
बावीसतेवीस वर्षांपूर्वीचा काळ माझ्यासाठी संक्रमणाचा होता. व्यावसायिक जगात स्थिरावण्याचा, आपले कुटुंब आणि नजीकच्या वर्तुळाने बनवलेल्या आपल्या धारणा जगाच्या वास्तवाशी ताडून बघण्याचा आणि आपली जी काही मते असतील ते अंतिम सत्य मानून कडाडून वाद घालण्याचा काळ. बरेचदा मित्रांशी नास्तिकता, देव नाही वगैरे वाद व्हायचे आणि ते, "तू काय देव नाही म्हणतो आहेस? दरवर्षी गणपती बसवतोस तू!" या भरतवाक्याने संपायचे. दरवर्षी बसणारा गणपती म्हणजे त्यांचा "सीमेवर सैनिक" प्रकारचा युक्तिवाद होता. त्यापुढे काही अपील नाही आणि अपील करावे अशी परिस्थितीच नव्हती. आमच्या घरी खरोखरच गणपती बसायचा. सकाळ संध्याकाळ चांगली षोडशोपचारे सोवळ्यातली पूजा, दणकून आरत्या, सगळे साग्रसंगीत होते. हे सगळे मला मनापासून आवडत होते; त्यामुळे या विषयावर मीसुद्धा जोरकस प्रतिवाद करू शकत नव्हतो.
पण शेवटी कधीतरी 'ती' वेळ आली आणि गणपतीकडे मी थोडे चौकसपणे पहायला सुरवात केली.
आता इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. वर जरी साग्रसंगीत गणपती असतो, असे म्हटले तरी माझे घर रूढार्थाने कर्मकांड करणारे कधीच नव्हते. घरात आस्तिकनास्तिक (किंवा आळशी आस्तिक म्हणू आपण) यांचा मेळ आई आणि बाबा दोन्ही बाजूने प्रत्येक पिढीत होता. फक्त आमचे कुटुंब म्हटले, तर आजी कर्ती असेपर्यंत रोजची देवपूजा, जप, नवरात्र वगैरे तिचे तिचे असे. लग्न झाल्या झाल्या आईने शिवामूठ वगैरे प्रकार केले, पण लवकरच ते सोडूनही दिले. आजी गेल्यावर नवरात्र वगैरे नैमित्तिक प्रकार बंद झालेच, पण घरात देवघर आहे आणि विशेष दिवशी त्याची पूजा होते इतपतच 'देवाचे करणे' प्रकारात येत होते. मात्र गणपती म्हटलं की या सगळ्याच्या विरुद्ध चित्र उभे रहायचे. बहुतेक वेळा त्याच्या समर्थनात 'गणपतीला हे लागतेच', 'आपण हे करतोच', 'हे सगळीकडेच असते, 'वर्षातून एकदाच तर करायचंय, त्यात अंगचोरपणा कशाला?' (ही एकदम सीमेवर सैनिक ग्रेड ऑर्ग्युमेंट) या सगळ्या कारणांची मदत घेतली जायची. लहान असताना, स्वतःची मते नसताना, सण हा गंमत करण्यासाठीच असतो अशी धारणा असताना आणि मुख्य म्हणजे या सगळ्याची धुरा कोणीतरी दुसरे सांभाळत असताना मला यात मजा न येण्याचा प्रश्नच नव्हता.
नववीदहावी पर्यंत तर लिंबूटिंबू म्हणून काहीच ताण नसे. पुढे कॉलेजला गेल्यावर गणपतीच्या आदल्या दिवशी मावशी आणि मामे-मावस भावंडे येत. रात्री जागून डेकोरेशन संपवायचे. मग रात्री उशिरा गिरगाव चौपाटीला चालत जाऊन कुल्फी खाणे आणि उशीर झाला - उशीर झाला करत झोपणे. सकाळी चुरचुरत्या डोळ्यांनी उठून सोवळे नेसून केलेली पूजा; मग अथर्वशीर्षाची पारायणे, जोरदार आरत्या या सगळ्याच्या खूपच ह्रदय आठवणी माझ्याकडे आहेत. संध्याकाळी मुंबईत एकमेकांच्या घरी दर्शनासाठी जाण्याची पद्धत होती. बिल्डिंगमधले लोक आणि जवळचे नातेवाईक घरी येत. मसाला दूध किंवा कॉफी, पेढा, थोड्या गप्पा आणि जात पुढच्या घरी. हे सगळे सगळे मी खूप खूप एन्जॉय करायचो. आजी गेली, त्या वर्षी गणपती आणून, पूजा करून लगेच विसर्जित केला होता; तेव्हा झालेली भयाण मन:स्थिती अजूनही आठवते. त्यामुळे गणपती कार्यक्रमात बदल हा विषय कधीच अजेंड्यावर नव्हता. कित्येक वर्ष 'मागचे मोडू नये, नवे करू नये' याच मोडमध्ये गेली. पुढे, मी मुखत्यार झाल्यावर, आधी आईबाबांच्या घरी आणि नंतर माझ्या घरी गणेशोत्सव करताना कसलातरी ताण येतो आहे हे स्पष्ट जाणवायचे, पण आपली आवडती गोष्ट करताना हे का होते आहे , हे समजायचे नाही. आपल्याला नक्की कसला आणि का ताण येतो आहे याचा उलगडा काहीश्या अपरिहार्यतेतून झाला.
माझ्या पहिल्या नोकरीसाठी माझे पोस्टिंग कोलकत्याला झाले. या गणपतीला मी घरी नसेन हे काहीतरी वीस दिवस आधी कळले. आता घरात माणसे ईनमीनतीन - मी, आई आणि बाबा. आदल्या दिवशी मूर्तीशाळेत जाऊन मूर्ती आणणे आणि नंतर गणपती बोळवायला समुद्रावर घेऊन जाणे हे बाबांना एकट्याला जमण्यासारखे नव्हते. (म्हणजे आता अमेरिकेतली मंडळी सीटबेल्ट लाऊन बसवतात बाप्पाला, पण हे मी २५ वर्षांपूर्वीचे सांगतोय. तेव्हा इये देशी सीटबेल्ट लावून गणपती आणला वगैरे प्रकार पाहण्यात नव्हते.) त्यामुळे कायमस्वरूपी गणपती आणावा असा विचार पुढे आला. ताबडतोब त्यावर कार्यवाही होऊन फायबरची एक सुंदर मूर्ती घरात आली. तीच मूर्ती आम्ही केली पंचवीस वर्षे वापरत आहोत. भर ट्रॅफिकमध्ये गणपती आणणे आणि बोळवणे ही मोठ्ठी वेळखाऊ कामे कमी झाल्याने आयुष्य बरेच सोपे झाले.
गंमत म्हणजे, ज्या आईने 'गणपती बदलणे' हे वरवर पाहता त्याकाळी सगळ्यात क्रांतिकारी वाटणारे पाऊल उचलले, त्याच आईकडून पुढच्या प्रत्येक छोट्या बदलला भरपूर विरोध झाला.
मात्र यातला धार्मिक अँगल काढून टाकला तर सोशल अँगलही उरणार नाही. त्यामुळे आता स्वतःला पटेल इतक्या प्रमाणात हा धार्मिक अँगल बदलायचे काम सुरू झाले.
वर म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी कर्मकांडाचे किंवा देवपूजेचे वातावरण नसले, तरी लोक गणपती कर्मकांडाबद्दल बरेच हळवे आणि कडक होते. सणासारख्या दिवशी आणि माझ्या दृष्टीने यःकश्चित गोष्टींवर वाद घालून घरातील वातावरण बिघडवायचे नसल्याने हे बदल फारच कासवाच्या गतीने करावे लागले - करावे लागत आहेत.
याबाबत माझ्या डोक्यात आलेले अल्टिमेट मॉडेल नाताळचे आहे. त्या सणातले ख्रिसमस-ट्री चे महत्त्व कोणी नाकारू शकत नाही. ते झाड आणि रोषणाई काढून टाकली तर तो सण 'सण' राहणार नाही. पण त्याची सजावट कमी पडली म्हणून ट्री कोपेल अशी भीती कोणी बाळगत नाही किंवा अंघोळ झाल्याशिवाय ट्रीला हात लावला म्हणून कोणी ओरडत नाही.
घरी गणपती आणला. त्याला फुले वाहून नमस्कार केला, आरती म्हटली. लोकांसाठी धार्मिक अँगल यायला इतके पुरे आहे की! मग त्यात मला टोचणाऱ्या गोष्टी करण्याची गरज काय?
उदाहरणार्थ : दुर्वा आणि पत्री पूजा!
गणपतीला दुर्वा आवडतात, मान्य. पण म्हणून घरात कामाचे डोंगर पडलेले असताना तीन माणसांनी कामे सोडून गवताच्या भाऱ्यातून दुर्वा निवडत जुड्या करत बसायचे, हे फुकट काम वाढवणारे आहे. दहा वर्षे अखंड कटकट करून ; सध्या आम्ही तीनचार जुड्या बनवू, इथपर्यंत खाली आलो आहोत. आयडियली एक जुडी किंवा दुर्वा नकोतच पर्यंत खाली येऊ तो सुदिन.
तीच गोष्ट पत्री पूजेची. गणपतीला पत्री वाहण्यामागे औषधी झाडांची ओळख व्हावी, परिसरात झाडे वाढवी, वगैरे जो उद्देश असेल, तो असेल. पण आजच्या घडीला गणपतीसाठी पत्री या नावाखाली जो भारा बाजारात मिळतो, त्यातून दोन किंवा तीन ओळखीची पाने मिळतात. मग दोन मार्ग उरतात. एकतर सगळ्या पत्रींसाठी अक्षता वाहणे किंवा आलेल्या अख्खा भार्यातून गुपचूप दोनतीन पाने काढून उरलेला भारा टाकून देणे. दुसरा मार्ग फारसा पटणारा नाही. जर दहा वेळ अक्षता वहायच्या असतील तर बारा वेळा वाहा आणि तो भारा घरी आणायचे कष्ट, कचरा आणि खर्च वाचवा.
नाही म्हणायला,आमच्या कोथरूडात एकाने निवडलेली पत्री विकायला चालू केले होते. एका झिपलॉकमध्ये प्रिंटेड कागद. त्यावर प्रत्येक पत्रीचे चित्र आणि नाव, आणि पाकिटात मोजून घातलेली पाने. उपक्रम म्हणून कितीही छान वाटले तरी मुदलात ही गोष्टच कालबाह्य असल्याने सव्यापसव्य असंबद्ध वाटते. त्यावर उपाय म्हणून पत्री पूजेत येणारी झाडे नोट करून परिसरात ती झाडे कुठे आहेत ते शोधून मुलींना झाडे दाखवणे, वगैरे प्रकार एकदोन वर्षे केला, पण त्याने जीव धरला नाही.
सद्य परिस्थिती - दर गणपती आधी बायको भारा घेऊन येते. बडबड करत त्यातली दोन किंवा तीन पाने मी बाजूला करतो, बाकी भारा टाकून देतो.
सोवळेओवळे - सुरुवातीला अगदी अंघोळ करून, सोवळे नेसून, नियम पाळून वगैरे पूजा करत असे.
त्यातला सोवळे नेसणे प्रकार आधी बंद केला. नंतर मुलगी लहान असताना, नुकत्याच उठलेल्या मुलीला मांडीवर घेऊन बिनदिक्कत पूजा करायला सुरुवात केली. मी पूजेत आणि आई, बायको नैवेद्याचा स्वयंपाक करत असताना मुलीकडे कोण बघणार असा सोयिस्कर युक्तिवाद कामी आला.
वर लिहिल्या प्रमाणे बायकोच्या माहेरी पाळीच्या वेळी देवपूजा न करणे वगैरे सगळे नियम पाळले जातात. बायको सुद्धा ते पाळत होतीच. आता आपल्याला दोन मुली आहेत, त्यांना आपण असे पाळणे बरोबर नाही शिकवत आहोत, मग तू पण तसेच वागले पाहिजेस वगैरे आमचे बोलणे वेळोवेळी होत असते.
एका वर्षी आमच्या एका मैत्रिणीचा फोन आला - मला अडचण आहे, मी गणपतीला आले तर चालेल का?. बायकोने तिला सांगितले, आमच्याकडे असे काही नसते. आपण सगळे या दिवशी भेटतो, त्यामुळे तू नक्की ये. गणपती निमित्त आहे."
वर्षानुवर्षाचे कंडिशनिंग पूर्णपणे पुसले जायला वेळ लागेल, पण ते पुसट नक्की व्हायला लागले याची खात्री तेव्हा वाटली.
जी गोष्ट पत्री- दुर्वांची तीच लाल फुलांची. गणपतीला लाल फुले आवडतात म्हणून वीस रुपये मोजून एक जास्वंद घेताना, पुढच्या वर्षी आपण जास्वंदीची फुले विकुया असा विचार कायम मनात येतो! ( असाच विचार गुढीपाडव्याला बांबू विकण्याबद्दल पण येतो.) One fine day जास्वंद आणणे बंद केले. माझी आत्या उत्कृष्ट कागदी फुले बनवते, ती वापरायला सुरवात केली. दोनतीन वर्षांनी नवीन फुले आणायची.
विचार करता करता जाणवले, काही गोष्टी " आँ! तुम्ही करत नाही?" या प्रेशरखाली घुसल्या होत्या. मागे कुणीतरी अथर्वशीर्ष पारायण ही गोष्ट अशीच घुसवली होती. पूर्वी मावशी, भावंडे वगैरे असायची तेव्हा सहासात जणांच्या ग्रुप मध्ये अथर्वशीर्षाची १०८ पारायणे सहज होऊन जायची. (ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी - आठजण बसले असतील, तर एकाने म्हटल्यावर आठ काउंट धरला जातो. म्हणजे बाकीचे सात जण मनातल्या मनात म्हणतात असे गृहीत धरले जाते. म्हणजे प्रत्यक्षात १०८ भागिले ८ = १२ वेळाच म्हणायला लागते. म्हणजे प्रत्येकी एक किंवा फारतर दोन वेळा.
पुण्यात आल्यावर हा प्रकार निग्रहाने थांबवला.
आरती करताना फक्त चार आरत्या, त्यापुढे कंटाळत , वजन एका पायावरून दुसऱ्या पायावर टाकत उभे राहण्यात काही मजा नाही.
पुढचा टप्पा ,षोडशोपचार पूजा.
आवाहन, अर्घ्य, पाद्य, वस्त्र, उपवस्त्र , नैवेद्य वगैरे सोळा उपचार. आधी हे फार निगुतीने केले जायचे. म्हणजे अगदी पाय धुवायला पाणी, म्हणताना पळीत पाणी घेऊन ते ज्योतीवर क्षणभर धरून गरम पाणी वगैरे... (मला लिहिताना लाज वाटते आहे) पण जसे मत बदलत गेले तसा हा सगळा बावळटपणा वाटू लागला. आता साधारण क्रम माहीत असतो, त्यानुसार एकेक गोष्ट नेटकेपणे गणपतीला चढवणे. बाजूला महत्त्वाची एकदोन पाने नीट मांडून पत्री पूजेचा आभास करणे आणि थोड्यावेळाने "पूजा झाली" असे declare करणे , हे सध्याचे status आहे.
मात्र - हे होताना आपल्यावर सॅटेलाईटची नजर/कान असतात हे विसरून चालत नाही.
अमुक वेळी घंटा वाजली नाही, उदबत्तीचा वास आला नाही, सहाण कोरडी कशी? वगैरे प्रश्न अजूनही येतात. ती एक छोटी काळजी घ्यावी लागते.
परत संध्याकाळी लोक येण्याच्यावेळी हा सगळा प्रकार आवरून, छान टपोरा हार घालून गणपती पाहुण्यांना receive करायला तयार होतो. ही सगळी पडद्यामागची गोष्ट माहीत नसलेल्या सासूबाई, "तुमच्याकडे कशी नेटकी पूजा असते," म्हणून कौतुक करतात ते नम्रपणे स्वीकारायचे.
अशी आमची खरी खरी मंत्रहीन , भक्तीहीन क्रियाहीन पूजा पार पडते.
पण यातली गणपतीची नावे , त्यातला नाद, त्यामागची story हे खूप आवडतात, ती मी आवर्जून वाचतो आणि पूजेचे अवसान आणून बसलेलो नसल्याने मुली आजुबाजूला असतील तर नावांची फोड, तशीच येणारी अजून नावे म्हणजे गजमुख म्हटले तर सुमुख, गजानन, गजवदन अशी चेहरा, तोंड यांचे वर्णन करणारी नावे, वर्ण/कांती वरून येणारी नावे असा खेळ क्वचित खेळतो. (स्कॉलरशिप परीक्षेला उपयोग होतो. )
हे सगळे वाचून कोणाला प्रश्न पडू शकतो, की ही सगळी घरच्यांची फसवणूक होतेय का?
तर त्याचे माझ्यापुरते शोधलेले उत्तर म्हणजे मी माझी मते, वैचारिक बैठक घरच्यांपासून लपवलेली नाही. तरीही त्यांनी ही जबाबदारी माझ्यावरच सोपवली आहे. मुळात घरच्यांचा (विशेषतः आई) देवाधर्माकडे ओढा नाही. कित्येक वर्षांच्या कंडिशनिंगमुळे त्यांना एखादी गोष्ट विशिष्ट प्रकारे व्हावी असे वाटते. त्यात भक्तीचा भाग किती? याच्याशी त्यांचे देणेघेणे नाही. हवा तसा दृश्य परिणाम त्यांना मिळाला की त्यांची तक्रार नसते.
आत्तापर्यंत मुलींची तीव्र धार्मिक किंवा रूढी परंपरा-कर्मकांडाच्या जगाशी ओळख अजिबात नाही, मात्र अलीकडे बदलते जग पाहत त्यांना या गोष्टीबद्दल आवर्जून सांगतो. आपण अमुक अमुक करत नाही, पण लोकांकडे करतात. त्या मागचे लॉजिक - आता ते सुसंगत आहे का? या सगळ्यावर थोडेफार बोलणे होते,
त्यांना hooked ठेवायला आपल्या पुराणातल्या गोष्टी फार मदतीला येतात. (नैवेद्य, मीठ अगस्ती) पाळायच्या असोत किंवा नसोत या गोष्टी माहीत असू द्याव्या , इतकाच याचा उद्देश.
हे सकाळचे दोनतीन तास सोडले तर बाकीचा दीड दिवस हा pure social event असतो. बिल्डिंगमधले, ओळखीपळखीचे बरेच लोक घरी येतात, पेढा, कॉफी घेऊन गप्पा होतात. कधीकधी वेगवेगळे गट एकावेळेस येतात, मग थोडी तारांबळ उडते. पण हा सगळा प्रकार आम्ही मनापासून enjoy करतो. रात्री मित्रमंडळी जेवायला असतात. सगळ्यांशी भरपूर गप्पा होतात. मोठ्ठा ग्रुप असल्याने आरती करायला पण थोडा मोठा आवाज लागतो (पण आरत्या चारच)
हे सगळे आवरून, झाकपाक करून, मी आणि बायको हातात कॉफी घेऊन हॉलमध्ये गणपती समोर बसतो. दिवे मंद केलेलं असतात. दिवसभराचा थकवा आलेला असतो, पण दोघांकडे बोलण्यासारखे भरपूर असते. मग कॉफी पीतपीत भरपूर गप्पा होतात. हा माझ्यासाठी गणेशोत्सवाचा हाय पॉइंट असतो. म्हणजे हा अर्धातास झाला नाही, तर गणपती आल्यासारखे वाटणारच नाही इतका!
गणपतीचा दुसरा दिवस तसा uneventful असतो. आम्हांलाच काही ठिकाणी दर्शनाला जायचे असते, आदल्या दिवशी न आलेले काही चुकार पाहुणे येऊन जाईपर्यंत चार वाजतात. चटचट उत्तरपूजा, "पुनरागमनायच" म्हणून गणपती हलवायचा आणि पुढच्या आवराआवरीला लागायचे.
अश्या रीतीने नास्तिकाकडचा गणपती आपल्या गावाला जातो.
सिम्बा
मनापासून लिहीलेय अगदी. आवडले
मनापासून लिहीलेय अगदी. आवडले मला. काही गोष्टी रिलेटही झाल्या. मी टोकाची नास्तिक नाही आणि टोकाची आस्तिकही नाही. कदाचित तुमच्या आईपेक्षा थोडी नव्हे बरीच जास्त आळशी आस्तिक असेन.
आमच्याकडेही कायमची मुर्ती आहे मेटलची. गेली २५ वर्ष तिचीच पुजा होते आणि टब मधे विसर्जन होते आणि पाणी गार्डन मधल्या झाडांना घातले जाते. बाकी फुले पत्री खताच्या टबमधे जातात. फळं आमच्याच पोटात जातात
पुजा सांगायला गुरुजी आधी कॅसेटरुपी हजेरी लावायचे मग त्यानंतर सिडी होती आता मोबाईलवर डाऊनलोड केलेय mp3. २५ वर्ष तेच रेकॉर्डींग (वैशंपायन गुरुजींच्या आवाजातले) फक्त फॉर्म बदलला.
दुर्वा आणि पत्रीचा प्रवासही बराच सारख्या ट्रॅकवर आहे आपला ... एखाद स्टेशन मागेपुढे फक्त ... त्याचेही कारण सिसिचा सिसिटिव्ही
फक्त मी स्वत:ला नास्तिक असं लेबल नाही लावत आहे कारण माझी श्रद्धा आहे. माझ्यासाठी कर्मकांडा पेक्षा भाव महत्वाचा आहे श्रद्धेमधेही. त्या अर्थी मी आस्तिकच आहे पण अती आळशी आस्तिक तुमच्या लेखातल्या व्याख्येनुसार
एकदम प्रामाणिकपणे लिहिल्याचं
एकदम प्रामाणिकपणे लिहिल्याचं जाणवतंय सिम्बा! आवडला लेख!
सोन्याची/चांदीची दूर्वा / जुडी करून घ्या पुढच्या वर्षी. म्हणजे तोही प्रश्न मिटेल.
आमच्या घरी गणपती नसायचा. आजी देवभक्त, धार्मिक स्वभावाची होती. ती कर्ती असेपर्यंत तिने आणि नंतर ती हयात असेपर्यंत आईबाबांनी तिने चालवलेल्या गोष्टी पुढे चालू ठेवल्या. आजी गेल्यावर एकेक करून जवळजवळ सगळं बंद झालं. बाबा आस्तिक असले तरी कर्मकांडांत त्यांनाही फारसा रस नव्हता. रोजची देवपूजा तेवढी आजीला झेपेनाशी झाल्यावर ते करायला लागले.
गणपतीसाठी मी आजोळी जायचे आईबरोबर. कधीकधी आधी श्रीवर्धनला काकाकडे. मलाही ते वातावरण, विशेषतः पंधरावीस जणांनी उंच आवाजात म्हटलेल्या आरत्या, उदबत्तीचा वास हे सगळं मनापासून आवडायचं/आवडतं. अथर्वशीर्षाची आवर्तनं ऐकायला आवडतात. पण त्यासाठीची सगळी खटपट दुसऱ्या कुणी त्यांच्या घरी केलेली असेल तरच!
इथे बंगलोरला कधीकधी मुलांनी हाताने केलेले मातीचे गणपती टेबलावर मांडून आरती वगैरे केली. गेल्या वर्षी धातूची गणपतीची मूर्ती आणून पाच दिवस आरती केली. पण खरं सांगायचं तर त्यात काही मजा नाही. मला तरी. मला डेकोरेशन वगैरे करण्यात फारसा रस नाही. मी आस्तिक नाही. मग राहिलं काय, तर तो नॉस्टॅल्जिया. तो मनातच असलेला चांगला. उगाच मग ज्या व्यक्ती आता नाहीत, त्यांच्या आठवणींनी दुःख तेवढं होतं. यावर्षी आम्ही दोघेही तापाने आजारी पडलो गणेश चतुर्थीलाच. त्यामुळे यावर्षी तर मोदकही नाही केले. ते मात्र करणार आहे मी आता एकदा तरी. कारण ते करायला आणि खायला आवडतात.
खूप आवडले लिखाण आणि रिलेटही
खूप आवडले लिखाण आणि रिलेटही झाले.
अरे वाह मस्त! खूप छान लिहिले
अरे वाह मस्त! खूप छान लिहिले आहे आणि रिलेट होणारे लिखाण झाले आहे.
एक म्हणजे मुंबईतील घरगुती गणपती.
दुसरे म्हणजे मी नास्तिक आणि घरचे सगळे आस्तिक.
पण गणपती हा सण त्या इतर सर्वापेक्षा मला जास्त आवडतो
खूप आवडले लिखाण आणि रिलेटही
खूप आवडले लिखाण आणि रिलेटही झाले. वावे आपलंही सेम सेम. फक्त मला डेकोरेशनमध्ये इंटरेस्ट आहे.
सिंबा , एकदम जम्या है!
सिंबा , एकदम जम्या है!
सिंबा, मस्त लिहिले आहे. बर्
सिंबा, मस्त लिहिले आहे. बर्याच गोष्टी रीलेट झाल्या. सण -उत्सव यावेळेचे कौटुंबिक बाँडिंग, सोशलायजेशन, नॉस्टॅल्जिया आणि देवाधर्मावरची श्रद्धा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मी स्वतःशी मान्य केलेले आहे. त्यामुळे काही करताना आणि न करतानाही गिल्ट येत नाही!
अरे वाह मस्त! खूप छान लिहिले
अरे वाह मस्त! खूप छान लिहिले आहे आणि रिलेट होणारे लिखाण झाले आहे. +१२३
मस्त लिहिलंय. माझाच अनुभव
मस्त लिहिलंय. माझाच अनुभव वाचते आहे असं वाटलं.
माझ्यासाठीही गणपतीसह सगळ्या सणांच्या आठवणी नॉस्तॅल्जिया म्हणून अतिशय प्रिय आहेत, मात्र हळूहळू धर्म (रिलिजन) ही कल्पना कालसुसंगत वाटेनाशी झाली आणि कर्मकांडं तर कधीच आवडत नव्हती. त्यातला भेदभावही दिवसेंदिवस (पूजा पुरुषांनीच करायची!) अधिकाधिक खुपू लागला.
आता माझ्यासाठी सणवार हे त्यांच्याशी निगडीत खाद्यपदार्थ तयार करून खायचे आणि खिलवायचे यापुरते उरले आहेत.
आत्ता परवाच ऑफिसमधल्या नवीन मैत्रिणीने विचारलेल्या 'तुझ्याकडे गणपती असतो का गं?' या प्रश्नाला अगदी सहज आणि तत्काळ 'नाही, माझ्याकडे मोदक असतात!' असं उत्तर तोंडून गेलं आणि माझी मलाच मजा वाटली!
हॅविंग सेड दॅट,
सणवारांनी आयुष्य रंगीबेरंगी राहतं, अगदी दैनंदिनही साधेसाधे - दारात रांगोळी काढण्यासारखे - नेमनियम रोजच्या धकाधकीच्या पिळात सृजनाचा/सौंदर्याचा/आस्वादाचा एक धागा गुंफत राहतात हे मात्र खरं. यांच्यामुळे घरात सीझनल फळं, फुलं येतात, संगीत येतं, मुख्य म्हणजे माणसं येतात, कॉलॅबोरेशनने मखरासारखं काहीतरी क्रिएटिव्ह तयार करतात, आणि सण संपला की त्यातून मन काढून घ्यायचंही एक वळण लागतं. चाकोरीतून 'एस्केप' मिळतो, जो अत्यंत अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे धार्मिक कर्मकांडं केली-न-केली तरी ज्याला जे आवडतं त्याच्या मिषाने तो धागा मात्र जपावा असं वाटतं.
असो, जरा वाहावत गेला प्रतिसाद.
सुंदर लेख आणि चर्चा.
सुंदर लेख आणि चर्चा. यानिमित्ताने एक वेगळ्या धाटणीचा विषय घेतल्याबद्दल संयोजक आणि लेखक दोघांचे कौतुक.
खूप आवडले लिखाण आणि रिलेटही
खूप आवडले लिखाण आणि रिलेटही झाले. +१
बराचसा असाच प्रवास आणि अशाच
बराचसा असाच प्रवास आणि अशाच शाब्दिक चकमकी घडल्या आहेत.
मी आता पूर्ण नास्तिक आहे. आळशी आस्तिक असताना अनेकवर्षे, इथे आणलेल्या देवांना दिवाळी, पाडवा असं काही स्पेशल असेल तर आंघोळ वगैरे मिळत असे. हल्ली त्या देवांचीच दया येऊन ज्या मूर्ती फोटो वगैरे होते त्यांना स्वच्छ पुसुन गुंडाळून खोक्यात ठेवले आहे. आई-बाबा आले आणि त्यांना पूजा वगैरे करायची असेल तर आहेत, घर म्हणून असू दे करुन ठेवले आहेत.
पण गणपती, रादर गणेशोत्सव मला प्रचंड आवडतो. गणपती ठाण्याला असतो, इथे आणत नाही. पण तरी आपण आणायला हवा होता असं दरवर्षी वाटतं. तो नॉस्टेल्जियाच आहे. पण त्या बाबतीत मी अती हौशी नास्तिक आहे. फारच हृद्य आठवणी गणपतीशी जोडल्या आहेत.
डोंबिवलीला असताना आदल्या दिवशी बाजारातून बाबा दुर्वांचा भारा आणत असत. त्यात पहिल्या दिवशी वाहायला म्हणून दुर्वांच्या जुड्या करणे. दुसर्या दिवशी विसर्जनाला मात्र २१ दुर्वांचा हार. डीएनसी शाळेच्या समोर एक काका राहातो, त्यांचा ही दीड दिवसाचा गणपती, त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे दर्शनाला जायचं आणि मग डीएससीच्या मैदानातून हा मोठा दुर्वांचा भारा आणायचा. मग दुपारी जेवणं झाली की आजी आणि आम्ही नातवंडं दुर्वांच्या जुड्या करायला बसत असू.
पहिल्या दिवशी आत्ते, चुलत, मामे भावंड सकाळी एकत्र असायची. मग सगळे मिळून आवर्तनं करणे, आणि मुख्य म्हणजे मोदक करणे! आजी आत्या, मामी, बाबा आणि आम्ही सगळी भावंडं मोदक करायला बसत असू. एक चुलत आत्या भारी गप्पिष्ट. आपल्याच केलेल्या आणि धड न जमलेल्या मोदकांना प्रचंड नावं ठेवत, 'बघा रे, कसं पॅचवर्क करायचं शिकून घ्या', 'तो माझा मोदक आहे, उकड समजून मळून टाकाल हो', ' अरे स्वयंभू मोदक आहे तो' अशा हसुन मुरकुंडी वळेल अशी बडबड करत मोदक करायला बसली की ती बडबड ऐकायला सगळी पोरं हौशीने मांड्या ठोकून चार मोदक तरी करतच असत.
मग भरपूर आरत्या म्हणायच्या. एक काका गिरगावातला, तो एकदम टीपेचा आवाज लावून देवे (मंत्रपुष्पांजली) म्हणत असे. दशावताराची, मदनगोपाळाची आरती म्हणायला तर आणखी मजा. नंतर एकमेकांना विचित्र आग्रह करत करत केलेली मोदकांची जेवण. मग अनावर आलेली झोप. संध्याकाळी तर सगळ्यात जास्त मजा. कारण भरपूर लोक घरी येत. सगळ्या खोल्यांत माणसंच माणसं. प्रसाद, कॉफी/ मसाला दूध द्यायचे आणि गप्पा!! बास! मग रात्री घरचे आणि आत्याकडचे सकाळंचं काय उरलेलं असेल त्यात भर घालून अंगत पंगत जेवताना आज कोण कोण आलेलं, कोण कसा काय आला नाही, कोणाशी काय काय बोललो अशा गमती सांगत जेवण. रात्रीची आरती साधी, तरी ८-१० आरत्या असायच्याच. आता या सगळ्यात गणपती होता का? तर होताच. पण मोदक, माणसं, मखर होते म्हणून तो होता. हे सगळं नसतं तर त्या गणपतीचे काही खरे न्हवते. तू ख्रिसमस ट्रीशी तुलना केली आहेस ती अगदीच भावली. तसाच गणपती आणि आपले सगळेच सण होवो, तरच ते टिकतील. अवडंबर माजवलेल्या गोष्टी कशा टिकायच्या?
नंतर विसर्जनाला डोबिवलीत हळूहळू फार त्रास होऊ लागला. कारण घरगुती गणपतींचे विसर्जन विहीरीत केलं जायचं आणि विहीरी कमी होऊ लागलेल्या. यंदा कुठल्या विहीरीत विसर्जनाला परवानगी आहे याची चर्चा करत तिकडे जाणे, तिकडे कितपत स्वच्छ वातावरण असेल नेम नाही. तिथल्या लोकांनी मूर्ती जवळ जवळ हिसकावून घेणे, प्रचंड घाई घाई करणे हे बिझनेस मॉडेल ज्येष्ठांच्या अंगावर येऊ लागलं. त्यातून मग एक पंचधातूची कायमस्वरुपी मूर्ती घरी आली. त्याला ही आता २५ एक वर्षे झाली असतील. मग पूर्वी गुरुजी पूजा सांगायला येत ते बंद होऊन बाबा पूजा सांगून आम्ही करणे, मग काही वर्षांनी मनानेच मनोभावे पूजा करणे वर गाडी आली. डोंबिवलीला अंगणात पुष्कळ झाडे होती तोवर पत्रीपूजा करत असू. 'विकत पाने आणणे' हे कोणाच्याच तत्त्वात बसत नसल्याने ते ही बाद झाले. हल्ली खूप वर्षांत गणपतीत भारतात जाणे झालेले नाही, पुढचा गणपती लेबर-डे च्या आधी असेल तर जायची इच्छा आहे. बघू.
इकडे मात्र तो नॉस्टेल्जिया दुसर्यांच्या जीवावर साजरा करतो. मित्रमंडळींकडे गणपतीला आवर्जून जातो. प्रसाद म्हणून मोदक, नारळाच्या वड्या, इथली बदामकतली, खिरापत करुन नेता आली तर बघतो. आरती करायच्या वेळेला जातो की आरत्या ही म्हणता येतात. यंदा एका मैत्रिणीने सहस्त्रावर्तन करू म्हणून बोलावले, येतो की म्हणून ते पण करुन आलो. छान देसी कपडे घालून, देसी जेवण करायला आणि गप्पा मारायला मिळणार असतील तर का नाही? ते वातावरण, उदबत्ती, फुलांचा सुगंध, झांजा घंटा आणि परत भरपूर माणसे.
'तू कसला नास्तिक, आरत्या आणि अथर्वशीर्ष बर म्हणतोस' इतके टोमणे ऐकायला लागतात. पण त्यातच तर मजा आहे!
खूप छान लिहिलंय, बऱ्याच
खूप छान लिहिलंय, बऱ्याच गोष्टी पटल्या.
कर्मकांड हे एक साधन आहे, ते तसंच असावं, जर ते साध्य बनलं तर सगळं अवघड बनत जातं हे अधोरेखित करणारा लेख आहे हा.
सगळ्यांना धन्यवाद,
सगळ्यांना धन्यवाद,
मलाच लेख थोडा विस्कळीत वाटत होता. पण तरीही तुम्हा सगळ्यांना आवडला ही बाप्पाची कृपा म्हणायला हवी
अमित सुंदर प्रतिसाद,
>>>>. आता या सगळ्यात गणपती होता का? तर होताच. पण मोदक, माणसं, मखर होते म्हणून तो होता. हे सगळं नसतं तर त्या गणपतीचे काही खरे न्हवते. >>>>>
हे वाचून गीत रामायणात अग्निपरीक्षे आधीच्या गाण्यात राम सीतेला म्हणतात "हे तुझ्यामुळे गे झाले, तुजसाठी नाही केले," याची आठवण झाली.
अरे पण त्या गाण्यात रामाचा
अरे पण त्या गाण्यात रामाचा रागच येतो. पुढे म्हणे 'मी कलंक माझे धुतले, गतवैभव ते लाभो रघुवंशाते 'काय?! किती ट्रॅन्झॅक्शनल! काही लाज आहे का नाही!
आज ह्या लेखाच्या निमित्ताने य
आज ह्या लेखाच्या निमित्ताने य वर्षांनी मायबोलीवर आलोय. फार मस्त लेख लिहिला आहे..
कविन, तुझ्याकडे असलेली वैशंपायन गुरुजींची कॅसेट माझ्याकडे पण आहे. आणि तीच वाजवून गणेश प्रतिष्ठापना करतो अजूनही..
छान झाला आहे लेख, प्रतिसाद ही
छान झाला आहे लेख, प्रतिसाद ही सगळे छानच.
हम्म्म्म.. मला नीट लिहिता येत
हम्म्म्म.. मला नीट लिहिता येत नाहीये, पण प्रयत्न करतो. मला हे अश्याप्रकारचे लेख डबल ढोलकी प्रकारचे वाटतात! म्हणजे आवडतं, करायचं असतंही पण ते केल्याचं सांगायचं / दाखवायचं नसतं आणि म्हणून काहीतरी आवरणं चढवून त्याखाली करायचं असं काहीसं.
ह्यापेक्षा वावेने लिहीलं ते म्हणजे <<< मला डेकोरेशन वगैरे करण्यात फारसा रस नाही. मी आस्तिक नाही. मग राहिलं काय, तर तो नॉस्टॅल्जिया. तो मनातच असलेला चांगला >>> हे स्वच्छ आणि खरं वाटतं.
ह्याच प्रकारातलं एक अवांतर उदाहरण द्याचचं ते आयुष्यभर मुंज वगैरे विधींना नावं ठेऊन स्वत:च्या मुलांची करायची आणि मग त्याला आई वडिलांची इच्छा होती म्हणून केली, मुलांना मजा येते म्हणून केली, त्या निमित्ताने गेट टू गेदर झालं वगैरे मुलामे द्यायचे!
आमच्या घरचं सांगायचं तर तीन पिढ्या गणपती चालू आहे. पत्रीमध्ये ही पानं हवी, अमुक इतक्या दुर्वांच्या जुड्या हव्या, ती फुलं हवी वगैरे नियम आज्जीच्या राज्यातही नव्हते. ज्यावर्षी जे जमेल/मिळेल त्यासकट पुजा केली जाते. इथे अमेरिकेत आम्ही मॅग्नोलिया, मेपल वगैरे बरीच पानं पुजेला वापरली आहेत. मागे आईनेच सेडरची डहाळी तोरणात लावली होती. ह्यावर्षी देसी स्टोरमध्ये विड्याची पानं मिळाली म्हणून ती आणली, पण एखाद्या वर्षी नाही मिळाली तर पुन्हा दारातला मेपल वापरू. आरत्याही नेहमीच्याच दोन-तीन म्हंटल्या जायच्या/जातात. घरातले/पाहुणे जे असतील त्यांच्यासकट आवर्तन केली जातात. डोंबिवलीला दीड दिवसात सुमारे पाच-सातशे माणसं दर्शनाला यायची. पुण्याला पहिली दोन वर्ष कोणीच आलं नाही कारण तिथे तशी पद्धत नाही. नंतर काही जवळची लोकं येतात. अमेरिकेत तर रितसर आमंत्रण करावं लागतं. जाऊ त्या जागी, तिथल्या पद्धतीने, यथाशक्ती, भक्तीभावाने गणेशोत्सव करावा, नाही जमलं तर ते ही ठिक आहे.. हेच घरच्यांचं सांगणं असतं. आता आम्ही "पुरोगामी" म्हंटले जाऊ का ?
म्हटलं तसं.. विस्कळीत प्रतिसाद झाला! पण असूदे. लेखन चांगलं आहे पण आवडलं असं म्हणणार नाही.
म्हणताना पळीत पाणी घेऊन ते ज्योतीवर क्षणभर धरून गरम पाणी वगैरे... (मला लिहिताना लाज वाटते आहे) >>>> हे जर देवाला घालायच्या (म्हणजे खरतर फुलाने शिंपडायच्या) उष्णोदकस्नानाबद्दल असेल तर त्यात लाज काय वाटायची आहे कळलं नाही ? ह्या सारखा प्रॅक्टीकल प्रकार नाही खरतर. शाळेत जेव्हा उष्णतेचे सुवाहक / कुवाहक ज्यावर्षी शिकलो होतो, तेव्हा हे फार रिलेट झालं होतं. शिवाय आपल्या पुजांमध्ये "जनरल कॅच ऑल" म्हणून जो अक्षतांचा वापर करतात तो ही मला फार इंटरेस्टींग वाटतो. कशावाचून देवाचंही काही अडत नाही. आपणच देवाच्या नावे उगीच काहीतरी प्रथा पाडत बसतो. असो.
छान झाला आहे लेख, सिम्बा. मी
छान झाला आहे लेख, सिम्बा. मी पण अति अति आळशी आस्तिक आहे. नास्तिक होता होता तत्वज्ञानाच्या वळणाने आस्तिकतेच्या मुक्कामी पोचले आहे.
माझा नवरा गणेश भक्त आहे. कर्मकांड नाहीत. १० दिवसांचा हौशी गणपती. पत्री तर नाहीतच पण विड्याची पाने सुद्धा विकत आणत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करुन गणपती कडे कोणत्या तोंडाने आशीर्वाद मागणार. नवरा हौशी आस्तिक आहे. मला सजावट वैगेरे मध्ये रस नाही. मी २ समया तेवढ्या रोज सकाळ संध्याकाळ, १० दिवस गणपतीपुढे उजळवते. मोगऱ्याच्या कळीसारखी ज्योत दिसेल हे पाहते. तेवढेच माझे contribution.
घरी कर्मकांडांबद्दलचा नीरस आहे हे मला बरे लक्षण वाटते
वैचारिक परिवर्तनाच्या
वैचारिक परिवर्तनाच्या प्रवासात एखादी घरातील प्रथा व परंपरा एकदम मोडीत काढण्याचे धैर्य आपल्यात नसते. मग नाईलाज म्हणून आपण ती चालू ठेवतो. पण चालू ठेवण्यात त्यातील अवडंबर कमी करत जातो. कारण तेवढा वेळ व एनर्जी नसते . एखाद्या घरात उपवासाची प्रथा असेल तर आपण पुण्य मिळेल या भावनेने नाही पण आहे चालू प्रथा तर पाळू यात, फार काही त्रासदायक नाहीये असे म्हणुन ती चालू ठेवतो. तेवढीच खिचडी खायला मिळते असे निमित्तही पुढे करतो. अनेक सण,प्रथा परंपरा या गतानुगतिकता म्हणून पाळल्या जातात. पाळणारा काही फार श्रद्धेने ते करत नसतो.
सिंबा लेख आवडला व पटला ही
सिंबा लेख आवडला व पटला ही बहुतेक.
@पराग - मला नाही वाटत हा डबल ढोलकी आहे. त्याने आपला प्रवास उलगडून दाखवला आहे आणि तो डोळस प्रवास आहे.
>>>
ह्याच प्रकारातलं एक अवांतर उदाहरण द्याचचं ते आयुष्यभर मुंज वगैरे विधींना नावं ठेऊन स्वत:च्या मुलांची करायची आणि मग त्याला आई वडिलांची इच्छा होती म्हणून केली, मुलांना मजा येते म्हणून केली, त्या निमित्ताने गेट टू गेदर झालं वगैरे मुलामे द्यायचे!
>>>
हे माझ्या बाबतीत घडले म्हणून माझे स्पष्टीकरण देतो. मी मुलाच्या मुंजीला नाही म्हटले. बायकोने सांगितले करायची. का वगैरे चर्चा बाजूला ठेवू. मुलाची मुंज न करण्याचा जितका मला हक्क आहे तितकाच तिला ती करण्याचा हक्क आहे हे मी नाकारू शकत नाही. जिथे शक्य असते तिथे धार्मिक कार्यक्रमात मी सहभागी होत नाही व तिलाही ते मान्य आहे. उदा सत्यनारायणाची पूजा केली तर बायको स्वतः ती करते. मी पुजेला बसत नाही, नमस्कार वगैरे करत नाही. स्वयंपाकात , नंतरच्या आवराआवरीत मदत करतो. पण मुंजीमध्ये मी सहभागी झालो नसतो तर ती मुंज करता आली नसती. मोठ्या कार्यक्रमात बाप का नाही या प्रश्नाने बायकोला कानकोंडे झाले असते. जर मी तोंड लटकावून सहभागी झालो असतो तरी त्यातली मजा गेली असती. तेव्हा जर बायकोचा मुलाची मुंज करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मान्य केला तर जोडीदार म्हणून मी त्यात सहभागी असणे मला क्रमप्राप्त वाटले.
वडिल गेल्यावर कोणत्याही प्रकारचे अंत्यविधी केले नाहीत. तिथे हा प्रश्नच उपस्थित राहिला नाही कारण वडिलांनी लिहून ठेवले होते, आई व बहिणीलाही मान्यच होते. तिथे जर कोणी अडून बसले असते की १०वा/१३वा करा, श्राद्ध घाला तर नाही असे स्पष्ट सांगितले असते. वडिल गेल्यावर पहिल्या वर्षाच्या स्मृतिदिनाला आई साहजिकच डिस्टर्ब झाली होती. श्राद्ध वगैरे असले तर बहुतेक एक मानसिक क्लोजर मिळत असेल त्या एकूण कर्मकांडात. ते तसे काही नव्हतेच , इथे त्यात पुन्हा कोणी नातेवाईकही नाहीत बरोबर. मग तिला एका देवळात घेऊन गेलो. ती तिथे थोडावेळ बसली व परत आलो. वडिल ज्या संस्थात काम करायचे त्या संस्थांना दरवर्षी त्यांच्या आठवणीच्या निमित्ताने मदतनिधी देतो. तिथेही एक वैचारिक धोंडा आडवा येतो. आता संघसंबंधित संस्थांना मी देणगी देत नाही. वडिल अनेक वर्षे वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हाप्रमूख होते. आई वनवासी कल्याण आश्रमाला देणगी देते - मी देत नाही. मी इतर संस्थांना देतो.
ही रेष खूप निसरडी आहे हे मान्य आहे. आईला वाईट वाटू नये म्हणून रानड्यांनी लहान मुलीशी विवाह केला. बायकोला वाईट वाटू नये म्हणून मी मुलाच्या मुंजीला बसलो. दोन्ही तुलनात्मक आहे हे मान्य.
डोळसपणे विचार करून आपल्या लहानपणापासून बळकट झालेल्या समजुतींच्या पलिकडे जाऊन जगता येते का हा शेवटी वैयक्तिक प्रवास आहे. मुलाला देव ही संकल्पना कशी आली असेल, का आली असेल, विविध धर्म वगैरे बद्दल सांगत असतो. त्यांनाही आजूबाजूला पाहून समजते. वर्गातला एखादा मुलगा फिल्ड ट्रिप ला येत नाही कारण तिथे डुक्कर असते. कुणीतरी जगात एकच देव तो जीझस असे सांगणारे भेटते. कानावर आपल्यात असे काही नसते हे घरात आजी-अजोबांकडून पडते. माझ्या पद्धतीने त्याला अधिक सजग करणे इतके मी करतो. बाकी त्याचे आयुष्य त्याचे आहेच.
>>त्यामागची story हे खूप
>>त्यामागची story हे खूप आवडतात<<
वेगवेगळ्या नावांच्या मागच्या स्टोऱ्यांच्या आधी :
मासिक पाळीच्या रजापासून पार्वती गणपती तयार करते. नित्यरत म्हणून फेमस असणारा तिचा अतितापट नवरा पार्वतीला 'भेटायला' जाताना आडव्या आलेल्या या लहान बाळावर जेलस होऊन त्याचे मुंडके उडवतो. मग पार्वती चिडल्यावर मुकाट्याने जाऊन एका हत्तीचे मुंडके उडवायला लावतो. म्हणजे पहिल्यांदा माणसाचा खून करून त्यांनंतर एका मुक्या प्राण्याचा पण खून करतो!! मग त्या दोघांचे एक विचित्र हायब्रिड तयार करतो. तेही कोअर हिमालयातल्या कैलासावर जो हत्तीचा नैसर्गिक अधिवास देखील नाही. (म्हणजे या प्राण्याच्या हत्येसाठी त्याने अख्खा भारत पिंजून काढला होता) म्हणजे तिथे या हायब्रीड हत्तीची उपासमार देखील होईल!
what part of this makes this lore lovable (to children)? लॉजिक नसल्याचे एकवेळ आपण बाजूला ठेवू पण ही कथा अतिशय हिंसक आणि भीबत्स आहे.
खरेतर शैवांवर जी सतत सांस्कृतिक अतिक्रमणे होत आहेत त्यामधे गणपतिचे उन्नयन ही अतिशय इंट्रेस्टिंग गोष्ट आहेत. मुळात उपद्रवी असलेल्या या देवतेचा प्रवास फुल सर्कल होऊन, बहुजनांच्या डेमी गॉड पासून मराठी ब्राह्मणांच्या आराध्य दैवतापर्यंत आणि त्यांच्या सत्तेमुळे (पेशवाई) बहुजनांच्या आराध्य दैवतापर्यंत असा दोन वेळा फुल सर्कल झालेला आहे!
मला वाटतं आस्तिक आणि नास्तिक
मला वाटतं आस्तिक आणि नास्तिक ही दोन्ही लेबलं आहेत. कुणालाही कसलंही स्पष्टीकरण न देता जे मनाला / स्वतःला करावसं वाटतं ते करणं आणि त्याचा कसलाही गिल्ट किंवा त्यासदृष्य भावना मनात नसणं, केवळ आपल्या आनंदासाठी जे काही करतो ते करणं, त्याचं कु ठ लं ही जस्टीफिकेशन न करणं हे साध्य होणं आवश्यक आहे.
मला आवडतात सण साजरे करायला. जेव्हढं जमते तेव्हढं आनंदानं, कुठलाही लोड न घेता करते. देवाला आणि आई वडिलांना नमस्कार करायला मनापासून आवडतो तो करते. मी आस्तिक का नास्तिक काय फरक पडतो?
अंजली तुझ्या अख्या पोस्टला
अंजली तुझ्या अख्या पोस्टला मोदक
मी जे अल्टिमेट गोल सांगितलं,
मी जे अल्टिमेट गोल सांगितलं, त्या प्रकारे गणपती साजरा करणारी सश्रद्ध, आस्तिक कुटुंबे पाहण्यात आहेत. गणपती आणला, फुले वाहिली, आरती केली या पलीकडे काहीही फापटपसारा नसतो.
आमच्याकडे सुरवातीपासून काही पद्धती पडून गेल्या आहेत. ज्या बदलायला विरोध होतो.
साधारण नास्तिक म्हटल्यावर लोकांच्या मनात अतिशय फटकळ, समोरच्याचे प्रत्येक म्हणणे उडवून लावणारी , प्रसंगी लोकांना दुखावणारी व्यक्ती येते.
कौटुंबिक उत्सव असताना त्यातल्या equal स्टेक होल्डर्सना (बायको) मी नास्तिक आहे म्हणून उडवून लाऊ शकत नाही ना? की तिला हा "माझ्या घराण्याचा" गणपती आहे, आणि त्याच्या बद्दल सर्वाधिकार मला आहेत असे सांगू ? तसे केले तर मला अभिप्रेत असणारा मुक्काम पहिल्याच वर्षी गाठता आला असता. पण मग दरवर्षी तो उत्सव एक दुखरी आठवण ठरला असता.
दोघांना drastic बदल वाटणार नाहीत, इतपत बदल करत स्वरूप बदलले तर हे संक्रमण हळूहळू होईल हे मान्य आहे, पण ते जास्त समजून होईल आणि आनंददायी असेल.
या मधल्या काळात कदाचित कोणाला हा दांभिकपणा वाटू शकेल but i know where we are heading आणि हम होंगे कामयाब एक दिन
सिंबा, लेख आवडला हे वेगळे
सिंबा, लेख आवडला हे वेगळे सांगत नाही.
@टवणे सर तुमच्या मुद्द्याला उद्देशून
मला हे सगळे rituals आवडतात. आपण ते काही सगळेच बदलू शकत नाही आणि नवे तर घडवायचे असतील ते आपल्यापुरतेच खाजगीच करावे लागतात. नवे rituals खरेतर लोक त्यांच्या परीने घडवत देखील असतात. पण आपले जर पारंपरिक rituals पाहिले तर मला एक स्टार्क खटकणारी गोष्ट जाणवते ती म्हणजे, ते ज्या काळात घडले त्या काळात नैसर्गिक गोष्टींची विपुलता आसपास होती. त्यामुळे मला प्रचलित असलेल्या एकाही रिचुअल मधे कुणी काहीतरी 'निर्माण' करते आहे हे कधीच दिसत नाही. उदा. झाड घ्या.
जवळ जवळ प्रत्येक भारतीय rituals मधे झाडाला ओरबाडणे युबिक्युटसली गृहीत धरले आहे.
माझी एक आठवण सांगतो. हा समारंभ साधारणत: अशाच रूपात इतरत्र साजरा केला जात असे.
माझे बालपण गेले तर शेवटच्या स्टेजला असलेल्या संस्थानी वातावरणात. म्हणजे राजाला जिथे मान होता आणि त्याचा शब्द आधुनिक राजकारणातही अंतिम होता. राजा राणीशी जवळीक असल्याने सार्वजनिक उत्सवात फार जवळून भाग घ्यावा लागे. मला लहानपणी त्याची गंमत देखील वाटे. पण आजोबा मला दसऱ्यालाच्या शिलांगणाच्या सोनेलुटीला येण्याला मज्जाव करत. मी एकदा खूपच हट्ट धरला म्हणून त्यांनी नाईलाजाने तो सगळा एंड टू एंड रिचुअल मला अनुभवू दिला.
त्यातले मला आवडलेले काम म्हणजे पालखीतून सोन्याचे पाणी दिलेली चांदीची तलवार वाड्यावरून आमच्या घराजवळच्या राजाच्या गावाबाहेरच्या 'वीकेंड होम' वर जी एक अतिशय मोठी विस्तृत बाग होती तिथल्या मैदानात मधोमध असलेल्या आपट्याच्या झाडाजवळ घेऊन येणे. कारण येताना आमच्या पायांवर आणि समोरच्या घोड्याच्या पायावर सगळा गाव घागरी उपड्या करत असे. तलवारीबरोबर बाकीचे किमती समान देखील असे आणि आजोबांची मुख्य जबाबदारी म्हणजे त्याचे संरक्षण करणे. खंडेनवमीला आमच्या घरी पूजलेल्या दोन बंदुकीपैकी एक बंदूक खांद्याला लटकवून घेऊन आमचे आजोबा रूबाबात पालखीबरोबर यायचे!!
नंतर राजा त्याच्या मोटारी/ घोडा अशा लवाजम्यातून गावाबाहेरच्या बागेत येई. आता तोवर या मैदानात (या झाडाला केंद्रस्थानी ठेवून) शेकड्याने लोक जमा होत. तलवारी आणि इतर शस्त्रांची पूजा झाल्यावर राजा तलवारीने एखादी फांदी तोडत असे. त्या क्षणाला बाजूची अक्षरशः टपून बसलेली गर्दी त्या झाडाला नागवायला तुटून पडे. त्या गडबडीत ती शस्त्रे आणि सोन्या चांदीची ताटे वगैरे काढून पटकन आमच्या शेजारच्या घरी हलवावी लागत.
स्टँपिड झाल्यासारखे पंधरा वीस मिनिटात त्या झाडावरचे पान न् पान ओरबाडून घेतले जाई. या गदारोळात लहान मुलाचा जीव वगैरे जाईल म्हणून आजोबा मला घेऊन जात नसत हे तेव्हा कळले. अतिशय अंगावर येणारे ते सगळे लुटीचे प्रकरण. ती मंत्रघोषातली पूजा (आता मंत्र वेदोक्त का पुराणोक्त ते तेव्हा कळत नसे) त्यानंतर वाजणारे नगारे आणि रणशिंग तुताऱ्या, ते टपलेले अधाशी लोक, बुडत्या सूर्याच्या प्रकाशात त्या गोंधळानंतर उभे असलेला तो निष्पर्ण वृक्ष, गर्दी पांगल्यावर हळू हळू साकळणारा संधिप्रकाश ही अशी हाँटिंग इमेजरी माझ्या मनात पक्की रुतलेली आहे. या 'मानलेल्या' सोन्याला लुटायला सगळे लोक एकमेकांवर चढत. त्यात कुणाचे हातपाय मोडले तरी कुणाला फिकीर नसे. कुणाच्याही मुंडक्यावर पाय देऊन झाडावर चढत. झाडावरचे शेवटचे पान न पान ओरबाडल्याशिवाय हे थांबत नसे.
मग प्रत्येक सणातल्या rituals मधे झाडांवरून काहीतून उपटून, लुटून, ओरबाडून आणावेच लागते हे लक्षात आले. एकही सणात कुणी नवे झाड लावत नाही. होळीला देखील आमच्या इकडे ताजे एरंड काढून जाळले जाते. वटपौर्णिमा कदाचित एकमेव असा रिचुअल असावा ज्यात झाडाचा पार्ट तोडत नाहीत मात्र त्यात देखील झाडाला बिचाऱ्याला कैद व्हावे लागते. झाडानंतर नद्या नाल्यांचा नंबर. प्रत्येक पूजेचे निर्माल्य सरळ सरळ फेकून देणे.
म्हणजे लग्नासारख्या रिचुअल मधे देखील एखादे झाड लावावे अशा नव्या परंपरा आजही पडू शकत नाहीत. आपण आता उधार घेतल्या आहेत त्या सगळ्या पुन्हा चंगळवादी प्रथाच. ( आपल्या लग्नात देखील लोक कुर्हाड, तलवार, कट्यार असली शस्त्रे घेऊन उभी असतात, लोल). म्हणजे आता गुरुजींनी सांगावे की बाबांनो तुमचे देवक वृक्ष आता 'हा' आहे आणि हा तुम्ही दोघांनी लावावा आणि सिंचावा. आणि ते पूर्ण बहरले तरच तुमचा वंशवृक्ष बहरेल वगैरे. आणि त्या भोवती एखादी सुंदर रिचुअल उभी करावि. एखाद्या मेटलच्या चौकोनात चार काटक्या आणि शेण तुपात जाळण्यापेक्षा! म्हणजे कम ऑन. २००० वर्षांपूर्वी देखील त्याच्यात काही विशेष गंमत नव्हती. आता कशाला ते करत बसायचे. अग्नीच पाहिजे ना मग सगळ्यांनी रात्री बोन फायर करून त्याभोवती बसून एकमेकांकडे लाल हृदयाची उशी फेकून रिमा लागू - अनुपम खेर रोमांस करावा. नुटक्याच गिटार शिकू लागलेल्या देवरजीला पण हात साफ करून घेता येईल.
अस्थी वाहत्या पाण्यात सोडणे इत्यादी गोष्टी फिलॉसॉफिकली प्रचंड सुंदर आहेत. पण गावोगावी जे ओढे आता गटारी नाले झालेल्या आहेत तिथे उभ्या असणाऱ्या स्मशानांत जळावे लागणे आणि तसल्याच गलिच्छ पाण्यात अस्थिरूपी मिळून जाणे कदाचित आधुनिक भारतीय डिझर्वच करत असावेत. rituals हवेतच. मात्र त्यांच्याभोवती निसरड्या रेषा काढत बसण्याऐवजी नवे अर्थ असलेले नवे रिचुअल निर्माण करावेत. ज्यात काहीतरी सृजन होईल. नद्या नाल्यांत घाण सोडावी लागणार नाही. मृत्यूनंतर देखील अस्थी कुठेतरी पुरून झाड लावता येईल. (त्या निमित्ताने पछाडनारी झाडे निर्माण होऊन कुणी ती आवर्जून तोडणार नाहीत हा एक वेगळाच फायदा) पण लक्षात कोण घेतो.
आपण काही गोष्टींत तार्किक असतो, मात्र रिचुअलमधला अतार्किकपणा आपण मान्य करू लागतो. संघर्ष टाळण्यासाठी. पण हे तरी गरजेचे आहे का?
कॅप्टन फँटास्टिक हा चित्रपट आठवला. अगदी नेमकं बोट ठेवतो या सगळ्यावर तो. रिचुअलमधला अतार्किकपणा मान्य करणे हे सौंदर्यपूर्ण, समकाळाला पूरक आणि सृजनात्मक देखील होऊ शकते ही शक्यता का मारून टाकावी? मनाने सतत लॉजिकल विचार करत राहावे ही मनाला दिलेली शिक्षाच आहे. परंतु दुसऱ्याबाजूला त्याला निर्धोक आणि निर्मळपणे इलॉजिकल होण्यासाठी काही तरी तसेच ना घडवता चारचौघे करतात म्हणून तेच करायला लावून गप्प बसवणे ही देखील शिक्षाच आहे.
शिवाय हा संघर्ष आता नेहमी या ना त्या रूपात आपल्यासमोर येत राहून आपला वेळ घेत राहणार आहे. बापट ही त्यातली पूर्ण विशुद्ध मिलिटेंट तर्ककर्कश्य बाजू. आणि बुद्धीच्या देवतेसाठी उन्मादी झालेली मूर्खांची झुंड ही पूर्ण करप्ट बाजू. यांच्या मधे काहीतरी स्पेस आहे. जोवर ती भरून येत नाही तोवर नेमेचि येतो पावसाळा तसे नेमेची हा बुद्धी विरुद्ध मन संघर्ष सार्वजनिक अवकाशात देखील येत राहणार आहे. हा संघर्ष खाजगी अवकाशात सोडवण्यात देखील खूप ऊर्जा खर्च होणारच आहे.
आता नवरात्री आणि कंडोमचा खप यांचा सहसंबध असलेले लेख पडतीलच. त्याचीच वाट पाहावे. जे जे घडते ते ते उगी पाहावे.
परंपरा आणि स्मृतीकातरता-
परंपरा आणि स्मृतीकातरता- दोघांत घोळ होतोय. दोघांना वेगवेगळी जागा, कोर्ट आणि मानवंदना दिली तर बरेच प्रश्न सुटतील
परंपरा आणि स्मृतीकातरता
परंपरा आणि स्मृतीकातरता
या दोन्ही गोष्टी एकमेकांत घट्ट गुंतलेल्या आहेत. परंपरा पर्सनल देखील असतात. उदा. वडिलांनी आणि मुलाने एकाच शॉप मधे रेग्युलर आईस्क्रीम खायला जाण्याची परंपरा. हीच परंपरा आपल्या नोस्टलिजियाचा पाया होते. त्यांना वेगवेगळे करणे म्हणजे काय? नोस्टाल्जिया करा इथे म्हणून जागा तयार करायच्या? आणि तिथे नोस्टाल्जिया करायला जाण्याची परंपरा घडवायची? फारच मेटा होतेय का हे साजिऱ्या?
नोस्टॅल्जिया (म्हणजे इंग्रजीत
नोस्टॅल्जिया (म्हणजे इंग्रजीत स्मृतीकातरता) फार पर्सनल आहे भिडू. तुमची आणि माझी वेगळी असेल. मला नाना पेठेतला एखादा उकिरडा बघून ती येऊ शकते. ती संपूर्ण्पणे मानसिक अवस्था आहे ना.
परंपरा ही मुळातच तुम्ही 'सार्वजनिक'करून ठेवलेली आहे. ती तुमच्या हातात नाही. कुणी पाळतात, कुणी नाही; आणि कुणी काही कारणं काढून टाळतात. पर्सनल लेव्हलला नोस्टॅल्जिया ही फार भारी आणि ट्रेडिशन ही फार भंपक गोष्ट असं होऊ शकतं. याच्या एक्झॅक्टली उलट तत्त्वज्ञान उरी बाळगणारे लोक आजुबाजूला सुखी आहेत असं तुम्ही सहज बघू शकता. अख्ख्या मॉडर्न उत्सवखोरीचा डोलारा त्यावर आहे.
रूट कॉज अॅनालिसिस केलं केलं तर तुमचा स्वतःचा 'नॉस्टॅल्जिया' सार्याला कारणीभूत आहे. कुठे तो थांबवायचा हे आपल्याला कळत नाही, आणि आणि चौर्यांशी लक्ष योन्यांचा का काय- त्यावर आपला विश्वास आहे. सार्या परंपरा फिरून नॉस्टॅल्जिया ठिकाणावर आला की आपणही येऊ ठिकाणावर..
सिंबाचा लेख मला दांभिक वाटला
सिंबाचा लेख मला दांभिक वाटला नाही.
परागने दिलेल्या उदाहरणातला 'आयुष्यभर मुंज वगैरे विधींना नावं ठेऊन स्वत:च्या मुलांची करायची आणि मग' हा ठळक केलेला भाग कळीचा असावा असं वाटतं. बदलाची सुरुवात स्वतःपासून करता येणार नसेल तर इतरांना गतानुगतिक म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार होता? कदाचित त्या चारचौघांपैकी अडीच जणांचंही प्रिय/ज्येष्ठ व्यक्तीला दुखवायचं नाही / कुटुंबात निर्णयाचा अधिकार समान हवा हेच कारण असू शकलं असेल.
पराग,
>>> वगैरे नियम आज्जीच्या राज्यातही नव्हते
मग तू एका प्रिव्हिलेज्ड ग्रूपमध्ये आहेस असं म्हणावं लागेल, ज्यात पुरोगामीपणाच्या मार्गावर तुम्ही सर्व कुटुंबीय साधारणपणे सारख्याच टप्प्यावर आहात. एकाच घरात निरनिराळ्या टप्प्यांवरचे लोक असले की कॉन्फ्लिक्ट आलाच ना? आपापल्या प्राधान्यक्रमानुसार कोणी संघर्ष करेल तर कोणी गोडीगुलाबीचा मार्ग पत्करेल.
Pages