शाबास पक्की.

Submitted by केशवकूल on 26 August, 2026 - 08:26

मे महिना येणार ह्या काल्पनेने पक्कीला एप्रिल महिन्यातच उत्साहाचे उधाण येत असे. पक्की मे महिन्याची चातका सारखी वाट पहात असतो. मे महिना व्हायच्या आधीच पक्कीच्या बाबाना नदी काठी होणाऱ्या व्याख्यान मालेचे वेध लागत. या वर्षी कोण कोण साहित्यिक, राजकीय कार्यकर्ते, अभिनेते, गायक हजेरी लावणार त्याची बित्तं बित्त बातमी मिळत असे.
"पक्की, ह्यावर्षी आमच्या व्याख्यान मालेत योगेश कुमार येणार आहेत. तुमच्या मालेत कोण येणार आहे सांग." पक्कीचे बाबा कधी कघी पक्कीची अशी मस्करी कारतात.
"तुमची व्याख्यान माला" म्हणजे पक्की ज्या व्याख्यान मालेची आतुरतेने वाट पहात असतो ती विज्ञान वर्धिनी व्याख्यान माला.
जेव्हा मुले साधारणपाने क्रिकेटमध्ये रममाण होत असतात त्या वयात तेव्हा पक्की विज्ञान शाखेत रस घेत घेतो ह्यात नवल वाटण्यासारखे काही नव्हते. तुम्हाला एक गम्मत सांगतो. जून महिन्यात जेव्हा पाउस सुरु होतो, शाळा सुरु होतात तेव्हा पक्कीचे बाबा शाळेची पुस्तके एक गठ्ठा घेऊन येतात, पक्की स्वतःची पुस्तके बाजूला ठेवतो आणि मालती ताई ची ९/१०/11/वीची पुस्तके वाचण्यात मग्न होतो. स्वतःची पुस्तके त्याने मागच्या वर्षीच वाचून संपवली असतात! मालू ताई बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार कथा वाचण्यात गढलेली असते त्यावेळेस पक्की तिची जनरल सायन्स, भूगोल, विज्ञानाची टेक्स्ट बुके वाचण्यात मग्न असे. सांगायचा मुद्दा असा की पक्कीने त्याच वयात ठरवले होते कि मोठा झालो कि शास्त्रज्ञ व्हायचे आहे,
"बाबा, तुम्हाला डॉक्टर अजेय हिरेमठ माहित आहेत? ते जगप्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत. भीमबेटका गुहेतील भित्तीवरील चित्रांच्या संशोधनामुळे त्यांचा अमेरिकेतील विद्यापीठांनी सन्मान केला आहे. ते आमच्या ह्या वर्षीच्या सत्राचे उद्घाटन करणार आहेत." पक्कीने अभिमानाने बाबांना माहिती दिली, "बाबा आपण आपल्या गावी राजापूरला केव्हा जायचे? "
"पक्की तुला राजापूरची आठवण का झाली?"
"मला कोकणातली कातळ शिल्पे पहायची आहेत."
पुढचा एक तास पक्की बाबाना भीमबेटका आणि कातळ शिल्पे समजाऊन सांगत होता.
"पक्की, कमाल आहे! पन्नास हजार वर्षापूर्वीचा मानव माझ्यापेक्षा चांगली चित्रे काढत होता."
"हे गेंड्याचे चित्र पहा. अगदी हुबेहूब काढले आहे ना. कोकणात तेव्हा गेंडे होते. त्या शिवाय का शिल्प कलाकाराने इतका सुंदर गेंडा खोदला."
पक्कीची व्याख्यान माला सकाळी असे तर बाबांची संध्याकाळी. बाबांना पक्कीचा क्षणभर हेवा वाटला. मुलांचे बरे असते, संपूर्ण मे हुंदडायला मोकळी, आमचे आपले ऑफिस एके ऑफिस. बारा महिने वर्षभर!
अहो बाबा मुलांना वर्षभर अभ्यास करून परिक्षा द्यावी लागते त्याचे काय? घी देखा लेकीन बडगा नाही देखा म्हणतात ते असे.
पक्कीची व्याख्यानमाला वस्तूसंग्रहालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या सभागृहात होत असे. पक्की नियमित वेळेच्या आधी दहा मिनिटे हजर होत असे. वक्त्याचे एकही वाक्य चुकवायचे नाही हा त्याचा शिरस्ता होता. बरोबर त्याची टिपण वही आणि पेन असणारच. ही पक्कीची एक चांगली सवय होती. ह्या बाबतीत त्याचा आदर्श होता मायकेल फॅरडे. त्याने सर डेव्हीच्या व्याख्यानाची तपाने काढून जेव्हा त्याना दाखवली, तेव्हा ते मायकेलवर इतके खुश झाले कि त्यांनी लगेच त्याला आपला मदतनीस म्हणून कामावर ठेवले. त्यानंतर अशिक्षित मायकेल फॅरडेने अनेक क्रांतिकारी शोध लावले. हा किस्सा तुम्हाला माहित असेलच, नाही माहित? ओके, मी पक्कीला सांगतो, माझ्यापेक्षा तोच तुम्हाला छान खुलवून सांगेल.
ह्या वर्षीच्या सत्रात भरगच्च कार्यक्रम होते. सर्पमित्र लोखंडे महाराष्ट्रातील नाग आणि सापाविषयी महिती देणार होते. छंद म्हणून घरच्या घरी क्रिस्टल रेडीयो कसा बांधायचा त्याबद्दलही एक व्याख्यान होते. फुलपाखरांवर डॉक्टर कासांबे ह्यांचे लेक्चर होणार होते. एका रात्री आकाश दर्शनाचा कार्यक्रम होता. अजून बरेच काही होते.
तर आज एक मे, आज डॉक्टर अजेय हिरेमठ ह्या वर्षीच्या सत्राचे उद्घाटन करणार होते.
नेहमीप्रमाणे पक्की सभागृहात वेळेच्या आधीच पोहोचला. डॉक्टर त्यांच्या पोतडीतून दगड समोरच्या टेबलावर मांडून ठेवत होते. श्रोत्यांची गर्दी वाढत चालली होती. नऊ वाजेपर्यंत सभागृह गच्च भरले.
डॉक्टरांनी व्याख्यानाला सुरवात केली, तत्पूर्वी विज्ञान विर्धीनीच्या कार्यवाहांनी डॉक्टरांची ओळख करून द्यायचा औपचारिक कार्यक्रम आटोपला.
डॉक्टरांनी प्रथम भीमबेटका गुहांतील प्रागैतिहासिक चित्रांची माहिती दिली. सभागृहातील मोठ्या पडद्यावर त्यातील काही चित्रे त्यांनी दाखवली.
भीमबेटका गुहा मध्याप्रदेशात भोपाळच्या जवळ आहेत. ह्या गुहात एक लाख वर्षांपूर्वी आदिमानवाने वस्ती केली होती. त्यांनी काढलेल्या चित्रात त्याच्या जीवनाचे प्रतिबिंब दिसते, तेव्हा आदिमानव वन्य प्राण्यांची शिकार करणे आणि जंगलात हिंडून फळे, कंदमुळे गोळा करणे ह्यावर गुजराण करत असे, साहजिकच गुहेतल्या चित्रांमध्ये शिकारीची चित्रे प्रामुख्याने आहेत. नंतरच्या काही चित्रात आदिमानव सामूहिक नाच करताना दिसतात,
त्यानंतर डॉक्टरांनी कोकणातील कातळशिल्पांची माहिती दिली. ह्या शिल्पांचे वैशिष्ठ्य म्हणजे कोकणातून नाहीशे झालेल्या एकशिंगी गेंडा, हत्ती, पाणघोडा अशा प्राण्याची चित्रे इथे आढळतात. काही चित्रात मासे, कासव
इत्यादींची च्य्ते आहेत.
त्यानंतर डॉक्टर अश्मयुगातील मानवांच्या दगडी हत्त्यारांकडे वळले. पक्कीला ह्याची थोडी पुस्तकी माहिती होतीच पण आज ती हत्त्यारे तो स्वतः बघत होता. पन्नास हजार वर्षांपूर्वी कोण्या आदिमानवाने ती हत्त्यारे वापरून शिकार केली होती. त्या हत्त्याराना स्पर्श करताना पक्कीच्या अंगावर रोमांच उठले असतील ना? तुम्हीच कल्पना करा.
व्याख्यानाच्या शेवटाला मात्र डॉक्टरांनी आशर्यकारक माहिती दिली.
ते म्हणाले, "हीजी हत्त्यारे मी तुमच्या समोर मांडली आहेत ती मी आपल्या गावाच्या सभोवताली जे डोंगर आहेत त्या डोंगराच्या पठारावरून गोळा केली आहेत. ह्या पठारावर पन्नास साठ हजार वर्षांपूर्वी आदिमानवाची वस्ती असावी. ही अश्मयुगातील हत्त्यारे त्याचे साक्षीदार आहेत..."
डॉक्टरांचे व्याख्यान संपले पण पक्कीच्या डोक्यात मात्र विचारसत्र सुरु झाले.
व्याख्यान झाल्यावर घरी परतताना पक्की विनुला म्हणाला, " विनू, आज आपण भुताळी टेकडीवर जाऊन आबिमानवाची हत्त्यारे शोधुया."
"पण पक्की तिकडे संध्याकाळनंतर भुतांचे साम्राज्य असते म्हणे. खर आहे ना?"
"विनू, मी तुला किती वेळा सांगितले आहे भूत बित कुछ नही होता. सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत."
अखेर खूप समजाऊन सांगितल्यावर विनू यायला तयार झाला.
"पण सूर्य मावळायच्या आधी परतायचे हा."
दुपारी दोन वाजता पककी आणि विनू भुताळी टेकडीवर जाऊन आदिमानवाची दगडी हत्त्यारे गोळा करू लागले.
टेकडीवर जिकडे तिकडे हत्त्यारे हत्त्यारेच होती. एक अणकुचीदार दगड बघून विनू म्हणाला, "हे बघ हे हरिणाची कातडी सोलायला अगदी चपखल आहे."
"आणि हे बघ. हे काठीला वेलींनी घट्ट बाधून हातोड्यासारखे वापरत असणार."
खालच्या बाजूने दोन बाप्ये टेकडी चढून येत होते. दोघेही धट्टे कट्टे होते.
पक्कीला आणि विनूला पाहून त्याना राग आला असावा कारण त्यातला एक जवळ जवळ ओरडलाच.
"काय रे मुलानो, काय करताय इथे. पळा जा घरी."
पक्की असल्या धमक्यांना घाबरणारा नव्हता. पण विनू? त्याला आधी वाटले की हेच ते आदीमानव असणार, पण ते तर पन्नास हजार वर्षांपूर्वी होते. मग ही त्यांची भुते असणार.
"पक्की, चल घरी जाउया."
"विनू घाबरू नकोस." मग त्या आडदांड माणसाला टो म्हणाला , "तुम्ही कोण आम्हाला ऑर्डर देणार?"
तो बाप्या पक्कीच्या जवळ आला आणि पक्कीची गचांडी धरून त्याने त्याला धक्का मारून ढकलले.
दुसरा बाप्या पहिल्याला म्हणाला. "मारत्या, काय पोरांच्या नादी लागलायसा. जा रे पोरांनो फुटा आता."
पक्कीने स्वतःला सावरले, कपडे झाडले आणि त्या दोघांकडे जळजळीत कटाक्ष टाकून तो विनुला म्हणाला, "चल."
शाबास पक्की! कधी कधी माघार घेणे ह्यातच शहाणपण असते हे पक्कीला पक्के माहित होते. माघार घेण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही लढाई हरला आहात.
पक्की परतायचे केवळ नाटक करत होता. त्याला त्या दोघा मवाल्यांचा संशय आला होता. कोण असतील ते? पक्की आणि विनुला पाहून त्याना एव्हढा राग का आला होता? चोरट्या दारूचा, मादक पदार्थांचा किंवा स्मगलिंगचा धंदा करणारे असतील काय? काहीही असो त्यांच्यावर नजर तर ठेवायला पाहिजे.
परतीच्या रस्त्यावर असलेल्ता वडाच्या विराट झाडाच्या मागे त्याने विनूचा हात धरून त्याला ओढले. त्या झाडाच्या कित्येक पारब्यांची झाडे झाली होती. त्यात लपून त्या दोन उपटसुभांवर वर नजर ठेवण्यासाठी ही जागा चांगली होती.
टेकडीवरच्या पायवाटेने ते दोघे गुंड चालत होते. एकाने मागे वळून बघितले. ती दोन मुलं दिसत नव्हती. तेव्हा ते डाव्या बाजूने जंगलात घुसले. पक्कीच्या दृष्टीआड झाले.
विनू म्हणाला, "चल पक्की, जाउया आता," जितक्या लवकर तिथून जाता येईल तितक्या लवकर त्याला घरी परतायची घाई झाली होती.
"विनू, घाई बको. ते बघ. ते दोघे जंगलातून बाहेर आले आहेत. आता तर बिलकुल हालचाल करायची नाही. "
ते जेव्हा त्या वडाच्य झादासमोरून जात होते तेव्हा विनूच्या जिवात जीव नव्हता. त्याचा स्वतःवर भरोसा नव्हता, त्याचवेळी त्याला शिंक आली तर? पण सुदैवाने तसं काही झाले नाही.
पण पक्की काय करत होता? मला माहित नाही, पण एक गोष्ट निश्चित होती की पक्की सगळे काही बघत होता, नजरेने टिपत होता. मेंदूत साठवत होता.
अखेर पक्की आणि विनू लपाछपीतून बाहेर पडले आणि घरी परतले.
घरी इन्स्पेक्टर कांबळे आणि पक्कीचे बाबा बाप्पा मारत होते. कांबळे काका आले की पाक्की खुश! कारण काकांच्या चोर शिपायांच्या सुरस आणि रम्य कथा ऐकायला पक्की अधीर असे.
काका सांगत होते.
"भाऊ साहेब,(म्हणजे पक्कीचे बाबा, बरं का ) काय सांगू, ह्या चोरांनी पुन्हा धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. काल पहा तिसरी चोरी झाली. सरदार उकिडवे जहागिरदारांच्या चिरेबंदी वाड्यावर दरोडा पडला. चोरटे वाड्याची मागील भिंत चढून आत शिरले आणि त्यांनी बाईसाहेबांची दागिन्याची पेटी पळवली. सगळे गाढ झोपलेले. कुणाला पत्ता पण लागला नाही. जहागिरदारांनी पार डीएसपी पोत्तर कन्प्लेंट केली आहे. काय करावे, कसे पकडावे चोरटे, काही समजत नाही, झोप उडाली आहे माझी."
पक्कीच्या मनात विचारसत्र सुरु झाले. ते दोघे तर नसतील? दिसत तर होते तसे. सांगावे का काकांना?
अखेर निश्चय करून काकांना भुताळी टेकडीवरचा किस्सा ऐकवला.
पक्कीच्या गोष्टीत काकाना काही खास इंटरेस्ट वाटला नाही. असतील कोणी तरी दारुडे.
"तुला धक्का देऊन पाडले त्यांनी? " काकांनी सहज विचारले.
"हो ना. आणि त्याच्या हाताला सहा बोटे होती."
काका एकदम उडी मारून उभे राहिले.
"सहाबोट्या!? अरे चोरा. पुन्हा इकडे आला आहेस. माझ्याशी गाठ आहे. चल पक्की, विनू भाऊसाहेब आपण आत्ताच्या आत्ता भुताळी वर जाउया."
काकांनी सगळ्यांना जीपमध्ये बसवले, जाताना चौकीतून दोन हवालदारांना उचलले आणि जीप भरधाव टेकडीकडे सोडली.
"काका , अजून एक. जाताना त्यांच्या हातात एक पिशवी होती. पण जाताना मात्र हात रिकामे होते."
"पक्की पक्की. मला सगळे समजले."
पक्कीने प्रथम त्याना ते वडाचे झाड दाखवले. "इथे आम्ही लपलो होतो."
सगळे जन पुढे चालत गेले. पावसाळा असल्यामुळे रस्त्यावर चिखल झाला होता.
"हा हा इथेच ते डावी कडे वळून जंगलात घुसले. ह्या पहा त्यांच्या बुटांच्या खुणा, इथपर्यंतच आहेत. पुढे नाहीत. " पक्की उत्साहित होऊन भराभरा बोलत होता.
तिथेही एक वडाचे महाकाय झाड होते. तिथेच ते दोघे थांबले असणार! काकांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातली.
"पाटील, इकडे ये, ह्या झाडाच्या ढोलीत बघ काही आहेका? पण जरा जपून, साप वगैरे काही असायचा."
पाटीलने ढोलीत काठी घालून हलवले. साप वगैरे कोणी नव्हते याची खात्री झाल्यावर आत हात घाऊन चाचपडले आणि पिशवी बाहेर काढली आणि इन्स्पेक्टरला दिली. आत जहागीरदारीण बाईसाहेबांच्या दागिन्यांची मखमली पेटी होती.
पोलिसांची खात्री होती की सहाबोटया आणि त्याचा साथीदार दागिन्याची पिशवी घेण्यासाठी दोब चार दिवसात टेकडीवर चक्कर मारणारच. म्हणून त्यांनी चोरांना पकडण्यासाठी सापळा लावला. पोलीस त्याच वडाच्या झाडामागे लपले होते जिथे पक्की आणि विनू लपले होते. चोर अलगद पोलिसांच्या सापळ्यात अडकले.
दुसऱ्या दिवशी सरदार उकिडवे पक्कीच्या घरी आले. त्यांच्या हातात पेढ्याची मोठी बॉक्स होती.
पक्कीच्या बाबांच्या हातात बॉक्स देऊन ते म्हणाले, "तुमचा पक्की खूप हुशार आहे." आणि मग कोटाच्या खिशातून एक पाकीट काढून ते म्हणाले , "हे पक्कीचे आणि विनुचे बक्षीस!"
"काय आहे त्यात?"
"एक लहानसी गिफ्ट. फक्त ५०० रुपये."
"थॅब्क्स बट नो." पक्कीने विनय पूर्वक बक्षीस नाकारले.
आता तर सरदारांकडे पक्कीचे कौतुक करण्यासाठी शब्दच नव्हते.
पण
दुसऱ्या दिवशी दुपारी पक्कीच्या घरी कुरिअर बॉय आला. पक्की साठी पार्सल होते. तुम्हाला काय वाटते? पार्सलमध्ये काय असेल? मी सांगतो. पार्सल मध्ये "भारतातील प्राणी, पक्षी आणि वनस्पती कोश " नावाचे रंगी बेरंगी जाडजूड पुस्तक होते. सरदार उकिडवे ह्यांच्याकडून भेट.
तर प्लीज तुम्ही पक्कीला डिस्टर्ब करू नका. कारण सगळा कोश वाचल्याशिवाय पक्की कुणाशीही बोलणार नव्हता. अगदी विनूशीही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो, पुरंदरे आभार,
मी लिहिलेले ही पक्कीची चौथी कथा, ती आवडली वाचून छान वाटले.