गेले क/तरायचे राहून - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 24 September, 2026 - 10:38

हो, शीर्षक वाचून तुम्हाला वाटला, नेमका तोच विषय आहे.
माझं ना, जलतरण (swimming) शिकायचं राहून गेलंय.
कारण असं काही नाही. खरंतर मुंबईत जिथे वाढले तिथे मफतलालचा तलाव जवळ होता. पण कधी ते डोक्यात आलं नाही खरं.
पुढे मुलं झाल्यावर त्यांना आवर्जून क्लासला घालून शिकवलं. तेव्हाही आपण शिकावं हे सुचलं नाही.

स्विमिंग हे सर्वायवल स्किल आहे म्हणतात त्यात काही तथ्य नाही. या बाबतीत मला बिस्वाचं म्हणणं पटतं.

शिवाय माझा एकदा बुडायचा कार्यक्रम करून झालेला आहे - आणि तो करताना माझे वडील माझ्याबरोबर होते. ते अगदी पट्टीचे नाही तरी चांगल्यापैकी स्विमर होते.
चर्नी रोडला कैवल्यधामच्या समोर ते दोन खांब आणि तिथून खाली समुद्रात उतरायला पायर्‍या नाहीत का? तिथून भरतीची मजा घेण्यासाठी उतरलो होतो मी आणि बाबा. एका मोठ्या लाटेसरशी पायाखालची जमीन सुटली. थोड्या गटांगळ्या खाल्ल्या, आणि नशीबाने दुसर्‍या मोठ्या लाटेने पुन्हा बाहेर फेकले गेलो. मी शाळकरी वयात होते, पण त्या काही मिनिटांत 'अरेच्च्या! शेवटच्या क्षणांत डोळ्यांपुढे जीवनपट वगैरे उलगडतो म्हणतात, आपल्याला पाण्याशिवाय काहीच कसं दिसत नाहीये?!' असं आश्चर्य वाटून गेल्याचं स्पष्ट आठवतंय. बहुतेक उलगडण्याइतका पटबीट तोवर रेकॉर्डच झालेला नसावा. आम्हाला त्या औटघटकेत फार काही नाट्यमय, ट्रॉमॅटिक वगैरे वाटल्याचं आठवत नाही. मात्र हे दृश्य किनार्‍यावरून बघणारी आई पुढे दोन दिवस थरकापत होती हे आठवतं. असो.

आता चर्नी रोडच्या त्या पायर्‍या बंद केल्या आहेत. त्या बंद होण्यात आमच्या पराक्रमाचा अंशतः सहभाग असावा.

तरीही मला पाण्याची भीती वगैरे वाटत नाही. उलट दिसेल त्या बॉडी ऑफ वॉटरमध्ये पाय तरी बुडवून येण्यात सहसा मीच पुढे असते. बीचला गेलं की हौसेने खांद्यापर्यंतदेखील पाण्यात जाते, डुबक्या मारते. पूलमध्ये उतरले तर बारला धरून पाय मारते.

पण!
मला पूर्णपणे 'सॉलिड' आधार सोडून पाण्यात झोकून देता येत नाही!
पाण्यातच का, खरंतर हवेतही नाही. म्हणजे मला बंजी जंपिंग, स्काय डायव्हिंग वगैरेही करायचं कधीही डोक्यात आलेलं नाही. ते करणार्‍यांबरोबर मी तिथे हजर असतानाही नाही.

हे लिहितानाच मला असंही जाणवतंय की मला फिगरेटिवलीदेखील जमीन सोडता येत नाही.

म्हणजे मी मजा करत असतानाही माझं वेळेचं, जबाबदार्‍यांचं वगैरे भान सहसा/पूर्णपणे सुटत नाही. मी एकदम नोकरीधंदा सोडून कलाक्षेत्रात किंवा समाजसेवेत उडी किंवा संन्यास घेणार्‍यांतली नाही. अंतिम जबाबदारी माझी असेल तर दुसर्‍याकडे सोपवलेल्या कामांवरचंही माझं लक्ष हटत नाही. अगदी मायक्रोमॅनेज नाही केलं तरी सगळी चेकलिस्ट वेळेत पाळली जाते आहे की नाही हे मी पाहत असते.

एकूण नेमस्तपणा हा स्थायीभाव आहे असं म्हणता येईल.
किंबहुना स्थायीभाव हाच स्थायीभाव आहे असंही म्हणता येईल.
असो.

तर, तरायचं राहून गेलेलं आहे.
पण आता निदान ते आता माझ्या 'टू डू लिस्ट'वर आलेलं आहे. 'बकेट लिस्ट' म्हणायचं टाळलं असल्याचं चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच. तरून तरायचं तर बकेटीत कशाला!

तुमच्या शुभेच्छा असू द्या म्हणजे झालं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या कडून जमीन सुटणार नाही याची खात्रीच आहे.
चेकलिस्टची काळजी वाहू आहेस तर टाकुन दे चेकलिस्ट वर होऊन जाऊ द्या टु डू! Happy

बकेट लिस्ट' म्हणायचं टाळलं असल्याचं चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच. तरून तरायचं तर बकेटीत कशाला!>> Lol
शुभेच्छा!

खूप छान लिहिलंय, या नव्या टू-डू ला मनापासून शुभेच्छा. लवकरच जमीन सोडून पाण्यावर तरंगण्याचा अनुभव तुम्हाला मिळो! Happy

मजा करत असतानाही माझं वेळेचं, जबाबदार्‍यांचं वगैरे भान सहसा/पूर्णपणे सुटत नाही. मी एकदम नोकरीधंदा सोडून कलाक्षेत्रात किंवा समाजसेवेत उडी किंवा संन्यास घेणार्‍यांतली नाही. अंतिम जबाबदारी माझी असेल तर दुसर्‍याकडे सोपवलेल्या कामांवरचंही माझं लक्ष हटत नाही. >>>> याला "अगदी अगदी ! " असं झालं Happy
मला पण ते एक्सट्रीम अ‍ॅडव्हेन्चर्स मधे काही थ्रिल नाही वाटत. किंवा मजा म्हणून ते करून पहावे असे अजिबात नाही वाटत.

आत्ताही शिकू शकतेसच. मी जपानमध्ये असताना क्लास लावला होता पोहायचा. पण मजा म्हणून आणि वेळ घालवायला म्हणून. खूप शिकायला हवं असं काही वाटलं नव्हतं.
नाही म्हणायला थोडं नाचता यायला हवं होतं असं वाटतं अधूनमधून. पण एक व्यक्ती आहे ज्याने शिकवलं तर प्रयत्न करता येईल. Wink

डीट्टो!! स्वातीताई मी पण तुझ्याच "बोटीत"

पंचमहाभुतातल्या या एका भुताची फार भिती वाटते मला..

स्विमिंग शिकण्याचे असफल प्रयत्न करून झाले. अ‍ॅडल्ट स्विमबॅच त्यातही फक्त बायकांची वगैरे... श्वासाचं तंत्र जमायला आधी पाण्यात तोंड घालावं तर लागतंच.. तिथेही मान वर च ठेवणार हा बाणा आडवा आला Lol आणि जसं ते जमिनीवरून पाय उचलायला सांगतात हातातल्या नुडल्स किंवा बोर्डच्या आधारे तिथे ततपप व्हायला लागते...
रुढार्थाने पाय जमिनीवरच असणारी बाई आहे मी Lol तू म्हणतेस तसं जमिन सोडवत नाही Proud

तुला शुभेच्छा!

स्वाती, तुझे पाय अगदी जमिनीवरच आहेत !
Happy
खूप छान लिहिलं आहे. म्हणजे, तुझ्या त्या परिपूर्तीच्या तुलनेत अगदीच साधं...तरीही मनभावनच!
जळाहून हलके होऊन तरंगत राहण्याचा अनुभव घेण्यासाठी खूप शुभेच्छा !

मस्त लिहिलं आहे. Happy
पण राहून गेलेलं कशाला ? अजून शिकू शकतेस की.

छान लिहिले आहे. Happy
मला ते बंजी वगैरे किंवा हिसका बसणारे काहीही सहन होणार नाही, मला गरगर फिरवणाऱ्या राईड्स सुद्धा सहन होत नाहीत. तुझं जसं पाय जमिनीवर, तसं मेंदू आणि शरीर एका रेषेत आणि मेंदू वर लागतो मला. नाही तर आता माझी सटकली. Proud खरीच वेळ आली तर मी मारेनही हेलिकॉप्टर मधून उडी पण असं तिकीट काढून खोटं खोटं नाही. मला पोहता येतं पण.

किंबहुना स्थायीभाव हाच स्थायीभाव आहे असंही म्हणता येईल. >>> Lol एकदम पीएल लेव्हल Happy

मस्त लेख. जमिनीवर पाय हे उपमेसारखे आणणे - जमले आहे.