जिन्नस एक, पदार्थ अनेक - सावली - पोह्यांस कारण की...

Submitted by सावली on 20 September, 2026 - 01:26

पोह्यांस कारण की...
सिरॅमिकच्या चार प्लेट्स वरून काढून त्यांचे दर्शन घडवणे!!

नरकचतुर्दशीच्या दिवशी पोह्यांचा नैवेद्य असतो.
त्यात पोह्यांचा चिवडा, दही पोहे आणि गोड पोहे असतात.
म्हणजे तीन पदार्थ झालेच ! असा विचार करून पोहे हा जिन्नस निवडला.
त्यात दही पोहे खूप आवडीचे आहेत , खूप भूक लागली तर पटकन करून खाता येतात आणि पोटभरीचे होतात
पण चिवडा करायला पातळ पोहे आणले नाहीत म्हणून बेत थोडा बदलून टाकला.
photopea_resize_1789881550195.jpg

तर आज या प्लेट मध्ये आहेत.
कांदे पोहे
काकडी पोहे
अद्रकवाले दही पोहे
गोड पोहे

यात अजून अनेक प्रकार करता आले असते . कोळाचे पोहे, कुरकुरीत पोहे, तिखटमीठाचे पोहे, वगैरे जे वेळेअभावी केले नाहीत

---------------
कांदे पोहे
सोपीच नेहमीची रेसिपी. शेंगदाणे वेगळे तळून घातले आहेत.

photopea_resize_1789881586879.jpg

----------------
काकडी पोहे
दीड ते दोन वाटी पोहे धुवून, पाणी निथळून
एक काकडी किसून
पाव कांदा अगदी बारीक चिरून
दोन चमचे शेंगदाणा कूट
एक दोन मिरच्या बारीक चिरून
एक चमचा ओले खोबरे - ऑप्शनल
चवीपुरती साखर मीठ
अर्धे लिंबू

सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून त्यावर दडपे पोह्यांसाठी वजन ठेवतो तसे ठेवून द्यावे. दडप्या पोह्या इतका वेळ लागणार नाही. दहा मिनिटे पुरतील.

photopea_resize_1789881601413.jpg

--------------
अद्रकवाले दही पोहे
दीड वाटी पोहे धुवून , निथळून
दोन मोठे चमचे दही
थोडं आलं किसून
कोथिंबीर बारीक चिरून
मीठ चवीपुरते
थोडे काळे मीठ किंवा चाट मसाला
डाळिंब - ऑप्शनल

सगळे जिन्नस एकत्र करून कालवायचे. दही पोहे तयार.
डाळिंब घरात नव्हते पण ते एकत्र करून फार छान लागते
त्यामुळे डेकोरेशन ब्लू बेरीज वापरल्या.

photopea_resize_1789881570573.jpg

--------------
गोड पोहे
दोन ते तीन मोठे चमचे तूप
एक वाटी कोरडे पोहे
बारीक ब्राऊन साखर किंवा पिठी साखर.

छोट्या कढल्यात तूप गरम करावे.
कडकडीत तापले की पोहे टाकून मिक्स करावे
पोहे थोडे तळले जाऊन फुलतील.
त्यावर पिठी साखर किंवा बारीक साखर घालून नीट ढवळून गॅस बंद करावा.
काही मिनिटात थंड व्हायला लागले की जास्त कुरकुरीत होतात.

photopea_resize_1789881621419.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच आहेत सगळे पोहे.
पण त्याहूनही अधिक मला त्या पानांच्या आकाराच्या प्लेट्स आणि ट्रे आवडला.
अद्रकवाले दही पोह्यांची प्लेट बहुतेक Ginkgo च्या पानाच्या आकाराची आहे.
जबरदस्त कलेक्शन.....

पोहे परिवार देखणा आहे

मात्र कांदे पोहे ते कांदे पोहेच, त्याची सर इतरांना नाही

Thank you
ऋतुराज, अनिंद्य, शर्मिला, अनु
त्या प्लेट्स साठीच इतका खटाटोप..
ट्रे काचेचा आहे, आईने रंगवला आहे.
प्लेट जपानवरून आणलेल्या आहेत.
Ginko ( काकडी पोहे)
waterlily ( दही पोहे)
maple ( कांदे पोहे) आणि
शेवटचे ( गोड पोहे)
कसले ते माहित नाही पण त्यासारख्या पानाच्या द्रोणात ताकोयाकी देतात असे आठवते.

मस्तच! पोहे एकदम आवडते.
तो मेपल म्हणजे नुसता मेपल नाही तर जॅपनीज मेपल आहे, नाजूक, निमुळत्या, नितळ पानांचा!

मस्त दिसतायत सगळेच पोहे पण कांदेपोहे पाहून खावेसेच वाटले.
काही वर्षांपूर्वी मी कांदापोहे हा आयडी दिसल्यावर कांदेपोहे करुन खाल्ले होते हे आठवलं. Wink

पोहे प्लाटर आवडलं.
गोड पोहे म्हटल्यावर आम्ही नर्कचतुर्दशीला करतो ते गूळ खोबरा पोहे आठवले.
हे वरचे गोड पोहे त्यात बारीक फिकी शेव घालून डाएट चिवडा म्हणून विकतात.

हे बघितलं गेलं नव्हतं. पोहे अगदी मनाशी पोचणारे, भूक लागली की ऐनवेळी बचकभर नुसतेही खायला आवडतात, गोड प्रेमी नसल्याने तिखट स्वरूपात आवडतात किंवा नुसते आवडतात.

काय सॉलिड प्रेझेंटेशन आहे,देखण्या डिशेस त्यात देखणे पोहे. आवडलं सर्व.

मस्तच!!
मला शीर्षकदेखील फार आवडलंय! Happy