
स्थळ : आपलं ते हे
चॅनल : तेहेसकाळ
मुलाखतकार : तर आज आपल्याकडे हे विद्यानंद बापट आले आहेत. बापट यंदा डीजेबंदीवरून चर्चेत आहेत.
आज ते आपल्याला त्यांचा आवडता पदार्थ सावजी चिकन करीची रेसिपी सांगणार आहेत.
तर आधी आम्हाला सांगा, की तुम्हाला उत्सवात डीजे चालत नाही, पण चिकन चालतं, हे कसं काय?
बापट : तुमचा हा प्रश्न म्हणजे भरकटप्रत्यारोपण आहे.
मुलाखतकार : आँ? काय आहे?!
बा. : डिफ्लेक्टिव काउंटर अॅक्युझेशन आहे. आम्ही त्याला महत्त्व देत नाही.
मु.का. : म्हणजे काय, जरा आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा.
बा. : म्हणजे कोंबडीचा आणि गणपतीचा संबंध नाही, गणपती आणि डीजेचा संबंध नाही...
मु.का. : (एक्साइट होत) पण डीजे आणि चिकनचा आहे! चिकन आणि सावजींचाही आहे!
बा. : हो, पण हे सगळं असंबद्ध आहे, शिवाय त्याने ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होतं.
मु.का. : पण आज आपण या ठिकाणी ध्... डीजेबद्दल बोलायला आलोच नाही. तुम्ही रेसिपी सांगणार आहात.
बा. : हो, पण डीजेबद्दल तुम्हीच विचारलंत. आम्ही तुमचा प्रश्न अनुल्लेखाने मारू इच्छित नाही. शिवाय तो आमच्या नागरी हक्कांबाबतचा प्रश्न आहे.
मु. का. : (गोंधळत, कॅमेर्याकडे वळत) तर आपण चिकनकडे वळू या.
बा. : तर या पाककृतीसाठी आपल्याला अस्थियुक्त पादखंड घ्यायचे आहेत.
मु. का. : कोऽऽण?!
बा. : बोन-इन. बोन-इन लेग पीसेस घ्यायचे आहेत. एका माणसाला पाव किलो चिकन तरी हवं.
मु. का. : (घाम पुसत) हाँ हाँ!
बा. : शिवाय ज्वारीचं पीठ, कांदा, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं, सावजी मसाला, असला तर कांदा लसूण मसाला
मु. का. : वा वा!
बा. : वा म्हणजे? अजून आपण काही केलेलंच नाही.
मु. का. : नाही, म्हणजे हे काय म्हणालात ते नीट कळलं.
बा. : आपण हे पादखंड शीघ्रकुंभात शिजवणार आहोत.
मु. का. : (जरा ताठ उभा रहायला लागलेला असतो तोच परत ढेपाळतो.) काय... म्हणालात?
बा. : शीघ्रकुंभ - इन्स्टन्ट पॉट!
मु. का. : ...
बा. : तर आधी उच्च परत मांडणीवर - म्हणजे हाय सॉते मोडवर ज्वारीपीठ भाजून घ्यायचं. मग उष्णता बंद करून उर्वरित आचेवर सुकं खोबरं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं. भारतीय दुकानांत बिर्याणीवर घालण्यासाठी तळलेला कांदा मिळतो, तो असला तर तोही वापरावा. हा कांदा आणि खोबरं वाटून घ्यायचं. तसंच आलं आणि लसणाचं ओलं वाटण करून घ्यायचं.
मु. का. : आणि चिकन...
बा. : हो, सांगतो आहे. तर आता उच्च परत मांडणीवर तेल तापवायचं. त्यात हिंग, हळद, लाल तिखट घालायचं. सावजी मसाला घालायचा. मी 'पल्लवी' नाममुद्रेचा मसाला वापरतो.
मु. का. : या आपल्या पत्नी का? (त्याला 'पत्नी' शब्द आठवल्यामुळे स्वतःचंच कौतुक वाटतंय!)
बा. : कोण?!
मु. का. : पल्लवी काय ते.. नाममुद्रे...
बा. : नाही नाही, पल्लवी हे मसाल्याच्या ब्रॅन्डचं नाव! तर तो मसाला, आणखी कांदालसूण मसाला घालणार असाल तर तो, कांदा, ओलं,/सुकं वाटण, ज्वारीपीठ सगळं परतून घ्यायचं. दोन हिरव्या मिरच्याही उभी चीर देऊन त्यात घालायच्या. कांदा-लसणाचा कच्चा वास गेला की मग ते कोंबडीचे पादखंड...
मु. का. : (कळवळून) तुम्ही सरळ चिकन म्हणाल का? पादबिद म्हटलं की खावंसं वाटत नाही!
बा. : (कसनुसं हसत) बरं. म्हणजे मराठी भाषेवर इंग्रजीचं अतिक्रमण होत चाललं आहे, पण त्याबद्दल आम्ही नंतर कधीतरी आंदोलन करणार आहोत.
मु. का. : (हायसं वाटून) हाँऽ!
बा. : तर त्यावर चिकन घालायचं. नीट सगळीकडे मसाला लागेल असं चांगलं हलवून घ्यायचं. मग पा... चिकन बुडेल इतकं पाणी घालायचं.
मु. का. : (पाणी पितो.)
बा. : चवीप्रमाणे मीठ घालून आता परत मांडणी बंद करून दबाव मांडणी..
मु. का. : (सावध होत) दबाव? कसला दबाव? आम्ही कुठलाही दबाव सहन...
बा. : प्रेशर प्रेशर! प्रेशर कुक करायचं चिकन पाच मिनिटं. आणि मग तातडीने वाफ मोकळी करायची.
मु. का. : म्हणजे?
बा. : क्विक रिलीज.
मु. का. : हाँ बरं बरं. मग?
बा. : मग काय? झाली पाककृती! आता रश्शात पाणी जास्त वाटलं तर थोडा वेळ परत...
मु. का. : परत??
बा. : सॉते हो! मघाशी सांगितलं नाही का? परत परत विचारू नका.
मु. का. : (पूर्णपणे हताश झालेला आहे.) बरं.
बा. : तर परत मांडणीवर जास्तीचं पाणी आटवून घ्यायचं. झालं!
मु. का. : धन्यवाद, या मस्त झणझणीत रेसिपीसाठी! आमचे एक प्रेक्षक विचारतायत की यात चिकनऐवजी बटाटा घातलेला चालेल का.
बा. : हा तेकानको युक्तिवाद झाला. (मु. क्या.चा एकंदर आविर्भाव बघून ) म्हणजे व्हॉटअबाउटरी! ही व्हॉटअबाउटरी झाली. म्हणजे आम्ही जी पाककृती सांगतो आहोत ती आमची..
मु. का. : (आता चक्क दुर्लक्ष करत) तर या भन्नाट रेसिपीबद्दल आमच्या प्रेक्षकांतर्फे आम्ही बापट यांचे आभार मानतो. धन्यवाद!
अस्थियुक्त पादखंड शीघ्रकुंभात
अस्थियुक्त पादखंड शीघ्रकुंभात शिजवायचे 😂
पादबिद म्हटलं की खावंसं वाटत नाही 😂
सही!!!
सही!!!
धमाल है भाई धमाल है.
धमाल है भाई धमाल है.
कमाल है.
हा तेकानको युक्तिवाद झाला.
(No subject)
ज्वारीचे पीठ हे दिशाभूल
ज्वारीचे पीठ हे दिशाभूल करण्याच्या हेतूने दिलेले आहे का? शाळेत जाणार्या माशांच्या समुहात रक्तवर्णी माशाची वर्णी का लावली आहे?
बोलेतो ज्वारीच्या पिठाचं काय करायचं आहे?
तो लाल धुरकटलेला मासा आहे!!!
तो लाल धुरकटलेला मासा आहे!!!
भाकऱ्या.
भाकऱ्या.
बटाट्याऐवजी पनीर चालेल का?
सावजी चिकनमध्ये रस्सा दाट
सावजी चिकनमध्ये रस्सा दाट करायला भाजलेलं ज्वारीचं पीठ घालतात.
ते लिहायचं राहिलं होतं, आता दुरुस्त केलंय.
शीघ्रकुंभाचा वापर केल्याने
शीघ्रकुंभाचा वापर केल्याने कुक्कुट, वराह ते डाळ-ओदन शिजवताना ज्या शिट्ट्या कराव्या लागतात त्या कराव्या न लागल्याने कार्यालयिन कामकाजाची झूम बैठक चालू असताना ही एकीकडे कुणाच्या नकळत काम करता येते. घरातील डेसिबलही आटोक्यात राहतात.
अन्न शिजवण्यासाठी विजेचा वापर केल्याने हरितगृहवायुंचे उत्सर्जनही कमी होते. इथे एक गोष्ट मात्र विचारात घेतली पाहिजे की आपण अजुनही पारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करुनच वीज निर्मिती करत आहोत. आपण अक्षय्य उर्जा स्त्रोतांकडे लवकरात लवकर वळण्याची गरज आहे, पण तो आजचा विषय नाही. ( इथे कसनुसे हसुन छताकडे बघत डोळे आणि भुवया चोळायच्या)
भन्नाट लिहीलेय
भन्नाट लिहीलेय
खतरनाक जमली आहे कोंबडी
कड्डक!!
कड्डक!!
फारच भन्नाट जमलंय सगळं!!!
फारच भन्नाट जमलंय सगळं!!! अस्थीयुक्त पादखंड काय..शीघ्रकुंभ काय

पल्लवी नाममुद्रे पण धमाल.
बापटांनी वाचलं तर घरीच हसतील.बाहेर विचारलं तर केस विस्कटून 'हां...म्हणजे प्रत्येक कलाकाराला आपल्या कलेचा आविष्कार करण्याचं घटना स्वातंत्र्य आहे.आम्ही ते राईट टू बी रॉन्ग म्हणून मान्य करतो' म्हणतील
धमाल आहे हे
धमाल आहे हे
काय लिहिलं आहेस स्वाती ! मजा
काय लिहिलं आहेस स्वाती ! मजा आली.
अनु , मस्त लिहिले आहेस.
आगाया कसलं खतरनाक जमलंय हे
आगाया

कसलं खतरनाक जमलंय हे
काय लिहिलं आहेस स्वाती ! मजा
काय लिहिलं आहेस स्वाती ! मजा आली.>>> १ अमितव व अनुचे प्रतिसाद आवडले.
कसलं भारी लिहिलंय
डीजेपासून सुरू झालेली ही
डीजेपासून सुरू झालेली ही पाककृती पादखंड–शीघ्रकुंभ–दबाव मांडणी करत अशी झणझणीत झाली की तोंडात बोटं घालून शिट्टी वाजवावीशी वाटतेय!
पण नको, बापट आक्षेप घेतील. 
सावजी चिकन मध्ये कांदा लसूण
सावजी चिकन मध्ये कांदा लसूण मसाला ? तरीच संतोष चव्हाणांनी विद्यानंद बापटांच्या श्रीमुखात भडकावली असे सकृतदर्शनी वाटते.

भन्नाट लिहिलं आहे. आवडल.
भन्नाट लिहिलं आहे. आवडल.
तो रस्याचा फोटो पाहून तर अगदी तोंडाला पाणी सुटले.
भारीच कल्पना सुचलीय तुम्हाला
भारीच कल्पना सुचलीय तुम्हाला आणि भन्नाट लिहिलंय!
भन्नाट
भन्नाट
सहिहे!
सहिहे!