कौल

Submitted by रानभुली on 21 September, 2026 - 22:42

कौल
====

दुपार गेली, उन्हे निवाली,
ओसरीवरी कौल निखळला
बंद घराच्या बंद खिडकीत
निळा पारवा घुमत होता

आंगणभर पसरले दाणे
पाखरांची चोच थांबली;
वाऱ्यावाचून पान हलावे,
अशी कुणाची चाहूल झाली.

देवघरातील वात विझेना,
तेल नव्हते, तरी ती जळली;
भिंतीवरती काळी रेघ एक
हळूच वरती चढत गेली.

मी उंबरठा ओलांडू पाहिले,
पाय मात्र का मागे सरले?
घर रिकामे होते म्हणता
आत कुणाचे श्वास भरले?

ओसरी ओलांडून काळी छाया
माजघराशी येऊन थांबली;
कौलावरती बसली चिमणी
माझे नाव घेऊन हसली

मी वळले ... घर तसेच होते,
दार, खिडक्या, नि देववसा
उंबरठ्याच्या मातीमध्ये
नव्हता माझा पाऊलठसा.

इतुका काळ कुठे गेलेले
कुणी मला घराशी आणले?
कोण घरात माझ्या आधी
माझी वाट पाहत होते?

- रानभुली

Group content visibility: 
Public - accessible to all site users