
नमस्कार!
रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत, तीन अंकी चवदार नाटक 'लाडका'.
प्रायोजक : गार्डनिंगची हौस असणारी मैत्रीण
लेखिका : आऊसाहेब
दिग्दर्शिका आणि सूत्रधार : स्वाती आंबोळे
कलाकार : कांदा, लसूण, दाण्याचं कूट, तीळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, फोडणीचं साहित्य, लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ, आगळ
आणि तिहेरी प्रमुख भूमिकेत आपला सगळ्यांचा लाडका - दोडका!
.
पडदा उघडतो तेव्हा ओट्यावर एक ताजा, कोवळा, रसरशीत आणि लांबसडक दोडका दिसतो.
स्वाती कमरेभोवती एप्रन बांधत लगबगीने येऊन दोडका धूते, आणि त्याचे दोन भाग करते.
सोलाण्याने एका भागाच्या शिरा काढते, आणि दुसरा भाग पूर्ण सोलते. शिरा आणि साली काळजीपूर्वक एका बोलमध्ये काढून घेते.
एकीकडे तोंडाने 'काय हिरवागार दोडका आहे! ताज्या तोडून आणलेल्या भाजीची मजाच वेगळी' वगैरे स्वगत सुरू आहे.
.
अंक पहिला : भाजी
(आता यापुढे 'करते' असा उल्लेख आला की काय ते स्वातीच करते आहे हे समजून वाचा! पुन:पुन्हा नाव लिहिणार नाही!)
.
शिरा काढलेल्या दोडक्याला एक उभी चीर देऊन मग त्याच्या साधारण दीड सेंटीमीटर जाडीच्या चकत्या करून घेते.
दाण्याच्या कुटात लाल तिखट, मीठ, गोडा मसाला मिसळून घेते.
कांदा लसूण आणि कोठिंबिरीची देठं बाऽरीक चिरून घेते.
.
.
कुटाच्या मिश्रणात किंचित पाणी घालून हाताने कालवते, आणि दोडक्याच्या फोडींत हे मिश्रण भरते.
.
.
आता तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करते. त्यात क्रमाने कांदा, लसूण, कोथिंबिरीची देठं आणि उरलेलं कुटाचं मिश्रण घालून छान परतून घेते.
.
.
कांदा शिजून तेल सोडायला लागल्यावर दोडक्याच्या फोडी घालते. चवीप्रमाणे गूळ आणि आगळ (त्याऐवजी चिंचेचा कोळही चालू शकेल, पण तिला आगळ आवडतं.) घालून वर आधणाचं झाकण ठेवते.
थोड्या थोड्या वेळाने तेच झाकणातलं आधणाचं पाणी लागेल तसं भाजीत घालते. असं केलं की भाजी पाणचट होत नाही.
दोडका कोवळा असल्यामुळे लगेच शिजतोच.
शिजलेली भाजी बोलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालते.
.
.
अंक दुसरा : भरीत
.
भाताचा कुकर लावताना त्या पूर्ण सोललेल्या भागाच्या फोडी करून त्या स्टीमर बास्केटमध्ये वाफवून घेते.
.
.
वाफवलेल्या फोडी हातानेच थोड्या कुस्करून त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घालते
दाण्याचं कूट आणि मीठ घालते. ती साखर घालत नाही, पण आवडत असेल तर घातलेली चालेल.
.
.
अंक तिसरा : शिरांची कुरकुरीत चटणी
.
शिरा आणि सालं चॉपरमधे बारीक करून तो कीस मायक्रोवेव्हेबल बोलमध्ये काढते. त्यात मीठ घालते.
थोड्या तेलावर तीळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि लसूण मध्यम चिरून परतून घेते.
.
.
हे सगळं मिश्रण त्या किसावर ओतते.
.
.
एका वेळी दीड ते दोन मिनिटं मायक्रोवेव्ह करून मग कीस ढवळून घेते - ही स्टेप चटणी कुरकुरीत होईपर्यंत रिपीट करते.
.
.
आता भरीतात घट्ट दही घालून कालवून घेते आणि पान वाढून घेते.
.
.
पहिला घास घेताना आपलाच गृहकृत्यदक्षपणा पाहून तिला अगदी गहिवरून येतं.
मागे 'माझ्याच दोडक्याची मी साल काढते, अन् पाऽऽन मांडते' गाणं सुरू आहे.
टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडतो.
वाह.मस्तच रेसिपी.आन8 खुसखुशीत
वाह.मस्तच रेसिपी.आणि खुसखुशीत मांडणी.भरला दोडका आणि दोडका चटणी आवडेल.करून पाहीन.भरताबद्दल मात्र अजून निर्णय नाही.
दोडका काही लाडका नाही, पण
दोडका काही लाडका नाही, पण लिबलिबित दोडक्याला असे फेसलिफ्ट, रादर glamorous लाइफ़ अपग्रेड दिल्याबद्दल तो तुमचा आजन्म आभारी असेल यात शंका नाही 😁
हायला ! हे लाडक्याच लोण पार
हायला ! हे लाडक्याच लोण पार अमेरिकेतही पसरले की काय !
लाडकी बहीणीनंतर लाडका दोडका
भारी दिसते आहे पाकृ. भरीत आणि शिरांची चटणी करुन बघेन
दोडका माझा दोडकाच राहील पण
दोडका माझा दोडकाच राहील पण पाकृ साठी १०० पैकी १५० मार्क्स.
भारी जमलंय नाटक .. !! दिसतंय
भारी जमलंय नाटक .. !! दिसतंय पण सुंदर.. दिग्दर्शकाचं कौतुक आहे हो !!
बाकी नाटकापुरताच दोडका लाडका आहे
आवडतात ह्या तिन्ही पाककृती.
आवडतात ह्या तिन्ही पाककृती.
तीन अंकी नाटक मस्तच जमलं आहे.
तीन अंकी नाटक मस्तच जमलं आहे. वाचायला मजा आली.
प्लेटिंग ही छानच.
रच्याकाने शिराळी दोडके दोन्ही मला आवडतात. मला भाजी ही आवडते आणि घरात मात्र सर्वांना चटणी.
दोडके इथेही आले की.
दोडके इथेही आले की.
छान आहे 3 अंकी नाटक.
आवडल्या रेसिपी.
मला अस्मिताकडे आलेले दोडक्याचे बंपर पिक आठवत होते वाचताना.
मराठी नाटक दिवाणखान्यातून
मराठी नाटक दिवाणखान्यातून स्वैपाकघरात गेलं.
हल्ली तीन अंकी नाटकं कोणी करत नाहीत. ती परंपरा पुनरुज्जीवित केल्याबद्दलही अभिनंदन..
नाटक चांगलंच रंगलंय. प्रेक्षक पडदा पडायच्या आत स्टेजवर येतील.
छान लिहिलंय. पाककृती पण मस्त.
छान लिहिलंय. पाककृती पण मस्त.
लाडकी बहीणीनंतर लाडका दोडका
वा मस्तच जमलंय नाटक. करुन
वा मस्तच जमलंय नाटक. करुन बघेन कधीतरी. जनरली दोडका आला की तुपावाच केली जाते.
लाडकी बहीणीनंतर लाडका दोडका >
लाडकी बहीणीनंतर लाडका दोडका >>>
दोन स्पर्धांची एंट्री एकत्रच झाली आहे.
चटणीची रेसिपी मस्त आहे.
नाटक रंगलंय!
नाटक रंगलंय!
एका दगडात पाककृती आणि लेखन दोन्ही आहे हे. शिरांची चटणी करताना त्यात इतकं तेल असतं का? ती आवडते.
हल्ली भारतात गेल्यावर ज्या भाज्या मला पूर्वी आवडत नसत त्या घरची ओढ, मायेची चव, काय असेल ते आवडू लागल्या आहेत. त्यामुळे काय सांगावं.
तरी सुदैवाने इथे दोडका मिळत नाही. गावातील लोकांशी मैत्री करण्याच्या चेकलिस्टीत 'दोडका पिकवत नाहीत ना?' हा एक प्रश्न दोनवर्षांपूर्वी घातला आहे. मला एकदा दोडकी आणि 'तू पण लाव' करुन दोडक्याचे रोप ही देण्यात आले होते. माझ्या उत्साहाने अर्थात त्याला मारले. उगा विषाची परीक्षा कशाला!
बाकी ती लिबलिबीत भजी दोडक्याचीच करतात ना?
फारच मस्त दिसतेय सगळं.
फारच मस्त दिसतेय सगळं. लिहिलेही छान!
झकास, हो ना. कुणी कितीही रसभरीत वर्णन लिहिले तरी मी काही दोन वर्षे दोडका आणणार नाही. त्या अमाप पिकाचा धसका घेतला आहे.
मायबाप प्रेक्षकांचे - आपलं,
मायबाप प्रेक्षकांचे - आपलं, अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
>>> शिराळी दोडके दोन्ही मला आवडतात
म्हणजे? आम्ही शिराळ्यांनाच दोडके म्हणतो, बिनशिरांची ती घोसाळी.
>>> गावातील लोकांशी मैत्री करण्याच्या चेकलिस्टीत 'दोडका पिकवत नाहीत ना?' हा एक प्रश्न दोनवर्षांपूर्वी घातला आहे
हा रूल मायबोलीवरही करणार का?
>>> लिबलिबीत
आँ? लुत्फ-ए-सब्ज तुझ से क्या कहूँ जाहिद!
मस्त जमलीय ! दोडका माझा लाडका
>>हा रूल मायबोलीवरही करणार का
>>हा रूल मायबोलीवरही करणार का? >> 'दुरुन दोडकी लाडकी' असे माबोकर आहेत तोवर ठीक आहे. दोडकी घरी आणून देतील इतक्या जवळ अंतरावर आले की बघू!
>>> शिरांची चटणी करताना त्यात
>>> शिरांची चटणी करताना त्यात इतकं तेल असतं का
नाही, ते फोडणीचं छोटं कढलं आहे - फोटो जवळून काढल्यामुळे फसवा आलाय.
>>> घरची ओढ, मायेची चव
नॉस्तॅल्जियाची फोडणी म्हणतात त्याला आमचे प्रायोजक.
भारी... दोडका लाडकाच
भारी... दोडका लाडकाच
सुरेख लिखाण.
सुरेख लिखाण.
त्यातले भरीत करून पाहायला हवे.
दोडका म्हटल्यावर आधी अस्मितेची(माबोकर अस्मिता) आठवण झाली.
मस्त लिहीलय
मस्त लिहीलय
आणि रेसेपीही मस्तच
शिरोळी माझ्यासकट घरात सगळ्यांच्या (नोट: लेकीसकट सगळ्यांच्या) आवडीची म्हणून वरचेवर आणली जातात (चटणीचा उत्साह मात्र कमीवेळा दाखवला जातो हे इथे बघून जाणवले)
वाहवा, खुसखुशीत लेखन सोबत
वाहवा, खुसखुशीत लेखन सोबत भन्नाट रेसिपीज.
खूपच छान , याच तिन्ही पाक
खूपच छान , याच तिन्ही पाक कृती मी दुधी भोपळ्याच्या करतो. सोबत दुधीची खीरपण होते.
दुधी / दोडक्याच्या साली / शिरांची चटणी माझ्या वाट्याला कमीच येते.
आज पद्धतीने भाजी केली आहे.
आज पद्धतीने भाजी केली आहे. खायची आहे.
चटणी मात्र तुमच्या पद्धतीने करायला विसरले.
मस्त लिहिलंय...
मस्त लिहिलंय...
दोडक्याला लाडका केला...
सर्व अभिप्रायांसाठी अनेक आभार
सर्व अभिप्रायांसाठी अनेक आभार!
>>> मराठी नाटक दिवाणखान्यातून स्वैपाकघरात गेलं.
भरत
दोडका भरून पावला असेल.. इथे १
दोडका भरून पावला असेल.. इथे १ भाजी खपवता आणि खाता खाता मारामार! तू ३ अंकी नाटक लावलेस.. कमाल!
भारी झालंय पण सगळंच! दोडक्याची चमचमीत भाजी आवडते, चटणी प्रकाराला फार डिमांड नाही माझ्याकडे, भरित करून बघण्यात येईल.