Submitted by संयोजक on 7 September, 2026 - 11:47
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
शीर्षक वाचून तुम्हांला कळलंच असेल की काय करायचं आहे! एरवी व्हॉट्स अॅप वर आलेल्या फॉर्वर्ड करायच्या मेसेजेसची , संदेशांची किंवा ढकलपत्रांची चिरफाड करण्यात आणि त्यातील विचारांची टर उडवण्यात मजा येते ना?
पण या गंमतखेळाच्या निमित्ताने आपण असे मेसेजेस / संदेश लिहायचे आहेत.
हा गंमतखेळ आहे. स्पर्धा किंवा उपक्रम नाही. त्यामुळे अटी फार नाहीत.
१. किमान शंभर शब्द लिहा.
२. संदेशात "आयुष्याचंही असंच असतं" हे शब्द आले पाहिजेत.
तुमचे फॉर्वर्ड्स किंवा ढकलपत्रे याच धाग्यावर प्रतिसादांत लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संदेशात "आयुष्याचंही असंच
संदेशात "आयुष्याचंही असंच असतं" हे शब्द आले पाहिजेत. 😂
वाट पहातोय इथल्या गमतीची 👍
ह्या धाग्यावर मज्जा येणार आहे
ह्या धाग्यावर मज्जा येणार आहे, पॉपकॉर्न घेऊन बसलेय!
सगळ्याच धाग्यांवर फक्त वाट
सगळ्याच धाग्यांवर फक्त वाट बघणारे लोक आलेत. स्टार कलाकार कुठे आहेत?
पण आयुष्याचंही असंच असलं पाहिजे.
वाट बघणारं कोणी असेल, तरच कुठे जाण्यात अर्थ आहे, इति चंगो.
कर्मा इज बॅक.
कर्मा इज बॅक.
कर्म फिरून येतं असं पिक्चरमधे सांगतात.
जंजीरमधे अजितने अमिताभ बच्चनच्या आई वडीलांचा दिवाळीच्या दिवशी खून केलेला असतो. तो स्वत: तेजा सेठ बनतो. त्याला समाजात मान्यता मिळते. त्याची काळी कर्मं तो विसरून जातो.
पण मग अमिताभ बच्चन त्याची दिवाळीच्या दिवशीच हत्या करतो. त्या आधी त्याची काळी कर्मं चव्हाट्यावर आणतो. तर त्याला ती येऊ नये असं वाटत असतं कारण तो प्रतिष्ठीत असतं.
आयुष्याचंही असच असतं.
आयुष्यात केलेली वाईट आणि चांगली कर्म फिरून आपल्या पुढ्यात येत असतात.
चांगली असतील तर चांगली कर्मे येतात.
वाईट असतील तर वाईट म्हणून येतात.
तुम्ही कुठल्या पदावर बसून त्या पदाला न शोभणारी कामे केलीत तर ती फिरून येतात.
आयुष्याचं असंच असतं.
सरकारी अधिकारी म्हणून भ्रष्टाचार केला तर कधी न कधी त्याची फळं मिळतात.
नोकरीत नाही मिळाली तरी मुलांच्या करीयर मधे अडथळे येणं, नात्यात दुरावे निर्माण होणं, संकट कोसळणं होतच असतं.
अंधाराचा फायदा घेऊन केलेली कामं आयुष्य फिरून परत आणतं.
जात्यात दाणे रगडले जाताना सुपातले त्यांना हसत असतात. पण ते ही जात्यात जाणारच असतात.
चोर पकडायची जबाबदारी असताना कर्तव्य सोडून आपणच चोर्या केल्या तर ते कर्म फिरून येत असतं.
आयुष्याचं हे असंच असतं.
अॅडमिन म्हणून जबाबदारी दिली असताना सातत्याने ड्युआयडी बनवून इतरांबद्दल कमेण्टस करणे फिरून येत असतं. मग तो प्रसंग तुमच्यासाठी महत्वाचा असू शकेल. तुम्ही इतरांच्या महत्वाच्या ठिकाणी नको ते धंदे केले कि तुम्हाला फेडावंच लागतं.
कर्म नीट असली कि नीटच होतं. पोलीसाने चोर पकडावेत, तुरूंगात घालावेत.
त्याच्या घरी चोरी करणे, चोर पे पोर होणे हे काही काळ चालू शकते.
जेव्हां उघडकीला येते तेव्हां तोंड काळेठिक्कर पडते.
कारवाईचा स्पार्क असावा पण चोरीच्या आगीने तवा काळाठिक्कर पडू नये.
आयुष्याचं असंच असतं. ती क धी टप्प्यात येईल सांगता येत नाही.
मग अमूक वेळीच का असं रडण्यात अर्थ नसतो.
आज श्री गणेशाचे आगमन झाले.
आज श्री गणेशाचे आगमन झाले. पूजा आटोपून नैवेद्य दाखवताना मनात आलेले विचार
नैवेद्याचं ताट म्हणजे फक्त पदार्थ नाहीत; त्यात दिसतो तो चवींचा सुंदर मेळ.
कुठे गोड मोदक, कुठे तिखट-झणझणीत भाजी, कुठे आंबट-गोड आमटी, कुठे खारट चटणी, तर कुठे साधं वरण-भात. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी… प्रत्येकाचं अस्तित्व स्वतंत्र. पण तरीही एक पदार्थ दुसऱ्याला कमी करत नाही. उलट, एकाची चव दुसऱ्याची चव अधिक खुलवते.
गोडवा जिभेला आनंद देतो, पण सतत गोडच खात राहिलं तर तोच गोडवा कंटाळवाणा होतो. तिखटपणा चव जागवतो, आंबटपणा रुची वाढवतो, खारटपणा सगळ्या चवींना उठाव देतो आणि साधं वरण-भात या सगळ्यांना आधार देतं.
आयुष्याचंही असंच असतं,
आयुष्यात सुखाचे गोड क्षण असतात, तसेच दुःखाचे तिखट अनुभवही असतात. कधी यशाची गोडी मिळते, तर कधी अपयशाची कडू चव चाखावी लागते. कधी नात्यांमध्ये आंबट-गोड प्रसंग येतात, तर कधी संघर्ष आयुष्याला खारटपणा देतो.
नैवेद्याच्या ताटात प्रत्येक पदार्थ वेगळा असूनही एकमेकांना पूरक असतो. तसेच आयुष्यात भेटणारी काही माणसं आपल्याला आनंद देतात, काही आपली परीक्षा घेतात, काही आपल्याला शिकवतात.
म्हणूनच आयुष्याकडे एका चवीने पाहू नये.
गोड क्षण जपावेत, कडू अनुभवांतून शिकावं, तिखट प्रसंगांना धैर्याने सामोरं जावं आणि आंबट-गोड नात्यांना प्रेमाने सांभाळावं.
कारण शेवटी…
नैवेद्याचं ताट असो किंवा आयुष्याचं ताट —
सगळ्या चवी एकत्र आल्या कीच त्याला ‘पूर्णत्वाची’ चव मिळते.
वा वा! एकदम फॉरवर्ड वर्दी
वा वा! एकदम फॉरवर्ड वर्दी जमलंय!
हे कॉपी पेस्ट मारले तर वायरल
हे कॉपी पेस्ट मारले तर वायरल होईल
जमलं जमलं हह.
जमलं जमलं हह.
पर्फेक्ट जमलंय. ओरिजिनल
पर्फेक्ट जमलंय. ओरिजिनल वाटतंय एकदम.
हह , एकदम चपखल!
हह , एकदम चपखल!
जे लोक असे ओरिजनल मेसेज
जे लोक असे ओरिजनल मेसेज बनवतात त्यांना आपण काहीच्या काही म्हणून हसतो आणि त्याची कोणी ओरिजनल वाटावे अशी कॉपी केली तर त्याचे कौतुक करतो
आयुष्याचे सुद्धा असेच असते.
तुम्ही स्वतःच्या मनाने जगलात तर लोकं नावे ठेवतात.
आणि त्यांनीच तुम्हाला तसे जगायला सांगितल्यावर मग तसे वागलात तर कौतुक करतात.
(No subject)
घरी गणपतीची लगबग सुरु होती..
घरी गणपतीची लगबग सुरु होती.. आमच्याकडे पहिल्या दिवशीच ५० ६० मोदक लागतात
आई आणि ताई सकाळी उठल्यापासून कामाला जुंपलेल्या मीही अधून मधून मदत करत होते
मोदकाची एकेक कळी पाडताना सहज मनात आलं..
मोदकाचं बाहेरचं आवरण तसं बघितलं तर अगदी साधं असतं,
पण आतमध्ये गोड सारण लपलेलं असतं…
आयुष्याचंही असंच असतं!!
बाहेरून पाहताना सगळं सुरळीत वाटतं,
पण प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच कहाणी असते.
मोदक बनवताना उकड मळावी लागते,
तसंच आयुष्य घडवताना परिस्थिती आपल्याला मळत असते…
कधी वाफेची उष्णता सहन करावी लागते,
कधी नशिबाच्या आचेवर स्वतःला सिद्ध करावं लागतं.
पण त्या सगळ्या त्रासानंतरच
मोदकाला त्याची खरी चव मिळते आणि माणसालाही आयुष्याची खरी गोडी कळते.
कधी मोदक छान आकार घेतो,
तर कधी थोडा विस्कटतो…
तरीही त्याची गोडी कमी होत नाही.
आयुष्याचंही असंच असतं
काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात,
तर काही अगदी अनपेक्षित वळणं घेतात.
पण म्हणून आयुष्याची किंमत कमी होत नाही…
कारण आयुष्य सुंदर असतं
ते परिपूर्ण असल्यामुळे नाही,
तर त्यात सुख-दुःख, हसू-आसू,
माणसं आणि आठवणींचं गोड सारण भरलेलं असतं म्हणून…
म्हणून आयुष्याचा प्रत्येक घास
मनापासून चाखत राहा…
कारण मोदक असो वा आयुष्य—
गोडी अनुभवण्यातच खरी मजा आहे!
ह्ह !! लै भारी !! जाम हसले
ह्ह !! लै भारी !! जाम हसले
ऋन्मेष, अंजली_कूल जमलंय बरं.
ऋन्मेष, अंजली_कूल जमलंय बरं.
मस्त
मस्त
एका तरी का का फॉ मध्ये पिझ्झा
एका तरी का का फॉ मध्ये पिझ्झा बर्गर shaming करण्यात यावं अशी फर्माईश आहे
Authenticity साठी
खास किल्लीच्या आग्रहास्तव >>
खास किल्लीच्या आग्रहास्तव >>
मुलांच्या हट्टापायी त्यांना घेऊन पिझ्झा खायला हॉटेलमध्ये गेलो.. पिझ्झा टेबलवर येताक्षणी मुलांनी अक्षरशः त्याच्यावर झडप घातली
मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी अगदी खुश झालो .."एक पीस मला ही द्या रे....!" असे म्हणून मी एक त्रिकोण हातात घेतला मात्र माझ्या मनात काही वेगळेच विचार चमकून गेले पिझ्झा आणि आयुष्य… अगदी असंच असतं!
पिझ्झा दिसला कि नजरेत भरतात ते त्यावरचे रंगबिरंगी टॉपिंग्स..
या टॉपिंग्सच्या स्वतःच्या चवीमुळे जसा पिझ्झा झकास लागतो तसाच
आयुष्यात आपण आपल्यात असणाऱ्या गुण अवगुणांमुळे माणसाचं आयुष्य घडतं
एखादा टॉपिंग् जरी जास्त झाला तरी पिझ्झाची चव बिघडू शकते
आयुष्यही अगदी असंच असतं !
म्हणजे बघा ना,
एखाद्या गुणाचा किंवा अवगुणाचा अतिरेक झाला कि संपूर्ण आयुष्य बिघडून जातं.
पहिल्या नजरेत पिझ्झा सुंदर दिसतो,
पण त्याची खरी मजा प्रत्येक घासात दडलेली असते.
आयुष्यही तसंच…
दूरून पाहिलं की सगळं छान वाटतं,
पण प्रत्येकाच्या वाट्याला आलेली चव वेगळी असते.
कधी चीजसारखं प्रेम भरभरून मिळतं,
तर कधी मिरची आणि पेपेरोनीसारखे तिखट अनुभव येतात.
कधी एखादा घास अगदी आपल्या आवडीचा असतो, कारण त्यात आपल्या आवडीचा टॉपिंग चा तुकडा येतो
पण कधी काहीतरी न आवडणारंही स्वीकारावं लागतं!!
ओव्हनची उष्णता सहन केल्यावरच
पिझ्झाला त्याची खरी चव आणि रूप मिळतं…
तसंच आयुष्य घडवताना संघर्षातून जावं लागतं.
आयुष्य अगदी असंच आहे—
अडचणींच्या आगीतून गेल्यावरच
त्याच्या व्यक्तिमत्त्वाला खरी झळाळी येते.
कधी पिझ्झाचा एक घास दुसऱ्यापेक्षा चांगला असतो,
तसंच आयुष्यातही काही दिवस सुंदर,
तर काही दिवस कठीण असतात.
पण शेवटी महत्त्वाचं हे नाही
की पिझ्झावर काय काय होतं…
महत्त्वाचं हे आहे की तो आपण कोणासोबत वाटून खाल्ला.
तसंच आयुष्यातही संपत्तीपेक्षा, यशापेक्षा
आपल्यासोबत हसणारी, रडणारी आणि साथ देणारी माणसं महत्त्वाची असतात.
कारण पिझ्झाची खरी चव प्रत्येक घासात,
आणि आयुष्याची खरी गोडी प्रत्येक क्षणात असते…!
आता इथले काकाफॉ नंतर
आता इथले काकाफॉ नंतर व्हाट्सअप वर फिरतील

छान जमलेत
वाह अंजली मस्त धन्यवाद
वाह अंजली
मस्त
धन्यवाद
नेमेचि येतो पावसाळा आणि मग
नेमेचि येतो पावसाळा आणि मग कोकणी माणसाला वेध लागतात ते गणपतीचे.
आणि हातघाईची लढाई सुरू होते ती कसं जायचं हे ठरवण्यासाठी.
इथे स्वतःची गाडी काढून जाणाऱ्यापेक्षा किंचीत जास्त भाव मिळतो तो जनशताब्दीचं कन्फर्म तिकीट हातात असलेल्याला. पूर्वजन्मात गुलबकावलीचे फुल पटकावणारे नरपुंगव याजन्मी जनशताब्दीमधून गणपतीला गावी जातात. उरले सुरले फास्टेस्ट फिंगर फर्स्ट न्यायाप्रमाणे निझामुद्दीन-तिरुचिरापल्ली, हापा-मडगाव, नेत्रावती, मत्स्यगंधा, तुतारी, मांडवी, राज्यराणी, दिवा-सावंतवाडी ज्या मिळेल त्या ट्रेनचं तिकीट बूक करतात.
ज्यांच्या गावाजवळ स्टेशनं नसतात ते गाववाले एकत्र येऊन परळ नाहीतर कुर्ला डेपोतून अख्खी गाडी बूक करतात. उरले सुरले रातराण्या, जादा गाड्या, राजकारण्यांनी गणेशभक्तांसाठी सोडलेल्या खास गाड्यांच्या मागे लागतात. नशिबी अगदी मर्सिडीज असली तरी गाडीवाल्याच्या पाचवीला मात्र मुंबई गोवा हायवे अन तासंतासाचे ट्रॅफीक जॅम पूजलेले असतात.
पण शेवटच्या क्षणी विसरलेलं जानवं, मंडपाला बांधायचं कवंडाळं नाहीतर तवशी, पपनस नी चिबडं शोधायला जावं लागतं ते हरतालकेच्या दिवशी बाजारात. ते विकणारी मामी मामी विचारत नाही की तू विमानाने आलास की एस्टीने लटकत आलास. तिच्यालेखी तुम्ही सगळेच गणपतीला आलेले चाकरमानी.
आयुष्याचंही असंच असतं. कधी कोणी संधी मिळून सुसाट पुढे निघून जातो तर कुणी रखडत, रखडत मार्गक्रमण करतो पण गरज तुमचा हुद्दा बघत नाही की गाडी. तिथे हवा असतो उभा राहणारा माणूस.
म्हणून माणसं जपा. त्यांचं अस्तित्वच तुमच्या जगण्याचा उत्सव करेल आणि मोदकाचा गोडवा तुमच्या आयुष्यात पसरेल.
असं रानोमाळ लिहिता आलं पाहिजे
असं रानोमाळ लिहिता आलं पाहिजे!
माझे मन जमलाय बरं का!
माझे मन जमलाय बरं का!
असं रानोमाळ लिहिता आलं पाहिजे! Lol >>
रानोमाळ शब्द एकदम परफेक्ट.
आयुष्याचे सुद्धा असेच असते.
आयुष्याचे सुद्धा असेच असते.
तुम्ही स्वतःच्या मनाने जगलात तर लोकं नावे ठेवतात.
आणि त्यांनीच तुम्हाला तसे जगायला सांगितल्यावर मग तसे वागलात तर कौतुक करतात. >>>
अंजली मी पण पहिले 'मोदक' फॉरवर्ड लिहायचा विचार केला होता पण त्यात नुसतेच (डोक्याचे) खोबरे झाले त्यामुळे मग नाद सोडला, तू मस्त लिहिलयस
पिझ्झा बर्गर फॉरवर्ड हे मात्र त्याला नाक मुरडणारे वाले पाहिजे (आणि आमचे सांस्कृतिक थालीपीठ कसे भारी हे अधोरेखित करणारे )
आज सकाळीच खमंग वासाने भूक
आज सकाळीच खमंग वासाने भूक चाळवली
स्वयंपाकघरात जाऊन बघतो तर कायआमच्या हिने थालीपीठ केले होते
गरम गरम आणि त्यावर लोण्याचा गोळा
वय आणि पथ्य विसरून त्यावर ताव मारला
आणि लागेहाथ गणपतीबाप्पाच्या प्रसादाचे लाडु मोदक सुद्धा खाल्ले जरा गोड लागतं हो जेवणानंतर
मग लक्षात आलं आयुष्याचं ही असंच आहे नाही का
सतत मन मारून जगण्यापेक्षा मनाला स्वैर सोडले आणि हवं ते करू दिले तर मिळणारा आनंद वेगळाच
त्यातही आपले पारंपरिक पदार्थ म्हणजे आरोग्य आणि विज्ञानाचा सुरेख संगम
हे आजकालच्या पीढी ला कोण सांगणार
त्यांना भिजवलेल्या चिया बिया आणि कच्च्या भाज्या आरोग्यासाठी बऱ्या वाटतात, प्रोटीन साठी खा पनीर खा त्या जनावरच्या चाऱ्यासारख्या लागणाऱ्या सोया वड्या पण त्यात आनंद कुठेय
मग ही पीढी चीट डे च्या दिवशी पावाचे तुकडे आणि चार भाज्यांच्या फोडी लावलेला महागातला पिझ्झा खाऊन कोरडा आनंद मिळवते, अरे आमच्यावेळी असं नव्हतं
तेव्हा कुठे प्रोटीन चं एवढं स्तोम माजलं होतं
अजूनही जगतेच आहे की आमची पीढी
संस्कार म्हणून उरले नाहीत
जेवताना दिशा बघावी त्याने विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होऊन प्रोटीन चे संतुलन होते हे प्राचीन विज्ञान आजची पीढी विसरून गेली आणि महागड्या प्रोटीन च्या मागे लागली
श्रावण महिन्यात भाजलेली डाळ आणि तांदूळ घेऊन पूर्वेला बघत त्याची खिचडी खाल्ल्याने फायबर मिलते हे विज्ञान आहे हे लक्षात कुणी घेत नाही
आणि आता कृत्रिम चवीच्या मागे लागतात
आयुष्यात जुन्या गोष्टींना पुन्हा उजाळा देऊन आचरणात आणलं तर देशाची वाताहत होणार नाही
हा मेसेज सर्व डाएट वेड्या लोकांना पाठवा आणि त्यांचे डोळे उघडा
जमलाय एकदम! पिझ्झा पण आला
जमलाय एकदम! पिझ्झा पण आला त्यात
Madan Hunkare, हह, anjali
Madan Hunkare, हह, anjali_kool, माझेमन (रानोमाळ फेम), किल्ली
धमाल लिहिले आहे तुम्ही लोकांनी. 😁
आता किमान एक काकाफॉ प्रॉपर बर्गर पिझ्झा शेमिंग वर येऊद्या
अच्छा अच्छा !! पिझ्झा बर्गरचं
अच्छा अच्छा !! पिझ्झा बर्गरचं शेमिंग होय !! ते मी नीट वाचलंच नाही !!
म्हणजे ते कसं वाईट आणि आपला वडापाव कसा भारी type
#आम्ही_संस्कृतीरक्षक
ह्ह , तुम्ही नेवेद्याचे ताट लिहिले म्हणून मला मोदक सुचला !!
सोसायटीमधे गणपती बाप्पाचे
सोसायटीमधे गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि अबाल वृद्ध आरती साठी खाली जमले. आरती नंतर गप्पांच्या ओघात काही तरी खायला मागवाचा गजर झाला. सगळ्यांनी एकमुखाने भेळ करुया म्हणुन ठरवले. घरातुन सामान आण गेलं ते पाहुन जेन झी ने नाकं मुरडली. आपले आपले पॉकिट मनीतले पैसे घेऊन त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला.
आमची भेळ तयार झाली तरी त्यांचा पिझ्झा काही आला नव्हता. भुक आनवर होऊन त्यांची चिड्चिड होऊ लागली. इतक्यात पिझ्झा आला आणि सगळे त्यावर तुटुन पडले. भरपुर पैसे घालवुन आणलेला एक एक तुकडाच प्रत्येकाच्या वाटेला आला. जीभ चळवली गेली होती पण पोट मात्र भरले नव्हते. आता त्यांच्या त्यांच्यात वाद होऊ लागले. इतका वेळ दिसणारी दोस्ती यारी आता हिशोबावर आली. मी इतके पैसे दिले, मला इतके पिसेस मिळायला हवेत.
इकडे आम्ही कॉल्ड मिलेनिअल अंकल आंटी मात्र आमची भेळ मस्त एन्जॉय करत होतो. आमच्या बूमरलाना पण ताट भरुन खायला नेऊन देत होतो. इतकं करुनही आमच्याकडे भरपुर भेळ उरली होती. शेवटी आमच्यातल्या एकाने त्यांच्या जेन झी लेकाला आवाज दिला आणि इतक्या वेळ आमच्या भेळेला नाकं मुरडणारी ती टोळी भेळेवर तुटुन पडली.
सगळ्यांची पोटं तुडुंब भरल्यावर एक आजोबा उठले आणि म्हणाले ,“ बघितलं बाळांनो , तुमचे ते मैद्याचे चिज घातलेले गोळे ना तुमचं मन भरवु शकले ना पोट. पण त्याच वेळेला इथे जमलेल्या प्रत्येकाच्या घरातुन आणलेलं सामान घेऊन केलेल्या भेळेने तुमचं मन आणि पोट सामाधानाने भरलं.
हे पोट भरण्याचं कारण फक्त भेळ नाहीये. त्यात मिसळलेले आनंदरुपी चुरमुरे, थोडेसे वाद म्हणजे आंबट चिंचेचं पाणी, गोडवा म्हणजे खजुराचं पाणी आणि एकमेकांच्या आयुश्यात येणारे दु:खाचे प्रसंग म्हणजे तिखट चटणी यांचं मिश्रण आहे.
तुमच्या पिझ्झ्यात आहे तरी काय ? अपलपोटीपणा सारखा मैदा जो चिकटुन बसतो आणि आतुन नुकसान करतो . माजुरडेपणा सारखे चीज जे प्रोटीन म्हणत येते . अगदी तसेच जसा उद्धटपणा स्पष्टवक्तपणाचा बुरखा पांघरुन येतो पण फायदा शुन्य नुकसानच करुन जाते. आणि तुमच्या सो कॉल्ड अचिव्हमेंट्स म्हणजे टॉपिंग्स!
आयुष्याचं असंच आहे बाळांनो! पिझ्झ्याला तुम्ही टॉपिंग्सच्या नावाने ओळखता का? नाही ना ? तो मैदा आणि चिज जे हनिकारक आहे त्यानेच ओळखला जातो पिझ्झा! तरीहीपुरवठ्याला येत नाही
पण भेळ सगळ्या पदार्थांशिवाय अपुर्ण! तरीही कमी पडत नाही.
तेंव्हा आव्वाच्या सव्वा महत्व दिलेला हा मैद्याचा गोळा बनायचं का सगळ्यांना सोबत घेऊन चविष्ट भेळ बनायचं हे तुम्हीच ठरवा”
हे बोलुन आजोबा झोपायला निघुन गेले.
नव्या पिढीच्या मनात झिरपलेले भेळेची चव पहाताना लांब पडलेले ते पिझ्झ्याचे बॉक्स आधिकच केविलवाणे भासु लागले.
भारी जमलेय भेळ vs पिझ्झा
भारी जमलेय भेळ vs पिझ्झा
Pages