दुपारी मरणझोप लागली. एका सूफी फकीराचा मृत्यू झाला होता. जनाजा कबरस्तानाच्या दिशेने निघाला होता. मी त्यात सामील होतो. डोक्याला रुमाल बांधलेला. जनाजा हळूहळू पुढे सरकत होता. दोन्ही बाजूंनी लोक. कुणी फक्त चालत होते. कुणी पुटपुटत होते. बुरखे घातलेल्या स्त्रिया दिसत होत्या. एक पुरुष हाताने त्यांना वाट करून देण्याचा इशारा करत होता. जनाजा घाटावर पोहोचला तेव्हा थोडावेळ दर्शनासाठी खाली ठेवला गेला.
मी गर्दीतून वाट काढत पुढे पुढे सरकत होतो. तेवढ्यात जनाजा हलला. फकीर आतून उठून बसला. त्याने हिरवी चादर बाजूला केली, डोळे चोळले आणि अगदी साधेपणाने म्हणाला, इस बार भी नहीं मरा मैं.'
थोडा वेळ आजूबाजूला बघितलं. मग वर पाहून म्हणाला, 'मालिक ने वापस भेज दिया. अभी और जीने का हुक्म है. कबतलक कौन जाने.'
ते ऐकून जमलेल्या सगळ्यांनी माना डोलावल्या. कुणी काही बोललं नाही. जे घडलं त्यात कुणाला काही आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. फकीराला तिथंच सोडून सगळे शांतपणे निघून गेले. मी तिथंच रेंगाळलो.
समोर मांडी घालून बसलेला फकीर.
'या अल्लाssह' म्हणत त्यानं पुन्हा आभाळाकडं नजर लावली. कनेक्शन जोडलं गेलं असावं वरती. तंद्री लागलेली असावी. 'तोसे बिनती करूं, तोरे पैंय्या पडूं' असलं काहीतरी विनवणीच्या स्वरात बोलत राहिला.
मी उभाच होतो.
काही वेळानं त्यानं डोळे उघडले. माझ्याकडे बघून विचारलं,
'कौन हो तुम?'
“मी गरीब.”
त्यानं मला आपादमस्तक न्याहाळलं.
'वो तो दिख ही रा है.'
मग म्हणाला, 'पर सवाल क्या है तेरा? क्या मुद्दा है?'
“सवाल असा काही नाही.” मी थोडं थांबून म्हणालो, “पण हे सगळं काय आहे? हा जनाजा, ही फुलं, एवढी माणसं.. आणि तुम्ही उठून बसलात म्हणजे हे सगळं फुकटच गेलं. याचा खर्च कोण करतं?”
फकीरानं भुवया उंचावल्या. बराच वेळ माझ्याकडे बघत राहिला. आणि मग म्हणाला, 'बचकाने सवाल पूछने की आदत छोड़ दो.'
“का?”
'क्योंकि जवाब महँगा पड़ता है.'
यावर काहीतरी फिलॉसॉफी झाडण्याच्या विचारात होतो तेवढ्यात कुणीतरी पाठीमागून माझ्या खांद्यावर हात ठेवला. वळून बघितलं तर एक चाळीशीतला मनुष्य. डोळे स्टोन्ड. चेहऱ्यावर हसू. मलंग टाईपचा वाटत होता.
त्यानं विचारलं, 'काय? इकडं कुठं?'
“काही नाही. सहजच. गर्दी दिसली. कसली आहे बघावं म्हणून आलो.”
त्यानं डोळे मिचकावून विचारलं, 'फकीराच्या मागं आला होतास? की बुरख्याआडून कुणी हसलेली आवडली? खरं खरं सांग.'
मी चपापलो. माझी पहिली प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे भीतीची. साला हा कुणी कपाली तांत्रिक वगैरे तर नसेल? मी आतल्या आत टरकलो. परंतु ती भावना दाबून वरवर खेळकर स्वरात मी विचारलं,"काय माईंड रिडींग वगैरे जमतं वाटतं? कुठे शिकला? आणि आता काय माझं भविष्य सांगणार की काय?"
त्यानं हसून विचारलं, 'उद्याचं की लांबचं?'
"एकूणच..!"
त्यानं माझ्याकडे निरखून बघितलं. 'तू खरंतर फार पूर्वीच टोकाचं पाऊल उचलायला पाहिजे होतंस.'
आणि मग नसिरुद्दीन शाहएवढा दीर्घ पॉज घेत म्हणाला, 'हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. बघ, विचार कर. पण फार नकोस करू.'
मग अचानक म्हणाला, 'नाहीतर असं कर. चल आत्ताच सोबत. आजच तुझं काम तमाम करू. तशी व्यवस्था आहे आपल्याकडे.'
माझ्या अंगावर बारीकसा काटा. साला, हे काय आता बळीबिळी देतायत की काय माझा?
मी मागे वळून बघितलं. फकीर आता उठून उभा राहिला होता. पण त्याच्या शेजारी ठेवलेला जनाजा कुठं दिसत नव्हता. गुलाबाच्या पाकळ्या होत्या. हिरवी चादर होती. धूप जळत होता. पण जनाजा गायब झाला होता.
मी इकडं तिकडं बघायला लागलो.
'क्या ढूंढ रहे हो?'
आवाज कुठून आला कळलं नाही.
मलंग आता माझ्या जवळ येऊन उभा राहिला होता. म्हणाला, 'ठुम साला घरीब लोघ… मरने खे बॅड बी सथाथे हो.”
“म्हणजे?” माझ्या तोंडून आवाज कसाबसा बाहेर पडला.
यावर त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला. 'चलो.'
“कुठं?” मी यावेळी स्पष्टपणे चाचरत विचारलं.
'चलो मछिंदर गोरख आया.!'
त्यानं कबरस्तानाच्या पलीकडे बोट दाखवलं.
तिथे आणखी एक जनाजा ठेवलेला दिसला. नवा. आजूबाजूला कुणी नव्हतं. फक्त एक माणूस पाठमोरा उभा होता. एकटाच. डोक्याला रुमाल बांधून.
काही अंतर चालून त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं वळून बघताच विचारलं, 'काय? इकडं कुठं?'
मी त्याला बघितलं. आणि बघतच राहिलो. त्याच्या चेहऱ्याच्या जागी मला माझा चेहरा दिसू लागला. च्यायला ! माझा चेहरा कुठं गेला? चेक करण्यासाठी म्हणून मी माझा हात माझ्या डोक्याच्या जागी नेला, तर तिथे खांद्याच्या वर डोकं लागेना. बोटं एका निराकार पोकळीत चाचपडत राहिली. डोक्याच्या जागी एक प्रचंड मोकळी फेसलेस व्हॉईड आहे असं जाणवलं. जाणवतच राहिलं. बापरे.! या स्पेसला तर काही अंतच नाही.
याबद्दल काही विचारणार होतो इतक्यात फकीराचा आवाज पुन्हा घुमला, 'अभी और जीने का हुक्म है.'
आणि मग मी जागा झालो. म्हणजे खरंच जागा.
विचित्र विश्वात घेऊन जाणारी
विचित्र विश्वात घेऊन जाणारी कथा.
आवडली.
The faceless void !
The faceless void !
अभी और जीने का फ़रमान है 👌
सुंदर!!!
सुंदर!!!
जबरदस्त!
जबरदस्त!