चाहते

Submitted by अर्जुन ..✍️ on 2 September, 2026 - 02:10

एलिफंट पॉईंटवर सुसाट वारा सुटला होता आणि त्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. माझी छत्री उलटी होऊ नये म्हणून माझी एक वेगळीच कसरत सुरू होती. तेवढ्यात समोर एक मोठे झाड दिसले आणि आडोशासाठी मी धावतच त्या झाडाखाली जाऊन उभा राहिलो.

एवढ्यात एक माणूस माझ्यासमोर आला आणि म्हणाला,

“साहेब, तुम्ही खूप मोठे कलाकार दिसताय!”

मी मनातल्या मनात विचार करू लागलो—हा नेमका कोण असावा?

थोड्याच वेळात तो पुन्हा म्हणाला,

“तुमचा चेहरा खूप बोलका आहे... खूप काही सांगून जातोय!”

आता मात्र माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. याने माझी कोणती कथा किंवा कविता वाचली असावी? आणि तीही कुठे?

‘ब्लॉगर’वर तर माझं लिखाण मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचतं... ‘मायबोली’वर याने माझी कविता वाचली असेल का? पण तिथे माझा फोटोही नाही... मग याने मला पाहिलं तरी कुठे असेल?

अचानक आठवलं—‘मातृभारती’वर माझा एक फोटो आहे!

अरेच्चा! कदाचित तिथेच याने मला पाहिलं असावं. म्हणजे हा माझा नवीन चाहता तर नाही ना? माझी कविता वाचून थेट गुगलवर माझा शोध घेतला असेल!

माझ्या मनात विचारांचं हे चक्र सुरू असतानाच तो माणूस अजूनही माझ्या शेजारीच उभा होता आणि माझ्याकडे एकटक पाहत होता.

आजूबाजूला पावसात भिजणारे इतर लोकही होते. पण एवढ्या पावसात, धुक्यात आणि वाऱ्यातसुद्धा याने मला ओळखलं, या विचाराने मला एक वेगळाच अभिमान वाटू लागला. आनंदही झाला.

मी पुढे काहीतरी बोलणार, इतक्यात तो म्हणाला—

“साहेब, फक्त ५०० रुपये लागतील! तुमच्या चेहऱ्यावरून तुमचं भविष्य सांगतो... आणि हात पाहायचा असेल तर अजून ५०० रुपये!”

ते ऐकताच, मगाशी कौतुकाने सुखावलेला माझाच हात त्याला गालावर ‘प्रसाद’ देण्यासाठी खवळला!

पण लगेच विचार केला—ज्याने आत्ताच आपले दोन शब्द कौतुकाचे बोलले, त्याला असा प्रसाद कसा द्यायचा?

क्षणभर तर त्याला ५०० रुपये देऊन टाकावेत, असाही विचार मनात आला. पण माझ्या तार्किक बुद्धीला चेहरा पाहून भविष्य सांगणं आणि हात पाहून भविष्य सांगणं काही पटत नव्हतं.

त्यामुळे मी काहीही न बोलता तिथून हळूच काढता पाय घेतला.

जाता जाता मनात एक विचार मात्र आला—

ज्या माणसांशी आपण कित्येक वर्षं बोलतो, भेटतो, हसतो, गप्पा मारतो... त्यांनासुद्धा आपण कधी कधी पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. एखादा माणूस आज मनमोकळेपणाने बोलतो, तर उद्या अचानक अबोल होतो. जवळीक असूनही माणूस कधी कधी गूढच राहतो.

माणूस समजून घेणं इतकं अवघड असेल, तर हा अनोळखी माणूस माझा चेहरा पाहून अवघ्या दोन मिनिटांत माझं भविष्य कसं काय सांगणार?

असो.

पण त्याच्या त्या दोन वाक्यांनी, एका क्षणासाठी का होईना, माझ्या मनात एक गोड गैरसमज मात्र निर्माण झाला होता—

**“आपले चाहते आता थेट महाबळेश्वरलाही पोहोचले आहेत!”**

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users