कथा.. कथा म्हणजे नेमक काय? घटनांची शृंखला? रंगवून सांगितलेली घटना? की आणखी काही?
कधी कधी विचार केला की अस वाटत की आपण जगत असलेले जीवन देखील कथाच असेल. कदाचित कोणी सांगितलेली, कदाचित कोणीही न सांगितलेली, कदाचित आपण स्वतःच स्वतःला सांगत असलेली नाही का? पाहाणा आपण आपल्या जगण्यातून आठवणी जमावतो, अनुभव कमावतो आणि नंतर याच आठवणींच्या जोरावर आपण आपले चारित्र्य गढतो त्या चारित्र्याच्या हिशोबाप्रमाणेच आपण आपल्या जीवनात येणारे कित्येक निर्णय घेतो, या निर्णयांचा परिणाम आपल्यापुढे नवीन आठवणी म्हणून येतो आणि हे चक्र असेच आयुष्यभर चालत राहते.
आता तुम्ही म्हणालं या सगळ्या गोष्टींचा कथेसोबत काय संबंध?
चला एक उदाहरण घेऊ आणि आपण आपल्या कथेतील पात्र तो स्वतःला सांगत असलेल्या कथेला अनुसरून काय निर्णय घेईल याचा अंदाज घेऊ!
नाव रमेश. वय सात. घरात कोणी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांना पाणी द्यायचे आहे आणि रमेश जिद्द करत आहे की तोच पाणी नेऊन देणार.. कदाचित आईने समोर काढलेले नविन काचेच्या ग्लास त्याला मोहवीत आहेत. आता इथे काही शक्यता आहेत की इथे काय काय होऊ शकते, या मला सुचलेल्या काही शक्यतांचा मी उल्लेख करतो तुम्ही त्याचा किंवा या सारख्या अनेक घटनांचा किंवा आठवणींचा या रमेशवर काय परिणाम होईल हे तुम्ही सांगा..
शक्यता १ आई त्याला एका ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास भरून देते आणि ते द्यायला सांगते आणि तो ते व्यावस्थित पाहुण्यांना देतो.
शक्यता २ आई त्याला एका ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास भरून देते आणि ते द्यायला सांगते आणि तो ट्रे पाडतो आणि ते ग्लास फुटतात यावेळी आई त्याला संगळ्यांसामोर दोन कानशीलात देते एक काम धडपणे करता येत नाही तुला हे म्हणते.
शक्यता ३ आई त्याला एका ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास भरून देते आणि ते द्यायला सांगते आणि तो ट्रे पाडतो आणि ते ग्लास फुटतात यावेळी आई त्याला काही बोलत नाही प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तुला कुठे लागले तर नाही न असे म्हणते
शक्यता ४ आई त्याला आधी दोन पाणी भरून स्टीलचे ग्लास देते आणि त्याला म्हणते की तू जर यातल पाणी एक थेंबही न सांडता पाहुण्यांना पाणी दिले तर मग मी तुला पाणी प्यायला काचेचा ग्लास देईल.
इथे मी मुद्दाम लहाणमुलाचे उदाहरण घेतले तुम्ही या किंवा अशा अनेक शक्यतांचा त्या मनावर काय परिणाम होईल आणि त्याच्या जीवनावर काय परिणाम होईल हे सांगा..
बरं चला आपण एक मोठ्या माणसाचे उदाहरण घेऊ आता विचार करा अजय आणि विजय दोन मित्र आहेत दोघांना सिगारेट सोडायची आहे तर कोण सिगारेट यशस्वीपणे सोडेल हे तुम्ही सांगा
अजय : मी कुठलेही काम हाती घेऊ ते कधी पूर्ण होत नाही.. त्यात लाईच अडचणी येतात आणि हाती घेतलेलं काम अपूर्णच राहते.
विजय : मी कुठलेही काम हाती घेतले की ते तडिस नेतो.. त्यात कित्येक अडचणी येतात पण त्यातून मी मार्ग काढून माझे काम पूर्ण करतोच.
आता तुम्ही सांगा यातले कोण यशस्वीरीत्या सिगारेट सोडेल? विजय, बरोबर न? का कारण त्याला स्वतःवर विश्वास आहे जो अजय ल नाहीये आणि हा आत्मविश्वास विजय ल बळ देईल. आता मला सांगा की हा फरक दोघांमध्ये कसा आला? ते स्वतः सोबत जे बोलतात त्यातूनच न? आता तुम्ही म्हणाल की हो पण विजयचे अनुभव त्या पद्धतीचे असतील बरोबर आहे.. आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती तुम्हीही कधी न कधी ऐकली असेल.
दोन जुळे भाऊ असतात त्यातला एक अट्टल बेवडा असतो आणि दूसरा दारूला हातही लावत नाही ज्यावेळी कोणी त्यांना विचारत की तुम्ही दारू का पिता किवा पित नाही तेव्हा दोघेही एकच उत्तर देतात की माझे वडील दारू प्यायचे.. आता इथे घटना एकच आहे वडिलांचे दारू पिणे पण त्याचे परिणाम दोन आहेत ते का असतील? काय वाटते तुम्हाला? मला वाटते की इथे दोघांनी या घटनेमुळे स्वतःला दोन वेग वेगळ्या कथा सांगितल्या जो बेवडा झाला त्याने कदाचित स्वतःची समजूत अशी काढली असेल की वडील दारू पितातच की मग यात चुकीच काही नसेल किंवा असेच काहीतरी सांगून त्याने स्वतःची समजूत काढली असेल. त्या ऐवजी दूसरा म्हणाल असेल की वडील दारू पित राहतात त्यामुळे त्यांचे आमच्याकडे लक्ष सुद्धा नाही या दरुने त्यांना आमच्यापासून दूर केले आहे त्यामुळे दारू खुप वाईट..
मी एकदा विपाशनेच्या दहा दिवसीय शिबिरात सहभागी झालो होतो तेथे त्यांनी सांगितले होते की आपण जी प्रतिक्रिया समोर घडणाऱ्या घटनेला देतो त्यानुसार आपले भाव पुढच्यावेळी तशाच घटनांसाठी असतील हे ठरते फक्त त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊनच नाही तर स्वतःच्या आनुभवावरुन मी हे बोलू शकतो की हे खरे आहे.
म्हणजे हे चक्र काहीसे असे असले पाहिजे:
घटना (प्रत्यक्षात घडलेली किंवा कोणी सांगितलेली) + त्याचा आपण लावलेला अर्थ + आपल्या मनात आपण दिलेल्या प्रतिक्रियेमुळे निर्माण झालेली भावना + आपण स्वतःला स्वतःबद्दल सांगत असलेली कथा की मी असा आहे मी तसा आहे आणि स्वतःला बरोबर ठरवण्यासाठी आपण स्वतःला दिलेले दाखले आणि यातून आपला निर्माण झालेला स्वभाव मग पुढच्या घटनेच्या वेळी पुनः सुरू झालेले हे चक्र.. या चक्राच्या पुनरावृत्तीलाच कदाचित आपले पूर्वज संस्कार म्हणत असावेत.
तुम्हाला काय वाटत?