मानवाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड (Turning point)

Submitted by चामुंडराय on 12 September, 2026 - 12:15

नुकताच मानवजातीने एक महत्वाचा लोकसंख्याशास्त्रीय टप्पा ओलांडला आहे. मानवाच्या संपूर्ण इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे किंबहुना असे काही घडेल अशी कल्पना कधीही केली गेली नसेल.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या यू.एस. सेन्सस ब्युरोच्या नवीन अंदाजानुसार, जगभरात आता ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या पाच वर्षांखालील मुलांपेक्षा जास्त झाली आहे. हा बदल एकाच वेळी घडणाऱ्या दोन मोठ्या प्रवृत्तींमुळे झाला आहे. एकीकडे वैज्ञानिक प्रगतीमुळे लोकांचे आयुर्मान वाढत आहे, तर दुसरीकडे कुटुंबांमध्ये मुलांची संख्या कमी होत आहे. किमान पाच अपत्ये असणाऱ्या मागील पिढीपासून आता एक अथवा फार तर दोन अपत्ये किंवा अपत्यहीन जीवनशैली (DINKs - Double Income No Kids) हा पर्याय निवडण्यापर्यंत मजल गेली आहे.

२०२५ मध्ये अंदाजे १०.५% लोकसंख्या आधीच ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची झाली आहे. २०६० पर्यंत या वयोगटातील जागतिक लोकसंख्या सुमारे २ अब्ज लोकांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्या कालावधीतील एकूण लोकसंख्या वाढीपैकी निम्म्याहून अधिक वाढ ही वृद्ध वयोगटांमधून होण्याची अपेक्षा आहे.

हे केवळ श्रीमंत आणि प्रगत देशांमध्येच घडत असे असे नाही तर आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर विकसनशील प्रदेशांमध्येही प्रजनन दरात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान २०२४ मध्ये जागतिक सरासरी आयुर्मान सुमारे ७३.३ वर्षांवर पोहोचले आहे आणि २०५४ पर्यंत ते ७७.४ वर्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

आणि ही तर केवळ सुरुवात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, २०७० च्या दशकाच्या अखेरीस, ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सुमारे २.२ अब्ज लोक असू शकतील. ही संख्या केवळ पाच वर्षांखालील मुलांपेक्षाच नव्हे, तर १८ वर्षांखालील प्रत्येकापेक्षा जास्त असेल.

या परिवर्तनाचा परिणाम जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर होईल ज्यामध्ये आरोग्यसेवा, निवृत्तीवेतन, गृहनिर्माण, रोजगार, नागरी सेवा, कार्यक्षम वयोगटातील घटणारी लोकसंख्या इत्यादी बाबींचा समावेश असेल. ८० वर्षे आणि त्याहून अधिक जगणे हे अपवादात्मक न राहता एक सामान्य बाब होईल.

मानवी इतिहासाच्या बहुतेक काळात, लोकसंख्येच्या पिरॅमिडच्या तळाशी प्रचंड संख्येने मुले आणि शिखरावर तुलनेने कमी वृद्ध लोक असत. आता तो प्राचीन आकार हळूहळू बदलत असून तो एखाद्या घटासारखा (माठासारखा - earthen pot) होतो आहे. भविष्यात त्याचा पाया (base) लहान आणि वरील भाग रुंद होईल. अशी आकृती अस्थिरता दाखवते.

असा अनुभव मानवजातीने या आधी कधीही घेतलेला नाही परंतु गेल्या काही दशकातील बदलती demography बघता -

ये तो होना ही था ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users