गुप्तहेर सत्यवीर आणि विलक्षण खून - भाग २

Submitted by रुद्रसेन on 20 September, 2026 - 07:59

भाग १- स्वेच्छानिवृत्ती https://www.maayboli.com/node/88872

≠==================================
शौनकची व्यथा

शौनकने सांगायला सुरुवात केली -
त्या दिवशी पहाटे सुमारे चार वाजता टपालनगर येथील रहिवाशांची झोप भयंकर किंकाळ्यांच्या मालिकेमुळे भंगली. या किंकाळ्या टपालनगर येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून येत होत्या. त्या घरात शेहरीन दिनशॉ आणि तिची मुलगी मेहेर दिनशॉ या दोघीच राहत असल्याचे माहीत होते. किंकाळ्यांच्या आवाजांनी आसपासचे शेजारी सगळेच जागे झाले. किंकाळ्या ह्या दिनशॉ कुटुंबाच्या घरातून ऐकू आल्याने सगळे तिकडे धावले. पण दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी फोन केला गेला.

दोन हवालदारांना घेऊन मी घटनास्थळी गेलो. नेहमीच्या पद्धतीने घरात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर काही वेळाने लोखंडी दांडा वापरून मुख्य दरवाजा फोडला आणि आठ-दहा शेजारी मी आणि दोन पोलिस अधिकारी आत गेलो. आतील ते दृश्य पाहून उपस्थित प्रत्येक व्यक्तीला भय आणि आश्चर्याचा एकाच वेळी धक्का बसला.

खोलीत सर्वत्र अत्यंत गोंधळ उडालेला होता. फर्निचर तुटलेले होते आणि वस्तू सर्व दिशांना अस्ताव्यस्त फेकलेल्या होत्या. खोलीत फक्त एकच पलंग होता. परंतु त्यावरील गादी काढून खोलीच्या मध्यभागी फेकलेली होती. एका खुर्चीवर रक्ताने माखलेला वस्तरा पडलेला होता. एका कोपऱ्यातील जागेवर दोन-तीन लांब आणि जाड पांढऱ्या/करड्या मानवी केसांच्या बटा आढळल्या. त्या रक्ताने माखलेल्या होत्या आणि त्या केसांना मुळांसकट ओढून काढल्याचे दिसत होते. जमिनीवर नाण्यांनी भरलेल्या दोन पिशव्या सापडल्या ज्यात काही रोख रक्कम होती.
मी सगळ्या खोलीची तपासणी करायला घेतली. पलंगाखाली एक छोटी लोखंडी तिजोरी सापडली. ती उघडी होती आणि तिच्या कुलपात किल्ली अजूनही होती. त्यामध्ये काही जुनी पत्रे आणि फारसे महत्त्व नसलेली काही कागदपत्रे यांशिवाय काहीही नव्हते.

त्यानंतर आम्ही घराच्या मागील बाजूच्या एका छोट्या फरसबंदी केलेल्या अंगणात गेलो. जिथे छोटंसं टेरेस होतं. तेथे वृद्ध स्त्रीचे प्रेत पडलेले होते. तिचा गळा इतका पूर्णपणे कापला गेला होता की तिला उचलण्याचा प्रयत्न करताच तिचे डोके धडापासून वेगळे झाले. तिचे शरीर आणि डोके दोन्ही इतक्या भयानक रीतीने विद्रूप झाले होते की शरीरात माणसाचे कोणतेही स्पष्ट स्वरूप जवळजवळ उरले नव्हते. या भयंकर रहस्याचा अद्याप आमच्या माहितीनुसार यत्किंचितही माग काढता आलेला नाही.

हि आपली व्यथा सांगून शौनक शांत बसला..
पलंगाखाली एक छोटी तिजोरी होती म्हणजे ज्याला तिजोरी उघडायची होती त्याच्याकडे किल्ली होती आणि त्याने काही घेतलं नाही” सत्यवीरने कुतूहलाने विचारलं.
“दिसत तर तसंच आहे.”
“मग तिजोरी उघडण्याचं कारण काय?”
"काही समजत नाही" शौनक खाली मान घालत विचारात पडला.
“खून नक्की कशासाठी झालाय.. हेच तर कोडं आहे” निंबाळकर साहेब सत्यवीरकडे पाहत म्हणाले.
काही क्षण शांतता पसरली.

"मुलीचा मृतदेह म्हणजेच मेहरचा मृतदेह घरातल्या दुसऱ्या खोलीत आढळला. तिच्य गळ्यावर हाताने आवळल्याच्या खुणा होत्या. शरीरावर झटापटीच्या खुणाही होत्या. चेहऱ्यावर ओरखडे होते. ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असावी. नंतर घराच्या मागच्या बाजूच्या छोट्या फरसबंदी केलेल्या टेरेसवजा अंगणात शेहरीन यांचा मृतदेह गळा कापल्याच्या अवस्थेत सापडला.” सत्यवीर हनुवटीवर हात ठेवून म्हणाला.
"हो" शौनकने मान डोलावली.
"तुम्ही सांगितलंत कि खुर्चीवर रक्ताने माखलेला वस्तरा पडलेला होता. कदाचित त्यानेच शेहरीनचा गळा धडापासून वेगळा केला गेला असावा?" सत्यावरीने विचारलं.
"हो वस्तार्यानेच गळा कापला गेलाय.. पण वस्तऱ्यावर कोणाचे ठसे आहेत ते सापडत नाहीये.." शौनकने पुढची माहिती दिली. "मेहेरचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं प्राथमिक तपासात दिसतं. पण शेहरीनच्या मृत्यूचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. तिच्या गळ्यावर गंभीर जखम होती.
“आणि तिच्या मृत्यूची पद्धत पाहता... हल्लेखोर अत्यंत क्रूर असावा असं वाटतं" सत्यवीर म्हणाला.
"कुणी काही संशयास्पद व्यक्ती पाहिल्याचं सांगितलेलं नाही का? कि सगळ्यांनी किंकाळ्याच ऐकल्या" सत्यवीरने पुढे विचारलं.
"हो... बऱ्याच शेजाऱ्यांनी किंकाळ्या ऐकल्या मात्र एक शेजारी जो दिनशॉ कुटुंबाच्या जवळ राहत होता तो म्हणाला त्याने एक माणसाचा आवाज ऐकला.. हाका मारत असल्यासारखा जो कि विचित्र भाषेत होता" शौनकने गूढ पद्धतीती सांगितलं.
"ओह्ह.. विलक्षण आहे" सत्यवीर म्हणाला.
शौनक क्षणभर थांबला.

"किंकाळ्या एका व्यक्तीच्या होत्या की दोन?" सत्यवीरने पुढचा प्रश्न केला.
“हा प्रश्न आम्हालाही पडला आहे.” शौनक काहीसं चाचरत म्हणाला.
“म्हणजे?”
“बहुतेकांनी फक्त एकाच व्यक्तीच्या किंकाळ्या ऐकल्या असं सांगितलं.”
"दिनशॉ कुटुंबियांच्या जवळ असलेल्या कोणा व्यक्तीची तपासणी किंवा कुटुंबीयांविषयी माहिती घेतलीच असतील तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे" सत्यवीरने विचारलं.
"नातेवाईक असं कोणी नाही पण घरात कामाला आलेल्या नोकरमाणसांकडून जुजबी माहिती मिळाली ती हि कि शेहरीन आपला उदरनिर्वाह भविष्य सांगून करत असावी. गेल्या सहा वर्षांपासून त्या तिथे राहत होत्या ते एक भाड्याचे घर होते भाड्याबाबत कधी कोणती तक्रार आलेली नव्हती. वृद्ध स्त्री शेहरीन काहीशी बालिश किंवा विचित्र स्वभावाची होती. आसपासच्या लोकांनी गेल्या सहा वर्षांत तिच्या मुलीला फक्त पाच-सहा वेळा पाहिले होते. त्या दोघी अत्यंत एकांतप्रिय जीवन जगत होत्या आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याची चर्चा होती" शौनकने माहिती दिली.
शौनकने खिशातून तो कागद बाहेर काढला जो त्याने काही वेळापूर्वी निंबाळकरांना दाखवला होता. तो कागद सत्यवीरसमोर ठेवत म्हणाला,
सत्यवीरने कागदाकडे पाहिलं.
“हा कागद त्या घराच्या तिजोरीत सापडलेल्या जुन्या कागदपत्रांपैकी एक आहे.”
सत्यवीरने कागद हातात घेतला.
त्यावर काही जुन्या तारखा, काही नावे आणि एका जुन्या मालमत्तेचा उल्लेख होता. ज्यात काही जमिनीच्या मालकीचा उल्लेखदेखील दिसत होता. त्याने कागद पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचला.

"सत्यवीर मला वाटतं तू या केसबाबत शौनकला मदत करावीस. तसंही त्याच्यापुढे मोठा पेचप्रसंग ओढवलेला आहे आणि तू सुद्धा इथे आलेलाच आहे तर माझ्या घरचा पाहुणचार पण घे काही दिवस" इतके वेळ शांत बसलेले निंबाळकर साहेब सत्यवीरकडे पाहत म्हणाले.
सत्यवीरने त्यांच्या या म्हणण्यावर आनंदाने होकार दिला. शौनकची आणि सत्यवीरची आधीपासून ओळख नव्हतीच पण निंबाळकर साहेबांच्या मध्यस्तीने कोणाची मदत मिळत असल्यास त्याला हवंच होतं म्हणून तो सुद्धा निंबाळकर साहेबांचे आभार मानून तिथून लगेचच निघून गेला.
गेट बंद झाल्याचा आवाज आला आणि त्याच क्षणी जणू त्या घरावरचं काहीतरी अदृश्य ओझं पुन्हा हलकं झालं.

अंगणातून हशा ऐकू आला.
कुणीतरी मोठ्याने म्हणत होतं- “अहो निंबाळकर आता तुम्हाला रोज सकाळी सहाला उठवायला कोणी फोन करणार नाही”
त्यावर दुसऱ्याने लगेच टोमणा मारला.
“अरे… सहाला उठवणं बंद झालं तरी वाहिनी आठ वाजता उठवतील”
सगळे हसले.
निंबाळकरही हलकेच हसले. पण सत्यवीर मात्र तिथेच उभा होता. नेहमीसारखाच तो केसच्या विचारात गढलेला होता.

त्याच्या मनात काही मिनिटांपूर्वी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीची पुनरावृत्ती होत होती.
चार वाजता किंकाळ्या.
आतून बंद असलेला दरवाजा...
विस्कटलेली खोली....
रक्ताळलेला वस्तरा....
कोपऱ्यातील सापडलेल्या केसांच्या बटा.
उघडी तिजोरी... आणि कुलपात असलेली किल्ली...
दोन मृतदेह.

सत्यवीरने डोळे मिटले. घटनास्थळ त्याच्या कल्पनेत पुन्हा उभं राहिलं. तो हळूहळू मनात प्रश्नांची मांडणी करू लागला. दरवाजा आतून बंद होता तर हल्लेखोर बाहेर कसा गेला? तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जाणं शक्यं आहे?
की तो अजूनही घरातच होता?
पण घराची तपासणी झाली होती. मग खून झाल्यावर दरवाजा आतून कोणी बंद केला?
त्याने डोळे उघडले. त्याच क्षणी त्याच्या मनात दुसरा प्रश्न आला. मेहेरच्या किंकाळ्या शेजाऱ्यांनी ऐकल्या... पण शेहरीनने त्या ऐकल्या नसतील?
मेहेर घरात ओरडत असताना.. शेहरीन अंगणात कशी पोहोचली?
आणि सर्वांत महत्त्वाचं त्या राखेत सापडलेले केस नेमके कुणाचे?

“काय विचार करतोयस?”
सत्यवीर दचकला. निंबाळकर साहेब त्याच्या शेजारी येऊन उभे होते.
" केस ऐकुन प्रश्न पडत आहेत.”
“पडायलाच हवेत.”
निंबाळकरांनी त्याच्या हातातला रिकामा ग्लास पाहिला. निंबाळकर त्याच्या शेजारी बसले.
"सत्यवीर..” निंबाळकर हळू आवाजात म्हणाले, “तुला एक गोष्ट सांगू?”
“बोला.”
“माझ्या निरोपाच्या दिवशी मला केस मिळेल असं मी कधीच कल्पना केली नव्हती.”
सत्यवीर हसला. बाजूच्याच टेबलावरील बाटली घेऊन निंबाळकरांनी सत्यवीरच्या रिकाम्या ग्लासात दारू ओतली.
“मला सुद्धा कल्पना नव्हती कि तुमच्याकडे पार्टीला आल्यावर खुनाची केस ऐकावी लागेल.”
निंबाळकरही हसले. पण त्यांचं हसू फार काळ टिकलं नाही.

त्यांनी समुद्राकडे पाहिलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. समोर पार्टी सुरू होती. हशा, गप्पा, संगीत, जेवणाचा सुगंध...
दोघांची नजर दूर समुद्रावर स्थिरावली होती. बंदरावरच्या दिव्यांची प्रतिबिंबं काळ्या पाण्यावर हलत होती. निंबाळकर आणि सत्यवीर दोघेही आपापल्या प्याल्यातून एक एक करून घोट घेत होते
समोर पार्टीचा गोंगाट सुरूच होता. निंबाळकर समाधानाने समोर पाहत पीत बसले होते पण सत्यवीरच्या मनात आता एकच प्रश्न घुमत होता.
टपालनगरच्या दिनशॉ कुटुंबीय राहणाऱ्या त्या घरात पहाटे चार वाजता नेमकं काय घडलं होतं?
==============================================================

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults