सहकार्‍याने माझ्या गाण्यावर जोक केला. की हर्षद मेहता तुरुंगात काही केल्या आपले गुन्हे कबूल करायला तयार होईना. तेव्हा भरतला तिथे गायला पाठवलं आणि त्याने सगळे केलेले, न केलेले असे सगळे गुन्हे कबूल करून टाकले.

Lol

लता, रफी इत्यादींचे गळे म्हणजे दैवी देणगी असं उगाच का म्हणतात?

आईशप्पथ!!!!
हेच सगळं मी लिहिणार होते आज....

आता गेले लिहायचे राहून.... ही एकच ओळ पुरे माझी....

मस्त लिहिलंय....!

काही दिवस मुलाला गाणं शिकायला आणि पेटी वाजवायला एका शिक्षकेकडे घेऊन जात होते. छान शिकवायच्या त्या.. सांगायच्या ' श्रेया घोषाल' राजस्थान मध्ये ज्या गुरुजींकडे संगीत शिकली तिथेच मी पण शिकले.. ते खरंच होतं.

म्हणायच्या , रुपाली तू पण शिक, बघ हि पुस्तक, वह्या बघ.. ! मी वह्या उघडून पाहून पटकन बंद केल्या.. आपलं काम नाही ते..!

धागा आणि प्रतिसाद खूप पोहोचले/रिलेट झाले Happy कोणतं/कोणत्या प्रकारचं गाणं त्यावरही खूप अवलंबून आहे. मला नाही वाटत 'ओंकार प्रधान रूप गणेशाचे' अशी गाणी सुरवातीलाच शिकवणे योग्य आहे. हे म्हणजे पोहायला शिकायला आलेल्याला उचलून थेट नदीत टाकल्यासारखं झालं. जुन्या काळात असेच पोहायला शिकवत ना? Lol

असो. आताच्या काळात जर नेहमीची फिल्मसॉंग्स गायची तर Smule सारखी ऍप नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. तिथे बरेच चांगले गायक आहेत. खूप काही शिकायला मिळतं. शिवाय एखादं गाणं वेगवेगळ्या गायकांनी कसं गायलंय हे ऐकलं तरीही खूप काही मिळतं. अगदी कालच, 'मेरे नैना सावन भादो' ची व्हर्जन्स ऐकली. विषयच निघालाय तर इथे देतो. नक्की ऐका.

Kishor Kumar: https://www.youtube.com/watch?v=_4Ccxj_A4UU&t=42s

S. P. Balasubrahmanyam: https://www.youtube.com/watch?v=7PPEZye1B6M&t=43s

Kumar Shanu: https://www.youtube.com/watch?v=yX_fK4jYd8w&t=41s

Abhijeet Bhattacharya: https://www.youtube.com/watch?v=ZCLjL-wbCro&t=43s

हे असं काही ऐकलं कि गाणं म्हणजे नक्की काय ते कळतं. विशेषतः शिकण्याच्या दृष्टीने अभिजितचं गाणं मला प्रचंड आवडतं. किती स्वच्छ स्पष्ट नोट्स असतात. Smule वर सुद्धा इतर गायक/गायिकांनी गायिलेली गाणी ऐकली कि खूप खूप शिकायला मिळतं.

चांगला लेख लिहिलात. तारंच छेडलीत Happy या विषयावर बोलण्यासारखं खूप खूप आहे. आवरतं घेतो.

आपल्याला कोणी सांगेपर्यंत आपण किती सूर / बेसुर आहोत हे माहीत नसते.
थोडे तरी दैवी देणगी हवीच.
त्यामुळे आता कानसेन होउन भरपूर ऐकावे झालं.