Submitted by किरण कुमार on 6 August, 2026 - 06:03
मला हवे जे अजून काही कोठे घडले होते
भिंतीवरचे कॅलेंडर ते फक्त बदलले होते
उगाच नाही बसल्या बसल्या ठसका आला आता
फुफुसामध्ये तिचेच काही श्वास अडकले होते
वधू बनुनी घरात माझ्या कैक वेदना शिरल्या
रुखवत जेथे मी कवितांचे छान सजवले होते
अभंग त्याचे मनामनावर किती कोरले गेले
इंद्रायणीत बहुधा त्याने शब्द बुडवले होते
वृद्धाश्रमातल्या अश्रूला प्रश्न बापुडा पडला
काय पेरले होते आणिक काय उगवले होते
कोरडवाहू शेती आणिक डोळ्यामध्ये पाणी
तिथे ढगाला बांधावरती कुणी अडवले होते
निवडणुकीच्या तोंडावरती श्रेय पाहिजे त्यांना
म्हणून बहुधा ह्या रस्त्याचे काम रखडले होते
- किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा