सणासुदीचं ताट, बेसनाचा थाट!
बेसनपोळी (वर तुपाचा गोळा), अळूच्या वड्या, कढी-पकोडे/बच्चू-कढी, भजी.
(फाउल नको म्हणून सणा-सुदीचे बाकीचे कलाकार फोटो काढून झाल्यावर पानात आले.)
ह्यातील बेसनपोळ्या आणि अळूच्या वड्यांचे लोंढे आदल्या दिवशी तयार करून ठेवता येतात. त्यामुळे पाहुणे येणार असतील तर हा बेत खूप सोयीचा होतो.
बेसनपोळ्या हा खास विदर्भी पदार्थ आहे. पुरणपोळीच्या मानाने सोपा आणि लवकर होणारा. बिघडण्याची शक्यता जवळपास नाहीच.
माहेरी ह्या पोळ्या बरेचदा व्हायच्या. अजूनही वाहिनीने ती परंपरा कायम ठेवली आहे. माझ्याकडे मात्र मी पहिल्यांदाच केल्या. मायबोलीची कृपा !!!
सासरी कायम पूरणपोळ्या आणि संक्रांतीला गुळपोळ्याच व्हायच्या.
अळूच्या वड्यांमद्धे सांगण्यासारखं काही वेगळं नाही. घरोघरी होतातच त्या. सणाच्या थाळीचा अविभाज्य भागच आहे अळुवडी म्हणजे!
कढी खरं तर पुरेशी होती ह्या ताटात. पण म्हटलं कुणाला वाटायला नको.., कढी मधे बेसनापेक्षा पाणी हाच मुख्य हिरो आहे. म्हणून मग कढी-पकोडे चा घाट घातला. कढी-पकोडेला बच्चू-कढी पण म्हणतात. (त्यानिमित्ताने मला विदर्भी भजी भात पण खाता आला मग!)

तर सुरवात करूया-
बेसनाचा डबा ओट्यावर काढायचा तो डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावरच आत टाकायचा. कारण सगळ्या पदार्थांमध्ये सढळ हस्ते बेसन वापरायचं आहे.
१. बेसनपोळ्या:- दिलेल्या प्रमाणात साधारण दहा मध्यम आकाराच्या पोळ्या होतील.
साहित्य:- बेसन (एक वाटी), तेल, चिरलेला गूळ (बेसानेवढाच- एक वाटी किंवा जास्त गोड चव आवडत असल्यास, थोडासाच जास्त), जायफळ, कणिक (एक वाटी कणीक + चमचाभर बेसन).
सारण कृती :-
i. पुरेशा तेलावर मंद आचेवर बेसन खमंग भाजून घ्यायचे.
ii. बेसन लालसर झाल्यावर थोडे थोडे करत त्यात बेसन पूर्ण बहिजेल इतके गरमसर पाणी टाकायचे.
iii मंद आचेवर एक वाफ काढायची.
iv त्यात गूळ टाकून चांगलं एकत्र करायचं.
v पुन्हा मंद आचेवर २/३ मिनिटे वाफ काढायची.
vi वरून जायफळ पूड मिसळायची आणि आता हे मिश्रण थंड करायला ठेवायचे.
थोडक्यात बेसनाचा गूळ घालून शिरा करायचा. हवे असल्यास हे सारण आदल्या दिवशी पण तयार करून ठेवता येतं.
आवरणाची कणिक कृती :-
i कणकेत चमचाभर बेसन आणि तेलाचं मोहन घालून पोळ्यांना हवी तशी भिजवून घ्यायची.
(भिजवलेल्या कणकेचा गोळा आणि बेसनाचे सारण ह्यांची consistency सारखी हवी.)

आता १५/२० मिनिटे कणिक मुरल्यावर पुरणाच्या पोळ्या करतो तशा पोळ्या करायला घ्यायच्या.
बेसनाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या इतक्या मोठ्या नाही करायच्या. मध्यम आकाराच्याच करायच्या.
पोळ्या तेलावर खरपूस भाजायच्या.
२. अळुवडी:-
साहित्य:-अळूची पानं, बेसन, चिंचेचा कोळ, तीळ, तिखट, मीठ, हलदं धने-जिरे पूड, गरम मसाला, थोडं तेल.
कृती:-
i पानं सोडून बाकीचे सर्व साहित्य एकत्र भिजवायचे. (पानावर पसरवता येईल इतपत घट्ट)
ii पोळपाटावर पान पालथे ठेवून त्यावर हे मिश्रण पसरवायचे.
iii त्यावर दुसरे पान पालथे ठेवायचे. त्यावर परत बेसनाचे मिश्रण लावायचे.
iv वरची स्टेप ४/५ पानं एकत्र होईपर्यंत रिपीट करायची. आणि मग लोंढे वळायचे.
v सर्व लोंढे वळून झाल्यावर कुकर/मायक्रोवेव मधे १५/२० मिनिटे वाफवायचे.
vi चांगले गार झाले की वड्या कापायच्या.
vii तव्यावर शालो फ्राय करायच्या.
३. कढी-पकोडे / बच्चू कढी:-
कढी साहित्य:- दही, बेसन, पातळ चिरलेला कांदा(हवा असल्यास), आलं पेस्ट, साखर, मीठ, कढी पत्ता, हिरव्या मिरच्या, मेथया, हिंग, जिरे, फोडणी साठी तूप.
कृती:-
i रवीने दही चांगलं घुसळून घ्यायचं.
ii त्यात बेसन घालून परत एकजीव करायचं
iii आता त्यात चवीनुसार मीठ, साखर, आल्याची पेस्ट, उभा पातळ चिरलेला कांदा (नको असल्यास हा गाळू शकता) घालायचा.
iv मिश्रणात दहयाच्या ५/६ पट पाणी घालून घोंटून घ्यायचं.
v तुपावर हिंग जिरयाची फोडणी करायची.
vi त्यातच थोडे मेथी दाणे, कढी पत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या.
vii आता दही बेसन मिश्रण फोडणीला टाकायचं.
viii मंद आचेवर सतत ढवळत राहायचं, साधारण १५ मिनिटे.
कढी तय्यार!

भजी (नुसती खायला / कढीत घालायला/ भाताबरोबर खायला)
साहित्य:-
बेसन, तेल (मोहना करता आणि तळणीला), तिखट, मीठ, हळद हिंग, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर,
सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं.
थोडं थोडं पाणी घालत भज्यांच पीठ भिजवायचं.
तांबूस रंगावर चमचमीत भजी तळून घ्यायची.

वाढणीच्या वेळी कढीत भजी टाकायची आणि वरून गरम तेलात थोडं तिखट टाकून तडका द्यायचा. (ऐच्छिक!)
अजून कुणीच बेसन, रवा, ब्रेड
अजून कुणीच बेसन, रवा, ब्रेड असे बिनीचे शिलेदार पदार्थ का वापरले नाहीत याचं आश्चर्य वाटत होतंच, तितक्यात तुमची एन्ट्री झाली.
झकास मेन्यू आहे. 👌
बेसनपोळ्या नवीन आहेत माझ्यासाठी.
कढी-पकोडेला बच्चू-कढी म्हणतात 🙂
वॉव
वॉव
बेसन पोळी करणार गं
सुग्रण आहेस
बेसन असंही आवडतं. त्यामुळे हा
बेसन असंही आवडतं. त्यामुळे हा थाट करणार नि सजवणार ताट.
वाह काय मस्त
वाह काय मस्त
माझ्या डोक्यात बेसन घोळत होतं.पण धिरडं पिठलं पीठ पेरून कांदा भाजी पुढे स्किल्स जात नाहीत त्यामुळे सोडून दिलं.
एकंदर ही स्पर्धा पण बऱ्याच नव्या आयडीया देणार.
बेसन हिरो होऊ शकतो हे लक्षात
बेसन हिरो होऊ शकतो हे लक्षात आलं नव्हतं.
बेसन पोळी नवा प्रकार आहे. पकोडेवाली कढी आवडते.
मी रुचिरातल्या कृतीने गोळ्यांचा भात करतो.
कढी पुलाव हाही एक प्रकार आहे. दही बेसनाच्या मिश्रणातच भात शिजवायचा.
बाकीचे पदार्थ फोटोत आले असते तरी चाललं असतं - थाळीतील किमान तीन पदार्थांत निवडलेल्या मुख्य घटकाचा ठळक आणि ओळखू येईल असा वापर असावा. असा नियम आहे.
बाकीचे पदार्थ फोटोत आले असते
बाकीचे पदार्थ फोटोत आले असते तरी चाललं असतं>> पहिल्याच फोटोत आहेत नं सगळे पदार्थ...
बाकी फोटो काढण्यात मी कच्ची आहे जरा. हात खूप हलतो.
सुग्रण आहेस>>
सुग्रण आहेस>>
सामो सुवर्णाक्षरात लिहून ठेवते. घरच्यांना दाखवायला बरं. हा...हा...
छान
छान
मस्त!
मस्त!
बेसनपोळ्या ऐकल्या नव्हत्या कधी - पुपोंना चांगला सोपा ऑप्शन आहे!
पुपोंना चांगला सोपा ऑप्शन आहे
पुपोंना चांगला सोपा ऑप्शन आहे!>> हो.
सुरेख सर्वच. बेसन पोळ्या
सुरेख सर्वच. बेसन पोळ्या वेगळा प्रकार .
मस्त सगळेच पदार्थ.
मस्त सगळेच पदार्थ.
बेसनाचे सर्व प्रकार आवडीचे, बेसनाच्या पोळ्या माझ्यासाठीही नवीन आहेत नक्की करून पाहीन.
अरेच्चा!!!
अरेच्चा!!!
आई बेसनाच्या पोळ्या इतक्यांदा करायची की मला वाटत होतं बऱ्यापैकी माहिती असलेला पदार्थ असेल....
बऱ्याच जणांना हा पदार्थ माहित नव्हता हे आत्ता कळतंय!
मस्त सजलं आहे ताट सब कुछ
मस्त सजलं आहे ताट सब कुछ बेसन .
बेसनाच्या पोळ्या करून बघणार. पुरण पोळ्यांसारख्या लागतात का ह्या थोड्या थोड्या ?
पुरण पोळ्यांसारख्या लागतात का
पुरण पोळ्यांसारख्या लागतात का ह्या थोड्या थोड्या ?>> हो. थोड्याफार प्रमाणात.
मुख्य पुरण वाटणं ह्या प्रकाराला सुट्टी मिळते आणि झटपट होतात.
वर लिहायचं राहिलं, दोन- तिन दिवस टिकतात छान. त्यामुळे कुणी येण्याच्या आदल्या दिवशी पण करून ठेवता येतात.
छान बेत आहे हा.
छान बेत आहे हा.
बेसन आवडतेच त्यामुळे सगळे पदार्थ उत्तम चवीचे होतील असे वाटतेय.
बेसन पोळी प्रथमच ऐकले/ वाचले.
बेसन पोळी फार मस्त झाली बरं
बेसन पोळी फार मस्त झाली बरं का. फक्त थोडी अगोड झाली तेव्हा परत थोडा गूळ घालून ठेवलय वाफ यायला. माझ्या फ्लेकी झाल्यात छान. खमंग आणि खरपूस.
व्वा! सामो, लगेच करून बघतलीस.
व्वा! सामो, लगेच करून बघतलीस...
बेसनपोळ्या नव्यानेच कळतायत.
बेसनपोळ्या नव्यानेच कळतायत. एकदा नक्की ट्राय करणार. पण जरा प्रमाण नीट लिहीणार का?
मी अळूवडी उचलणार
मी अळूवडी उचलणार
मस्त ताट.
बेसन हिरो होऊ शकतो हे लक्षात आलं नव्हतं.>>> उलट बेसन ऑल टाईम हीट आहे, गोडाचे तिखटाचे किती पदार्थ बनतात!
फारच मस्त आहे सगळंच.
फारच मस्त आहे सगळंच. बेसनपोळ्या करून पाहणार. आईकडे एक काकू यायच्या मदतीला त्यांच्या हातच्या खाल्ल्या आहेत एकदा. पण पुन्हा नाहीच.
@सायो लिहिलं प्रमाण.
@सायो
लिहिलं प्रमाण.
आज जेवतांना मी परत बेसनपोळी
आज जेवतांना मी परत बेसनपोळी खाल्ली. जास्त चवदार लागली. (चार दिवसांपूर्वी केल्या होत्या.)
गुळाचे पदार्थ जितके मुरतात तितके जास्त छान लागतात.
सहा दिवस पुरवून पुरवून
सहा दिवस पुरवून पुरवून खाल्लेल्या बेसनपोळ्या आज संपल्या.
संपत होत्या तशा अधिकाधिक चवदार लागत होत्या.
मी पहिल्यांदाच केल्या होत्या. इतकी वर्ष का केल्या नाही कुणास ठाऊक.
ही स्पर्धा ठेवणाऱ्या संयोजकांचे आभार.
आता ह्या वर्षात माझ्याकडे जे कुणी शाकाहारी पाहुणे येतील त्यांना हाच पाहुणचार!
बेसनपोळी प्रकार आवडला (
बेसनपोळी प्रकार आवडला ( म्हणजे रेसिपी). सोपा वाटतोय पुरणाच्या मानाने. करून बघेन.
अरे वा, शर्मिला, अळू वडी
अरे वा, शर्मिला, अळू वडी सोडली तर सगळे प्रकार नवीन आहेत माझ्या साठी. माझा स्वैपाक करायचा कंटाळा जाईल असं वाटतंय एवढ्या सगळ्या रेस्प्या बघून.( जरा आलाय खरा कंटाळा, पण ते जाऊदे अवांतरा साठी सॉरी)
छान .बेसन पोळी कोरडी होते का?
छान .बेसन पोळी कोरडी होते का?
बेसन पोळी कोरडी होते का?>>
बेसन पोळी कोरडी होते का?>>
नाही. पुरणपोळी सारखी ओलसरच होते. पुरण बिघडण्याची शक्यता पण नाही. शिवाय वेळ पण कमी लागतो.
@ शर्मिला.
@ शर्मिला.
तुमची ही बेसनपोळ्यांची कृती वाचल्यापासूनच करून बघायची तीव्र इच्छा होती. दुसरीकडे मनीमोहोर यांचे पुरणपोळीचे savoury version सुद्धा खुणावत होते. मग शुचिर्दक्ष होऊन दोन्ही कृतींचे फ्यूजन म्हणून थोड़े फेरफार करून “नमकीन बेसनपोळी” करण्यात आली !!!
फार खटाटोप नाही झाला आणि end product हिट्ट ठरले. तुमचे आभार आणि तुम्हाला हा चक्षुर् नैवेद्यम् समर्पयामी 👇
आयडियादाता प्रसन्नम् भवेत 🙏
व्वा!!!
व्वा!!!
तुम्ही लिहिलेलं नं अडखळता वाचता आलं तर ही फोटोतील पोळी सुद्धा खाता येईल मला... हा... हा....
पण सिरीयसली .. पोहोचली बेसनपोळी.... मस्त जमलेली दिसतेय.
Pages