व्हिन्सेंट नावाची प्रेमकथा - साजिरा

Submitted by संयोजक on 21 September, 2026 - 08:32

एकवीस वर्षांचा व्हिन्सेंट उर्सुलावर प्रेम करू लागला होता. नाजुक, हसतमुख उर्सुला एका पाद्र्याची पोर होती. लंडनच्या त्या घरात तो भाड्याने राहत होता आणि थोर चित्रकारांची चित्रं विकण्याच्या दुकानात काकाच्या ओळखीने नोकरीला लागला होता. या वयात असं काही झालं की सारं आयुष्य रसरसून फुलून आल्यागत वाटतं, तसंच त्याचंही झालं. उर्सुला मात्र काही गावीच नसल्यागत त्याच्याशी वागत होती.

व्हिन्सेंट आजकाल स्वतःला आरशात न्याहाळू लागला होता. हॉलंडमधून आलेल्या व्हिन्सेंटने स्वतःच्या रूपाचा आजवर कधी विचार केला नव्हता. आता तो आयुष्यात पहिल्यांदा करू लागला. रूंद हनुवटी आणि रूंद कपाळ हे काही इंग्रजांना शोभेसं नव्हतं. पण त्याने काही फरक पडणार नाही असं त्याला वाटलं, कारण उर्सुला त्याच्याशी खूपच हसतखेळत वागत होती.

एका क्षणी अवचित त्याने उर्सुलाला त्याचं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगून टाकलं, तशी उर्सुला प्रचंड आश्चर्यात पडली. 'तू फक्त छान मित्र आहेस,' असंही म्हणाली. त्यानंतर व्हिन्सेंटला कळलं- तिचं लग्न आधीच ठरलंय.

व्हिन्सेंट सटपटला. कसं शक्य आहे? प्रेम तर मी करतोय. माझ्याशिवाय इतर कुणाहीसोबत उर्सुला कशी सुखी राहू शकेल? नंतर ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला वर्षभरात भेटलीही नाहीये - हे कळल्यावर त्याला धीर आला. मी आहे. मीच आहे हिच्यावर खरंखुरं, इतकं आसुसून प्रेम करणारा. इतक्या भांडवलावर त्याने एकदा डोक्यात भिरभिरं फिरल्यागत तिला जवळ ओढलं आणि तिचे ओठ नव्यानेच पाहिल्यागत ओठांत घेतले. तिचा चेहेरा, केस सारं काही नीट न्याहाळलं, भरभरून श्वासांत घेतलं. तिच्या हे सारं लक्षात यायला थोडा वेळ लागला. आलं तेव्हा ती ओरडलीच- दूर हो, लालतोंड्या माकडा!
***
दुसर्‍या दिवशी गॅलरीतल्या चित्रविक्रीकडे व्हिन्सेंटचं लक्ष लागेना. त्याला अजून हरायची इच्छा नव्हती. तिच्या डोक्यातून त्या आगंतुकाला बाहेर काढायलाच हवं. पण कसं? असाच आणखी एक आठवडा संपला. व्हिन्सेंटच्या हिरव्या डोळ्यांतली चमक जरा निस्तेज होऊ लागली. शेवटी रविवारी संध्याकाळी त्याने बोलायची संधी साधली. तिने पुन्हा पहिल्यासारखंच त्याला सरळ तोडून टाकलं. तिने सरळच त्याला विचारलं- लंडन सोडून केव्हा जातोयस तू? माझा होणारा नवरा सुटीसाठी यायचाय इथं.

तरीही पुढले दोन महिने त्याने तिची मनधरणी करण्यात घालवले. त्याने भावाला पत्रात लिहिलं- मला तिकडे यायचं आहे, सार्‍या आपल्या लोकांसाठी, आपल्या घरा-गावासाठी, हॉलंडसाठी. पण काय करू कळत नाही.
मग जुलै उजाडला आणि त्याची सुटी सुरू झाली. निघताना उर्सुलाच्या आईने त्याला सांगितलं, जाताना सारं सामान घेऊन जा. काहीही मागे ठेऊ नकोस. उर्सुला नि तिचा नवरा- दोघं म्हणताहेत की यापुढे तू इथं राहू नयेस.
***

कशीबशी सुटी संपवून तो लंडनला परत आला. केंसिंगटन रस्त्यावरच्या एका म्हातारीच्या घरातली एक खोली त्याने मिळवली. हे ठिकाण इतकं शांत आणि सुनं होतं, की संध्याकाळनंतर त्याला ते खायला उठे. तडक उठून उर्सुलाच्या घराकडे पळत सुटावं असं वाटे. मग तो झोपायचा प्रयत्न करे आणि थोड्याच वेळात त्याच्या लक्षात यायचं- आपण तिच्या घराखालीच येऊन उभे राहिलो आहोत. मग त्याला हळुहळू सवयही झाली. तो असा तिथं येऊन उभा राहिला, की आपोआप त्याला तिच्या ओठांचा स्पर्श, केसांचा गंध येऊ लागला..

नाताळच्या आठवड्यात त्याने उर्सुलाचं घर फुलांनी आणि दिव्यांनी सजलेलं पाहिलं. तो थबकला. नाताळच्या या प्रेमाच्या, क्षमेच्या वातावरणात काहीही घडू शकलं असतं. तो धावत पुन्हा आपल्या खोलीवर आला. दाढी केली. नवे कपडे घातले आणि धावत पुन्हा उर्सुलाच्या घरी आला. आतून हसण्याचे, पार्टीचे आवाज येत होते. जिन्यात उभा राहून त्याने आवंढे गिळले, मग जिना चढून वर गेला आणि दरवाजा वाजवला.

खुद्द उर्सुलानेच दरवाजा उघडला. तिने फुलांची नक्षी असलेला हिरवा फ्रॉक घातला होता. ही इतकी सुंदर दिसते? तो पाहतच राहिला. त्याने तिचं नाव घेतलं आणि क्षणार्धात ती म्हणाली- चालता हो.
धाडकन बंद केलेल्या दारासमोर व्हिन्सेंट थोडावेळ थांबला, आणि मग शक्तिपात झाल्यागत परत फिरला.
दुसर्‍या दिवशी तो आपल्या हॉलंडमधल्या गावी परत आला.
***
एका प्रकरणाचा अखेर जवळजवळ निकाल लागला होता. यात मोकळं होण्याचा आनंद मानायचा की हरल्याचं वाईट वाटून घ्यायचं या दोलायमान स्थितीत तो बराच काळ होता. मध्येच तो कुठची तरी ट्रेन पकडे. एखाद्या माळरानावर जाई. आकाशाकडे बघत बसे. रात्रीच्या सुगंधी थंड हवेत बाहेर भटके.

आपला मुलगा कसल्याशा अवघड अवस्थेतून जातोय, हे आईबापांनी ओळखलं. त्यांनी अ‍ॅमस्टरडॅमला कुटुंब हलवायचा निर्णय घेतला. तिथं आधार मिळणार होता. ओळखी होत्या. व्हिन्सेंटला काम आणि शिक्षण असं दोन्ही मिळणार होतं. तिथूनच जवळ असलेल्या रॅम्सगेट नावाच्या एका छोट्या उदास भकास गावात त्याला शिक्षकाची नोकरी शेवटी मिळाली.

त्याने हिशेब केला- उर्सुलाच्या लंडनच्या घरापासून हे ठिकाण म्हणजे रेल्वेने अंदाजे साडेचार तास.
***

जेवण आणि राहाणं फुकट,' या बोलीवर नोकरी लागली होती. शाळाप्रमुखांकडे व्हिन्सेंटने थोडे पैसे मागून बघितले, पण त्यांनी हात वर केले.

मग शनिवारी पहाटेच तो चालत निघाला. रस्त्यात लागलेल्या तळ्याकाठी, कॅथेड्रलसभोवतीच्या बागांमध्ये त्याने आलटून पालटून विश्रांती घेतली. अख्खा शनिवार असाच गेला. एक आडोसा बघत त्याने रविवारी पहाटेपर्यंतची वेळ कशीबशी काढली. आणि मग केव्हातरी, जाणीवे-नेणीवेच्या सीमारेषेवर असताना त्याला थेम्स नदी दिसली.

त्याला उर्सुलाचा गंध आला, आणि तिच्या अनामिक ओढीने तो इतकं थकूनही झपाझप तिच्या घराच्या दिशेने चालू लागला. तिचं घर दृष्टिपथात आलं, आणि घरातले दिवे विझले. तो बराच वेळ तसाच उभा राहिला आणि मग छातीतली धडधड थांबवण्याचा प्रयत्न करत मागे फिरला.

जवळजवळ प्रत्येक आठवड्याअखेरीस तो असा चालत लंडनला येऊ लागला. सोमवारी शाळेच्या तासाला परतणं अशक्य होऊ लागलं आणि मग शुक्रवारी रात्रीच तो चालणं सुरू करू लागला. थंडीपावसात काकडत, भुकेल्या, थकलेल्या अवस्थेत हे सारं चालूच राहिलं- फक्त उर्सुला दिसावी म्हणून.

मग त्याला लंडनजवळच इझलवर्थला जरा बरी नोकरी मिळाली. नोकरी होती मास्तरचीच, पण हळुहळू त्याला क्लर्जीमॅनचं काम मिळू लागलं. चर्चमध्ये प्रवचनं लिहून देणे, वाचून दाखवणं- हे काम त्याला आवडू लागलं. परमेश्वराच्या अशा पद्धतीने जवळ जाता आलं तर आपल्यातलं वैगुण्य दूर होईल आणि उर्सुला होकार देईल असं त्याला वाटू लागलं. खरंतर तिच्या लग्नाची तारीख जवळ येत होती, पण व्हिन्सेंट ते मान्य नसल्यागत, तो तिसरा माणूस अस्तित्त्वातच नसल्यागत विचार करत होता.

एकदा काम संपवून तो पावसात चिंब भिजून चालत तिच्या घराजवळ आला तेव्हा वाद्यांचे, संगीताचे, नाचगाण्याचे आवाज आले. बाहेर घोडागाड्या उभ्या होत्या. त्याने एका गाडीवानाला विचारलं- काय चालंय इथ? तर उत्तर आलं- लग्न.

तो थबकला. लाल केस आणि कपड्यांतून पाणी गळत असल्याची पर्वा न करता तसाच उभा राहिला. मग दरवाजा उघडून उर्सुला एका माणसासोबत हसत खिदळत बाहेर आली, आणि सजवलेल्या घोडागाडीत बसली. व्हिन्सेंट अंधारात लपला. ती दोघं एकमेकांच्या मिठीत शिरली आणि एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करू लागली.

तो किती वेळ तिथं उभा होता याचं त्याला भान राहिलं नाही. खूप वेळाने एखादा लोळ अंगावर कोसळल्यागत तो भानावर आला. त्यात आधीचा व्हिन्सेंट पूर्ण जळून खाक झाला, आणि आता आपला नव्याने जन्म झालाय असं त्याला वाटलं.

मग तो घरी आला. सामान आवरलं आणि निघाला- लंडनला कायमचा रामराम ठोकण्यासाठी.
***
चर्चचा अधिकृत 'इव्हान्जेलिस्ट' झाल्यानंतर नंतर व्हिन्सेंट 'बोरिनाज'च्या कोळशांच्या खाणीच्या प्रदेशात गेला. तिथलं दैन्य, कष्ट आणि जगण्याची लढाई बघून तो पुरता हादरला. या लोकांना ख्रिस्ताच्या उपदेश-शिकवणुकीची गरजच काय ? असं त्याला राहून राहून वाटू लागलं. खाणीतल्या अपघात आणि मृत्यूंबद्दल त्याने तिथल्या व्यापार्‍यांशी वाद घातले. पण काहीही उपयोग झाला नाही.
मग नंतर त्याच्या लक्षात आलं- चर्चमध्ये प्रवचनं देणं हा मूर्खपणा आहे. परमेश्वर वगैरे कुठेही नाहीय. तो असता तर हे असं क्रूर, बेभरवशाचं, जन्मच नको करून टाकणारं जिणं कुणाच्या नशिबी आलं नसतं.
मग तो तिथून निघालाच. दरम्यान एक झालं होतं- त्यानं खाणकामगार आणि गरीब शेतकर्‍यांची असंख्य चित्रं काढली होती.
***
vincent1.jpg
The Weaver (1884)

आणि मग तो परत घरी आला.
तिथं त्याला आपली मावसबहीण- के भेटली. ती नुकतीच विधवा झाली होती आणि तिला एक लहान मुलगाही होता. उर्सुलानंतर जवळजवळ सहा-सात वर्षांनी त्याच्या भावनांना पुन्हा एकदा फुंकर मिळाली. इतकी वर्षं जणू त्याच्यातला पुरुष हरवला होता, तो आता गवसला; आणि नवरा गेल्याच्या निराशेत के ला व्हिन्सेंटच्या सोबतीचा आधार मिळाला. ते दोघे एकत्र भटकू लागले. व्हिन्सेंटला ही सुगंधी सोबत संपू नये असं वाटे. तो चित्रांबद्दल भरभरून तिच्याशी बोले. के त्याचं सारं कौतुकाने ऐकून घेई, मात्र काहीही करून ती प्रेम, लग्न असे विषय काढत नसे. निघाले तरी त्याला उत्तर देत नसे. तिने असं केलं की व्हिन्सेंटच्या फसफसत्या उत्साहावर आणि पुरुषसुलभ उन्मादावर पाणी पडत असे.

एकदा मात्र व्हिन्सेंटला एक निराळीच नशा चढल्यागत झालं. एका अवचित क्षणी त्याने 'के'ला आवेगाने जवळ ओढून आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं सागितलं आणि सरळच लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला थिजून गप्प राहिली. मात्र त्याने काय केलं हे तिच्या मेंदूत झिरपलं तेव्हा ती शेतांतून ओरडत धावत सुटली. तिला हे सर्वस्वी अनपेक्षित होतं. यानंतर त्याची घरातही खरडपट्टी काढण्यात आली. ''मिशले'सारख्या लोकांची पुस्तकं वाचून तू बिघडलायस' असंही सांगण्यात आलं. आपलं काय चुकलं, हेच त्याला कळेना. आपल्यावर आणि आपल्या चित्रांवर भरभरून बोलणारी, मनस्वी वाटणारी के अशी अचानक का बिघडली? हे त्याला समजेना.

त्याला वाटलं, पुन्हा एकदा कुणावर तरी प्रेम करण्याच्या कल्पनेने के घाबरते आहे, तिची भीती समजुतीने काढायला हवी. जरा सबुरीने घ्यायला हवं. त्याच्या मनाने पुन्हा उभारी घेतली. आपण समजून-सवरून केलेलं प्रेमच के ला यातून बाहेर काढेल याची त्याला खात्री वाटू लागली, तसा तो मनोमन के वर आणखीच प्रेम करू लागला. तिच्यासाठी कासावीस होऊ लागला. त्याने थिओला, आपल्या भावाला पत्रं लिहिली, तशी के लाही लिहिली. पण ती पत्रं वाचत असल्याचंही चिन्ह दिसेना. एक दिवस थिओसोबत स्ट्रायकरकाकांचं, म्हणजे के च्या बापाचंही पत्र त्याला मिळालं. त्यात लिहिलं होतं- के एका श्रीमंत माणसावर सध्या प्रेम करते आही. कदाचित लग्नही करेल.

व्हिन्सेंटने उठून के चं घर गाठलं. मोलकरणीच्या अडवणुकीला न जुमानता सरळ आत घुसला आणि जेवत असलेल्या स्ट्रायकर कुटुंबासमोर जाऊन उभा राहिला. म्हणाला- मला केशी बोलू द्या. तिच्यावर प्रेम आहे माझं.

स्ट्रायकरने आधी थोड्या तुच्छतेने, आणि जरा समजूत काढायच्या थाटात त्याचं बोलणं उडवून लावलं. के तुझ्यासारख्या मुर्खावर प्रेम करणं या जन्मात शक्य नाही, असंही म्हणाला. व्हिन्सेंट तिथून हलेना तसा त्याचा उनाड, रिकामटेकडा, नालायक, दुसर्‍यांच्या पैशांवर जगणारा आणि कृतघ्न वगैरे शब्दांत अपमानही केला. व्हिन्सेंट कळवळून म्हणाला- मला फक्त एकदा बोलू द्या तिच्याशी.

अनेक विनवण्या केल्यानंतर व्हिन्सेंटने सरळ मेणबत्तीवर हात धरला. काही क्षणांतच त्याची कातडी जळू लागली, आणि स्ट्रायकर त्याला शिव्या देत झेपावला, आणि ओरडत त्याने व्हिन्सेंटला घराबाहेर काढलं. जळालेला हात तोंडावर घेऊन तो कालव्यापाशी आला आणि मग त्याचा गळा दाटून आला. तोंडावरचा जळालेला हात काढला तर हुंदका येईल असं त्याला वाटलं आणि त्याने तो आणखीच दाबून ठेवला. असह्य होईपर्यंत.
***

पुन्हा भिरकावला गेल्यागत तो गावाकडे, म्हणजे ड्रेन्थला आला. तिथं मोव्ह, म्हणजे त्याचा मेव्हणा होता. त्याच्या शेजारीच त्याने एक जागा भाड्याने घेतली. भाऊ थिओ महिन्याला शंभर फ्रँक्स पाठवायचा, त्यात सगळं भागवावं लागणार होतं. चित्रं काढण्यासाठी मॉडेल्सना वगैरेना पैसे देणं म्हणजे चैनच होती.

त्यातही बरं हे होतं की मोव्ह त्याला शिकवत होता, चित्रांबद्दल बोलत होता. थिओचे पैसे यायला कधीकधी उशीर होई. अशा वेळी मोव्हचं हे असं सोबत असणं त्याला आश्वासक वाटायचं. चित्रं काढण्यासाठीचं सामान घेतलं की जेवण्यासाठी पैसे राहत नसत. त्याला पुन्हा ते बोरिनाजच्या कोळशाच्या खाणीचे दिवस आठवायचे. आपला जन्मच भुकेलं राहण्यात जाणार का, असा विचार मनात येऊन तो निराश होई.

एकदा थिओचे पैसे आल्यावर स्टेशनसमोरच्या एका स्वस्त अंधार्‍या कॅफेमध्ये गेला. इथं सगळे कामगार असायचे. प्यायला येण्यापेक्षा 'आश्रयाला' येणारे. शेजारी एक बाई वाईन पीत बसलेली. वेटरला तिने 'पैसे संपले' म्हणून सांगून टाकलं. तसा व्हिन्सेंट म्हणाला- माझ्यासोबत पी.

सगळं मान्य असल्यागत ती शेजारी येऊन बसली. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती तशी सामान्यच होती. तिच्या हातातला ग्लास बघून त्याला के हातात ग्लास कशी धरायची ते आठवलं. हे अगदीच अजागळ प्रकरण होतं.

मग त्याला कळलं- तिचं नाव सिएन ख्रिस्तीन होतं. आणि ती धंदेवाईक होती. आताशा धंदा नीट चालत नसल्याने धोबिणीचं काम करत होती. पण त्यातही मुलांना खाऊ पिऊ घालण्याइतपतही पैसे मिळत नव्हते.

तिच्या निस्तेज शरीराकडे आणि चमकदार डोळ्यांकडे पाहत व्हिन्सेंटने तिला विचारलं- माझ्या चित्रांसाठी पोझ करशील का?
***
vincent2.jpg
Sien Christine (Facing Left)

ख्रिस्तीन मग अधुनमधून त्याच्याच जागेत राहून त्याच्यासाठी चहा, खाणं वगैरे बनवू लागली आणि ती त्याला चक्क सुंदर वाटू लागली. त्याने तिची अनेक चित्रं केली. तो चित्रांच्या नादात असताना घरात खायला काय आहे नि खिशात किती पैसे आहेत याचं भान विसरून जाई, तेव्हा ती उधारउसनवारी करून बाहेरून खायला घेऊन येई. हळूहळू त्याला तिच्या मैत्रीचा आधार वाटू लागला. मॉडेलिंगसाठी तो तिला दिवसाला एक फ्रँक देई. पण नंतर ते अशक्य होऊ लागलं. त्याने काम बंद केलं पण तरीही ती येत राहिली. घरून ब्रेड, बटाटे आणि चीज जमेल तसं आणत राहिली. व्हिन्सेंटचा जीव तिच्यात अडकलाय, हे बघून तीही त्याच्यासाठी जीव देऊ लागली. तिनं त्याला सांगितलं- तू छान आहेस, आणि मला आवडतोस. आय लव्ह यू.

आणि मग ती तिथलीच झाली. संसार करणार्‍या बाईगत ती व्हिन्सेंटच्या चित्रांचं, कमाईचं, खर्चाचं बघू लागली. तिचा रुक्ष करकरीत आवाज त्याला गोड वाटू लागला. घरातला बाईचा वावर आणि भांड्याकुंड्यांत उकळणार्‍या चहा-कॉफी-सूप चा वास त्याला सुखद वाटू लागला.

मात्र साधा पाव, कॉफी कुठून आणायचं हा प्रश्नच होता. वायसेनब्रुक, मोव्ह, द बोक्, टेर्स्टीजसारखे श्रेष्ठ कलाकार आणि चित्रविक्रेते त्याच्या कामावर खुष नव्हते. त्याची चित्रं विकली जात नव्हती, आणि कुणीही त्याला पैसे उसने द्यायला तयार होत नव्हतं. वायसेनब्रुकने (Weissenbruch) तर स्पष्ट सांगितलं- तुला श्रेष्ठ चित्रकार व्हायचं असेल तर या यातनांमधून जा, भुकेला राहा. फार तर दोनेक दिवसांतून एकदा काळा पाव खा, तरच तुझी चित्रं उच्च दर्जाची होतील!

त्याचा एकमेव आधार त्याचा भाऊ थिओ होता. त्याने दरमहा पैसे पाठवले नसते तर तो एव्हाना मेलाच असता. त्याने ख्रिस्तीनला घरी आणून ठेवलंय हे थिओला कळलं तर त्याची काय प्रतिक्रिया असेल या विचाराने तो हादरून जात असे. त्याच्या चित्रकार आणि विक्रेत्या मित्रांनी त्याला आधीच तिला आणून ठेवल्याबद्दल शिव्या द्यायला चालू केलं होतं. आम्ही लग्न करणार आहोत- असं व्हिन्सेंट कळवळून म्हणाला की ते शहारून वगैरे म्हणत- बापरे! भूत बरं दिसतं रे यापेक्षा!

भावानेही आपल्याला टाकलं तर काय या विचाराने तो भेदरून पार केविलवाणा होऊन जाई. त्याने थिओला लांबलचक पत्रं लिहिली. त्याच्या मनातलं ख्रिस्तीनबद्दलचं सारं काही सांगून टाकलं. सुरुवातीला थिओही हादरलाच. त्याने नाना विनंत्या केल्या, संबंध तोडून टाकण्याच्या, पैसे बंद करण्याच्या धमक्या दिल्या. पण मग सावकाश समजूनही घेतलं. येऊन बघेन तेव्हा माझं मत ठरवेन, असं म्हणाला. व्हिन्सेंटचं नशीब इतकंच, की महिन्याचे पैसे पाठवणं मात्र त्याने बंद केलं नाही. कधी उशीरही होई. तेव्हा व्हिन्सेंट सारी खरेदी बंद करी. जास्तीत जास्त किती काळ भुकेला राहता येतं याचे प्रयोग करून पाही. थिओ त्याच्याकडे आला, तेव्हा ख्रिस्तीन त्याच्याशी सभ्यतेने, मृदू आणि एखाद्या सुगृहिणीसारखी बोलली वागली. व्हिन्सेंटलाही ती यावेळी जास्त सुंदर आणि सुस्वभावी वाटू लागली. व्हिन्सेंट तिच्यासोबत सुखी आहे, तर हरकत नाही, अशी थिओने स्वतःची आणि आईवडिलांचीही समजूत करून दिली.

व्हिन्सेंटच्या घरी येण्याआधीच ख्रिस्तीन गर्भार होती. याआधी अनेक वेळा गर्भार राहिल्याने यावेळी परिस्थिती जवळजवळ हाताबाहेर जाईल अशी होती. ती आधी धंदा करत होती हे डॉक्टरांनी ओळखलं, आणि स्पष्ट सांगितलं- आता पुन्हा ती त्या वाटेला गेली, तर ती वाचणार नाही. आता पण व्हिन्सेंटने कसेबसे पैसे जमवले, आणि तिचं ऑपरेशन यशस्वी केलं. ती घरी आली तेव्हा बायको घरात नव्याने आल्यागत त्याला वाटलं. मूल कुणाचं होतं याची त्याला पर्वा नव्हती, पण आता खाणारी तोंडं वाढली- त्याचं काय करायचं हा प्रश्न होताच.

वायसेनब्रुक एक दिवस आला तर ख्रिस्तीन पाळण्यातला बाळाला झोका देत होती, आणि एखाद्या प्रेमळ कुटुंबागत दोघे शेजारी बसले होते. तो ओरडला- वा, क्या सीन है! मी तुमचं चित्र काढलं तर त्याला नाव देईन- 'होली फॅमिली'!

व्हिन्सेंट दातओठ खात त्याच्यावर धावून गेला तसा वायसेनब्रुक चपळाईने बाहेर निघून गेला. एक धंदेवाली, तिचं एक- बापाचं नाव माहीत नसलेलं पोर आणि यांचा पालनहार- व्हिन्सेंट. लोक असंच म्हणणार हे त्याला कळून गेलं. तो खाली मान घालून परतला. ख्रिस्तीनने विचारलं- काय म्हणत होता तो? व्हिन्सेंटला त्याचं कुत्सित उत्तर ऐकून पुन्हा एकदा डोक्यात तिडीक गेली. पण शांत राहून तो ख्रिस्तीनला म्हणाला- तो आपल्याला पवित्र कुटुंब म्हणाला. म्हणजे मदर मेरी, जोसेफ आणि जीझस.

ख्रिस्तीनचे डोळे पाणावले आणि तिने त्याच्या कुशीत तोंड लपवलं. व्हिन्सेंटने मग सावकाश तिला मिठीत घेतलं.
***

त्याच वायसेनब्रुकने काही दिवसांनी व्हिन्सेंटची पाच चित्रं चांगली किंमत देऊन विकत घेतली. कितीही खवट नि तुसडा असला, तरी तो सच्चा चित्रकार आणि रसिक होता, हे खरं. मग व्हिन्सेंट दुप्पट जोमाने कामाला लागला. थिओकडून पैसे आले रे आले, की तो बाजारात जाऊन ऑकर, कोबाल्ट, प्रशियन ब्ल्यू, नेपल्स यलो, टेरा सिएन्ना, अल्ट्रामरीन रंगांच्या महागड्या ट्यूब्ज अधाशासारखा विकत घेऊन येई. ख्रिस्तीनने हे असं कधी बघितलं नव्हतं. तिला त्याची चित्र छान वाटत होती, पण नक्की कशामुळे ते सांगता येत नव्हतं. तिने विचारलं, की व्हिन्सेंट वायसेनब्रुक, पिसारो, मिय्ये, मोव्ह, मोने, गोगँ, सरा, सिन्याक, रन्वार, सिसले, दगा, लोत्रेक वगैरेंशी बोलल्यागत चित्रांबद्दल आणि त्यांतून त्याला काय सांगायचं आहे, काय दिसतं आहे याचं मोठ्या उत्साहात वर्णन करी.

ख्रिस्तीन त्याच्या तोंडाकडे बघत नुसती मान डोलवत राही. या सार्‍यासाठी इतका खर्च का करायचा आहे- याचं उत्तर तिला मिळेना. ही चित्रं विकली जातील तेव्हा खर्चाच्या शेकडोपट पैसे मिळतील- हे व्हिन्सेंटने सांगितलेलं सत्यात उतरण्याची ती वाट बघत राहिली.
***
vincent3.jpg
Potato Eaters (1885)

व्हिन्सेंट झपाटल्यासारखा काम करू लागला, आणि कॅनव्हास नि रंग विकत घेतल्यावर घरच्या खर्चाची पुन्हा त्रेधा उडू लागली. एक वर्षापासून कुटुंबासारखंच ते राहत असले तरी व्यवस्थित कमावू लागेपर्यंत त्याने लग्न करू नये या बोलीवरच थिओ त्याला पैसे पाठवत होता. पण लग्न केलं नाही म्हणून घरची कामं वाचत नव्हती. तिला फार काम करायला लागू नये आणि तिने पहिल्यासारखंच पुन्हा चित्रासाठी पोझ द्यायला बसायला चालू करावं म्हणून व्हिन्सेंट स्वतःच घरची रोजची कामं उरकण्यासाठी पहाटेच उठत असे. पण आता ख्रिस्तीन पोझ देण्यासाठी टाळाटाळ करू लागली आणि काहीतरी कारण काढून सारखी आईकडे जाऊ लागली. तिची आई व्हिन्सेंटला आवडत नसे कारण ती सतत बारीसारीक गोष्टींत नाक खुपसे आणि आता तर तिने ख्रिस्तीनचे कानच भरायला सुरू केलं होतं. खरंतर कोण चूक नि कोण बरोबर हे ठरवणं अवघड होतं. व्हिन्सेंटला चित्रं हवी होती आणि ख्रिस्तीनला स्वतःसाठी आणि मुलांसाठी बरं अन्न आणि झालंच तर प्यायला जिन, वाईन हवी होती.

ख्रिस्तीनचं जुनं वागणं हळुहळू उफाळून येऊ लागलं. ती सारखी आईकडे जाऊन अनोळखी पुरुषांसोबत दारू पिऊ लागली. एकेकाळी त्याच्या एका स्पर्शासाठी आणि प्रेमाच्या एका शब्दासाठी आसुसलेली सिएन ख्रिस्तीन हीच का? असा प्रश्न त्याला पडला. कुरबुरी वाढू लागल्या, आणि अशातच थिओने कळवलं- यापुढे पैसे पाठवणं अवघड आहे. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता, आणि तिला उपचाराची गरज होती. शिवाय पुढे जाऊन त्याला तिच्यासोबत लग्न करायचीही इच्छा होती.

व्हिन्सेंटने हेच ख्रिस्तीनसाठी एक वर्षापुर्वी केलं होतं. त्याने कळवळून सांगितलं- थोडी वाट बघ भावा. माझा प्रवास उलट दिशेने सुरू झाला आहे..

कुरबुरी असोत, पण आता मुख्य प्रश्नच उपस्थित झाला होता. पैसेच नसतील तर घर चालणारच नव्हतं. व्हिन्सेंटने तिला मुलांसकट गावाकडे, म्हणजे ड्रेन्थला जाऊ असा आग्रह केला, परोपरीने विनवलं. मात्र तिने ऐकलं नाही. व्हिन्सेंट म्हणत होता ते खरं झालं. म्हणजे चित्रं विकली जाऊन जास्त पैसे आले, तरीही चित्रांचा खर्चालाच प्राधान्य मिळणार आणि तो खर्च वाढतच राहणार. या चित्रांशिवाय व्हिन्सेंट जिवंतच राहणार नाही, हे तिला कळून चुकलं होतं. आपलं भागणार नाही, आणि आता वाटाच वेगळ्या आहेत- असं तिने त्याला समजावून सांगितलं. स्टेशनवर निरोप द्यायला ती मुलांना घेऊन आली. निरोप घेताना काय बोलावं ते कुणालाच कळलं नाही. सारं काही आधीच बोलून झालं होतं.

त्याच्या पोटचा नसला तरी ख्रिस्तीनवर केलं होतं, तितकंच प्रेम त्याने धाकट्या अँटोनवर केलं होतं. त्याची चित्रं काढली होती. त्याने मागे वळून पाहिलं. ते तिघं काळोखात दिसेनासे होत होते आणि त्याच वेळी ख्रिस्तीनची काढलेली असंख्य पेंटिंग्ज त्याच स्टेशनच्या काळोखात उजळ आणि ठसठशीत होऊन पुढे येत होती. फक्त चित्रं नव्हती ती, व्हिन्सेंटला घडवणारी शाळा होती.
***

व्हिन्सेंट पुन्हा आपल्या घरी आईवडिलांकडे आला. घरातले त्याची मनस्थिती त्यातल्या त्यात जपत त्याच्याशी प्रेमाने वागत होते. न्युनॉन छोटं गाव होतं आणि इथंही सारे कष्ट करूनच जगत होते, विशेषतः विणकाम किंवा शेतीकाम करून. इथल्या शांत, संथ, ठहराव असलेल्या आयुष्यात तो बुडून जाऊ लागला. थिओडोरसने, म्हणजे त्याच्या वडिलांनी बागेतल्या झोपडीत त्याच्या स्टुडिओसाठी जागा दिली. मग व्हिन्सेंट तासन् तास कष्टकर्‍यांची, विणकरांची, शेतातल्या महिलांची, खोदकामगारांची, कालव्यांची, शेतांची, लाल-तपकिरी रंगाच्या शेतजमिनींची चित्रं काढू लागला. सकाळ झाली की हा ईझल, कॅनव्हास, ब्रश, रंग आणि त्यांच्या बशा घेऊन निघे, तो थेट दिवेलागणीला घरात अवतरे! बाहेर काय, पण घरातही कुणाशी फार बोलत नसे. आवडत्या लेखकांविषयी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी, मांडणीविषयी थिओडोरसशी मतभेद झाले, की जरा चिडून आपलं जेवणाचं ताट कोपर्‍यात घेऊन तो बसे. भावा-बहिणींशीही फार सख्य जमेना. बहीण तर याच्या विक्षिप्तपणामुळे माझ्या लग्नाला अडचणी येतील म्हणू लागली.

गावातल्या एकमेव गल्लीतून स्वारी जात असताना गावातले लोक दरवाजे किलकिले करून उत्सुकतेने बघत. व्हिन्सेंटच्या लेखी तो रोज अपार कष्ट करत होता. मात्र गावकर्‍यांना एका लहरी कलाकाराची दिनचर्या दिसत होती, काम नव्हे. त्यांच्यासारखं किंवा इतर कुठचंही 'काम' न करणारा, पण तरीही दिवसभर व्यग्र असणारा असा माणूस ते आयुष्यात पहिल्यांदाच बघत होते. इतर लोक दिवसभर शेतात असत तसा हाही शेतातच असे, पण हा काहीतरी वेगळंच काम करी..

त्याला मग या लोकांच्या नजरांची सवय झाली.
पण हळुहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं- एक नजर त्याचा पाठलाग करत होती.
***
कुणीतरी आपल्या मागे येतंय, आणि आपल्याला दिसण्याच्या आधीच नाहीसं होतंय- हे त्याला गेल्या काही दिवसांपासून जाणवत होतं. एकदा त्याने चित्रातलं लक्ष वळवून नीट बघितलं तर एक पांढरा स्कर्ट झाडामागे लुप्त झाला. चित्र काढणं चालू असताना ती सतत त्याच्या मागे उभी राहून एकटक बघत राही, हेही त्याला मग कळलं सावकाश.
नंतर एकदा शिताफीने चकवा देऊन उलटा पाठलाग त्याने केला, तर ती मुलगी त्याच्या शेजारच्याच घरातली निघाली.

एकदा तो झपाटल्यागत काम करत असताना तिच्या नजरेची धग त्याला पाठीमागून जाणवली. ती हळुहळू जवळ येतेय, हेही त्याला कळलं. नंतर त्याने अचानक मान वळवून पाहिलं, तेव्हाही ती हलली नाही. संमोहित झाल्यागत ती त्याच्या चित्राकडे बघत होती.

डोक्यातले, हृदयातले, नजरेतले सारे प्रपात चित्रात ओतून झाल्यावर त्याच्या लक्षात आलं- ती अगदी शेजारीच उभी आहे; तशीच एकटक चित्राकडे पाहत. ओठ कोरडे पडून बोलायला सुचू नये अशी तिची अवस्था झाली होती. कसली भीती होती का तिला?

शेवटी तिच्या बोलण्याची वाट न बघता तोच म्हणाला- मी व्हिन्सेंट, तुमचा शेजारी. तिची तंद्री भंग झाल्यागत भानावर येऊन ती म्हणाली- मी मार्गो (Margot) आणि मग तो ताण सहन न झाल्यागत ती कोसळली. व्हिन्सेंट घाबरला. त्याने तिच्या चेहेर्‍यावर पाणी मारलं आणि ती जरा भानावर आली. साध्या चेहेर्‍याची, तपकिरी गूढ डोळ्यांची ती मग हिरव्यानिळ्या डोळ्यांच्या व्हिन्सेंटकडे बघत राहिली.

आणि अनाहूतपणे तिने त्याच्या गळ्यात हात टाकून आपले ओठ त्याच्या गालांवर टेकले.
***
vincent4.jpg
The Cypress and the Wheatfield (1889)

मग दोघे रोज चित्रासाठीची जागा शोधत सोबत फिरू लागले. व्हिन्सेंट कधीकधी पाचदहा मैलही चालून जाई. पण तिची तक्रार नव्हती. मी तीनदा प्रेम करूनही मला ते कधी लाभलं नाही, हे त्याने तिला सांगितलं. शिवाय मी चित्रं काढतो खरी, पण ती कधीच विकली जात नाहीत- हेही. मित्र नाहीत, आणि इतर चित्रकारांचं फार पटत नाही, त्यांच्याशी जमत नाही- हे सांगितलं. खरंतर कुणाशीच आजवर नीट कधी जमलेलं जुळलेलं नाही- हेही सांगितलं. बोरिनाजचं, अँमस्टरडॅमचं हलाखीचं जगणं, सहकलाकारांनी केलेली हेटाळणी, आणि उपाशी राहण्याचे दिवस याबद्दल सांगितलं. वेश्येसोबत दोन वर्षं राहिलो आहे, तिच्यावर प्रेम केलं, सुधारण्याची वाट बघितली, तिची मुलंही सांभाळली- हे सांगितलं.

पण मार्गोला जणू नशा चढली होती. ती व्हिन्सेंटच्या प्रेमात पुरती हरवली होती. व्हिन्सेंटला ती पहिल्यांदा पंचविशी-तिशीची वाटली असली तरी तिने पस्तिशी ओलांडली होती आणि इतका सगळा काळ तिने प्रेमाची, पुरुषाची वाट बघितली होती. तो तिला आता सापडला होता. ती त्याच्या प्रेमात पडली होती, हे तिला पुरेसं होतं. त्याने तिच्या प्रेमात पडण्याची अटच तिची मुळात नव्हती.

ती एकदा त्याला म्हणाली- तू ख्रिस्त आहेस.
***

अजूनही वेळ आहे, हिने आपल्यापासून दूर जावं असं त्याला वाटे. कारण गावात, त्याच्या आणि तिच्याही घरात या दोघांनी एकत्र यावं असं वाटण्याइतकी अनुकूल परिस्थिती नव्हती. गावातले लोक एखाद्या विक्षिप्ताकडे बघावे तसे त्याच्याकडे बघत. पण एकदा त्याच्या आईचा पाय मोडला आणि बोरिनाजमधल्या शुश्रुषेच्या अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या बळावर डॉक्टरांच्या मदतीशिवाय त्याने तो बरा करून दाखवला आणि मग त्याची गावात पत थोडी वाढली. पण बोरिनाजच्या खाणींत केलेलं काम ही वरवरची गोष्ट होती. खरी गोष्ट होती- एखाद्या अस्सल चित्रकाराला मानवी शरीरशास्त्राबद्दल जी जबरदस्त आसक्ती आणि कुतूहल असते, ती.

पण इतकं पुरेसं नव्हतं. पुरेसं मिळव आणि मग लग्न कर- असं बापाने आधीच सांगून ठेवलं होतं. तिकडे मार्गोच्या घरात व्हिन्सेंटचा सारा इतिहास माहितीच होता. त्यांनी ठरवलं- याच्याशी लग्न करण्यापेक्षा मार्गोट अशीच राहिली तर जास्त बरं आहे. व्हिन्सेंट एकदा तिच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं- मी आजवर कुणालाही सोडलेलं, टाकलेलं नाही. उलट माझ्यावरच ती पाळी आली आहे. पण मार्गोटच्या आईला, बहिणींना हे पटत नव्हतं. तिने व्हिन्सेंटसारख्याशी लग्न करण्यापेक्षा इतर बहिणींसारखं आजन्म अविवाहित राहून स्वतःचा आब सांभाळला तर कुटुंबाची प्रतिष्ठा जपली जाणार होती.
***

मग ती एक दिवस नेहेमी त्याच्यासोबत शेतात येई तशी आली. त्याचा हात आणि दंड पकडून काहीतरी मोकळं झाल्यागत, कोडं सुटल्यागत बोलली- तुझ्यावर प्रेम करणं ही आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट होती व्हिन्सेंट, थँक्स!

आज ही इतकी मोकळी, इतकी स्वच्छंद, इतकी सुंदर कशी दिसते आहे, याचा विचार करत असतानाच तिच्या हातातल्या बाटलीचा आवाज आला, आणि तिच्या तोंंडातून फेस बाहेर पडला. तो धावला पण तोवर उशीर झालेला.
तिची आई व्हिन्सेंटच्या नावाने कांगावा करत होती आणि त्याला मात्र आठवत होती करडी-तपकिरी मातीची शेतं. त्यांत मांडलेले कॅनव्हास आणि तिथंच रंगलेले शृंगार. चित्रांतल्या कष्टकर्‍यांच्या चित्रांना निरखून बघणारी मार्गो. विणकर्‍यांची चित्रं इतकी सुंदर असतात हे पहिल्यांदा कळलं असं म्हणणारी मार्गो. लपून त्याच्या चित्रांचं निरीक्षण करणारी मार्गो. तू माझ्यावर प्रेम करायची गरज नाही म्हणणारी मार्गो.

त्याला तो झाडामागे हलकेच अदृश्य होणारा पांढरा स्कर्ट आठवला. शेतातल्या तपकिरी काळ्या मातीत त्याने चेहेरा खुपसला. क्षणभर त्याला वाटलं, त्याचे अश्रू मातीत मिसळून काहीतरी नवीन जन्माला येईल. कदाचित मार्गो.
***
vincent5.jpg
Wheatfield with Crows* (1890)

त्यानंतरच्या मिनिटात असेल किंवा दशलक्ष वर्षांनी, व्हिन्सेंटने स्वतःचा कान वस्तर्‍याने कापून टाकला. त्याच्या आधी त्याला वाटलं असेल- एक प्रचंड पक्ष्यांचा क्रूर थवा आपल्या माथ्यावरच्या गव्हाच्या शेतावरनं घोंगावत जातोय. किंवा मग हे फार पूर्वीच वाटलं असेल.
***

आणखी काही सेकंदांनी, म्हणजे काही दशलक्ष वर्षांनी सूर्य, चंद्र, तारे, प्रकाश आणि इतकंच काय, पण सायप्रससारख्या वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टींनी आपलं रूप बदललं. व्हिन्सेंट सूर्यफुलाच्या सावल्यांत गेला नसता तर हे बघायला मिळालं नसतं.
त्या सायप्रसचं आकाशाला हाक मारत आर्ततेने आवेगाने वर जायला एकच कारण असेल- 'व्हिन्सेंट' नावाची प्रेमकथा.
***
vincent6.jpg
Starry Night (1889)

***

***

संदर्भ :
'व्हिन्सेंट व्हान गॉग'- आयर्व्हिंग स्टोन (अनुवाद- माधुरी पुरंदरे)
चित्रे आंतरजालावरून साभार
Dear Theo (The Letters of Vincent Van Gogh)
https://www.wikiart.org/en/vincent-van-gogh
https://www.vangoghmuseum.nl

साजिरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव जबरदस्त! त्याच्या चित्रांनी मनावर कायमचे गारुड केले आहेच. स्टारी नाइट , सायप्रस बघून काय वाटते ते शब्दात धड सांगता येत नाही, ती चित्र जिवंत आहेत , हलत आहेत असे वाटते, सायकॅडेलिक ड्रग खाऊन डोळ्यांना जग कसे दिसत असेल तसे काहीतरी. पण विसरू शकत नाही तुम्ही ती चित्रं. त्यातले सायप्रस (ओरिजिनल) काही वर्षापूर्वी म्यूझियम मधे चक्क प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळण्याचे भाग्य मिळाले ! व्हॅन गो च्या ब्रश स्ट्रोक्स च्या प्रत्यक्ष समोर आपण आहोत या कल्पनेनेच एक्साइट व्हायला झाले!
त्याच्या आयुष्याची कहाणी तुकड्या तुकड्यात माहित होती पण पूर्ण कथा आता पहिल्यांदाच वाचली. किती ट्रॅजिक आणि मनस्वी आयुष्य.

सुंदर लिहिलंय!

व्हिन्सेन्टबद्दल पोटात तुटतं, त्याच्या संपर्कात आलेल्या, नात्याने बांधलेल्या, प्रेमात पडलेल्यांबद्दल जास्त तुटतं!
त्याच्या चित्रांचं त्याच्या हयातीत यथायोग्य मूल्यमापन होऊन त्याला पैसा / प्रसिद्धी मिळाली असती तर त्याच्या नियतीचं चित्र काही निराळं दिसलं असतं का? की फक्त तो 'गरीब अप्रसिद्ध मनोरुग्ण पेंटर'ऐवजी 'श्रीमंत प्रसिद्ध मनोरुग्ण पेंटर' झाला असता? की मग त्याच्या पेन्टिंग्जमधून रेडिएट होणारा तो मॅडनेस संपला असता? सांगणं अवघड आहे.
पेंटिग्जच्या प्रेमात पडणं सोपं आहे - माझ्या ममव मनाला निदान तेवढं झेपतं हे काय कमी आहे!

मार्क ट्वेनचं एक पात्र म्हणतं, 'A painter has so much more talent when he is dead. Indeed the deader he is, the better he is!'
इलाज नाही!

विलक्षण!

त्याची चित्रं बघताना त्याचं तुटलेपण जाणवायचं, पण ही अशी कहाणी माहीत नव्हती. ओघवत्या शैलीत ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.
आता त्याची कथा आणि चित्रांची संगत लागते का बघायचं...
मुलखावेगळ्या कलाकाराची ही हृदय हेलावणारी कथा.
आजचा दिवस सार्थकी लागला.

लिहीलंय पण खूप सुंदर... शब्दच नाहीत सांगायला!

सुंदर लिहिलंय. आवडता artist असल्यामुळे माधुरी पुरंदरे यांचं पुस्तक संग्रही आहे. यात फक्त प्रेमाचा आढावा घेतल्यामुळे जास्त अंगावर आला. बिचारा विन्सेंट.

सुरुवातीला विन्सेंट आणि अर्सुला वाचून वाटलं पुण्यातल्या convent शाळांमधली काहीतरी सत्य प्रेमकथा आहे. Happy

साजिरा आणि विन्सेंट म्हटल्यावरच समजलं होतं की कुणाची कथा आहे.
त्याची चित्रं जितकी मनस्वी असतात तशीच ही कथा झालीय.
हॅटस् ऑफ टू यू.

यावरून आठवलं की ॲमस्टरडॅमला जाऊन तिथलं म्युझिअम पाहणे हे बकेट लिस्टीत आहे. त्याची ओळख करवून देणारं लहान मुलांसाठीचं पुस्तकही मुलीने घेतलं होतं. ते ही असंच काहीतरी वेगळं आहे. शोधणं आलं.

साजिरा,सुंदर लिहिलंय.

चित्राविषयी काहीच कळत नाही.पण का कोण जाणे ही वरची अणि इतरत्र पाहिलेली चित्रे खिन्न करतत.
The Cypress and the Wheatfield हे तर अंगावर आले. गॉगच्या चित्रातिल पिवळ्या रंगाच्या छटेविषयी वाचलं होते.तो रंग खिळवून टाकतो.

धन्यवाद मित्रहो.

खिन्नता किती महत्वाची आहे, हे मला गॉड ऑफ स्मॉल थिंग्स आणि साहिब बिबी गुलाम सारख्या पुस्तकांनी शिकवलं (ही उदाहरणं. अशी अनेक). नंतर गुरुदत्त आयुष्यात आला. (त्याचा साहिब बीबी वरचा सिनेमाही) नंतर सावकाश van gogh. यांनी तर खिन्नतेला सिंहासनच देऊन टाकलं. दोघे लेकाचे चाळीशीत गेले, कसलासा अकस्मात आलेला विजेचा लोळ साजरा करत.

पिवळा रंग त्याने अक्षरशा साजरा केला. इतकी इमोशनल एनर्जी मला अजून सापडायची आहे. त्याच्यासोबतच्या निळ्या जांभळ्या रंगाने आणखी निराळंच अधिष्ठान दिलं, आणि van gogh अमर झाला.

मला चित्रं टाकायची नव्हती, कारण ती सगळीकडे दिसतात. या माणसाच्या प्रेमाबद्दल, प्रेम करण्याबद्दल फक्त लिहायचं होतं. पण शेवटी टाकली. स्टारी नाइट बद्दल सगळ्यांना खूप माहिती आहे. कलाकारापेक्षाही जास्त चर्चा झालेली कला- याचं एक उदाहरण म्हणता येईल ते.

मला wheatfield and crows हे सगळ्यात जास्त अंगावर येणारं चित्र वाटतं. त्यावर fb post टाकलेली पूर्वी.

अफाट लिहिलं आहेस!
चित्रे टाकलीस ते बरं केलस. त्या तुटलेपणाच्या आवेगात चित्रं आणखी भिडतात.

साजिरा, मस्तं लिहीलंय. किती तरी वर्षातून एकाच बैठकीत फ्लो मधे वाचून काढलेला लेख.

मुद्दामूनच कौतुकाचे शब्द लिहायला आढेवेढे घेत आहे. कारण मगे म्हटलं कि लिहीत जा तर आढेवेढे घेतले होते. कसचं कसचं म्हणत विनय दाखवलेला. (विनय हा शब्द सहस्रबुद्धे शब्दामुळे खोटा वाटू लागलेला आहे.)
एखाद्या सुंदर मुलीला विचारावं कि " बाई दिसायला चांगली आहेस, पिक्चरमधे काम करशील का?" तर तिने आढेवेढे घ्यावेत, "मला जमेल का, मी कशी दिसेन?" आणि नंतर ती मोठी हिरॉईन झाल्याचं समजावं... तसला प्रकार सगळा Wink

सहस्रबुद्धे Lol
कसचं कसचं.. सहस्रबुद्धे कुठे, आम्ही कुठे Proud

फार सुरेख लिहीलंय साजिरा. अनेक वर्षानी माबोवर निवांतपणे आले तर ही मेजवानीच मिळाली एकदम.
स्टारी नाईट त्याचं स्टार क्रिएशन असलं तरी वीटफील्ड अँड द क्रोज विंसेंट मधल्या कलाकाराला जास्त रिप्रेझेंट करतं.

छान लिहिलंय..
Van Gogh Show बघितलाय का ?
नसल्यास जरुर बघा.

तुफान आवडले ! व्हिन्सेंट व्हॅन गॉग घडला (का विखुरला ?) अन् त्या दोलायमान द्वैतात जगाला काय काय देऊन गेला त्याची पार्श्वभूमी वाचणे एक वेगळा अनुभव वाटला. तुमचे खूप आभार. एकदा एका ऑक्शन हाऊस मधे काम करणारा कार्यकर्ता बोलला होता की "चित्रकाराची किंमत त्याच्या मृत्यूनंतरच" व्यावसायिक टोन मधले ते तर्कट ऐकून विषण्ण वाटले होते पण एकंदर गॉग, दाली, तय्यब मेहता, मकबूल फिदा हुसेन पाहून तरी ते पटते.

माझी एक जुनी fb पोस्ट इथं टाकून ठेवतो रेकॉर्ड म्हणून..

—
चित्तरकथा- ७
---
गव्हाच्या शेतातून तीन रस्ते जाताना दिसताहेत. डावा आणि उजवा कदाचित कुठेतरी जाईल न जाईल, पण समोरचा रस्ता पुढे जाऊन जवळजवळ लुप्तच झालेला दिसतो आहे. या हिरव्या मातकट गवताळ पायवाटांच्या पार्श्वभुमीवर खास अशा उजळ पिवळ्या शेड्समधलं शेत उठून दिसतं आहे. थोडं वर बघितलं तर कावळे सैरभैर झाल्यागत उडताना दिसतात, आणि आपली नजरेची बैठक जराशी हलते. आता पुन्हा समोर आत गेलेला रस्ता बघितला तर तो गायब झाल्याचं नव्या अंगाने जाणवतं. जरा अस्वस्थ होऊन आपण पुन्हा वर कावळ्यांकडे आणि त्यानंतर आणखी वर बघतो. वादळ येणार असल्याची चिन्हं आकाशाचे रंग आणि नूर बघून जाणवतात. नंतर संपूर्ण चित्र एका नजरेच्या कवेत घेण्याचा प्रयत्न आपण करतो तेव्हा काहीतरी अशुभसूचक, करुण, वेदनेचा अंडरकरंट असलेली अशी काहीतरी कथा सुरू होईल, असं आपल्याला जाणवायला लागतं.

काय दुखतंय हे न उमजून, स्तब्ध होऊन, मेस्मेराईझ झाल्यागत आपली नजर चित्रावर खिळून राहते. मग सगळे रंग एका फ्रेममधून एकत्र दिसू लागतात- गव्हाच्या शेताचा केशरी पिवळा, पायवाटांचा मातकट आणि कडेला गवताचा हिरवा, आकाशाच्या स्ट्रोक्समधला निळ्या रंगाचा स्पेक्ट्रम आणि या सार्‍या पार्श्वभूमीवर कावळ्यांचा काळा. आपल्या नेहमीच्याच पाहण्यातल्या आणि 'नेहेमीच्या यशस्वी' रंगांचं हे असं अजब, गुढ, गुंगवून टाकणारं काँबिनेशन- हे सारं काहीतरी वेगळं आहे, याची जाणीव व्हायला लागते. हे इतकं सुंदर, खास असं युरोपियन कंट्रीसाईड, हे जबरदस्त पॉवरफुल कलर काँबिनेशन, रंगांची ही अशी श्रीमंती आणि मनावर गारुड करणारे ते वैभवशाली स्ट्रोक्स.
---
व्हिंसेंट व्हॅन गॉग. आपल्या गुरुदत्तसारखाच, अवघ्या ३९व्या वर्षी गेलेला हा जगातला सर्वात महान कलाकार-चित्रकार. आपलं मनस्वीपण त्याने त्याच्या त्या जगप्रसिद्ध स्ट्रोक्समध्ये बुडवून टाकलं. नाही म्हणायला तो भावाला सगळं सांगायचा, पत्रं लिहायचा. ही पत्रंही जगप्रसिद्ध आहेत. पण ते तेवढंच. मनातली गुंतवळ सोडवायला भावाचीही मदत शेवटी झालीच नाही, अँड ही किल्ड हिमसेल्फ.
ज्या वर्षी तो गेला, त्याच वर्षीचं, म्हणजे १८९० सालचं हे चित्र. 'व्हीट्फील्ड विथ क्रोज'. 'इंप्रेशनिस्ट' शैलीतलं, त्याच्या सर्वात जास्त प्रसिद्ध चित्रांपैकी एक. शिवाय त्याच्या 'व्हीटफील्ड' सिरीजमधलंही सर्वात सुंदर, अर्थगर्भ, चिंतनशील आणि अर्थात्च सुप्रसिद्ध. १८८९ आणि १८९० याच २ वर्षांत त्याने जी चित्र काढली, ती सर्वात जास्त जगप्रसिद्ध झाली. अगदी पुस्तकंही निघाली, जगभर चर्चा झाली, पुढच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांवर व्हॅन गॉगच्या शैलीने छत्रछाया धरली. काहींच्या मते हे त्याचं शेवटचं चित्र. मात्र काही वर्षांनी त्याने आणखी काही मोजकी चित्रं (काही अर्धवट असतील) यानंतरही काढली होती, हे सिद्ध झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या दोन वर्षांत तो 'मेंटल असायलम' मध्ये वास्तव्य करून होता. त्याचं सर्वश्रेष्ठ मानलं जाणारं 'स्टारी नाईट' त्याने इथंच काढलं.
---
शेतात जाणारा आणि नंतर लुप्त होणारा रस्ता - हे शेवटी तो ज्या दिशाहीनतेत सापडला होता, त्याचं प्रतीक- असं जवळजवळ सारे क्रिटिक्स आणि अभ्यासक म्हणतात. तसंच कावळे हे अशुभसुचक, शेवट जवळ आल्याचं किंवा काहीतरी वाईट होणार असल्याचं, आणि गडद निळं आकाश हे अर्थातच वादळ येणार असल्याचं सुचवणारंही. तो अत्यंत एकाकी पडला आहे, दु:खी आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी त्याने हे चित्र काढलं, असं त्याने त्याच्या भावाला, थिओला लिहिलेल्या पत्रात आहे. चित्रातल्या कावळ्यांची स्थिती विचित्र, सैरभैर झाल्यागत आहे, आणि या अशुभसुचक संकेताला, कदाचित एरवी मिळालं नसतं, पण याच वर्षी झालेल्या व्हॅन गॉगच्या मृत्युमुळे एक प्रकारे दुर्दैवी क्लोजर मिळालं.
कावळे आणि वादळसुचक आकाश तर असोच, पण वरकरणी सुंदर केशरी पिवळ्या रंगांतलं गव्हाचं शेतही आपल्याला नंतर अस्थिर वाटू लागतं, पायवाटा भरकटलेल्या, तुमच्या निवडीचं स्वातंत्र्य हिरावून घेणार्‍या, गायब झालेल्या, म्हणजे त्यांचा पर्पजच पूर्ण न करणार्‍या अशा वाटू लागतात; आणि क्षणभंगुरतेच्या अध्यात्मात आपण क्षणभर, घटकाभर तरी शिरतोच.
---

रात्री २-३ वाजता, आजूबाजूला कुठलाच आवाज -कोणतीच जाग नसतांना निवांत वाचण्यासाठी ठेवला होता हा लेख. Proved to be a right decision.

काहीतरी magical yet melancholic जग पुढ्यात आले. प्रोसेसिंग ला वेळ लागेल.

साजिरा, हा सुंदर लेख काही दिवसांनी पुन्हा वाचणार.

थँक्यू फॉर शेयरिंग

इतकं सहज आणि ओघवतं लिहिलं आहे. इतक्या परक्या जगातलं आणि काळातलं असूनही ते सगळं घडताना दिसतंय असं वाटलं.

मला चित्रातलं काही कळत नाही, असं मी ठरवून टाकलं होतं.
पण मध्ये फेसबुकवर मोने Monet च्या चित्रांना वाहिलेलं एक पेज दिसलं आणि त्यांतली संगती कळायला लागली. मग हे त्याचं चित्र हे वाचायच्या आधी ओळखता येऊ लागलं.

या लेखातल्या शेवटच्या दोन चित्रांतले ब्रशचे स्ट्रोक्स आवर्तात ओढणारे वाटतात. चांगलेच मनावर ठसले. आज ट्विटरवर केरला टुरिझम च्या ट्वीटमध्ये एक चित्र दिसलं आणि ते Vincent van Gogh चं असेल असंच वाटलं. आणि होतंच की.
https://x.com/KeralaTourism/status/2101999853589106735

या लेखासाठी धन्यवाद आणि अभिनंदन साजिरा.

साजिरा, हा लेख मी ४ वेळा वाचला. आणि आता मला वाटतेय की मी प्रतिसाद देऊ शकेन.
आणि तरिही शब्द सुचत नाहीत.
व्हिन्सेंट इज माय क्रश. पूर्वी, आत्ता आणि मरेपर्यंत. तरिही त्याच्या आयुष्याविषयी इतकं आतून, ममतेनं, प्रेमानं, आपूलकीनं, मैत्रीनं बोलणारं कुणी दिसलं नाही आजवर.
तुम्ही त्याला तो जिवंत असताना भेटला असता तर तो फार फार जगला असता.

सुंदर लिहिलंय. चित्रं अनेकदा पाहिली होती पण त्यामागची कथा पहिल्यांदाच वाचली फारच ट्रॅजिक कथा आणि किती मनस्वी कलाकार.