बिनकामाच्या नोंदी - ८

Submitted by संप्रति१ on 10 September, 2026 - 08:32

. आटपाट देशातल्या आधीच्या पिढ्या नशिबवान होत्या. त्याच्यानं त्यांना आपोआप बरे नेते मिळत गेले. आटपाट देशातली जेनझी पण स्मार्ट आहे. त्यामुळे तेही डिझर्व्हिंग नेत्यांच्या हातात देश सोपवतील, अशी आशा आहे.
प्रॉब्लेम फक्त मधल्या पिढीचा झाला होता. ही आख्खीच्या आख्खी पिढी येडझवी निपजली.
म्हणजे सगळं ठीकठाक चाललं होतं, ते ह्यांना बघवलं नाही. ह्यांनी साल्यांनी धोसरा काढून काढून एक सर्तुल नग हुडकून काढला. आणि नंतर तो जो काय ह्यांच्या बोकांडी बसलाय तो आता पार निब्बर म्हातारा झाला तरी उतरायलाच तयार नाय म्हणताना आता मग हे ''बचाssव बचाssव'' म्हणून बोंबलाय लागले. पण आता बोंबलून काय? आता काय तो ऐकत नसतो. ह्येंनी त्येला चटक लावलीय. तर आता तो ह्येंन्लाच पुरेपूर गोंदवून टाकणार. आता 'बचाssव बचाssव' म्हणून कसं चालेल?

. एका मेडिकल टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये. बुबुळं एक्स्पांड करणारे ड्रॉप्स डोळ्यात टाकून झाल्यावर नर्स फटाफट स्क्रीन्सवरची अक्षरं बदलायला लागली. विचारत होती “हे दिसतंय का?” “ते दिसतंय का?”वगैरे.

हो गं बाई, दिसेल सगळं. पण तुझा स्पीड जरा कमी करशील काय? मी काय आता सोळा वर्षांचा पोरगा राह्यलो नाही टणाटण उड्या मारायला. प्रोसेसर स्लो झालाय माझा !

नंतर डोळे मिटून बेंचवर वाट बघत बसलो तर शेजारच्या म्हाताऱ्यांची आपापसातली चर्चा कानावर पडत राहिली.

“तुम्ही त्या अमुक योजनेत पैसे गुंतवले का?”
“अरेरे! त्या तमुक योजनेत का नाही गुंतवले? जास्त रिटर्न्स मिळतात...” वगैरे.

अहो काका, मी नाय काय गुंतवलं-बिंतवलं कुठे. मी सरंडर करून टाकलं आहे. हॅंड्स अप करून टाकलं आहे फार पूर्वीच.

आणि तुम्ही पण आता तसंच करायला पाहिजे. हो ना.‌ आता कुठं गुंतवागुंतवी करत बसता? कुठल्याही क्षणी अचानक पृथ्वी सोडावी लागेल, अशा टप्प्यावर पोचला आहात. तर जरा मोकळं-मोकळं व्हायला शिका. जो काही पसारा केला असेल, त्यातून अंग काढून घ्यायचं बघा हळूहळू.

कारण शेवटी असंय की पृथ्वी सोडताना माणसानं कसं एकदम मोकळं-मोकळं असलं पाहिजे. मागं कसलाही पायगुंता नसला पाहिजे. नायतर ते परत माघारी पाठवतात. 'पुन्हा सगळं नीट जगून या' म्हणून सांगतात. साला परत इथं माघारी यायचं आणि पुन्हा सगळी झवझव पहिल्यापासून करत बसायचं म्हणजे...

. दोन्ही हातांनी पीएमटीच्या वरच्या दांड्याला पकडून लोंबकळत उभा आहे. आजूबाजूला इतरही अनेक मानवी शरीरं तशाच पोझमध्ये दाटीवाटीने लोंबकळतायत. हेडफोन्समधून यूट्यूबवर एक पॉडकास्ट चालू आहे.
तेवढ्यात जाहिरात येते.

“बहुत सारे लोग समझते हैं कि चार दिन में हिप्नॉटिजम सीख ही नहीं सकते, मगर मैं आपको गॅरंटी देता हूँ कि...”

जाहिरात संपता संपत नाही. आणि ती संपते तोच पुढची चालू. आता कुणीतरी सोट्या ‘ताइची वॉकिंगनं ढेरी कमी करण्याचा कोर्स’ विकत घेण्यासाठी माझ्या कानात गयावया करायला लागलाय.

ती संपली की तिसरा एक जाहिरातदार मला एआय मूव्ही बनवायला शिकवण्यासाठी तरसायला लागलाय. आणि तो फिल्म इंडस्ट्रीत माझे कॉन्टॅक्ट्ससुद्धा जुळवून देणार आहे, तेही फक्त नव्वद रुपयांत.

आणि मला स्कीप करता येत नाही. दोन्ही हात वरती गुंतलेले आहेत. नाईलाज को क्या ईलाज?

यूट्यूबनं हे असं नाही करायला पाहिजे. एखाद्याच्या अवघडलेल्या स्थितीचा एवढा गैरफायदा घेणं योग्य नाही. एखादा कस्टमर खिंडीत सापडला म्हणून त्याला अशा प्रकारे पार झवून काढणं हे काही चांगलं नाही.‌ काही व्यावसायिक नीतीमत्ता वगैरे काही प्रकार असतो की नाही?

. ‘बटवारा’ मूव्हीला बसलेलो. इंटरव्हलनंतर समोर एक मध्यमवयीन कपल येऊन बसलं. त्यांची चुळबुळ, खुसपुस चाललेली दिसली.
शेवटी थोड्या वेळानं पुरुषानं मागं वळून विचारलं, “आवारापन’चाच शो हाय ना हा?”

बोललो की नाही, हा बटवारा चाललाय.

मग ते उठून गेले. निम्म्यातनं वाट चुकून इथं येऊन बसलेले. आता येईल मग येईल, म्हटलं तरी इम्रान हाश्मी कुठं दिसेना. त्याऐवजी सनी देओल-शबाना आझमीचे सेंटी डायलॉग्ज दिसायला लागले. रडारड चाललीय समोर. घनव्याकूळ रडताहेत मायलेक.

मग ह्यांना कळलं की कायतरी गडबड आहे. प्रश्नपत्रिका उलटी-सुलटी करून बघितल्यावर शेवटी उजेड पडला की आपण वेगळ्याच कोर्सच्या परीक्षाकेंद्रात घुसलोय.

. एक शाळा. ग्राऊंडवर विद्यार्थी रांगेत उभे. लाऊडस्पीकर चालू होतो. बटन दाबलं की ओळीने पाच गाणी धडामधूड.

इतनी शक्ती हमें देना दाता.सर्वात्मका सर्वेश्वरा.गर्जा महाराष्ट्र माझा. वंदे मातरम्. जन गण मन.

हे सगळं झाल्यावरच सुटका. पोरंपोरी जांभया देत म्हणतायत. जांभया देतायत म्हणजे कष्ट आहे. बळजबरी आहे. निरूत्साह आहे, अस्वाभाविक काहीतरी आहे. परंतु माणसाच्या पिल्लांचं आज्ञाधारक नागरिकांमध्ये रूपांतर करायचं असल्यामुळे ही प्रक्रिया रोज सकाळी राबवावीच लागते. जिच्या मुळाशी लाखो-करोडो जांभया दफन होऊन जातात. कोलॅटरल डॅमॅज. रोज. जगभर. सगळीकडे.

. चॅटजीपीटीला सांगितलं की असा व्हिडिओ शोध, ज्यात फक्त म्युझिकचा सलग प्रवाह असेल आणि मध्येच अचानक काही सेकंदांचं मौन असेल.

म्हणजे त्या पर्टीक्युलर सेकंदांत मनाचा आधार कोसळेल आणि ते बावचळून निराधार होऊन कोसळून पडेल. पण वेगवेगळ्या प्रकारे आदेश देऊन बघितले तरी ते काही हवा तसा व्हिडिओ शोधून देईना. चीडचीड व्हायला लागली. ती वाढायला लागली. पुढे पुढे तर एवढा फाफललो की चॅटजीपीटीला चवताळून शिव्या द्यायला लागलो. त्याची अक्कल काढायला लागलो. विसरूनच गेलेलो की चॅटजीपीटी काही जिवंत ह्युमन बीईंग नाही.

चेष्टाच झाली म्हणजे. आपण मारे निघालेलो होतो अनंताच्या शोधाला; परंतु एक क्षुल्लक नॉनलिव्हिंग चॅटजीपीटीनंसुद्धा आपल्याला धडा शिकवला. धडा शिकवला पेक्षा घोडा लावला असं पाहिजे खरंतर. तेच जास्त सुटेबल आहे याठिकाणी.

बाई द वे, यूट्यूब मध्ये-मध्ये म्यूट असलेले व्हिडिओज अलाऊ करत नाही. सलग काही ना काही ध्वनी असलेले व्हिडिओच लागतात यूट्यूबला.

. असं बघा सर, तुम्हाला रिव्ह्यू मिटींगबद्दल ही जी भीती वाटते ती इमॅजिनरी आहे. जोपर्यंत बॉस भर मिटींगमध्ये आपल्या जवळ येऊन शारीरिक मारहाण करत नाही, किंवा थेट कॉलर बिलर पकडत नाही, तोपर्यंत काही टेन्शन घ्यायचं कारण नाही.

हे सगळं शेवटी बोलण्यापुरतंच तर असतंय. बोलण्यानं काय होतं? बोलण्यानं काय तुम्ही गाभण राहणार आहात काय?आणि तुम्ही त्यांचं सगळं सिरीयसली कशाला घेत बसता? मुळात कानाच्या आतच कशाला घेता? ती काय ईश्वरी वचनं हैत काय? त्येला वरनं कुणीतरी रिचार्ज मारला की तो इकडं येऊन आपल्याला रिचार्ज मारत बसतो. त्याला स्वतःचा आवाज ऐकायला आवडतो म्हणून तो चार लोकं जबरदस्तीनं गोळा करून बोलत बसतो.

तर बोलतोय तर बोलू द्या. टॉंट मारतोय तर मारू द्या. तुम्ही फक्त मुंडी हलवण्याची स्ट्रॅटेजी वापरत जा. मुंडी कधी कशी किती कोनात हलवायची समजत नसेल तर माझ्याकडे बघत जा. बघून बघून शिकतं माणूस. जमता जमता जमून जातं.
काय नाय. त्याचं बोलणं म्हणजे फक्त साऊंड वेव्हज आहेत, अशा स्थितप्रज्ञ दृष्टीनं त्याकडे बघायचं सर. साऊंड वेव्हजनी काही आपल्या अंगाला भोकं पडत नाहीत. तुम्ही ऐकलंय का कधी? मी तर कधी ऐकलं नाही.

. उदाहरणार्थ लिबरल यूट्यूब चॅनल्सवरचे डिबेट. मिडीयावर डबल ए चा कब्जा झाल्यापासून अकाली बेरोजगार झालेले काही पत्रकार. प्लस काही रिटायर्ड म्हातारे विश्लेषक. भाकरी निर्माण करण्यासाठी मनुष्याला धडपड करावी लागते. सगळे यूट्यूबर होऊन बसले आहेत. रोज रात्री सात ते दहा या वेळेत आळीपाळीने एकमेकांच्या चॅनल्सवर प्रकट होतात.

स्क्रीनवर चारपाच खिडक्या उघडलेल्या. त्या खिडक्यांतून डोकावणारे वयोवृद्ध चष्मिश चेहरे. आपापला नंबर येताच या चेहऱ्यांवरची तोंडं घाईघाईनं वाजायला सुरुवात करतात. तेचतेच दुःखाचं गाणं गात राहतात. जरा नीट बघितलं तर भास झाला की ह्या लोकांना अटक झालेली आहे. स्क्रीनरूपी डिजिटल तुरूंगात बंदिस्त पडलेत हे लोक. न जाणो कधीपासून. न जाणो कधीपर्यंत. आणि यांची कुठेही कधीही सुनवाई होणार नाहीये. तर मग डिजिटल खिडक्यांमधूनच हे आपापली कैफियत दुनियेपुढं सादर करत आहेत. आणि यांना खरोखरच वाटतंय की असं केवळ बोलत राहण्यानं परिस्थिती बदलेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास, नेहेमीप्रमाणे.

२) तर माझा फेव्ह विषय आहे, पायगुंता होऊ द्यायचाच नाही 👍

सुरेख.

झालेली आहे. स्क्रीनरूपी डिजिटल तुरूंगात बंदिस्त पडलेत हे लोक. न जाणो...... भारी.

जरा नीट बघितलं तर भास झाला की ह्या लोकांना अटक झालेली आहे. स्क्रीनरूपी डिजिटल तुरूंगात बंदिस्त पडलेत हे लोक. न जाणो कधीपासून. न जाणो कधीपर्यंत. >>> हे नक्की आठवणार Biggrin

मस्त! Happy चुरचुरीत आणि रॉ.