पेल्यातलं वादळ

Submitted by किरण कुमार on 5 August, 2026 - 05:31

"तुझ्या नवऱ्याला मी एका बाईबरोबर लक्ष्मीरोडला पाहिलं आज शॉपींग करताना, लक्ष दे बरका त्याच्याकडे, आज जरा गडबड आहे. उद्या निवांत बोलते तुझ्याशी."
गाडेबाईनी दिपाला काल फोनवर असे काही सांगितल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. आज सकाळपासूनच घरातल्या भांड्यांचा आवाज वाढला होता. मुलांनी अमुक भाजी नको म्हटल्यावर "जे केले आहे ते खा गुपचूप" असा सज्जड दम भरला गेला होता.
"आम्हीच मर मर मरायचं, आम्हाला कुठं शॉपींगला न्या म्हटलं तर लय कामं निघत्याय ऑफिसची. त्या सटवीबरोबर बरं वेळच वेळ असतो हिंडायला"
समीरच्या कानावर अशा बऱ्याच वाक्यांची सरमिसळ सकाळपासून कानावर पडत असली तरी त्याला त्याचे फार काही विशेष वाटले नव्हते. नेहमीप्रमाणे पुस्तकात तोंड खुपसून त्याने दिपाकडे दूर्लक्ष केल्याने तिची अजून चिडचिड होत होती.
"कोणाशी बोलतेय मी, भिंतीशी का? कोण होती ती बाई आणि काय शॉपींग करायची होती तुम्हाला?" दिपाचा राग 'सातवे आसमान' वर पोहचला होता.
"आता कोण भेटलं तुला कान भरवायला, कुणी काहीही बरळतं आणि तू विश्वास ठेवतेस, कसली शॉपींग, कोण बाई?" समीर अगदी शांतपणे तिच्यासमोर असूनही पुस्तक वाचत असल्याचा आव आणत होता. खरे तर कुणी हिला सांगितले असेल, काय काय सांगितले असेल अशा विचारातच तो बुडाला होता. काल रात्री दिपाने त्याची बॅग तपासली, फोन तपासला, खिसे चाचपले पण तिला ठोस असे काही सापडले नव्हते कदाचित म्हणूनच नवऱ्याने स्वतःहून सांगावे या अपेक्षेने तिचे केविलवाणे प्रयत्न चालू होते. मुलांची शाळेची बस आली आणि दोन्ही मुले शाळेत गेली. घरात एकटे सापडलो तर भांडण वाढेल याची पूर्वकल्पना समीरला असल्याने त्याने ऑफीससाठी आवराआवर सुरु केली.
"मला लवकर जायचे आहे ऑफीसला, डबा भर लवकर" समीर अजूनही काहीच घडले नाही या अविर्भावात वावरत होता.
"हो तर, ती सटवी वाट बघत असेल ना, ऑफीसला जाणार आहे की अजून कुठे फिरायला जायचे असेल?"
"अग माझी आई, चल माझ्याबरोबर म्हणजे कळेल तुला कुठे चाललो आहे ते, काय डोक्याला शॉट लावला आहे सकाळपासून, उगाच काहीतरी खुळ डोक्यात घ्यायचं आणि बडबड करायची, देते आहेस का डबा की निघू तसाच"
"तिच्याबरोबर हॉटेलात जेवायचं असेल ना, मग कशाला पाहिजे डबा" दिपाच्या तोंडाचा पट्टा काही थांबायचे नाव घेत नव्हता.
समीरने स्वतःच कष्ट घेऊन डबा भरला आणि तो घरातून निसटला.
अशा नाजुक गोष्टीत एकमेकांचा सल्ला घेण्यासाठी बायकांची एखादी खास मैत्रीण असते तशी चौथ्या मजल्यावर राहणारी नैना होती. समीर गेल्यानंतर दिपाने नैनाला घरी बोलविले आणि कालच्या फोनबद्द्ल सांगू लागली. खरे तर अशा वेळी धीर देऊन कानावर आलेल्या बातम्या खऱ्या की खोट्या याची शहानिशा करण्याचा सल्ला देण्याऐवजी अशा मैत्रिणी सुतावरुन स्वर्ग गाठल्यासारख्या भलत्या सलत्या कथा रचायला लागतात.
"अगं, या पुरुषांचे काय खरे गं, आपल्याला सांगतात एक, बाहेर करतात एक, आणि आपण कुठं कुठं लक्ष घालणार, घरची कामं, पोरांची शाळा त्यातच दिवस जातो निघून आपला, पण गाडेबाई खरे बोलत असेल ना गं?"
"ती कशाला खोटं बोलेल माझ्याशी, तिचे दुकान आहे म्हणून जायला लागतं तिला लक्ष्मीरोडला, तिकडच बघितलं असेल यांना."
एकंदरीत सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन नैना बोलू लागली " पण तुला काही शंका वगैरे आली का एवढ्यात, म्हणजे तो फोनवर कुणाशी बोलताना वगैरे, किंवा अचानक छान रहायला लागला, नवीन परफ्युम, कपडे आणले वगैरे असे काय?
बायकांच्या डोक्यात असे कुणी काय घातले तर बायका आपोआप साखळी जोडायला चालू करतात.
"तसे काही नाही पण त्याला क्रिकेटची आवड आहे म्हणून मागच्या महिन्यात शूज आणि चार पाच टी शर्ट घेतले आहेत. अधेमधे टी शर्ट जीन्सवरपण ऑफिसला जायला लागला आहे आजकाल." दिपाचे बोलणे नैना एखादा आवडता चित्रपट पाहिल्यासारखा मन लावून ऐकत होती.
"मग तर बाई लक्ष ठेव त्याच्यावर, दर दोन तासांनी व्हिडीओ कॉल करत जा, तू फोन आलेला त्याला सांगायचं नव्हतं लगेच, आता तो सावध झाला असेल, तुला लगेच काही क्लू मिळणार नाही. सध्या असे दाखव की तुला कूठलाच संशय नाही. जे चाललय ते चालू दे, बघ सात आठ दिवसात काही ना काही धागा लागेल हातात." नैना अगदी मोठ्या अनुभवी बाईसारखे दिपाला समजून सांगत होती.
डोळ्यातील बुबुळं कपाळाच्या दिशेने वर नेत दिपाने "हं" एवढाच प्रतिसाद दिला.
"चल मी निघते, पोरीला शाळेतून आणायला जायचे आहे. मी सांगितले ते लक्षात ठेव" नैना मार्गस्थ झाली.

समीरच्या कामाचा व्याप बराच वाढला होता, चाकणचा ब्रँच मॅनेजर सोडून गेल्याने त्याला भोसरी आणि चाकण दोन्ही ब्रँचचे काम करावे लागत होते. त्यात दिपाच्या कानात कुणी काय भरवले त्यामुळे कालपासून तिचे वागणे बदलल्याने त्याला वाईट वाटत होते. कदाचित गेल्या काही महिन्यात आपण कुटुंबासोबत कुठे फिरायला गेलो नाही म्हणून दिपा अशी वागत असावी असेही त्याला वाटले. लवकरच एखादी ट्रीप करु असे त्याने मनोमन ठरवले.
संध्याकाळी घरी आल्यावर समीरला आश्चर्याचा धक्का बसला. दिपाने चिकन बनवले होते. तिच्या चेहऱ्यावर स्मित होते. सकाळी जाताना हीच होती का अशी शंकाही त्याला आली. हात पाय धुतल्यावर त्याने सोफ्यावर बसून टीव्हीचा रिमोट हातात घेतला.
" काय मग, गेलं का डोक्यातून जे काय भरलं होतं ते, कुणी काय सांगितलं होतं आता?"
"कुणी नाय" दिपाने ताट वाढायला घेतले. नैनाने सांगितलेल्या गोष्टी मात्र तिच्या डोक्यात फिरत होत्या. ती आता कुठलाही संशय नाही असे छान वागू लागली. पुढचा आठवडाभर घरातील वातावरण चैतन्यमय राहिल्याने समीरलाही बायकोचा कुठलाही संशय नसल्याची खातरी झाली.
नैना तशी रोज आढावा घेण्याचे काम उत्साहाने करत होती. "काही मिळाला का गं क्लू" या वाक्यावर "नाही ना अजून काहीच" हे उत्तर येत होते. या एवढ्या गोंधळात गाडे बाई त्या फोननंतर गायब झाली होती. तिने दुसऱ्या दिवशीही फोन केला नव्हता याचे दिपाला थोडे आश्चर्य वाटले. तिने गाडेबाईला दिवसभरात चार वेळा कॉल केला होता पण एकदाही कॉल कनेक्ट झाला नव्हता. बहुतेक ती रेंज नाही त्या ठिकाणी असावी असे दिपाला वाटले. पुढे दोन दिवसांनीपण गाडेबाईचा कॉल न लागल्याने दिपा अजून अस्वस्थ झाली. एका दुपारी नैना घरी आल्यावर 'आपण गाडेबाईच्या घरी जायचे का ?' अशी विचारणा तिने केली त्यावर 'संध्याकाळी जाऊ' असे नैनाने सांगितले. गाडेबाईचे घर तसे गाडीने दहा मिनिटांच्या अंतरावर असल्याने त्या दोघी संध्याकाळच्या सुमारास तिच्या घरी पोहचल्या.
घर आणि दुकान समोरासमोर असणारी गाडे बाई अंगणातच भाजी निवडत बसली होती. या दोघींना पाहताच ती उठून उभी राहिली. "काय दिपाली, नैना आज इकडं कुठं वाट धरली म्हणायची." तिच्या अशा बोलण्याने दिपा थोडी गोंधळली.
"इकडं कुठ म्हणजे, तूच तर फोन केला होता ना दिपाला तिच्या नवऱ्याला एका बाईबरोबर पाहिलं म्हणून लक्ष्मीरोडला शॉपींग करताना" नैनाने आता गुंता सोडवायला पुढाकार घेतला होता.
"बया, मी कशाला कॉल करु हिला. मी त्या दिपाली ठोकळला कॉल केला होता. ही दिपाली पाटील हाये. हिच्या नवऱ्याला वेळ असतोय व्हय फिरायला कामातनं, पार रात व्हती यायला घरी."
खरे तर दिपापेक्षा नैना आता जास्त चिडली होती. "तुझा फोन आण इकडे भवाने" तिने गाडेबाईला आदेश दिला.
नोकियाच्या त्या फोनची स्क्रीन तशीपण फार अंधुक दिसत होती. आवाजही नीट येत नाही असे गाडेबाईनेच सांगितले. त्यात तो फोन पावसात भिजल्यामुळे चार पाच दिवस बंद होता. तरीही फोन थोड्या वेळापूर्वीच कसाबसा चालू झाला होता. नैनाने कॉल हिस्ट्री उघडली. गेल्या सोमवाच्या यादीत दिपाली नाव तिला दिसले.
"अगं टवळे हा कॉल काय तुझ्या आईने केला होता का, बघ की?"
"अगं पण मी ठोकळला लावला होता फोन" गाडेबाईच्या उत्तरावर नैनाचा पारा अजून चढला, पण तिने पुढे काही बोलण्याऐवजी "ठोकळचा नंबर काय नावाने सेव्ह आहे याच्यात" हा प्रश्न टाकला तेव्हा तोही दिपाली नावाने सेव्ह असल्याचे नैनाच्या लक्षात आले.
"अग दिपा या भवानीने दोन्ही नंबर दिपाली नावाने सेव्ह केले आहेत आणि त्या दिवशी ठोकळ ऐवजी तुला फोन लावला होता हिने.एखाद्याचा संसार उध्वस्त करेल ही बाई, हिच्याशी काही संबंध ठेवू नको यापुढे. चल आता इथून"

"चुकुन लागला गं हिला फोन, नको आमच्यात भांडणं लावू" म्हणत गाडेबाईने सारवासारव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

गाडेबाईच्या 'मी कशाला कॉल करु हिला' या वाक्यानंतरच दिपा आपल्याच जगात हरवली होती. आपल्याकडून फार मोठी चूक झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. अपराधीपणाच्या भावनेने तिच्या तोंडून शब्द फूटत नव्हता. नैनाने दिपाला गाडीवर बसवले आणि घर गाठले.
"दिपा, आपणच मूर्ख आहोत बघ, कोणाच्याही बोलण्यावर सरळ विश्वास ठेवतो, तुझ्या नवऱ्याला काय वाटेल गं हे सगळे कळाल्यावर, जाऊ दे त्याला सांगूच नको काय घडलं ते"
"हं" एवढाच प्रतिसाद दिपाने दिला खरा पण संध्याकाळी एकांतात घडलेला सगळा प्रकार तिने समीरला सांगितलाच.
"अगं माझी शक्की पागल बायको, कुणी काही बोलल्यावर त्याची शहानिशा करावी, विघ्नसंतोषी लोकं कमी असतात का जगात"
समीरने दिपाची समजूत काढली होती.

समीरने एव्हाना सुटकेचा निश्वास टाकला होता. तसे बायकोने संशय घेण्याची ही पहिली वेळ नव्हती. या अधीही अशा घटना घडल्या होत्या.

'आता बाहेरची लफडी कमी केली पाहिजेत, सगळी माणसं गाडे बाईसारखी दोन हजारात मॅनेज होणार नाहीत' असे समीर मनातच पुटपुटला आणि पेल्यातलं वादळ थोपल्याच्या आनंदात झोपी गेला.

- किरण कुमार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users