गेले करायचे राहून - अमितव

Submitted by अमितव on 24 September, 2026 - 13:07

धाग्याचा विषय वाचला आणि मनात काय काय करायचं आहे आणि काय करायचं राहिलं आहे याची यादी सुरू झाली. पण ही बकेट लिस्ट नाही तर काय करायचं राहुनच गेलं अशी यादी आहे हे सारखं मनाला बजावत होतो. पण एखादी गोष्ट/ इच्छा मनात उत्पन्न झाली, आणि ती करायची पार राहुनच गेली असं का म्हणावं? करू की अजुन! इतकं काय वय झालेलं नाही की त्या रस्त्याने अजिबात जाणारच नाही. असं करत करत यादीतील बर्‍याच गोष्टींवर फुल्या मारल्या.
बाकी 'किसी चिझ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे पूरी करने लग जाती है' या आमच्या शारुख स्कूलचा असल्याने यातल्या ही काही गोष्टी 'गेले करायचे राहुनी' मधुन 'बकेट लिस्टीत' आणि त्यातून एकदाच्या बाहेर येतीलही. कोणी सांगावे!
-----
मुंबईच्या उपनगरांत वाढल्याने असेल कदाचित, पण मला गजबजलेली शहरे, रोज सकाळी सार्वजनिक वाहतुकीतून येणारे चाकरमान्यांचे (हो! महाराष्ट्र टाईम्समुळे या जमातीला चाकरमाने हा एकच शब्द अंगवळणी पडला आहे) जथे, लगबग, बस स्थानकात एकामागोमाग एक भरुन येणार्‍या क्षणभर थांबून परत जाण्याच्या बसेस या सगळ्या वातावरणाचे, कोलाहलाचे फार आकर्षण आहे. मुंबईत असताना नरिमन पॉईंट, कफ परेड किंवा बेलार्ड पिअर वरच्या उंच इमारतीत काम मिळावे हे स्वप्न होतं. काही काळ उमेदवारीचे काम सीप्झ मध्ये मिळाल्याने रोज ठाणे - दादर - अंधेरी - सीप्झ असा प्रवास करुन त्यातला काही भाग पूर्ण झाला पण तरी उंच डाउनटाऊन म्हणता येईल अशा भागात काम करणे हा भाग राहिलाच.

मग कामाच्या निमित्ताने पुण्याला आलो. पुणे मला इतर अनेक कारणांनी फार आवडलं. पण महानगराचा सार्वजनिक स्तर; एक लसावी जो असतो त्याची उणिव इथे होती. उच्चभ्रू हे वेगळं जीवन जगत होते. इथे पल्सरवरुन पाच वर्षे जिवाचं पुणे आनंदाने केलं. पणं मी जे मुंबईत रहात असताना बघितलेलं की आर्थिक - सामाजिक स्तर प्रवास करतात एकत्र असतात, हे विविधरंगी जग न्याहाळतानाची श्रीमंती जी प्रवासात येता जाता दिसते, (लळतलोंबत का असेना) त्यापासून मी दूरच होतो. अर्थात तसं रहायचं, ते जीवनमान हा शेवटी माझाच निवडलेला निर्णय होता. तो मी तसा घेतला होता. सगळंच एकावेळी कसं मिळेल!

काही वर्षांनी टोरांटोला आलो. टोरांटो, मोठं शहर. स्ट्रीट- कार (ट्राम), बसेस, उपनगरी रेल्वे अशा सगळ्या प्रकारचे वाहतुकीचे प्रकार. नवा देश त्याची उत्सुकता, त्यात सुटवंग! त्यामुळे वर्षभर मजा केली. उंच ऑफिसात काम केलं पण तरी सॉफ्टवेअर कंपनीचे ऑफिस डाउनटाऊन मध्ये बांधायला बंदी असल्यागत कामाची जागा थोडी दूरच होती. तिकडून आटोवा, मग अमेरिकेत -कॅलिफोर्निय - बे-एरियात काम करायची एक मनोकामना होती ती पूर्ण झाली, पण परत डाउनटाऊन मध्ये पब्लिक ट्रांझिटने जाऊ हा भाग राहिलाच. आता आटोवाला कायमचा परतोनी आलोय पण तरी उंच इमारतीत कॉर्नर ऑफिस किंवा क्युब आहे, बाहेर स्नो पडतोय, खाली एका मागोमाग एक बस जात आहेत, सिग्नल लाल हिरवे होत आहेत, माणसं लगबगीने इकडून तिकडे जात आहेत. दुपारी जेवायला मी ही खाली जातोय, उद्वाहकात वरच्या- खालच्या मजल्यावरील रोजचे ओळखीचे चेहेरे दिसतात, त्यांच्याकडे हसायचं म्हणून भावनाशून्यपणे ओठ एकमेकांवर दाबून हसल्यासारखं करतो, ते पण तसंच करतात. उगा काय उन पडलंय, सकाळी स्नो मध्ये कसे अडकलो असे निरर्थक चार शब्द बोलले जातात. पटकन खाली जाऊन सबवे, श्वारमा, बरिटो बोल, बर्गर अगदी लाडात आलो तर व्हिएतनामी सूप (फ), थाय करी-राईस घेऊन वर येतो, किंवा घरुन कालचे उरलेसुरले डब्यात आणलेले असते. ते किचन/ कॅफेटेरिया मध्ये जाऊन सहकार्‍यांसोबत खातो. तेव्हा गेम, पॉलिटिक्स, टीव्ही, सिनेमे, घरगुती पोरंबाळं, कॉस्कोतून काय घेतलं, जीवनात झालेल्या फजीत्या, ते परत औपचारिक वीकेंडला काय केलं, लाँगवीकेंडला काय करणार अशा गप्पा मारुन परत काम करुन संध्याकाळी ट्रेनने - ट्रान्सफर करुन बसने घरी जातो. यातलं डाउनटाऊन मध्ये ऑफिससोडून बाकीचं करतोय, केलंय. पण ते शहराच्या मध्यवर्ती भागातील उंच इमारत ही राहिलीच. जिकडून शक्यतो एकही झाड दिसणार नाही, ती पुष्कळ बघितली, त्यांचे बदलणारे रंग-बिंग पुष्कळ बघुन झालं. पण मोठ्या इमारती आणि खाली माणसं दिसतील. ही जिवंत माणसं हेच जीवन हो! या इच्छेवर आता काम करुन पूर्ती करावी असं आता वाटत नाही.

-----
दुसरी अशीच राहिलेली गोष्ट म्हणजे मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा मोटारमन होणे.
रेल्वेचे तेव्हा ही आकर्षण होते, आजही आहेच. सुरुवात व्हिटी ते कर्जत - कसारा, चर्चगेट ते विरार, व्हिटी ते मानखुर्द मग वाशी मग बेलापूर अशी स्टेशने पाठ करण्यापासून झाली. मग फास्ट आणि स्लो गाड्या कुठे थांबतात, त्यांचे फलाट कुठल्या बाजुला येतात, दारातून वाकून पांढरा सिग्नल सरळ रेषेत आहे का तिरका आहे त्याप्रमाणे ठाण्याला गाडी चार नंबरला येते आहे का तीनला काढताहेत हे आधीच समजुन प्लॅटफॉर्म वो साईड आएगा सांगणे, कर्जतला एस, कसार्‍याला एन का म्हणतात, एकामागोमाग एक फास्ट लोकल मध्ये कुठली सोडायची इ. तर ते असो. सांगायचा मुद्दा ही ट्रेन चालवायची इच्छा होती- आहे. आता पैसे कमवायची चटक लागली आहे, त्यामुळे कधी करेन, करेन का? कल्पना नाही. पण आता आमच्या गावात पण एलआरटी आली आहे. तिकडे अजुन थोड्यावर्षांनी करू ही शकेन. त्या निमित्ताने आत्ताच प्रक्रिया वाचुन भारतातील डीग्री इव्हॅल्युएट करायला लागेल समजलं. ते तरी करुन ठेवतो. Happy सध्यातरी ही राहिलेली गोष्टच आहे.
ममव असल्याने ट्रेन नाही तर सिटी बस ते नाही तर यल्लो बस तरी नक्की चालवेन. त्यांना व्हॉलेंटिअर ड्रायवर हवेच असतात. पण आधी ट्रेनच बघू.

---
एक अगदीच वैयक्तिक बोच. बोच होती म्हणू, कारण आता त्यावर काहीही करणे शक्य नसल्याने ती मनात खोलवर दडपुन टाकली आहे, जमली तर काढूनच.
मी कॅनडात आल्यावर दोन-तीन वर्षेच झाली असतील, आजीला काही दुर्धर आजाराचे निदान झाले. ते सगळे इतके पटकन घडले, आणि मी त्याच्या आधीच्याच महिन्यांत नोकरी बदललेली होती, आणि काही व्यवधाने होती .... असो, त्या सगळ्या सबबीच आहेत, पण मी तिला भेटायला शेवटचं गेलो नाही. जाऊ शकलो नाही म्हणण्याला काही अर्थ नाही. गेलो नाही. न जाण्याचा तो घेतलेला निर्णय होता. जो चुकला. ते जायला हवं होतं, ते आजही शल्य आहेच.
यापुढे कुठलाही निर्णय घेताना, पर्यायांंची निवड करताना, 'तो पर्याय निवडल्याने आपल्याला पश्चाताप होऊ शकेल का?', 'नंतर मन खात राहील का' किंचितही पश्चाताप होणार असेल तर परत विचार केला पाहिजे हा एक निर्णय घेण्यात मदत करणारा विचार लक्षात ठेवला आहे.
---
अजुन 'करायच्या आहेत', 'शिकायच्या आहेत' अशा पुष्कळ गोष्टी आहेत, पण त्या अजुन करेन असं वाटतंय त्यामुळे त्या इथे नको. आशा आहे की बकेटीतून इकडे गोष्टी यायला नको Proud त्या निमित्ताने दोन तीन वर्षांपूर्वी बकेट लिस्ट उपक्रमांत ज्या गोष्टी खरडलेल्या त्यातल्या काही पूर्ण झाल्या आहेत ते बघुन मलाच छान वाटलं Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले. लेखकाचे नाव वाचून धागा उघडला जातो आणि थिल्लर ब्राउझिंग पेक्षा नीट वाचला जातो - अश्या लेखकतले एक तुम्ही आहात. कारण मनापासून येते. स्पष्ट असते. कोणाला मोदक द्यावा म्हणुन केलेले लिखाण नसते Happy
>>>>सगळंच एकावेळी कसं मिळेल!
करेक्ट.
आजीबद्दल वाचून मनात कालवा कालव झाली कारण वाड्यावरती तुम्ही क्वचित उल्लेख करता त्यातून नाते व नात्याची विण कळून येते. बाकी नोकरीचे बद्दलचे तर फारच रिलेट करता आले.

>>>यापुढे कुठलाही निर्णय घेताना, पर्यायांंची निवड करताना, ...... मदत करणारा विचार लक्षात ठेवला आहे.
तसे करता येत नाही कारण हाईंड साईट इज ऑलवेज २०-२०. हे आपल्याला आधी कळत नाही. केसरां सरां हेच खरे.

छान लिहिलंयस.
आजीबद्दल वाचून वाईट वाटलं. आणि ते शल्य राहिल्याबद्दलही.
त्यावर समजुतीचं बरंच काही बोलता येईल, पण ते इतरांनी किंवा तुझं तूही स्वतःला सांगून झालंच असेलच.
तरीही अशी शल्यं राहतातच. इलाज नाही. त्यातून घेतलेला धडा पटला. यापुढे माझ्याही लक्षात राहील तो.

>>> शहराच्या मध्यवर्ती भागातील उंच इमारत ही राहिलीच. जिकडून शक्यतो एकही झाड दिसणार नाही
कुणाचं काय तर कुणाचं काय! Lol

मोटरमन व्हायचं स्वप्न वाय क्रोमोसोमबरोबर फ्री मिळतं का? Proud

छान ओघवते लिहिले आहे.
लेखाची (कारकिर्दीची) मुंबईपासून सुरुवात केली त्यामुळे लेखासोबत जास्त रिलेट करता आले.

<< नंतर मन खात राहील का >> खरे आहे. लोकं काय बोलतील हे गेले खड्ड्यात म्हणता येते. पण स्वतःच्या मनाबाबत हे करता येत नाही.

<< किसी चिझ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे पूरी करने लग जाती है'>> हे आपल्या शाहरुखचे वाक्य घेतल्यासाठी तेवढे तीन बदाम ❤️❤️❤️

खूपच छान लिहिलेय. मनापासून आणि विचार करून. काही ना काही तरी राहणारच आहे, काही ना काही अवचितही गवसणार आहे. Happy

आजीबद्दल वाचून वाईट वाटलं. आणि ते शल्य राहिल्याबद्दलही. >>> अनुमोदन. सांत्वन करत नाहीये अनुभवाचे बोल सांगतेय, आपल्यालाही पुढचा अंदाज येत नाही कधीकधी, आपण सकारात्मकच विचार करत असतो आणि घडतं वेगळंच.

मस्त मस्त - यातले दोन माझेही फेवरिट होते. डाउनटाउनमधे काम आणि रेल्वे - मला इंजिन ड्रायव्हर (त्याला लोको पायलट म्हणतात हे माहीत नव्हते) आणि गार्ड हे दोन्ही व्हायचे होते. द बर्निंग ट्रेन मधे विनोद खन्ना जर आख्ख्या रेल्वे गाडीचे (इंजिन आणि डबे सगळेच) डिझाइन करणारा इंजिनियर, शॉप मधला हेड आणि नंतर गाडी चालू असताना तिचे ऑपरेशन बघणारा प्रमुख असू शकतो तर माझी अ‍ॅम्बिशन त्यामानाने मर्यादितच होती.

मलाही पुढे कधीतरी एक हॉबी म्हणून इंजिन चालवायला शिकायचे आहे. एक नोकरी म्हणून ते फार जिकीरीचे असेल Happy पण हॉबी म्हणून धमाल. रेल्वे स्टेशन्स, यार्ड्स हे सगळे माझ्या दृष्टीने डिस्नेलॅण्ड आहे.

डाउनटाउन मधला माहौल, ती गजबज याचे मलाही खूप आकर्षण आहे. मुंबईत थोडा काळ केलेही आहे. रीगलजवळ हॉटेल आणि फाउण्टनला जॉब - यापेक्षा मुंबईत आणखी सोपे काय असेल! पण इथली नोकरी सगळी सबर्ब्ज मधे झाली आहे. त्यामुळे ते गजबजीचे आकर्षण अजूनही आहे. फक्त त्याकरता तास तास लटकून जायला नकोय. (बाय द वे, लळतलोंबत शब्द बर्‍याच दिवसांनी वाचला)

माझ्या आजीच्या बाबती मी तिला इकडे आणू शकलो नाही याचे शल्य आहे. म्हणजे मी थोडा आधी आलो असतो तर ती फिट होती व येऊ शकली असती. तिला माझे प्रचंड कौतुक होते. वाट्टेल ते करून आली असती. पण समहाऊ ते जमले नाही.

व्वा! खूप मनापासून लिहिले आहे.
मुंबई, ट्रेनबद्दल वाचून बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या.
यापुढे कुठलाही निर्णय घेताना, पर्यायांंची निवड करताना, 'तो पर्याय निवडल्याने आपल्याला पश्चाताप होऊ शकेल का?', 'नंतर मन खात राहील का' >>>>>> खरं आहे.

आवडलं लेखन.
डाउनटाउनबद्दल वाचताना लक्षात आलं की माझी मुंबईतली तीन ऑफिसेस अनुक्रमे न्यु मरीन लाइन्स, चर्चगेट जमशेटजी टाटा रोड आणि मग थेट कफ परेड वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे होती. तेव्हा त्याचं काय अप्रूप वाटलं नाही.
इंदूरचं ऑफिस सिटी सेंटर नावाच्या इमारतीत आणि तिथल्या मध्यवर्ती सीबीडी म्हणावं अशा भागात. पण मुंबईतून तिथे गेल्याने मला ते डाउन वाटायचं.

बस? बरं.

बोच पोचली.

अमित चांगलं लिहिलंय. आजीबद्दल लिहिलंय ते शल्य आहे. 'गेले करायचे राहून' पेक्षा खूप खोल असतात हि शल्ये. हो देजावूच. असो Sad

बाकी तुझी गे.क.रा. यादी मात्र वेगळ्या धाटणीची आहे. आवडला लेख.