पाककृती स्पर्धा क्रमांक 1 जिन्नस एक पदार्थ अनेक !! अश्विनी11 , आज जेवणात ग्रीन सिग्नल !!

Submitted by अश्विनी११ on 24 September, 2026 - 23:36

घरच्या गणपतीची गडबड संपली. रोज मायबोली बघताना येणाऱ्या नवीन पाककृती, पार परदेशातून आलेले रसमलाई चे फोटो बघून मनाने उचल खाल्ली. मुगडाळ ठरवली पण आधीच दोन प्रवेशिकांमध्ये बरेचसे पदार्थ येऊन गेल्यामुळे नवीन काही सुचेना. मग स्वीट कॉर्न ठरवले. सूप, कटलेट, राईस, हलवा, कॉर्न चाट असा भरगच्च मेनू ठरवला. त्याप्रमाणे खरेदी ही झाली. पण घरातल्या सदस्यांनी कॉर्न उकडून आणि भाजून अधिच संपवल्यामुळे प्रश्न पडला. मग शेवटी घरातला पालक मदतीला आला. भाजी आणि सदस्य ही ! आणि ही नवीन थाळी सजली.
थाळीमध्ये आहे- पालक मुगडाळ चीला, पालक पुरी, हराभरा कबाब, लसूण कॉर्न पालक, स्पिन चिज पास्ता

सगळ्या पदार्थांसाठी पालकची अर्धी जुडी गरम पाण्यात मीठ घालून ब्लांच करून घेतली आणि त्याची मिक्सरवर पेस्ट करून घेतली. हीच पेस्ट सगळ्या पदार्थात वापरली.

पालक मुगडाळ चीला- हिरवे मूग भिजवलेले होतेच. ते वाटून त्यात आलं-लसूण पेस्ट, थोडा रवा, पालक पेस्ट ,मीठ घालून दहा ते पंधरा मिनिटं भिजवले. नंतर नॉनस्टिक तव्यावर छोटे चिले घातले. वरून सजावटीसाठी तीळ लावले. दोन्ही बाजूने शेकले.

पालक पुरी- कणिक आणि बेसन घेऊन त्यात पालक पेस्ट, मीठ, आलं मिरची लसूण वाटण , तीळ, ओवा ,हिंग ,हळद घालून घट्टसर पीठ भिजवून ठेवले. नंतर त्याच्या पुऱ्या केल्या.

हराभरा कबाब- हिरवे हरभरे आदल्या दिवशी भिजत घातले. कबाब करायच्या आधी कुकरमध्ये हिंग आणि मीठ घालून ते उकडून घेतले. नंतर मिक्सरमध्ये उकडलेले हरभरे वाटून त्यात पालक पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून त्याचे कबाब करून घेतले. सजावटीसाठी वरून अर्धा काजू लावला. तव्यावर थोड्या तेलात शॅलो फ्राय करून घेतले.

चीज पास्ता- नेहमीसारखा व्हाईट सॉस करून घेतला. मॅकरोनी पास्ता उकडून घेतला. त्यातच थोडे मटार दाणेही वाफवले. व्हाईट सॉस मध्ये पालक पेस्ट ,ओरेगॅनो ,चिली फ्लेक्स आणि चीज घालून पास्ता करून घेतला.

लसूण कॉर्न पालक- एक टोमॅटो आणि एक कांदा याची पेस्ट करून घेतली. तेलावर थोडे जिरे घालून त्यावर टोमॅटो कांदा याची पेस्ट, स्वीट कॉर्न परतून घेतले. नंतर त्यात गरम मसाला, हळद, तिखट घातले. त्यावर पालकची पेस्ट घालून परतले. हव्या त्या कन्सिस्टन्सी साठी गरम पाणी घातले. थोडे शिजल्यावर त्यात चुरून कसुरी मेथी घातली. एका छोट्या कढईत तेल आणि भरपूर लसूण याची फोडणी केली. लसूण लाल झाल्यावर ती फोडणी भाजीवर घातली.

अशा तऱ्हेने एक तासभर आई आणि मुलीने खिंड लढवल्यावर थाळी तयार झाली. पास्ताचे पूर्ण क्रेडिट माझ्या मुलीला आहे.

शेवटच्या दिवशी तरी प्रवेशिका पाठवता आली याचे समाधान आहे. गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हरा रंग डाला … मार डाला !! हिरव्या रानात हिरव्या पानात वगैरेही.

हेल्दीपणाचा कडेलोट आहे ही एन्ट्री. पालक, मूग, हिरवे चणे , सर्वच सुपरफूड्स.

कॉंगो अश्विनी११, तुम्ही सर्व diet conscious लोकांच्या मनात उच्चस्थानी स्थापन झाला आहात याठिकाणी.

खूप छान 👌

सर्व सोमीजगत चिल्ला-चिल्ला के “चिल्ला” म्हणत-लिहित असतांना “चीला” हा शब्द योग्य लिहिल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन आणि तुम्हाला एक Bournville Fruit and Nut 70 units dark chocolate 🍫 अर्पण (coz it’s fav)

काय अप्रतिम सुंदर दिसतंय डोळ्यांना..उत्तम सजावट आणि उत्तम फोटो.
कबाब तर एखाद्या 5 स्टार हॉटेल मध्ये सर्व्ह करावे असे।
मला जेवायला बोलाव Happy

हरंभरं वाटलं ताट बघून. सही आहेस. आणि कॉर्न ला, मुगाच्या डाळीला तू नहीं तो और सही असं म्हणून पालकाला जवळ केलंस, ग्रेट.
सगळे पदार्थ छान दिसताहेत.

छान आहे.. पण,
ताट एवढे हेल्दी दिसत आहे की कोणी पूर्ण संपव म्हटले तर दडपण यावे Happy

हराभरा कबाब मुलांचे आवडते. एक दुर्मिळ हेल्दी पदार्थ त्यांना आवडणारा. मला मात्र पालकच्या फक्त पुऱ्या आवडतात. चहासोबत खायला त्या तेवढ्या उचलतो Happy

हिरवाई नेत्रसुखद.

मस्त मस्त मस्त, कबाब उचलून खावेसे वाटतायेत.

अनिंद्य , डार्क chocolate साठी special आभार !!
अनु, कधीही ये, स्वागत आहे.
कविन , धनवंती, मॅगी, धनि , ऋन्मेष , अशिका , मनीम्याऊ धन्यवाद !!
तुमचे प्रतिसाद वाचून थाळी फारच healthy झाली आहे का वाटले . खरं तर पालक पेस्ट पुरवण्याकरता शोधलेले हिरवे पर्याय आहेत ते.

छान पदार्थ, फोटोही छान.
मला फक्त पालक पुऱ्या आवडतात.
आणि रोज च्या जेवणात पालकाची भाजी.

… तुमचे प्रतिसाद वाचून थाळी फारच healthy झाली आहे का वाटले…

नाही नाही. तुम्ही स्पिन्याच पास्ता आणि (Deep fried) पुऱ्या केल्यात की. कबाब आहेतच सोबत. अती हेल्दी नाही झाले, balance आहे.

डिश मस्त दिसतेय. पुरी जास्त आवडली चीला पराठ्याच्या जवळ गेलाय
यंदा सगळ्यांनाच पाककृतीच्या निमित्ताने काहीतरी शैलीदार लिहायची लागण झालेली पाहून मला उगाचंच बरं वाटतंय.

दिल गार्डन गार्डन हो गया
हराभरा कबाब विशेष आवडीचे
पटकन उचलून तोंडात टाकावेसे वाटतायत

अश्विनी,
भारी टेम्प्टिंग दिसतेय ताट. पालक आवडतो आणि ताटातील सगळे पदार्थ सुद्धा. पुरी आणि कबाब तर भारीच. अगदी उचलून खावेसे वाटत आहेत.
फोटोचा angle आवडला

सर्वांचे धन्यवाद !!
ऋतुराज , फोटो मुलीने काढलाय. तिला फूड फोटोग्राफी ची आवड आहे.

Pages