लहान मुलांसाठी उपक्रम : माझ्या घरातला महाराष्ट्र

Submitted by संयोजक on 7 September, 2026 - 12:05

काय छोट्या मित्रांनो, कसे आहात?

गेल्या वर्षी तुम्ही सगळ्या उपक्रमातून भाग घेतला होता. तुमच्या अंगी असलेल्या कला बघून आम्हाला फार छान वाटले.
तुमचे आवडते छंद, कला असेच जोपासत राहा. अभ्यासाच्या रगाड्यात त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष नका करू.

या वर्षी आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो अआहोत.
मुलांनो, तुम्हाला आपल्या महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे?
महाराष्ट्र फक्त आपल्या भारताच्या नकाशावर नाही तर तो आपल्या घरातही कुठेतरी लपलेला आहे.
कसा बरं ? तर, तुमच्या घरात अशा अनेक गोष्टी असतील की त्या मराठी कुटुंबाच्या आयुष्याशी, भाषेशी, साहित्याशी, कला-संस्कृतीशी किंवा आठवणींशी निगडीत असतील. हो की नाही? तर तुमच्या पालकांची मदत घ्या आणि तुमच्या घरातील अशा वस्तूंचा/ गोष्टींचा फोटो घेऊन एक छोटासा collage तयार करा.
त्या वस्तूंचा महाराष्ट्राशी किंवा मराठी संस्कृतीशी काहीतरी संबंध मात्र नक्की असायला हवा हं.
उदाहरणार्थ: पैठणी किंवा मराठी पारंपरिक दागिना, एखादं मराठी पुस्तक (पु. ल. देशपांडे / वि. स. खांडेकर / कुसुमाग्रज, इ), किल्ले, लेणी, मंदिर, चित्रकला, हस्तकला.
या वस्तूबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची. म्हणजे “ही वस्तू काय आहे?” “ह्या वस्तूचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?”
किमान तीन ते जास्तीत जास्त सात/ आठ फोटो असावे.
त्या फोटोंचा एखादे ऍप वापरून कोलाज करायचा किंवा पालकांनी करून द्यायचा.

धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
छायाचित्र उपक्रम- माझ्या घरातला महाराष्ट्र- मायबोली आयडी - छोट्यांचे पूर्ण नाव

नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे. मुलामुलींचे वय पंधरा वर्षा खालील असावे.
३) वस्तूचे छायाचित्र मुलांनी स्वतः काढलेले असावे आणि त्याबद्दलची माहिती मुलांनी स्वतः त्यांच्या शब्दात लिहिलेली असावी. (यासाठी पालकांनी मदत करावी)
४) छायाचित्र पाठवायची शेवटची तारीख शुक्रवार सप्टेंबर २५, २०२६ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
५) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी
६)प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२६' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता १४ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७)‘मायबोली गणेशोत्सव २०२६' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०२६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२६ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).

चला तर मग येउद्या पटापट तुमच्या घरातील फोटो.

या सगळ्या फोटोंचे संकलन केले तर शेवटी मायबोलीकडे कडे एक छोटंसं “बाल-महाराष्ट्र संग्रहालय” तयार होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर आणि संस्कृती जपणारा कल्पक उपक्रम!
इस बार कुछ अलग हो रहा है.. संयोजकांची डोकी छान चालत आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी शुभेच्छा Happy